इंद्रजीत घुले
मंगळवेढ्याच्या भूमीतून निघणारा ‘शब्दशिवार’ हा अंक गेल्या दशकभरात देखण्या चित्रांसाठी, मांडणीसाठी आणि कष्टाने उभारलेल्या मजकुरासाठी राज्यभर ओळखला जातो. ग्रामीण लेखकांसाठी कायम आपली दारे उघडे ठेवणार्या या प्रकाशनाने आत्तापर्यंत तीनशेच्या वर पुस्तके प्रकाशित केलीत. वाचन व्यवहार वाढावा यासाठी अभिनव उपक्रम राबविणार्या या प्रकाशनाच्या जडणघडणीची कहाणी…

मंगळवेढ्याच्या शिवारात एक पाऊस पडला तरी ही माती आख्खा हंगाम तगवून ठेवते. तिचा चिवटपणा, सकसता, पिढ्यानपिढ्यांचं बळ होऊन जगली. इथं पाखरं थव्यानं येतात, पोत्यानं खातात. गोफणही दगड घेऊन फिरत नाही. या शिवारात बांध नाही, कुंपण नाही, हद्दीची साधी रेषसुद्धा नाही. समन्वयवादी समतेचं बाळकडू देणारी भीमेच्या काठावरली ही माती म्हणजे बसवेश्वर, चोखामेळा, दामाजीपंत आणि कान्होपात्रा यांची संतभूमी.

चंद्रभागेच्या पुण्याईचं सार असलेलं गाव म्हणजे मंगळवेढा. इथं ‘कवितोत्सव’सारखे कार्यक्रम अखिल भारतीय साहित्य संमेलनासारखे व्हायचे. त्यापूर्वी व्यंकटेश माडगूळकरांच्या अध्यक्षतेखाली एक संमेलन झालं होतं. हा ‘कवितोत्सव’ १९९९ ते २००१ असा सलग तीन वर्षे पार पडला.

सकाळपासून रात्रीपर्यंत मी सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली. नारायण सुर्वेंपासून अनेक दिग्गज या मंचावरून ऐकता आले. इथलं नगर वाचनालय दीडशे वर्षांपूर्वीचं आहे. दहावीत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत टायपिंगचा कोर्स लावला होता. तिथंच माहिती कळली की, नगर वाचनालयाच्या तळघरातील पुस्तके साफ करून व्यवस्थित लावायची आहेत. दिवसाला ५० रुपये पगार होता. तिथं काम करताना कळालं की या जगात एवढी पुस्तकं असतात.

नंतर तिथली पुस्तकं वाचायला लागलो. इथल्या अर्बन बँकेची व्याख्यानमाला खूप चांगली चालायची. अनेक वक्ते, लेखक इथं मनभरून ऐकले. तो काळ माझ्या दहावी-अकरावीचा. शाळा शिकायची, विद्यापीठात जायचं खूप वाटायचं. पण ऐपत नव्हती. वडील व्यसनाच्या आहारी, आई रानात राबायची. बी. ए.ला श्री संत दामाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दुसर्या वर्षाला असताना मी कॉलेजमध्ये माझी ‘लग्नातलं जेवण’ कविता सादर केली.

बी. ए. नंतर काय? मग विद्यापीठात जाता येत नाही, तर सावित्रीबाई फुले विद्यापीठातून बहि:स्थ म्हणून मराठीतून एम. ए. केलं. त्यानंतरही पुढे काय, हा प्रश्न होताच. वृत्तपत्रात एक जाहिरात वाचली. पुण्यात येरवडा येथे पश्चिम विभागीय भाषा संशोधन केंद्र आहे, तिथे कोणतीही भाषा शिकण्यासाठी छात्रवृत्ती मिळते. बहिणीचं लग्न झालेलं. घरात खायचे वांदे. भाकरीची भूक हाच सगळ्यात मोठा प्रश्न असलेल्या घरातून मी आलोय. अर्ज भरला आणि मला कोंकणी शिकण्यासाठी प्रवेश मिळाला.

२०११ मध्ये तिथे मी कोंकणी शिकलो. अंतिम परीक्षेत केंद्रात पहिला आलो. तिथल्या विद्यार्थ्यांनी कुणीही वाचली नसतील एवढी पुस्तकं वाचली. महिना सहा हजार मिळायचे. दोन हजार स्वत:ला आणि चार हजार घरी पाठवायचे. पुण्यातला हा कोर्स संपताना डोळ्यात पाणी आलं. गावाकडं जाऊन काय करायचं. बेकारच राहणार. तेव्हा कवितेचे कार्यक्रम केले. २०१३ च्या दुष्काळात मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळच्या तळ्यावर गाळ काढण्याच्या कामावर सुपरवायझर म्हणून गेलो. पुण्यातून येताना ‘माझा दोस्त’ हे कोंकणीतलं पुस्तक सोबत आणलं होतं. लहान मुलांची छान छोटी कादंबरी होती. गोव्यात सुधा खरंगटे यांची परवानगी घेऊन तळ्यातल्या कामावर बसून मिळालेल्या वेळेत त्याचा अनुवाद केला. ते पुस्तकही त्या तळ्यालाच अर्पण केलं. दुष्काळी काम संपलं आणि पुन्हा बेकार. त्या कामामुळे वडिलांच्या दवाखान्याचं कर्ज फिटलं याचा आनंद झाला.

कोंकणी अनुवादि त पुस्तकाचे प्रकाशन ‘लोकायत’ प्रकाशन, सातारा यांनी केले. त्यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याशी परिचय झाला. या काळात मला पोटाची भूक शांत बसू देत नव्हती. हॉटेल रुचीसंगममध्ये काऊंटरवर उभं राहून काम केलं, मनोरमा बँकेत कॅशिअर म्हणून काम केलं, पण कुठंच निभाव लागला नाही.

दहावीला टायपिंगचा कोर्स केल्यामुळे ती कला अवगत होती. अनेकांच्या मदतीने एक कॉम्युटर घेतला. कवितेच्या कार्यक्रमासाठी एकदा सोलापूरला उर्मिला आगरकर यांची भेट झाली. त्यांचे पुस्तक करायचे आहे, करतो का, असं एकानं सूचवलं. मी होकार दिला. सलग पाच दिवस त्यांची कथा रेकॉर्ड करून घेतली. घरी येऊन चार महिन्यात टाईप केली आणि ‘मनी मानसी’ हे पुस्तक तयार झाले.

याच दरम्यान एकाने ‘कवी आहेस, तर संपादक म्हणून काम कर, मी बघतो सगळं.’ असा प्रस्ताव ठेवला. त्यातले धोके माहीत होते. सुरू करणं सोपं, पण चालवणं अवघड. बंद पडता कामा नये, या अटीवर मित्रासह मासिकाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील सर्व कवी साहित्यिक मंचावरील सादरीकरणामुळे ओळखीचे झाले होते. मासिक सुरू कर म्हणणार्याचा उद्देश काही वेगळाच होता. लाखो रुपयांच्या जाहिराती गोळा करायच्या आणि त्यासाठी मला वापरायचं. त्याचा तो उद्देश सफल झाला नाही. अकरा अंक तोपर्यंत निघाले होते.

महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना ते आवडले होते. त्याच अंकात मी ‘मनी मानसी’ पुस्तकाचा एक अंश छापला होता. ‘पद्मगंधा’च्या अरुण जाखडे सरांनी तो वाचला आणि म्हणाले, ‘‘ते पुस्तक मी करतो.’’ त्यांनी ते छापले. त्याच्या चार आवृत्त्याही निघाल्या. अनेकांनी मासिकाची वर्गणीही दिली होती. त्यामध्ये भालचंद्र नेमाडेंचे एक दिवस पत्र आले. सोबत तीन वर्षांच्या वर्गणीचा चेकही होता. पत्रात लिहिलं होतं, ‘शब्दशिवार अखंडपणे चालावं या शुभेच्छा…’

अकराव्या अंकापर्यंत आर्थिक गणित नरड्याजवळ आलं होतं. वर्गणी यायची, पण खर्चाच्या तुलनेत कमीच. काढलेल्या अंकाचं बील भागवायला मंगळवेढ्यातील बँकेत बहिणीचे गंठण गहाण ठेवलं. मग सावध झालो. अंक बंद केला. नामुष्कीनं डोळ्यात पाणी आलं. पण थांबायचं नाही हे ठरवलं. वाटायचं एखाद्या दिवशी नेमाडे कुठेतरी प्रत्यक्ष भेटतील आणि विचारतील, ‘अंक बंद पडला काय?’ त्यांना तोंड कसं दाखवायचं? म्हणून सहा महिने थांबून दिवाळी अंक काढायचं ठरवलं. कवितेमुळे राजकीय, सामाजिक, औद्योगिक मंडळींशी चांगली ओळख होत होती. दिवाळी अंकासाठी स्वत:च्या बळावर जाहिराती मागायला सुरुवात केली. जाहिराती मिळाल्या. पहिले तीन वर्षे जाहिरात आणि अंकाचा खर्च बरोबरच व्हायला लागला. परंतु ‘शब्दशिवार’चा अंक सर्वत्र पोहोचतोय यातच आनंद होता.

अशातच महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे मंगळवेढ्यास आले होते. त्यांना मी दिवाळी अंक दिला. ते किती मोठे संपादक आहेत, हे मला माहीत नव्हतं. नुकतीच ओळख झालेली. अंक पाहून त्यांनी श्रीधर अंभोरेंना फोन केला. श्रीधर अंभोरे शब्दशिवारशी जोडले गेले. महाराष्ट्राच्या पातळीवर अंकाची ओळख झाली. अंक विक्रीतून खपायला लागला. जाहिराती वाढल्या.

याच दरम्यान श्रीधर अंभोरे यांच्या कलात्मक मांडणीच्या दृष्टीतून ‘आ. ह.’ विचारग्रंथ संपादित केला. ते ‘शब्दशिवार’ प्रकाशनाचं पहिलंच आणि मोठं पुस्तक. या ग्रंथासाठी भांडवल नव्हतं. शोभा काळुंगे या साहित्य आणि विचारांवर प्रेम करणार्या जाणकार. त्यांनी कर्ज दिलं. पहिलंच पुस्तक आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून धाराशीव अखिल भारतीय साहित्य संमेलनात स्टॉल घेतला. तीन दिवस पूर्णवेळ पुस्तकांचा स्टॉल लावून पहिल्यांदाच पुस्तक विक्रीचा अनुभव घेतला. वाचकांना काय हवं, कोणत्या दृष्टीने ते पुस्तकं मागतात याचा बराच अंदाज आला. या स्टॉलवर आ. ह. विचार ग्रंथ आणि इतर प्रकाशनाचीही पुस्तके विक्रीस ठेवली होती. पुढे करोना आला आणि छापलेले ग्रंथ तसेच घरात राहिले.

करोना काळातील टाळेबंदीत फक्त किराणा दुकानदारांना सवलत होती. माझे मित्र सुहास ताड यांचा मंगळवेढ्यात ‘डी मार्ट’सारखा मोठा मॉल होता. ते म्हणाले, ‘तुमच्या पुस्तकांसाठी दोन रॅक देतो. त्याचे भाडे घेणार नाही.’ इथल्या मॉलमध्ये पुस्तके ही कल्पनाच कुणाच्या गावी नव्हती. आम्ही तो प्रयोग केला. माझ्याकडे संमेलनाच्या स्टॉलसाठी आणलेली इतर प्रकाशनाचीही अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होती. मॉलमध्ये दोन रॅक भरून पुस्तके लावली. सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्या काळात तब्बल सात लाखांची पुस्तके मॉलमधून विकली आणि लक्षात आलं, इथल्या लोकांना पुस्तकं वाचायची आहेत.

एक दिवाळी अंक मला पोस्टाने आला होता. त्याचा कागद मला खूप आवडला. तो अंक घेऊन कोल्हापूरच्या ‘सकाळ’ प्रेसमध्ये गेलो. त्यांना म्हटलं, असाच कागद हवा. ते म्हणाले, ‘हा सत्तर जीएसएम नॅचरल शेड आहे. पुस्तक परफेक्ट बायडिंग करायचं की कसे?’. मी म्हणालो, या दिवाळी अंकासारखेच करायचे. ते म्हणाले, ‘हे परफेक्ट बायडिंग आहे.’ हे शब्द ऐकायचे. घरी आल्यावर ते वहीत लिहून घ्यायचे.

हेही वाचा

पुढच्यावेळी पुस्तक छापायला जाताना ते शब्द बघून जायचे. नॅचरल शेड कागद हवा, परफेक्ट बायडिंग करायचे. प्रेसवाल्याला वाटायचे हा मुरलेला प्रकाशक आहे. असे शब्द गोळा केले. प्रत्यक्षात पाहिले, अनुभवले आणि स्वत: अनुभव घेऊनच सगळे शिकलो. मला केवळ टायपिंग येत होते. कोरल, फोटो शॉप माझ्या गावातही नव्हते. एक ले-आऊट करणारा शोधला. त्याला हाताशी धरून कॉम्प्युटरवर सगळे ॲप टाकून घेतले.

थोडं थोडं कोरलही शिकलो. ले-आउट, पानाचा आकार, पुस्तकांचे मुखपृष्ठ, त्याचा आकार, मिलिमीटरमध्ये सगळी मोजमापे आहेत. पट्टी घेऊन दहा-दहा वेळा ते मोजत बसायचं. पुस्तक छापून येईपर्यंत झोप लागायची नाही. पुस्तक छापून आलं की रात्री-बेरात्री हायवेला थांबून स्वत: उतरवून घ्यायची. ॲक्टीवावरून घरी आणायची. आणलेली पुस्तके विक्रीसाठी पुढे पाठवायची. गेल्या दहा वर्षांत दिवाळी हा सण केलेला आठवत नाही. लोक नटूनथटून उत्सव साजरा करत असतात. मी, माझी बहीण, भाचा-भाची, पुतणे दिवाळी अंक पॅक करणे आणि पाठवणे या कामातच गुंतलेलो असतो.

पुढे कवीसंमेलन, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन अशा प्रत्येक ठिकाणी मी पुस्तकांचे प्रदर्शन लावत गेलो. आडपाडीला एका पुस्तक प्रकाशनावेळी खूप गर्दी होती. तिथे एका दिवसात २८ हजार पुस्तके विकली गेली. आमच्या एका मित्राने मुलीच्या लग्न पत्रिकेवर छापले की, लग्नात आहेर स्वीकारला जाणार नाहीत. पुस्तके आणली तर भेट घेऊ. पण लग्नात पाहुणे पुस्तके कुठून आणणार? मित्राने विचारले, ‘लग्नस्थळी पुस्तक स्टॉल लावाल का?’ वेगळ्या वातावरणात वेगळ्या कारणासाठी लोक आलेले असतात, तिथं पुस्तकांचं काय काम असं लोक म्हणतील. म्हणाले तर म्हणाले, आपण उभं तर राहू, असा विचार करून प्रदर्शन लावलं.

लग्न मालकाचीच परवानगी असल्यामुळे मोठ्या शाही लग्नसोहळ्याच्या स्वागत कक्षाच्या बाजूला पुस्तकांचं प्रदर्शन लावलं. आलेले पाहुणे पुस्तक स्टॉल ओलांडूनच पुढे जातील अशी व्यवस्था केली होती. त्या प्रदर्शनाला जाताना, लोक पुस्तके भेट देणार आणि कोणती पुस्तके घ्यायची, या निवडीला फारसा वेळ असणार नाही म्हणून आम्ही अध्र्या स्टॉलवर १०० ते ५०० रुपयांच्या पुस्तकांचे संच केले. ज्याला ज्या किमतीचा संच हवा तेवढा द्यायचा. लग्न सोहळा संपल्यावरही आम्ही ते प्रदर्शन सुरूच ठेवले.

आलोच आहोत, तर आणखी थोडं थांबू. मग पाहुणे मंडळी जेवण करून बाहेर यायला लागली. बाहेर आइस्क्रीम, कुल्फीचे गाडे होते, तसे पुस्तकांचेही प्रदर्शन होते. लग्न संपले, जेवण झाले. माणसं निवांत होती. पुस्तकं चाळायला लागली, बायका आल्या, लहान मुलं आली, पुस्तकं घ्यायला लागली. काही मुलांनी तर चित्रे पाहून पुस्तक घ्यायचेच मला, असा हट्ट धरला.

मासिकाचं संपादन, ग्रंथाचं संपादन सुरू असताना अशीच निर्मिती हवी म्हणून अनेक लेखकांनी माझ्याकडे पुस्तक प्रसिद्धीसाठी आग्रह धरला. त्यातून प्रकाशनाची वाटचाल सुकर झाली. २०१९ साली ‘आ. ह.’ ग्रंथ प्रसिद्ध झाला. धाराशिवच्या संमेलनानंतर टाळेबंदी लागली. काय करायचं म्हणून मी, फावल्या वेळेत ‘आ.ह.’ ग्रंथाचे पार्सलपॅकिंग करत बसायचो. मला विश्वास होता, की जग जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याकडे वेळ असणार नाही. त्यासाठी आपण तयारीत असायला हवे. तेव्हा मी पॅक केलेला एकही ग्रंथ नंतरच्या काळात शिल्लक राहिला नाही. या काळानं एकच शिकवलं, वेळ आहे तर तो उपयोगात आणला पाहिजे. करोनाच्या आधी लोक म्हणायचे, लिहून झाल्यावर चार वर्षांनी पुस्तक काढू. तेच लोक म्हणायला लागले, चार महिन्यात पुस्तक हवं आहे. पुस्तकांच्या निर्मितीला करोनाने गती दिली. आज शब्दशिवारची जवळपास तीनशेवर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

उत्तम कांबळे, रणधीर शिंदे, सुनीलकुमार लवटे, महावीर जोंधळे, रामदास फुटाणे, डॉ. कृष्णा इंगोले, राजेंद्र दास, बा. ना. धांडोरे या मोठ्या व्यक्तिमत्त्वांनी शब्दशिवारवर विश्वास ठेवला. मंगळवेढ्यासारख्या सीमावर्ती तालुक्यातील एक सुशिक्षित, पण बेराजगार तरुण धडपडतोय म्हणून हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी अतिशय मोठ्या मनानं साथ दिली.

पुस्तकाचा व्यवसाय आतबट्ट्याचा आहे, असं म्हणणार्यांनी कधीही आत्महत्या केलेली नाही. शब्द, विचार, पुस्तकं माणसाला जगवतात. भाकरीची सोय करतात, असं मी म्हणतो. मी अभिनव पद्धतीने पुस्तके विकली. सांगोल्यातील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नात पत्रिका पुस्तकाच्या मागे प्रिंट करून घेतली. महान स्त्रियांची चरित्रे लग्नाला येणार्या व्यक्तींना भेट म्हणून दिली. अशी हजारो पुस्तके वेगवेगळ्या मार्गाने घरोघरी पोहोचायला हवीत. पुस्तकांतही आपला श्वास आहे, जीवन आहे, विश्वास आहे. जगण्याचे अनेक संदर्भ आहेत, हे माणसांना कळायला हवं. तरच वाचन व्यवहार पुढे जाईल.

indrajitghule81@gmail.com