डॉ. नीलांबरी मंदार कुलकर्णी

रवींद्र पांढरे यांची ‘सायड’ ही कादंबरी त्यांच्या ‘मातीतली माणसं’ (कथासंग्रह), ‘अवघाचि संसार’ (कादंबरी) यांसारख्या आधीच्या साहित्यकृतींप्रमाणेच ग्रामीण परिसरात आकारास येते. या कादंबरीस खानदेशातील परिसराची पार्श्वभूमी असली तरी ती रूढार्थाने ग्रामीण कादंबरी नाही. शेतशिवार, पीकपाणी, शेतकऱ्याच्या मागे वर्षभर असणारा शेतीच्या कामांचा तगादा यांचे दर्शन या कादंबरीत घडते; पण ते आनुषंगिक आहे. ही कादंबरी मूलत: मानवी नातेसंबंधांचे दर्शन घडविते. पांगरी गावातील यशवंत पाटील आणि शांता लावन्या यांच्यात जुळलेल्या ‘सायड’ संबंधांची ही बरीचशी एकरेषीय म्हणता येईल अशी साधी, रोमँटिक, पण वेगळी कहाणी आहे. अलीकडच्या बऱ्याच ग्रामीण वा देशीवादी कादंबऱ्यांतून दिसणारे शेतकऱ्याचे नाडलेपण, शेतीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांविषयीची नाराजी, मोडीत निघालेल्या जुन्या गावगाडय़ाविषयीची हळवी हळहळ असले काहीही या कादंबरीत नाही.

How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

 या कादंबरीचे वेगळेपण ‘सायड’ या कृषिव्यवस्थेतील परंपरेचे जे रूपकात्मक उपयोजन केले आहे त्यात आहे. दोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतीची मशागत करून घेणे म्हणजे ‘सायड’ करणे होय. मनुष्यबळ, बैल, साधनसामग्री अपुरी असेल तर एकमेकांची साधनसामग्री व स्त्रोत यांचा परस्परांना फायदा करून देणे म्हणजे सायड.. हे एक प्रकारे सहकाराचेच पारंपरिक रूप होय. शांताबाई लावन्याच्या घरी लहान मुलं, म्हातारी सासू असतात. पण मुळात भाबडा, बावळा असलेला तिचा नवरा बळीराम संधिवाताने आजारी होऊन कायमची खाट पकडून बसतो, तेव्हा मात्र ती अडचणीत येते. जमीन सात बिघेच असली तरी शेतीचा कुटाणा एकटी बाईमाणूस कसा सांभाळणार, म्हणून सायड करण्याचा निर्णय शांतेची सासू घेते. मग यशवंत पाटील व शांती लावन्या या दोन व्यक्तींचे व दोघांच्या कुटुंबाचे ‘सायड’ संबंध जुळत जातात. ज्या प्रकारच्या कौटुंबिक, व्यावसायिक किंवा एकूणच मानवी संबंधांना ग्रामव्यवस्था मान्यता देते, ती मूल्यचौकट मोडून हे सायड संबंध आकारास येतात. गावातले पार किंवा पाणवठे या ठिकाणी होणाऱ्या आणि व्यक्तिगततेवर आक्रमण करणाऱ्या गॉसिपरूप चर्चा याही गावातले स्त्री-पुरुष करतात. पण या दोन्ही कुटुंबांतील पहिल्या पिढीतल्या म्हाताऱ्या स्त्रिया त्याकडे चक्क काणाडोळा करतात. माणसाने आपल्या जिवाचा आसरा शोधावा, जी वाट दिसेल ती चालत राहावी असा सल्ला त्या देतात, हे या कादंबरीचे वैशिष्टय़ आहे. सायड ही कृषिव्यवस्थेची पद्धत म्हणून पारंपरिक आहे, पण या कादंबरीतील सायड व्यावसायिक संबंधांचा उंबरा पार करून परंपरेची चौकट मोडते. तसे करताना बंडखोरीचा कोणताही अभिनिवेश कोणत्याही पात्राच्या वागण्यात दिसत नाही. या दोघांच्या जाती वेगवेगळ्या आहेत. पण ती बाब त्यांच्या संबंधांच्या आड आलेली नाही. जे मनाला रुचतं, ज्याने बरं वाटतं ते केलं, एवढीच दृष्टी त्यामागे आहे.

या कादंबरीत ‘खल’पात्रे नाहीत. सावकारी नाही. परस्परविरोधी काळ्या-पांढऱ्या रंगांतले व्यक्तिचित्रण नाही. सावकारी, सरकारी वा नैसर्गिक संकटे नाहीत. कथानकात फार वळणे वा धक्केही नाहीत. अपेक्षित मार्गानेच कथानक पुढे सरकते. सुरुवातीच्या घटना-प्रसंगांत पेरलेल्या दुव्यांतून वाचकांना कथेची दिशा सहज कळते. सायबूचे एक छोटेसे उपकथानक वगळता फारशी गुंतागुंतही नाही. एखाद्या दीर्घकथेएवढाच खरे तर या कादंबरीचा जीव आहे. तृतीयपुरुषी निवेदनही सरळ, सुबोध आहे. यात पात्रांचे निर्णय महत्त्वाचे ठरतात. त्यातूनच ‘सायड’ आकाराला येते. त्याला आडमुठा विरोध जवळपास कोणीच करीत नाही. सगळी पात्रे इतकी समजूतदार आहेत! जत्रेची वर्णने, शेतीकामांशी संबंधित सांस्कृतिक प्रथा-परंपरांचे दर्शन, लोकगीते सगळे काही यात आहे. पण ज्या प्रकारे ग्रामीण साहित्यात समूह किंवा ग्राममूल्ये केंद्रस्थानी असतात, तसे या कादंबरीबाबत म्हणता येत नाही. बटबटीत संघर्ष टाळणारी आणि व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवणारी ही कादंबरी आहे. नैतिकतेच्या रूढ कल्पनांना ती धक्का लावते; पण कथानकाची, पात्रांची हाताळणी या प्रकारे आहे, की त्यात कोणताही सवंगपणा, चटोरपणा येत नाही. पात्रांचा सहज ओघाने व्यावसायिक, कौटुंबिक व व्यक्तिगत प्रवास दिसतो. सध्याच्या ग्रामीण वास्तवात छोटय़ा छोटय़ा गावांतून जातीचा अडथळा पार करून अडचणीत एकमेकांना हात देणाऱ्या मैत्रीची, आधाराची, मानवी संबंधांची भावनिक गरज पुरवणाऱ्या व्यवस्था लवचीकपणे अस्तित्वात आहेत. त्या व्यवस्था पुढे आणण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते.

ही जामनेरी बोलीतील कादंबरी आहे असे ब्लर्बवर लिहिले आहे. त्याप्रमाणे खास खानदेशातील ग्रामीण शब्द यात येतात. ‘इस गावचं तिस गाव अन् भिकाऱ्याले चाळीस गाव’, ‘एक बेलदार, बारा फौजदार’ यांसारख्या म्हणीही त्यात आहेत. वाचकांच्या अनुभवातील भाषिक अडथळे टाळण्यासाठी शब्दांचे अर्थही कादंबरीच्या सुरुवातीला दिले आहेत. पण त्याची तशी गरज पडत नाही. एका बाजूने पाहिले तर ही कादंबरी मानवी संबंधांच्या, माणसांच्या मनावर होणाऱ्या परिणामांच्या फार खोलात जात नाही. पण दुसऱ्या बाजूने कोणताही भडकपणा, सवंगपणा टाळून सहजतेने जुळत गेलेल्या मानवी संबंधांची कथा आणि प्रत्यक्ष ग्रामीण वास्तव उलगडण्याचा ती प्रयत्न करते. फारशी धक्के, कलाटण्या नसलेली, पण मानवी संबंधांकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहणारी कादंबरी ज्यांना अपेक्षित असेल त्यांच्या अपेक्षा पारंपरिक ग्रामीणतेपेक्षा किंचित वेगळा बाज असणारी ही कादंबरी पूर्ण करते.

‘सायड’- रवींद्र पांढरे, रोहन प्रकाशन, पुणे, पाने- १३९, किंमत- २०० रुपये.

neelambari.kulkarni@yahoo.com