आपण राहतो त्या पृथ्वीच्या एक-तृतीयांश भागात पाणी आहे. पाण्याने केवळ जगच नाही, तर मानवी शरीरही व्यापलेले आहे. असं म्हणतात की, कित्येक कोटी वर्षांपासून पृथ्वीवर पाणी आहे. पाणी म्हणजे जीवन असं भारतीय संस्कृतीत मानलं जातं. तर असं हे पाणी गेल्या कितीतरी वर्षांपासून पृथ्वीचा एक अविभाज्य भाग बनून राहिले आहे. पृथ्वीवर आजवर कितीतरी बदल झाले आहेत. अनेक गोष्टी नष्ट झाल्या आहेत, नव्या निर्माण झाल्या आहेत. पण या सर्वामध्ये पाणी मात्र अबाधित म्हणावे अशा प्रकारचे आहे त्या स्वरूपात टिकून आहे. किंबहुना ते विश्वाचा आधार आहे. हा आधार ते कसे बनले, या पारदर्शक पाण्याची काय काय वैशिष्टय़े आहेत, ते कसे अजब आणि अद्भुत आहे, याविषयीचे हे पुस्तक आहे. या छोटय़ाशा पुस्तकात उगम, सर्वसमावेशक, प्रवास, विश्वव्यापी, मूलद्रव्य ते संयुग, पाणी म्हणजे?, बर्फाच्या बारा गती, पाण्याचा वर्णपट, सजीव सृष्टी आणि अनोखेपण अशी एकंदर दहा प्रकरणे आहेत. समर्थ रामदास पाण्याविषयी ‘उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यकारक, पाहता उदकाचा विवेक, अलौकिक आहे’ असे म्हटले आहे. पाण्याचा हा तारकमारक यापासून ते अलौकिक या पर्यंतचा प्रवास या पुस्तकातील प्रकरणांतून उलगडत जातो.  
‘पाणी- एक वैज्ञानिक वेध’ –      डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १०१, मूल्य- १०० रुपये.

आंबेडकरांचा सच्चा शिलेदार
तळागाळातील बहिष्कृत समाजाला आत्मविश्वास आणि संघर्षांची प्रेरणा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यता निवारणापासून शिक्षणापर्यंतचे कार्य महाराष्ट्राला आणि भारताला नव्याने सांगण्याची गरज नाही. डॉ. आंबेडकरांच्या या कार्यात मोलाचा वाटा उचलणारे अनेक सहकारी होते. त्यातील एक म्हणजे दादासाहेब गायकवाड. त्यांनी आंबेडकरांच्या पश्चातही त्यांच्या कार्याचा वारसा आपल्यापरीने पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. त्या वारशाचा आणि दादासाहेबांची कर्तृत्वाचा आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो. चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळामंदिर प्रवेश सत्याग्रह, मुंबई विधिमंडळातील कार्य, भूमिहीनांचे सत्याग्रह, धर्मातर व धर्मप्रचार, राजकीय पक्ष-संसदेतील कार्य असे प्रकरणनिहाय दादासाहेबांच्या कार्याचा आढावा लेखकाने घेतला आहे. या प्रकरणांवरूनच त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात येतो. आंबेडकरी चळवळीतील दादासाहेबांच्या योगदानाचा तपशीलवार आढावा लेखकाने घेतला आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेला आणि एकंदरच समाजाला या पुस्तकातून चळवळीच्या आणि जीवनध्येयाच्या प्रेरणा जाणून घ्यायला मदत होईल.
‘आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’- डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे- २६४, मूल्य- २५० रुपये.

पॅलेस्टिनी ‘वाल्याचा वाल्मिकी’
या पुस्तकाचे अनुवादक अरुण गद्रे यांनी म्हटल्यानुसार ‘वाल्याचा वाल्मिकी’ ही कविकल्पना आहे, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण ही कथा अनेकांच्या आदराचे स्थान असलेल्या रामायणातील आहे. पण गेली अनेक वर्षे पॅलेस्टाईन-इस्राएल यांच्यामध्ये सुरू असलेले महाभारत हा भयानक सूडाचा असा प्रवास आहे. या प्रवासात तास साडा हा मुलगा वयाच्या सतराव्या वर्षी यासर अराफत यांच्या फताह या संघटनेत सामील होतो. मग माणसं मोजून मारणं, त्यांच्या हत्या करणं हेच त्याचं आयुष्य बनतं. किडामुंगी मारावेत तशी तो माणसं मारतो. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर साडाला येशूच्या करुणेच्या शिकवणीची आठवण होते. मग तो सगळं सोडून देऊन अमेरिकेत स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतो. अमेरिकेत हॉटेल व्यवसायात मोठा लौकिक मिळवतो. ‘होप फॉर इस्माईल’ ही अरब व ज्यूंमध्ये सलोखा घडवून आणणारी संस्था स्थापन करतो. साडा यांचा हा सूडाकडून करुणेकडे कसा प्रवास होतो, याची ही त्यांनी स्वत: सांगितलेली कहाणी आहे. अंगावर शहारे आणणारी ही वाल्या ते वाल्मिकीपर्यंतची कथा अद्भुत आणि अविश्वसनीय वाटावी अशी सत्यकथा आहे.
‘सूडाकडून करुणेकडे’- तास साडा, अनुवाद-अरुण गद्रे, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १७४, मूल्य- २०० रुपये.    ल्ल