भारतीय सांस्कृतिक परंपरेचा आजही शाबूत राहिलेला उत्तुंग आविष्कार म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत. आपापली सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख कायम ठेवून एकमेकांच्या सांस्कृतिक परंपरांचा आदर करणारी ही ‘गंगाजमनी’ परंपरा. तिचं हिंदी चित्रपटातील रूपडं असंच देखणं आहे.

मुंबईतील एशियाटिक सोसायटीत विठ्ठल सी. नाडकर्णी यांनी दिलेल्या व्याख्यानाचा भावानुवाद..

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

‘गंगाजमनी तहज़ीब’ किंवा ‘गंगाजमनी परंपरा’ हा शब्दप्रयोग सर्वाना माहीत आहे. आजच्या काळात अगदी ‘गूगल’द्वारे त्याची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न केला तर ही सांस्कृतिक परंपरा ‘भारतीय आणि अब्राहमी धर्माच्या संगमातून..’ घडल्याचा उल्लेख सापडला आणि मला ‘ब्रह्मी आणि अ-ब्रह्मी धर्म’ असा श्लेष करण्याचा मोह झाला, हे सोडा. पण गूगललाही मान्य दिसते की, भारतीयांचा दृष्टिकोन ‘वसुधैव कुटुंबकम्’ असा विशाल असल्याने ही सांस्कृतिक परंपरा इथेच आकाराला येऊ शकली! त्यामुळे आपापली सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख कायम ठेवून एकमेकांच्या सांस्कृतिक परंपरांचा आणि पद्धतींचा आदर करणे इथे शक्य झाले. या परंपरेचा आजही शाबूत राहिलेला उत्तुंग आविष्कार म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत. तेव्हा ही गंगाजमनी परंपरा आजही आहे ती कशी आणि तिच्या संदर्भात आपण कुठे आहोत, हे जाणून घेण्यासाठी संगीताकडेच कान द्यावा लागेल.

हिंदूुस्थानी शास्त्रीय संगीत म्हटले की घराणी आठवतात.. पण घराणे कोणतेही असो, तिथेही परंपरा आहे. मग ती आग्रा घराण्याचे थोर गायक आणि गुरू पं. श्रीकृष्णबुवा रातंजनकर यांची ‘सुमिर साहेब सुलतान’ ही बंदिश असो की ‘प्रथम धर ध्यान गणेश’ ही रामपूर-सहस्वान घराण्याचे उस्ताद इनायत खान यांची पेशकश असो.. एकमेकांचे सण उत्साहाने साजरे करण्यामध्ये जो सहजपणा असावा, त्याच सहजपणाने या बंदिशी आवडीने आणि रसपूर्णतेने गायल्या जात. बहुधर्मीयतेने ‘साजरे’ झालेले संगीत हा आपला जिवंत सांस्कृतिक इतिहास आहे याची जाण पुढे अगदी हिंदी चित्रपटसृष्टीलाही होती, हीच तर त्या इतिहासाच्या जिवंतपणाची खूण. सांस्कृतिक परंपरा तयार होण्यासाठी आत्मबळच हवे. किंबहुना, सक्तीने किंवा दबावाने टिकते ती संस्कृतीच नव्हे. गंगाजमनी संस्कृतीचे हे आत्मबळ हिंदूुस्थानी संगीतात किती असू शकते याचा वस्तुपाठ देणारा एक चित्रपट १९५०च्या दशकात निघाला, तोही अनेकांनी (अनेकदासुद्धा) पाहिला असेल.. ‘बैजू बावरा’ हा तो चित्रपट!

लक्षात घ्या- सन १९५२ म्हणजे ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस फिफ्टी टू’सारखे स्वातंत्र्योत्तर काळातल्या तरुणाईचे चित्रपट आणि उडत्या चालीची धमाल गाणी यांचा सुवर्णकाळ! अशा काळात मीनाकुमारीसह भारतभूषणला घेऊन निर्माते विजय भट यांनी हिंदूुस्थानी शास्त्रीय संगीत हा विषय केंद्रस्थानी असलेल्या ‘बैजू बावरा’चा घाट घातला तेव्हा मुंबईच्या चित्रपटसृष्टीत मुरलेल्या ‘तज्ज्ञां’नी विजयभाईंना वेडय़ात काढले. ‘अरे, कसले तुमचे ते ‘क्लासिकल’ संगीत? आता जमाना ‘क्लास’वाल्यांचा नाही, ‘मास कल्चर’चा आहे. आता ‘मासिकल’ संगीतच चालणार..’ अशा कुचाळक्या होऊ लागल्या. बडय़ा निर्मात्यांनी ‘चलेगी नहीं’ असा सटवाईचा शापच या बैजूच्या भाळी लिहिला. पण अखेर ती अंधश्रद्धाच ठरली आणि ‘बैजू बावरा’ तुफान चाललाच;

त्याला पुरस्कारही मिळाले आणि त्यातील गाणीही गाजली. ती आपल्यापैकी अनेकांना आजही आठवतच असतील अशी मला खात्री आहे. ‘मन तडपत हरिदरसन को आज..’ हे या ‘बैजू बावरा’मधील एक गाजलेले गाणे आणि मालकंस रागातली एक अजरामर रचना. गुरूला देवस्थानी मानणाऱ्या शिष्याची ही आर्त आळवणी गायली होती मोहम्मद रफी यांनी. गीतकार होते मुंबईच्या चित्रपटसृष्टीला त्या काळात काहीसे नवखेच असलेले शायर शकील बदायूनी. चरित्रकार सांगतात की, संगीतकार नौशाद यांनी या शकील बदायूनींना अक्षरश: एका मुशायऱ्यातून उचलून थेट मुंबईच्या फिल्मी म्युझिक रूममध्ये आणले होते. ‘बैजू बावरा’चेही संगीतकार अर्थातच नौशाद अली! मोहम्मद रफी, शकील बदायूनी आणि नौशाद अली या त्रिवेणी संगमाने हरिदर्शनाची आस मालकंस रागातून आपल्यापर्यंत पोहोचवली. चित्रपटातील संगीत दिग्दर्शनासाठी ‘फिल्मफेअर पुरस्कार’ १९५४ साली पहिल्यांदा सुरू झाला होता, तो पहिला पुरस्कार नौशाद अलींना याच ‘बैजू बावरा’मधील ‘तू गंगा की मौज, मैं जमुना का धारा। हो रहेगा मीलन ये हमारा तुम्हारा..’ या भैरवीवर आधारलेल्या गीतासाठी मिळाला. 

नौशाद अलींना पुढे १९९२ मध्ये पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याआधीच (१९८१) चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार असे सन्मानही मिळाले आणि तत्कालीन ‘दूरदर्शन’वर त्यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली. यूटय़ूबवर आजही उपलब्ध असलेल्या त्या मुलाखतीत नौशाद यांनी ‘सत्ता, धर्म सारे काही संगीतच..’ असे प्रतिपादन केले होते. त्यांचे शब्द आजही आठवण्याजोगे आहेत. ते म्हणाले होते, ‘संगीत.. आलमगीर है उसकी जुबाँ.. बैजनाथ से बीथोवन, मोझार्ट से मियाँ तानसेन तक सारों के सूर सात ही है..’ संगीत दैवीच आहे, संगीत हाच धर्म आहे, असे सांगताना नौशाद यांनी ‘दीन’ असा शब्द वापरला होता. अकबराने स्थापन केलेल्या ‘दीन-ए-इलाही’ या धर्मामुळे आपल्याला ‘दीन’ म्हणजे धर्म, हे माहीतच असेल. पण आलमगीर? हा तर औरंगजेबाने धारण केलेला किताब! औरंगजेब आणि संगीत? त्याच्याच राजवटीत तर ‘शायरी’ऐवजी ‘शरियत’चा दबदबा वाढला. साधेपणा म्हणजेच धार्मिकपणा अशा कल्पनेपायी कला हद्दपार झाल्या आणि शहाजहाँ, जहांगीर, अकबर यांच्या काळापासून मुघल दरबारात मान असलेले गायक-वादक औरंगजेबाने देशोधडीला लावले. याच औरंगजेबाला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने मरेपर्यंत झुंजवले आणि ‘माझ्या कबरीवर माझे नाव नको’ या त्याच्या अंतिम इच्छेनुसार ‘औरंगजेब’ (याचा शाब्दिक अर्थ ‘सिंहासनालंकार’) याची साधी कबर बांधण्यात आली. ‘फतवा-ए-आलमगिरी’ काढून शरियत लादणाऱ्या या आलमगीराने ज्या संगीताला सैतान मानले, ते संगीत मात्र ‘जगावर अधिराज्य असणारे’(आलमगीर) ठरले आहे. अगदी औरंगजेबाच्या वारसदारांनीदेखील संगीताच्या तिरस्काराला मूठमाती देऊन संगीताला पुन्हा राजाश्रय दिला आणि त्यातूनच हिंदूस्थानी संगीताचे अद्वितीय लक्षण ठरणारी ‘खयाल’गायकी बहरली.

‘खयाल’चा अर्थ ‘विचार’ असा होतो. हा विचार टिकला, बहरला, शतकानुशतके रुजून पुन:पुन्हा वाढला. मुहम्मदशहा यांच्या दरबारातील उस्ताद नियामत खाँ (सदारंग) यांना बीनचा मोठा अभिमान. हे वाद्य साक्षात शंकराचे अशी त्यांची श्रद्धा. त्यामुळेच सारंगीशी जुगलबंदी करण्यास ते नकार देतात, मोहम्मदशहाची खप्पामर्जी ओढवून घेतात आणि अखेर एकांतात चिंतन करून धृपद-प्रबंध गायकीपेक्षा निराळे संगीत हवे, ते साऱ्यांना रिझवेल असे हवे, म्हणून त्यांनी बंदिशी रचल्या आणि प्रत्येक बंदिशीच्या अखेरीला मुद्दामहून ‘मुहम्मदशहा सदारंगीले’ असा दुहेरी नामोल्लेख केला, अशी कथा प्रसिद्ध आहेच. पण या मुहम्मदशहाचे वारस स्वत:देखील पंडितांकडे किंवा उस्तादांकडे संगीत शिकणारे होते. मियाँ तानसेन हे मुघल दरबारात येण्याआधीचे त्यांचे नाव पंडित रामतनु पाण्डे. ते रेवा दरबारात तेथील राजा रामचंद्र सिंह याला संगीत शिकवत! दिल्लीचा अखेरचा बादशहा बहादुरशहा जफर ऊर्फ ‘शौक-रंग’ हा दिल्ली घराण्याचे उस्ताद तानरस खानसाहेब यांच्याकडे संगीताचे धडे घेत होता. या तानरस खानांचे कनिष्ठ पुत्र उस्ताद उमराव खान यांची एक बंदिश आहे अडाणा रागातली- ‘लंका चढमे राम’!

ही उस्ताद उमराव खानांची ‘लंका चढमे राम’ बंदिश काय आहे? पाकिस्तानात स्थायिक असलेले ग्वाल्हेर घराण्याचे महत्त्वाचे गायक उस्ताद नसीरुद्दीन सामी खान यांनी ‘लाहोर म्यूझिक फेस्टिव्हल’मध्ये ही ‘लंका चढमे राम’ गायली, तेव्हा सांगितल्याप्रमाणे- ‘‘राम सीता की कहानी है। उस जमाने में सब गा लेते थे। कोई मसला नहीं था!’’ ही वीररसपूर्ण बंदिश आहे. रावणाचा नि:पात करून रामाने सीतेला परत आणले, हा या बंदिशीचा प्रसंग.

‘वसंत पंचमी’चा उत्सव उत्तर भारतात महत्त्वाचा मानतात. पण मुसलमानही तो साजरा करीत आणि दिल्लीत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दग्र्यातही तो साजरा करण्याची परंपरा आहे, हे आज किती जणांना माहीत असेल? सातशे वर्षांत या परंपरेला ‘जहाँ-ए-खुसरो’ असे नाव मिळाले, इतकेच.

सातशे वर्षे तो उत्सव होतो यात हिंदुस्थानी संगीताचा वाटा मोठाच आहे, पण एकविसाव्या शतकातला ‘जहाँ-ए-खुसरो’सारखा महोत्सव हीसुद्धा संगीताच्या ‘आलमगीर’पणाची पावती आहे. हा ‘जहाँ-ए-खुसरो’ महोत्सव मुजफ्फर अलींनी दिल्लीत २००१ मध्ये सुरू केला. त्याला प्रायोजकही मिळाल्याने त्याचा बोलबाला वाढला. प्रायोजकांना वाटते की, आपल्या उपखंडातील शांतता राहावी आणि टिकावी अशी शक्ती कलांमध्येच आहे. हेच तर पतियाळा घराण्याचे उस्ताद बडे गुलाम अली खानसुद्धा म्हणत असत. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले, कारण त्यांचे जन्मगाव त्या देशात गेलेले होते. पण त्या देशातील बंधनांचा या थोर संगीतकाराला उबग आला.. हिंदू पद्धतींची बदनामी केली जात होती, रागांची नावेसुद्धा बदलली जात होती.. हा अवमान सहन न होऊन १९५७ साली बडे गुलाम अली खान भारतात परतले. फाळणी तर त्यांना कधीच नको होती. आणि देशांची जरी फाळणी केलीत तरी संगीताच्या वाटण्या होऊच शकणार नाहीत, असा सार्थ विश्वासही त्यांना होता. त्याहीपेक्षा ‘संगीत जर घरोघरी शिकवले जात असते तर फाळणीबिळणी होऊच शकली नसती,’ असे मत ते ठामपणे मांडत.

बडे गुलाम अली खान ऊर्फ ‘सबरंग’ यांच्या घरात संगीताची परंपरा होती. प्राथमिक धडे त्यांनी काका आणि वडिलांकडून गिरवले होते. पण तानरस खान यांच्या (दिल्ली) घराण्याची तालीम त्यांना मिळाली होती. ‘सबरंग’ हे टोपणनाव सार्थ करणारा सांगीतिक भावदर्शनाचा वर्णपट त्यांनी आत्मसात केला होता. त्यामुळेच परमपूजनीय घनश्यामाची भजने आणि निराकार सर्वशक्तिमान अल्लाहची आळवणी यांमध्ये सबरंग यांचा सूर सच्चा असे.

ही विश्वधर्माची प्रतीती ‘आफ्ताब-ए-मौसीकी’ (म्हणजे संगीतसूर्य) म्हणून ओळखले जाणारे आग्रा घराण्याचे उस्ताद फय्याज खान ऊर्फ ‘प्रेमपिया’ यांच्याही गायकीतून येते. प्रागतिक राजे सयाजीराव गायकवाड यांच्या काळात फय्याज खान बडोदे संस्थानचे राजगायक होते. त्यांनी ‘वन्दे नन्दकुमारम्’ ही ठुमरी रचली. ती आहे अन्य अनेक ठुमऱ्यांच्या वळणाने काफी रागात बांधलेली. पण श्रीकृष्णस्तुतीची ही अख्खी ठुमरी संस्कृत भाषेत आहे!

किंवा पं. अजोय चक्रवर्ती हेही बडे गुलाम अली खानांच्या पतियाळा घराण्याचे. दादरा आणि सादरा, झपतालासारखे ताल ही भारताच्या वायव्येकडल्या घराण्यांची वैशिष्टय़े. कोलकात्यात वाढलेल्या अजोय चक्रवर्तीनी झपतालातलाच एक सादरा गायला आहे- भैरव रागातला. बोल आहेत- ‘अल्ला हो अल्ला’! अर्थात ही बंदिश आजवर अनेक घराण्यांच्या अनेक गायकांनी गायली आहे आणि शिष्यांना भैरव राग कळावा यासाठी शिवस्तुतीपर चिजा जशा घटवून घेतल्या जातात, तशीच ही ‘अल्ला हो अल्ला’सुद्धा कंठस्थ करवून घेतली जाते.

झपताल आणि भैरवातली बंदिश हे काही केवळ शिव किंवा अल्ला यांच्या स्तुतीचे साधन नव्हे. अगदी ‘माणूस चंद्रावर गेल्या’नंतरही प्रागतिक, विज्ञाननिष्ठ वृत्तीनेही याच भैरव रागात, याच झपतालात बंदिश होऊ  शकते. आग्रा घराण्याचे दिवंगत गायक पं. दिनकर कायकिणी (दिनरंग) यांची ही बंदिश आहे.. ‘आयो है जीत के मानव चंद्रलोक। चकित भयो विश्व ब्रह्मांड सारो।’ आणि तिचा अंतरा- ‘धन्य धन्य पृथ्वीजन जिना रचो हे यान। और धन नील शशि राजा लायो है।’

पुन्हा एक झपतालातल्या सादऱ्याचे उदाहरण देतो. हा आहे सईदुद्दीन डागर यांच्या आवाजात- भैरव रागातच- शिवस्तुतीपर सादरा. भैरव हा ‘आदिराग’ आहे. ‘हिन्दुस्थानी संगीत पद्धति’चे कर्ते पं. विष्णु नारायण भातखंडे यांनी या रागाचा इतिहासही सांगितलेला आहेच. तर, ‘भैरवाचे सूर भारताने इतके आत्मसात केले आहेत की भैरव हा भारताच्या सांगीतिक आत्म्याचा घटकच ठरला आहे. अगदी निरक्षरांनाही भैरवाचे सूर या ना त्या प्रकारे अवगत असतातच..’ असे सार्वकालिक ठरणारे निरीक्षण अमेरिकेत स्थायिक असलेले भारतीय संगीताचे गाढे अभ्यासक राजन र्पीकर यांनी नोंदवले आहे. भैरव हा सकाळचा राग. भारतातल्या सकाळची ती निर्मळता नेमकी टिपणारा राग- असे र्पीकर मानतात. ते किती खरे, यासाठी राज कपूर यांच्या ‘जागते रहो’ या चित्रपटाच्या अगदी अखेरीस नर्गिसवर चित्रित झालेले ‘जागो मोहन प्यारे’ हे गाणे पाहायला हवे. आपला राष्ट्रीय ठेवा ठरलेल्या लता मंगेशकर यांनी इथे भैरव गायला आहे.

भैरव आशा जागवतो, तसाच रामपूर घराण्याचा अद्वितीय राग ‘रामकली’देखील आशेची नवी किरणे आणतो. ‘जहाँ-ए-खुसरो’ सुरू करणारे मुजफ्फर अली यांच्या ‘उमराव जान’ या कालजयी चित्रपटात भारत भूषण (आणि गाण्यातच मोठी झालेली रेखा) यांच्यावर चित्रित झालेले एक रागमालेसारखे गाणे या रामकलीने सुरू होते. गायक आहेत- उस्ताद गुलाम मुस्तफा खान. या रामकलीचे बोल अर्थातच ‘प्रथम धर ध्यान गणेश’! ही बंदिश मुस्तफा खानांच्या गुरूंचे गुरू व रामपूर-सहस्वान घराण्याचे संस्थापक उस्ताद इनायतखाँ साहेब यांची. भारतीय संगीतात सहिष्णुतेची परंपरा आहे म्हणजे काय आहे, याचा वस्तुपाठ म्हणजे ही बंदिश. गुलाम मुस्तफा खान हे राशिद खान यांचे मामा. आणि होय, ए. आर. रहमान यांचेही गुरू. रामचरितमानसाच्या गेय संकीर्तनातून आपल्याला परिचित असणारी रामधून ही या रामपूर घराण्यातून आल्याचे आपल्याला माहीत असेल वा नसेल; पण ही रामधून आजही बहुधर्मीय सहिष्णुतेचे धडे तितक्याच प्रवाहीपणे देत राहिली आहे.

आपण पुन्हा ‘बैजू बावरा’कडे येऊ. बैजू नावाच्या या गायकाला बावरा होण्याइतके कसले पिसे लागले, याविषयीची ही कथा मुघलांच्या- त्यातही अकबराच्या काळात घडते. ती पंडित रामचंद्र ठाकूर यांनी लिहिली आणि झिया सरहदी यांच्या संवादांतून ती बोलू लागली. शकील बदायूनींनी लिहिलेल्या गाण्यांपैकी ‘मन तडपत हरिदरसन को आज’ या गाण्यातला ‘हरी’ म्हणजे विष्णू/ देव किंवा स्वामी हरिदाससुद्धा. हरिदास हे तानसेनाचे गुरू. त्यांच्याच दारी जाऊन बैजू ही आळवणी करतो आहे. बैजूलाही हरिदास हेच गुरू म्हणून हवे आहेत. जो तानसेन अकबराकडे राजगायक झाला, तोच आपल्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता म्हणून आपण त्याला त्याच्या पदावरून हटवायचे असे बैजूच्या मनाने घेतलेले असते. यासाठी तानसेनाला जुगलबंदीचे आव्हान देऊन त्यात हरवणे आवश्यक आणि त्यासाठी हरिदास हेच गुरू हवेत. म्हणजे ही एक सूडकथाच; पण पूर्णत: संगीतमय, सुस. पूरिया धनाश्री रागात उस्ताद आमीर खान यांच्या आवाजात ‘तोरी जय जय करतार’ या चिजेने हा चित्रपट सुरू होतो. पण चिजेचे हे शब्द महत्त्वाचे आहेत का? ईश्वरशरणता, पावित्र्य, लीनता आणि अध्यात्मशोध यांची भाषा शब्दांची असायला हवी का? संगीतातल्या शब्दांपेक्षा सुरांचे मोल नक्कीच मोठे की नाही? तरीही शब्द हे आपल्या संगीत परंपरेचा भाग आहेत. कारण मुळात आधी शब्दब्रह्माशी तद्रूप व्हायचे, मग ब्रह्माशी तादात्म्य साधायचे आणि तिथून परब्रह्माच्या उन्मनी अवस्थेपर्यंत जायचे.. हा आध्यात्मिक प्रवास भारतीय मनाला मान्य आहे. मग ते मन हिंदू असो की मुस्लीम- शब्दातून शब्दांपलीकडे असा प्रवास करण्याची शक्ती संगीतच देत असते. म्हणूनच बहुधा भारतीय शिष्यांना ‘सुर साधो, सब साधो’ असा गुरुमंत्र मिळत असावा.

म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेत धर्म काय नाहीसेच होतात का? अजिबात नाही. संगीताकडे पाहण्याच्या, ते सादर करण्याच्या दृष्टिकोनांत धर्मानुसार भेद असतील तर ते राहतात. त्या दोन धर्माच्या संगीतरीतींमध्ये स्पर्धासुद्धा घडतेच. पण पुढली कसोटी आपण या भेदांच्या पलीकडले पाहण्याची असते. या भेदांचा वापर ‘बैजू बावरा’ या चित्रपटाने अत्यंत खुबीने करून घेतला आहे, तसाच तो ‘कटय़ार काळजात घुसली’ या पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलेल्या आणि पं. जितेन्द्र अभिषेकींनी संगीत दिलेल्या नाटकातही आहे. आज ‘सारेगमप’ किंवा ‘कोण होणार सुपरस्टार?’सारख्या टीव्हीवरल्या संगीत स्पर्धातही अशीच स्पर्धाळू सुरावट ऐकू येते. पण ‘बैजू बावरा’ या चित्रपटाची कथा मुळात ज्यांच्यावरून बेतलेली आहे, ते नायक बैजू यांचे म्हणणे काय? ते खट रागातल्या नायक बैजूरचित ‘विद्याधर गुणिजन सो’ या सादऱ्यातून उमगेल. मुळातच हा खट राग ‘षट्’ किंवा सहा रागांच्या छटा असलेला- हे लक्षात घेतल्यास इथेही स्पर्धा आहेच. आपल्याला काय येते हे दाखवण्याची पुरेपूर संधी देणारी ही रचना म्हणता येईल. आसावरीच्या छटांपासून हा राग सुरू होतो. किंवा मग हीच बंदिश तानसेनाचा पुत्र बिलासखान याने रचलेल्या ‘बिलासखानी तोडी’मध्येही गाता येते. तानसेनाचा मृत्यू सांगीतिक जुगलबंदीतच झाला असे मानतात. पण ‘गुण-चर्चा की लडाई लडिये’ हेही बंदिशीतूनच सांगण्याची समज हिन्दुस्थानी संगीताकडे आहे.

‘बैजू बावरा’ या चित्रपटातील सांगीतिक लढाई- तानसेन आणि नायक बैजू यांची जुगलबंदी- ग्वाल्हेर घराण्याचे पं. डी. व्ही. पलुस्कर आणि उस्ताद आमीर खान यांनी सादर केली. त्यासाठी नौशाद यांनी ‘देसी तोडी’ आणि ‘तुरुष्क (तुर्कस्तानी) तोडी’ अशा सुरावटींची योजना केली होती. या तुरुष्क तोडीला आद्यसंगीतग्रंथकार शारङ्गदेवाने ‘यवन भैरवी’प्रमाणेच ‘संगीत-रत्नाकरा’मध्ये स्थान दिलेले आहे. आता हा शारङ्गदेव सिंघण राजाच्या पदरी होता आणि सिंघण हा महाराष्ट्रात १२१० ते १२४६ पर्यंत राज्य करणाऱ्या यादवकुळातला होता. याचा अर्थ असा की, अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून यादवांचे राज्य संपवण्याच्याही आधीपासूनच भारतीय संगीतकारांचे जगाच्या अन्य भागांतील संगीतकारांशी सूर जुळत होते!

हे सूर जुळतात, कारण मने जुळवणे हेच त्यांचे काम असते. म्हणूनच तर ‘तानों से पत्थर पिघलाए’ असे तानसेन (उस्ताद आमीर खान यांच्या आवाजात) म्हणतो आणि ‘बैजू के संगीत से दाता जल में आग लगा दें’ असे उत्तर त्याला (प. पलुस्करांच्या आवाजात) मिळते, तेव्हा ‘बैजू बावरा’च्या प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले असत.. ते निव्वळ सुरांची ताकद जाणवल्याचे आनंदाश्रू असायचे.                             

(संकलन व अनुवाद : अभिजीत ताम्हणे)