डॉ. सुरेश सावंत
शेतीमातीची कविता लिहिणारे लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव ‘रानमळ्याची वाट’, ‘गाणे गोजिरवाणे’ आणि ‘नातूऋतू’ या तीन पुस्तकांचा संच घेऊन बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत.

‘रानमळ्याची वाट’ या संग्रहात २२ कविता आहेत. पहिल्याच कवितेत कवीने बाळगोपाळांना रानमळ्याच्या निसर्गरम्य वाटेवरून फिरवून आणले आहे. या कवितेत गुरावासरांवर हिरवी माया पांघरणारी ‘वडमाउली’ भेटते. बच्चे कंपनीचा आवडता पाऊस भेटतो. झड लागली, की घरात अडकून पडावे लागते. तर कधी कधी हाच पाऊस वाट पाहायला लावतो. मोराचे पिवळे पाय पळवून नेणारी लबाड साळुंकी एका कथाकाव्यात भेटते. दु:खी मोराच्या केका ऐकून वाचकही अस्वस्थ होतो. शहरातल्या पोराला कवी आपल्या गावी येण्याचे आवतन देतो आणि म्हणतो :

‘तू न्याहाळ हिरवी धरती
ये बस ना ओढ्यावरती
मग होशील निसर्गवेडा’

अशी ही निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी आणि निसर्गाचे वेड लावणारी बालकविता आहे. पोळ्याचा सण म्हणजे बैलांचा सोहळा. या सोहळ्याचे सुंदर वर्णन असलेली कविता या संग्रहात वाचायला मिळते. कवीने लोकजीवनातील बहीण- भावाच्या ताटातुटीचे सुंदर कथाकाव्य गुंफले आहे. शहरातील मुलांना ‘शिंदोळ्या’ हे रानफळ माहीत असण्याची शक्यताच नाही. त्या शिंदोळ्यांची चव या कवितेत चाखायला मिळते. इथल्या मामाच्या मळ्याची वाट मायाळू आहे.

‘मामाच्या मळ्याची मऊशार माती
लावावी वाटे मला सन्मानाने माथी’

इतका कवीला या मातीचा अभिमान आहे. गावाकडे सगळे चांगलेच असते, असे नाही. तिथेही अभावाच्या अनेक जागा आहेत. अलीकडेच कवी इंद्रजित भालेराव आजोबा झाले आणि त्यांच्या आयुष्यात सातवा ऋतू बहरून आला. त्यातून साकारला त्यांचा नवीन बालकवितासंग्रह ‘नातूऋतू’. या संग्रहाचे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आहे. नातूऋतू हा प्रत्येक आजोबाच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा ऋतू असतो. त्याचा पुरेपूर अनुभव कवी इंद्रजित भालेराव यांनी घेतला आणि नातवाच्या निमित्ताने आपले सुंदर बालपण पुन्हा एकदा अनुभवले आहे. नातवाने कवीचे आनंदविश्व व्यापलेले आहे. म्हणूनच ही कविता नातवाच्या पायातील घुंगुरवाळा होऊन अवतरली आहे. कवीने आपल्या नातवाला अतिशय जिवीच्या जिव्हाळ्याने या शब्दांत रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.

‘तू सदैव व्हावा आनंदाचा धनी
हे शब्द टाकितो तुजवर ओवाळुनी

अशा शब्दांत त्यांनी नातवाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बाळाचे पहिले हसू, बाळाचे मोठे मोठे डोळे, बाळाचा उबदार स्पर्श, बाळाचे दुधाचे दात, बाळाची घंगाळातली अंघोळ, बाळाचे रांगणे, पहिले पाऊल टाकणे, बाळाचे मम्मम करणे अर्थात जेवणे, आई आणि आजीच्या दुहेरी वात्सल्यात चिंब भिजलेले बाळाचे बालपण, बाळाच्या बोबड्या बोलांमुळे आजोबांनी मुद्दाम स्वीकारलेले बोबडेपण, बाळाचे पेपर आणि पुस्तक वाचणे, बाळाचे कवडसे पकडणे, बाळाचे जावळं काढणे, बाळाचे रंगांसोबत खेळणे, कुत्र्याच्या आणि शेळीच्या पिलासोबत खेळणे, खेकडा भज्यांची चव चाखणे, गाडीत बसून आजोबांसोबत गल्लीभर फिरणे, बाळाची पहिली होळी अशा सगळ्या बाळलीलांचे कौतुक करताना आजोबा आणि आजोबांची लडिवाळ कविता मुळीच थकत नाही. बाळ आजोळी गेल्यावर झालेला विरह आणि परत आल्यावर झालेला आनंद या दोन्ही गोष्टी या कवितेत तितक्याच उत्कटतेने उतरल्या आहेत.

‘बाळ गेला आजोळाला आजोबांना करमेना
बाळा, रुसले आजोबा जरा तातडीने ये ना’
अशी ती आतुर उत्कटता आहे.
‘तांब्याचे गंगाळ। गुलाबाचे पाणी
उघडी नहाणी। बागेतली’

हा बाळाच्या अंघोळीचा आनंदानुभव आहे. बाळ रांगू लागले की घरअंगण अपुरे पडते. बाळाच्या रूपात ससाही दिसतो आणि बागडणारा मोरही! बाळाचे पेपरवाचन आणि पुस्तकवाचन म्हणजे काय विचारता!

‘एकेकाचे दोन दोन
त्यांचेही करतो तुकडे
चित्राचेही होतात हाल
अर्धे इकडे अर्धे तिकडे

असे असले, तरी कौतुकाचा धनी होतो तो बाळच. बाळाच्या हातून झालेला लाभ किंवा हानीचा विषय मग अगदीच गौण ठरतो, कारण नातू हा आजोबांच्या काळजाचा तुकडा असतो. दुधावरची साय असतो. स्निग्ध आणि हवीहवीशी! बाळाचा कवडसे पकडण्याचा छंद तर अफलातून असतो. ज्या मातीने कुणब्याच्या अनेक पिढ्या पोसल्या, त्या मातीचा बाळाला झालेला पहिला स्पर्श मोठाच रोमांचकारी आहे.

बाळाच्या आयुष्यातील पहिला हिवाळा फारच तापदायक असतो. बाळ थंडीने बेजार होतो. यावर कवीआजोबांनी एक उपाय शोधला आहे :‘या थंडीचं करावं काय खाली मुंडकं वरी पाय’ हाच तो साधा, सोपा उपाय आहे. ‘गाणे गोजिरवाणे’ या संग्रहातील कविता ही नवनिर्मिती नसली, तरी ही मुलांची लोकगीते आहेत. या लोकसंचितातील लोकगीतांवरच ग्रामीण भागातील आमच्या अनेक पिढ्यांचे मानसिक भरणपोषण झालेले आहे. तिन्ही पुस्तकांतील कवीची लडिवाळ कविता आणि सरदार जाधव यांची बोलकी चित्रे हातात हात गुंफून आणि गळ्यात गळे घालून आली आहेत. नवनिर्मिती असो की लोकगीते असोत, या कवितेतील निसर्ग आणि शेतकरी जीवनाचा धागा कुठेही सुटत नाही, हे विशेष!

या कवितेत लय आहे, ताल आहे, नाद आहे, गेयता आहे आणि आंतरिक संगीत आहे. आकलनसुलभ आणि चपखल शब्दयोजना हा भालेराव यांच्या बालकवितेचा लक्षणीय विशेष आहे. म्हणून त्यांची बालकविता बालकुमार वाचकांच्या मनाचा लवकर ताबा घेते. ‘नातूऋतू’ मधील कविता एकाच विषयावरची असली तरी ती कंटाळवाणी होत नाही. कारण रचनाबंधाचे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत. निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी आणि जगण्याची जीवनदृष्टी देणाऱ्या या कविता बालकुमार वाचकांना निश्चित आवडतील, असा विश्वास वाटतो.

‘रानमळ्याची वाट’, ‘नातूऋतू’ ‘गाणे गोजिरवाणे’ – इंद्रजित भालेराव, आदित्य प्रकाशन, अनुक्रमे पाने ३६,४८,३६, अनुक्रमे किंमत- १६०, १८०, १६० रुपये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sureshsawant2011@yahoo.com