बालमित्रांनो, कळी, फूल आणि फळ… हा निसर्गनियम आहे. प्रत्येक कळीचं फूल होतं, पण प्रत्येक फुलाचं फळ होतंच असं नाही. लवकरच चैत्र महिना सुरू होईल. आंबा, काजू, जांभूळ, जाम अशा झाडांना मोहर आला आहे. या मोहराकडे आपण लक्षपूर्वक बघितलं तर मोहर म्हणजे अनेक फुलांचा संच.

मोहरामध्ये अनेक छोटी छोटी फुलं एका देठावर फुललेली आपल्याला दिसतात, पण जेव्हा त्या झाडाला फळं धरतात, त्यावेळी फळांची संख्या फुलांच्या तुलनेत नेहमीच कमी असते. मग बघा बरं, ज्या फुलांची पुढे फळं होणार नाहीत अशांनी फुलायचंच नाही का? असं कसं होईल बरं! प्रत्येक कळीला आपलं फळात रूपांतर व्हावं असं वाटत असेलही कदाचित, पण फळात रूपांतर होण्यासाठीचा मधला टप्पा म्हणजे फूल असतं, तिचा ती विचार करते.

कळीचं जरी फळ होऊ शकलं नाही तरी तिची फूल ही अवस्थासुद्धा खूप मोहक असते. ही अवस्था जरी एका दिवसापुरती असली तरी तिला रंग, गंध, रूप यांची देणगी असते. ही फुलं आपला उत्साह, आनंद वाढवतात, मनाला चैतन्य देतात, उभारी देतात, तजेलाही देतात. भुंगे, फुलपाखरू, वेगवेगळे कीटक, निरनिराळे पक्षी यांना आकर्षित करतात. प्रत्येक कळी फुलताना ती काही फळाची अपेक्षा करत नाही, पण तिचं फुलणं हेच तिचं पूर्णत्व असतं. ती चहू अंगाने फुलल्यामुळे तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. इतरांना ऊर्जा देण्याची शक्ती तिला प्राप्त होते. त्यामुळे कळी कधीच फळाची अपेक्षा धरत नाही, फक्त चहू अंगाने फुलत जाते, तेच महत्त्वाचं असतं.

joshimeghana.23@gmail.com