बुडापेस्टमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा हंगेरीच्या नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होऊन ७२ तासही उलटलेले नव्हते. त्या शपथविधीच्या कहाण्या रस्तोरस्ती चघळल्या जात होत्या. अनेकांनी पाहिला असेल तो शपथविधी सोहळा. नवे पंतप्रधान पीटर मग्यार आणि त्यांचे काही मंत्री शपथविधी सोहळ्यात दणकून नाचले वगैरे. हजारो जण सहभागी झाले मग या उत्सवात. ताजा सत्ताबदल सामान्य हंगेरीयनांनी भरभरून उत्साहात साजरा केला.
हंगेरीला भेट देताना हा काही विचार मनात नव्हता. या वर्षीच्या युरोपीय भटकंतीत मध्य युरोपचा नकाशा डोळ्यासमोर होता. त्यातही ज्यांनी साम्यवादी राजवट अनुभवलीये अशा देशांना भेट द्यावी असं मनात होतं. या यादीत हंगेरी बसवण्यामागे आणखी एक कारण होतं.
ते म्हणजे डॅन्यूब. इतकी रोमॅण्टिक नदी दुसरी कोणती नसेल. काही नद्या अजस्र असतात. त्या भीती घालतात. काही रोड. जवळ गेलं तर ‘‘बाबा… काही पोटाला द्या की…’’ असं त्याच म्हणतील असं वाटतं. कीव येते त्यांची. काही फारच सोवळ्या. एखाद्याची आलवणातली आजी सतत देवघरात दिसावी तशा दिसतात. कुठले तरी स्तोत्र म्हणत पूजाअर्चा करत बसलेल्या. त्याही नकोशा वाटतात. डॅन्यूब या सगळ्यापेक्षा वेगळी. कायम तरुण राहणार्या मैत्रिणीसारखी. तिच्या भेटीची संधी मिळेल तिथे साधायची हा माझ्यापुरता नियम. तो खूप कसोशीनं मी पाळतो. अगदी वर र्हाइनच्या खोर्यात जर्मनी-स्वित्झर्लंडच्या सीमेवर पहिल्यांदा तिला पाहिलं. मग जर्मनीत, ऑ्ट्रिरया वगैरेतही तिची भेट झाली. ही नदी जवळपास सगळ्या युरोपला कवेत घेते. अगदी युक्रेनलाही भिजवते. तिकडे कधी जाणं होईल तेव्हा होईल. तूर्त र्हाइनची जमेल तिथं गाठ घेणं नेमानं सुरू आहे. खरं तर ही काही युरोपातली सगळ्यात मोठी वगैरे नदी नाही. तो मान रशियातल्या ‘व्होल्गा’चा. पण ती कम्युनिस्टांच्या कराल कोंडीत अडकलेली.
क्रांतीबिंती तिनं अनुभवलेली. त्यात लहानपणी ‘व्होल्गा लाल’ झाल्याचं वाचलेलं असतंच आपण. त्यामुळे तिच्याशी काही दोस्तान्याची संधी मिळालेली नाही. मिळाली तरी किती मोकळेपणानं ती संवाद साधेल हाही प्रश्नच. तिचा सगळा इतिहासच कष्ट-वेदनांचा. त्यामुळे आलेलं एक गांभीर्य व्होल्गाच्या व्यक्तिमत्त्वात सतत दिसतं. डॅन्यूब अजिबात अशी नाही. मानवी विचार करायचा तर व्होल्गा म्हणजे मीनाकुमारी आणि डॅन्यूब ही मधुबाला. कधी तरी कोणाला तरी ‘अच्छाजी मै हारी चलो…’ असं म्हणाली असेल किंवा आपल्या अंगाखांद्यावर अनेकांना असं म्हणायला तिनं उत्तेजन दिलं असेल.
… तर या निवांत आणि तरीही उत्फुल्ल डॅन्यूबच्या किनार्यावर हंगेरीच्या पार्लमेंटची दिमाखदार इमारत उभी आहे. डॅन्यूब किनारी पार्लमेंट! पार्लमेंटच्या सौंधातनं समोर पाहिलं की डॅन्यूब. एखाद्या तरुण मुलीच्या अडनिड्या वेळेतल्या प्रवासाकडे वडिलांनी वळणावरनं लक्ष ठेवावं तसं पार्लमेंट डॅन्यूबकडे पाहत असतं. आणि हे वडील काळजीनं ‘म्हातारे’ होणार नाहीत याची काळजी डॅन्यूब घेते. पार्लमेंटच्या समोर एक टेकडी. तिथं चर्च. पलीकडच्या अंगणात बसून इकडे बघणारे आजोबा असावेत तसं दिसतं ते. आणि या दोघांमधला आसमंत तरुण-तरुणींच्या उत्साहात न्हाऊन निघालेला. हा मानवी उत्साहाचा प्रवाह डॅन्यूबशी स्पर्धा करेल असा. मुळात नदीकाठी पार्लमेंट असणं या केवळ कल्पनेनंसुद्धा छान वाटतं. सोनेरी रंगात न्हाऊन निघालेली आकाशात सुळके गेलेली भव्य इमारत कमालीची प्रेक्षणीय आहे. त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे ती जिवंत आहे.
पार्लमेंटच्या आसपास असा जिवंतपणा फार महत्त्वाचा. एक तर बर्याच ठिकाणी जनतेच्या प्रतिनिधीगृहाच्या या इमारती सीमेवरच्या जवानांप्रमाणे गोळी घालायला सज्ज सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असतात. जवळ येणारा प्रत्येक जण हा जणू जिवावर उठलेला आहे अशी या सुरक्षारक्षकांची देहबोली. त्यात लोकशाहीचं मंदिर वगैरे असेल तर मग प्रश्नच मिटला मैत्रीचा. मग फक्त ‘पावित्र्य’, ‘गांभीर्य’ जपणं वगैरे.
ती भानगड बुडापेस्टमध्ये पार्लमेंटच्या आसपास अजिबात जाणवली नाही. मोजून चार सुरक्षारक्षक. चार कोपर्यात चार. दिमाखदार दिसणारे. एकदम फिट. बंदुका वगैरे काही नाहीत. बाकी योग्य ठिकाणी इशारे, साखळ्या इतकंच. एकाला विचारलं तर म्हणाला… ‘‘सुरक्षा ‘दाखवाय’ची गरज काय… कॅमेरे लावलेले आहेत सगळीकडे. ‘आतनं’ लक्ष ठेवणारे असतात त्यांचं काम करत चोवीस तास.’’
वातावरण इतकं मोकळं की इमारतीच्या नदीच्या बाजूला उतरणार्या पायर्यांवर पार्लमेंटच्या साक्षीनं निवांत प्रणयी युगुलं बसलेली. ते पाहून तिथल्या गार वार्यातही घामाची एक लकेर पाठीवरनं घरंगळली. बाप रे… आपल्याकडे असं काही झालं तर त्या बिचार्यांचे आपले नैतिक-सा्त्विवक काय हाल हाल करतील या भीतीनं घाम फुटला! पण तिथले हे तरुण निर्धास्त होते. परत समोर नदीच्या पात्रात झुलणार्या बोटींवर डॅन्यूबच्या पवित्र पाण्याचे ‘तीर्थ’रूप झुरके घेण्याची राजरोस सोय. पलीकडच्या बोटीवर तरुणांचा एक ग्रुप धमाल नाचत होता. हे सगळं या पार्लमेंटच्या नाकाखाली. काय हा संस्कृतीसंहार…!
तर पार्लमेंटची ही गॉथिक शैलीतली इमारत रात्री अशी कलात्मक उजळते की समोरच्या डॅन्यूबमधलं तिचं प्रतिबिंब पहावं की तिला पहावं असा प्रश्न पडतो. लवकरच सव्वाशे वर्षांची होईल ती. पण तरी नवीन पार्लमेंट बांधावं आता असं काही तिथं कुणाला अजून तरी वाटलेलं नाही. बुडापेस्टकरांना या इमारतीचा भयंकर अभिमान. इतका की त्यांनी नियम करून टाकलाय… या शहरातली कोणतीही इमारत पार्लमेंटपेक्षा उंच असणार नाही. कळल्यावर आश्चर्य वाटलं. पण खरा धक्का बसला तो हा नियम काटेकोरपणे अमलात आणला जातो हे पाहून. त्यामुळे सगळ्या इमारती पार्लमेंटपेक्षा अंगुळभरका असेना पण उंचीनं कमी. अपवाद एकच. नदीपल्याडच्या डोंगरावरचं चर्च. पण तेही पार्लमेंटच्या उंचीशी बरोबरी करतं. पार्लमेंटला खुजं नाही करत ते. धर्मसत्तेला राजसत्तेपेक्षा मोठं होऊ न देण्याची काळजी हंगेरीच्या राज्यकर्त्यांना असणार.
तर पीटर मग्यार आता या हंगेरीचा राज्यकर्ता. खरं तर त्याचा पंतप्रधानपदी शपथविधी होऊन तीन दिवसही व्हायचे होते; पण कुठेही त्याचं कसलं पोस्टर नाही की विजयाबद्दल अभिनंदन नाही किंवा ‘पीटर साब आगे बढो…’ असं आश्वासन देणार्यांच्या आरोळ्या नाहीत. ज्यांना राजकारणात काही रस नसतो त्यांना कळलंही नसतं या भूमीनं नुकतंच एक भलं मोठं सत्तांतर अनुभवलंय ते. व्हिक्टर ओर्बान यांची जवळपास १६ वर्षांची मजबूत राजवट या तरुणानं किरकोळीत उलथून पाडली. ओर्बान कुठे आणि हा ‘कलका लौंडा’ कुठे! पण वादळात पाचोळा उडून जावा तसं ओर्बान या निवडणुकीत हरले. हे कसं काय शक्य झालं… हे कुतूहल १२ एप्रिलच्या मतमोजणीपासनंच मनात निर्माण झालेलं. आमचं प्रवासाचं नियोजन त्याआधीचं. त्यात हा काही विषय नव्हता. पण निकालामुळे तो असा अचानक समोर आला. मग इथूनच काही खटपट केली आणि हंगेरीत असताना काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल का याची चाचपणी केली. ते म्हणाले अधिकृत मुलाखत वगैरे नाही, गप्पा मारायला आलात तर चालेल. म्हटलं फारच छान. या गप्पा फारच रंगल्या. पंतप्रधान ओर्बान यांना हरवणारा पीटर मग्यार हा पंतप्रधानांच्याच पक्षाचा आहे, हे माहीत होतंच. पण इथे राहून जे काही दिसलं नव्हतं, दिसलं नसतं… ते या भेटीगाठीतनं उलगडत गेलं. फारच भारी आहे, जे काही झालं ते. विशेषत: मग्यार यानं बदलासाठी निवडलेला मार्ग आणि त्यासाठी वातावरण निर्मितीची त्याची कला.
वास्तविक मग्यार हा काही गरीब किंवा नाही रे वर्गाचा, व्यवस्थेला आव्हान देणार्यांचा प्रतिनिधी वगैरे अजिबात नाही. तोही चांगला तालेवार घरातला. वडिलांकडचे सगळे वकील. किंवा न्यायाधीश. आजोळकडच्यांना तर थेट राजकारणाचा अनुभव. तो आणि त्याची बायको यांचा या सगळ्याशी कसलाही संबंध नव्हता. तो, त्याची दोन दशकभराची बायको ज्युडिथ वार्गा आणि तीन मुलं सुखात होते ब्रुसेल्समध्ये. तीही अशाच प्रस्थापितांतली. स्वत: उत्तम वकील. पीटरही वकील. मायदेशी होता तेव्हा सरकारविरोधातले खटले फुकट चालवायचा. तिथल्या ‘आंदोलन जीवीं’चा आधार होता तो. राजकारणाशी संबंध तेवढाच. पण पीटरला नाही तर, ज्युडिथला पहिली राजकारणात येण्याची संधी मिळाली. ओर्बान यांनीच ती देऊ केली. म्हणून मग ते आले मायदेशी. ज्युडिथ मंत्री झाली ओर्बान यांच्या मंत्रिमंडळात. नंतर पीटरलाही संधी मिळाली. आधी त्याच्या लाग्याबांध्यांमुळे तो तसाही वजनदार, आतल्या वर्तुळातला वगैरे मानला जात होताच. पण पद मिळालं आणि हे वजन चांगलंच वाढलं. पण स्वत:चा पक्ष काढावा किंवा पक्षाचं नेतृत्व करावं वगैरे काही त्याच्या डोक्यात नव्हतं. किंवा असलं तरी तोवर त्याच्या या इच्छा दिसून आल्या नव्हत्या.
तो अचानक राजकारणातला तारा वगैरे ठरला एकदम २०२४ साली. म्हणजे अवघ्या दोन वर्षांपूर्वी. एव्हाना पंतप्रधान ओर्बान यांचा खुंटा चांगलाच बळकट झालेला. ते २०१० साली पहिल्यांचा पंतप्रधान झाले. त्याआधी १९९८ सालीही या पदावर त्यांनी एक खेप काढलेली. परत पक्षाचेही अध्यक्ष. कडवे ख्रिश्चनवादी, कडवे उजवे असं काही वर्णन केलं जातं त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्या राजकारणाचंही. म्हणजे पीटरही याच उजव्या राजकारणाचा भाग होता. पण दुसर्या खेपेनंतर ओर्बान यांची राजवट अधिकाधिक संकुचित होत गेली. इतक्या मोठ्या पदावर इतका काळ राहायला मिळालं की विचारधारा बाजूला राहते आणि स्वत:चा बडेजाव महत्त्वाचा ठरतो. हा जगातला सार्वत्रिक अनुभव. समाजवादाची भाषा करणारे युगोस्लावियाचे माजी सर्वेसर्वा मार्शल टिटो यांची तर कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात ३४ शेतघरं (फार्महाऊसेस) होती असं तिथल्या एकानं सांगितलेलं. जनतेनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी, उधळपट्टीचं छानछौकीनं जगू नये, असा उपदेश करणारे मार्शल टिटो स्वत: मात्र रोल्सरॉइस शिवाय प्रवास करायचे नाहीत.
ओर्बान यांच्याबाबतही असं काही होत गेलं हंगेरीत. नेत्याचं अढळपद जितकं मजबूत तितका तो जनतेपासनं तुटत जातो हे वैश्विक सत्य हंगेरीतही दिसू लागलेलं. त्यात ओर्बान हे वयाच्या शतकापासनं पावशतकापेक्षा काही वर्षं दूर. आणि पीटर मग्यार हा वयानं तेजतर्रार म्हणता येईल असा. जेमतेम ४५-४६ इतकाच. त्याला आपल्या पंतप्रधानाचं जनतेपासनं तुटणं जाणवत गेलं. भौगोलिकदृष्ट्या आपण युरोपचा भाग आणि पंतप्रधान ओर्बान हे कडवे युरोपीय-संघविरोधी. युरोपमध्ये राहून युरोपियनांना विरोध करायचा आणि पाण्यात राहून माशांशी वैर पत्करायचं… हे दोन्ही एकच. त्यामुळे हंगेरीयन तरुणांची कोंडी होतीये, त्यांच्या रोजगार संधी कमी होतायत, व्यवसायसंधी आटतायत हे आपल्या वयस्कर पंतप्रधानांना कळत नाहीये, हे पीटरला कळू लागलं. हे कळणं इतरांना कळवण्यासाठी २०२४ सालचं प्रकरण त्याच्या हाताशी आलं.
झालं होतं असं की, त्यावेळी केटलीन नोव्हाक या अध्यक्ष होत्या हंगेरीच्या. त्यांनी आपला अध्यक्षीय अधिकार वापरून एका व्यक्तीवरचे गुन्हे माफ केले. ही व्यक्ती बुडापेस्टजवळच्या एका बालअनाथगृहाच्या संचालकाची प्रमुख. तिथं एक लैंगिक अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं. यात जवळपास १० मुलींवरच्या अत्याचाराचा प्रश्न होता. यातल्या काहींवर दबाव आणून आपल्या साहेबाविरोधातल्या तक्रारीच मागे घ्यायला लावल्या त्या व्यक्तीनं. तिच्यावरचे गुन्हे केटलीन यांनी अध्यक्षीय अधिकारात माफ केले. या माफीच्या निर्णयाला अनुमोदन दिलं कायदामंत्र्यांनी. कायदामंत्री कोण? तर ज्युडिथ वार्गा. म्हणजे पीटरची बायको. तिला पंतप्रधान ओर्बान यांच्याशी या विषयावर बोलताना पीटरनं ते ऐकलं. त्याला धक्का बसला. पण त्याहूनही त्यानं दिलेला धक्का अधिक मोठा. या पठ्ठ्यानं आपल्या बायकोचं अन्य एका मंत्र्यांशी या संदर्भात झालेलं संभाषण रेकॉर्ड केलं. म्हणजे पंतप्रधानांना लक्ष्य करण्यासाठी त्यानं बायकोशी बेईमानी केली. बायकोपेक्षा देशहित महत्त्वाचं वाटलं त्याला. त्यानं ते रेकॉर्डिंग पत्रकार परिषदेत वाजवलं. एकच खळबळ मग.
त्यानंतर मग त्याला हवं होतं तसं झालं. अध्यक्ष नोव्हाक यांना राजीनामा द्यावा लागला. पण त्याचबरोबर ज्युडिथनेही मंत्रीपद सोडलं. आणि मग तिनं नवरा पीटरलाही सोडलं. घटस्फोट झाला त्यांचा. पीटर लगेच तयार वैयक्तिक संसारापेक्षा देशाचा संसार किती महत्त्वाचा आहे वगैरे सांगायला. यानंतर पीटरचं रूपांतर पूर्ण राजकीय नेत्यात झालं. त्यानं आपल्या जुन्या पक्षातल्या पदांचे राजीनामे दिले आणि नवीन काही करण्याचा संकल्प सोडला. पंतप्रधान ओर्बान हे त्याचं लक्ष्य बनले. ‘‘मध्यमवर्गाची स्वप्न पूर्ण करण्याकडे लक्ष द्यायच्या ऐवजी पंतप्रधान दोन-तीन कुटुंबांच्या हिताला प्राधान्य देतायत,’’ असा आरोप ओर्बान यांच्यावर करायला त्यानं सुरुवात केली. हा आरोप पंतप्रधानांना खरोखर चिकटायला लागला. कारण खरोखरच ओर्बान यांच्या काळात काही विशिष्ट उद्योगसमूहांचंच भलं होताना दिसत होतं.
पीटरनं मग ओर्बान यांच्या विरोधात मेळावे आयोजित करायला सुरुवात केली. तुफान प्रतिसाद मिळू लागला. त्यात विशेष लक्षणीय होती ती तरुणांची उपस्थिती. जवळपास एक लाख तरुणांनी एक छदाम न घेता पीटरसाठी वर्षभर काम करायची शपथ घेतली. एक लाख तरुण ही संख्या हंगेरीसाठी फार मोठी आहे. हे तरुण मग सोशल मीडियात पीटरसाठी काय काय करायला लागले. नुसती राळ उडवून दिली त्यांनी. या तुलनेत ओर्बान तसे वयस्कर. त्यांना ही तरुणांची समाजमाध्यमी भाषा आणि उद्योग काही कळेनात. त्या तुलनेत पीटर नव्या दमाचा.
आपला हा नवा दम दाखवण्यासाठी त्यानं ड्रेस कोड ठरवला. शक्यतो पांढरा शुभ्र टीशर्ट, जीन्सची पँट आणि पांढरेच शूज. एकदम टेनिसपटू वाटायला लागला. शरीरानं तो फिट होताच. पण फिटनेस असा राजकीयदृष्ट्या कामाला येतो, हे त्याला लक्षात आलं. आणि त्या तुलनेत ढेरपोटे, काहीसे बेंगरूळ पंतप्रधान ओर्बान. पीटरची भाषाही तरुणांची. बघता बघता त्याचं गारूड तयार झालं हंगेरीभर. मग पायाला भिंगरी लावल्यासारखा तो फिरला. त्या इतक्याशा देशातलं गावन्गाव त्यानं पिंजून काढलं. त्याची हवा तयार झाली. त्यावेळी रोमानिया संदर्भातल्या एका मुद्द्यावर पंतप्रधान ओर्बान यांनी त्याच्या कोंडीचा प्रयत्न केला. या पठ्ठ्यानं ‘दहा लाख पावलं’ चालत रोमानियाच्या सीमेपर्यंत जात या मुद्द्याला उत्तर देण्याची घोषणा केली. खरोखरच चालत गेला तो. झकास वातावरण निर्मिती झाली. ओर्बान आणखी बचावात्मक वाटू लागले. पीटरनं मुद्दा केला होता तो परदेशी हस्तक्षेपापासून हंगेरीला दूर ठेवत स्वाभिमानी राजकारण करण्याचा. युरोपातनं येणार्या बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नावर तो आणि पंतप्रधान ओर्बान एकाच मताचे होते. हाही खरं तर ओर्बान यांच्यासारखा उजवा. पण ओर्बान यांनी आपलं स्वावलंबत्व लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आधार घेतला तो अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा. अध्यक्ष ट्रम्प ओर्बान यांची जाहीर भलामण करू लागले. खरं तर मुरलेल्या राजकारण्यांना अंदाज असतो (निदान असायला हवा) कोणाचं कौतुक हे टीकेपेक्षा वाईट ठरेल याचा. ओर्बान यांचा तो चुकला. आणि मग तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे चक्क प्रचारातच उतरले.
ओर्बान यांच्या बाजूनं ‘अगली बार…’चा नारा देत. पीटर यानं हाच धागा पकडला आणि परदेशी हस्तक्षेप होऊ देणार नाही याचा दावा करणार्या पंतप्रधानांसाठी परदेशी नेते कसे येतायत यावर राळ उडवली त्यानं. त्याच्या बाजूनं आणखी एक झालं. हंगेरीत डावे प्रभावी. पण त्यांनी ठरवलं निवडणुकीत उतरायचंच नाही. काहीही झालं तरी निवडणूक तिहेरी होऊच द्यायची नाही आणि मतविभाजन टाळायचं. वास्तविक पीटर उजवा. पण डाव्यांनी त्याला पाठिंबा दिला. बुडापेस्टच्या वास्तव्यात त्यातला एक भेटला. त्याला हे डावं-उजवं विचारलं. तर म्हणाला : ‘‘ओर्बान यांना काहीही करून हरवणं महत्त्वाचं होतं. नाही तरी आम्हाला सत्ता मिळणारच नव्हती… म्हटलं निदान मतविभाजन तरी टाळावं.’’
डावे इतके समजूतदार असणं तसं दुर्मीळच. असो.
इतकं झाल्यानंतर पीटर जिंकणार आणि ओर्बान हरणार हे उघड होतं. पण तरी सगळ्यांना धाकधूक होती. एक सरकारी अधिकारी म्हणाला…‘‘ ७५ टक्केच मतदान झालं तर ओर्बान जिंकणार… ७७ टक्क्यावर ते गेलं तर काटेकी टक्कर वगैरे… आणि त्यापेक्षा अधिक झालं तर पीटरच्या बाजूनं लाट…’’ असं समीकरण होतं. मतदान जवळपास ७९-८० टक्के इतकं झालं. नॅशनल असेंब्लीच्या १९९ पैकी १४१ जागांवर पीटरचा पक्ष जिंकला. आम्ही बुडापेस्टमध्ये पोहोचलो तेव्हा नुकताच एक प्रसंग घडलेला. मजेशीर आहे.
हंगेरीचा आपल्या ‘डीडी’सारखा सरकारी (किंवा अन्य कोणत्याही खासगी वाहिनीसारखा) एक न्यूज चॅनेल आहे. संपूर्ण निवडणुकांत आणि आधीही ओर्बान यांची सतत तळी उचलणं इतकीच त्याची पत्रकारिता. पीटरवर सतत टीका. निवडून आल्यावर पीटरनं या चॅनेलला मुलाखत दिली. मुलाखतकार इतकी वर्षं पंतप्रधान ओर्बान यांची निलाजरी चाटुगिरी करणारे न्यूज अँकर. त्यांना पीटरनं लाइव्ह घोळात घेतलं. तुम्ही कशी ओर्बान यांचीच सतत बाजू दाखवत होतात- माझ्यावर सतत कशी टीका करत होतात वगैरे… प्रसंग इतका बाका की हे न्यूज अँकर गयावया करू लागले. लंगडं समर्थन करू लागले. पीटर अजिबात चिडला वगैरे नाही. शांतपणे बोलत होता. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या लाइव्ह मुलाखतीत तो म्हणाला : ‘‘बंद करून टाकतोय तुमचं हे चॅनेल …!’’ त्यानं ते केलं. पूर्ण व्यावसायिक चेहर्यानं ते आता लवकरच सुरू होईल. यापुढे कोणत्याही सत्ताधीशाच्या तालावर त्यांना नाचावं लागू नये, असा बदल केला जातोय तिथं. पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीलाही जास्तीत जास्त दोन वेळाच ते पद मिळेल, असाही कायदा होतोय तिथं.
हे फारच कौतुकास्पद. सत्ताबदलाची मागणी करताना विरोधी पक्षात असताना एक आणि सत्ता मिळाल्यावर पुन्हा आधीच्या सत्ताधीशांप्रमाणेच… असं करायचं असतं हे अजून तरी माहीत नसावं पीटरला. संपूर्ण हंगेरीभर हे पीटरचे नव्या उत्साहाचे वारे अंगाला जाणवत होते. तिथलं हवामान अधिकच आल्हाददायक वाटत होतं त्यामुळे. या नव्या हंगेरीत भारत कुठे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
बुडापेस्टचे रस्ते प्रचंड रुंद आणि अगदी कर्कटकाने गोल केल्यासारखे आखीव-रेखीव चौक. त्या वर्तुळाच्या मध्यावरनं, कडेनं ट्राम जातायत, मोटारी आहेत… फोटो घ्यायचा मोह होतो. तो घेताना परिघावरच्या इमारती येतात फोटोत. त्या इमारतींवर बँक ऑफ चायना. बीवायडी. ह्युकोबाल्ट वगैरे भव्य फ्लेक्स. सगळे चायनीज. त्यावर विचारल्यावर मिळालेली माहिती चीन कुठे, आपण कुठे हा प्रश्न पुन्हा एकदा पाडणारी.
अशा महत्त्वाच्या रस्त्यांवरच्या फोटोत हमखास येतीलच येतील अशा सगळ्या इमारती चीननं विकत तरी घेतल्यात किंवा स्वत:च्या कंपन्यांसाठी भाड्यानं घेतल्यात. हेतू हा की चिनी प्रभाव लक्षात यावा. त्याहून पुढचा धक्का म्हणजे हंगेरीयन शाळांत चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशियस शिकवला जातो. सर्रास. ते ऐकल्यावर भारताचे इतिहास आणि वर्तमानातले चाणक्य वगैरे काय करतायत, हा प्रश्न पडला. तो तिथून दिल्लीतल्या संबंधित अधिकार्याला विचारला. तो म्हणाला ते त्याच्याच शब्दात याप्रमाणे : ‘‘आपण काय करणार? हंगेरीतल्या भारतीय राजदूताचं कल्चरल बजेट आहे दोन कोटी रुपये आणि चीनच्या राजदूताचं बजेट आहे ३० मिलियन डॉलर्स. म्हणजे तीन कोटी डॉलर्स. म्हणजे (डॉलरचं लवकरच शंभरीला पोहोचणं गृहीत धरलं तर) साधारण ३०० कोटी रुपये.’’
हा फरक ऐकल्यावर पुढे काही विचारायचं धाडस नाही झालं. हे असे जगात दिवे लावण्यापेक्षा निवडणूक आयोग, नियामक यांना मॅनेज करणं, पक्ष फोडणं वगैरे कित्ती सोप्पं, याची जाणीव स्पर्शून गेली.
एवढासा हंगेरी… पण सत्तांतराच्या आगेमागे काय आणि कसं घडतं ते इतकं सहज दाखवून गेला की ते सांगावंसं वाटलं. तेवढंच पर्यटनातलं पॉलिटिक्स… दुसरं काय!
युरोपातला एवढासा देश हंगेरी… शहर नियोजनात चोख
आणि ऐतिहासिक वास्तूंबाबत अभिमान बाळगण्याबरोबर त्यांचं सौंदर्यही जपणारा. पीटर मग्यार तिथं नुकताच निवडून आला. खरं तर त्याचा पंतप्रधानपदी शपथविधी होऊन तीन दिवसही झाले नव्हते, तेव्हाच झालेल्या तिथल्या भेटीत या ऐतिहासिक सत्तांतराच्या आगेमागे काय आणि कसं घडलं हे उमजत गेलं. मग नव्या हंगेरीत भारत कुठे, याचादेखील शोध सुरू झाला…
girish.kuber@expressindia.com
