scorecardresearch

मतकरींची महानगरीय ‘इन्व्हेस्टमेंट’

कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रपट कथालेखक म्हणून रत्नाकर मतकरी यांची मराठी वाचकांना ओळख आहे. नाटक आणि कादंबरी हे वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या मतकरींनी कथेचा रूपबंधही तितक्याच ताकदीनं हाताळला आहे.

कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रपट कथालेखक म्हणून रत्नाकर मतकरी यांची मराठी वाचकांना ओळख आहे. नाटक आणि कादंबरी हे वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या मतकरींनी कथेचा रूपबंधही तितक्याच ताकदीनं हाताळला आहे. त्यांचा ‘खेकडा’ हा पहिला कथासंग्रह १९७० साली प्रकाशित झाला. तेव्हापासून आतापर्यंत मतकरी यांचे तीस कथासंग्रह प्रकाशित झाले असून ‘इन्व्हेस्टमेंट’ हा एकतिसावा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
यातील ‘रोझ डे’, ‘वाल्याची बायको’ आणि ‘इमोशनल ब्रेक’ या तीन कथा स्त्री-पुरुष नातेसंबंधाच्या आहेत. या तीनही कथा उच्चभ्रू सोसायटीत घडतात. ‘रोझ डे’ ही पटकथा आहे. यामध्ये एका श्रीमंत डॉक्टरच्या मुलाच्या प्रेमाची कथा आहे. मॅक्स त्याचं नाव. तो नेहाला प्रपोज करतो. नेहा नकार देते. मग तो तिच्यावर बलात्कार करतो. त्यातून तिला एचआयव्ही होतो. मॅक्सला समजतं तेव्हा तोही पॉझिटिव्ह असल्यानं आत्महत्त्या करतो. नेहा ठामपणे जगण्याचा निर्धार करते. सर्वेश तिची सोबत करण्याचं ठरवतो. या पटकथेत पटकथाकार जेके यांचीही एक कथा आहे. आपल्या मुलाच्या आत्महत्येनं अस्वस्थ झालेले जेके अ‍ॅटॅकनं जातात. तत्पूर्वी त्यांच्या जगण्याचे काही संदर्भ कथेत येतात. ‘वाल्याची बायको’मधील प्रज्ञा आपल्या नवऱ्याच्या अवैध धंद्यात सहभागी न होता स्वतंत्रपणे राहणं पसंत करते, तर ‘इमोशनल ब्रेक’मध्ये शुभंकर बोसच्या विवाहबाह्य़ संबंधांना कंटाळून त्याची बायको तृप्ती आत्महत्या करते. पण नंतर टोकाच्या निराशेनं ग्रस्त बोसही आत्महत्या करतो. ‘इन्व्हेस्टमेंट’ ही कथाही पौगंडावस्थेतील प्रेम प्रकरणातून घडलेल्या खुनाशी संबंधित आहे.
‘शो-विन्डो’, ‘पप्पू-दादा’, ‘फॅक्टरी’ या कथांमध्ये गुन्हेगारी जगाचं चित्रण आहे. अविनाश केदारे (‘शो-विन्डो’) सुखी संसार असूनही रसिका नावाच्या तरुणीला एकतर्फी प्रेम करून ब्लॅकमेल करत राहतो. परंतु रसिका त्याचा डाव त्याच्यावरच उलटवते. त्याची बायको नीता घर सोडून जाते आणि पोलीस त्याला पकडून नेतात. ‘पप्पू-दादा’मध्ये पप्पू स्वत:सह नील नावाच्या श्रीमंत मुलाचं अपहरण करवून घेतो. त्यातून पंधरा लाख खंडणी वसूल करतो. परंतु नीलचं आजारी पडणं त्याच्या जिव्हारी लागतं. तो त्याला वाचवण्यासाठी धडपड करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. ‘फॅक्टरी’मध्ये ‘स्नेहधार’सारखी अनाथालयं अनैतिक संबंधांची आणि गुन्हेगारीची केंद्रं कशी बनत जातात याचं चित्रण आलं आहे. ‘चरित्र’ कथेतील या नामवंत लेखक गुन्हेगारी व भ्रष्ट पाश्र्वभूमीच्या श्रीमंत व्यक्तीचे चरित्र लिहायला नकार देतो, त्यामुळे त्या लेखकाचं घर पेटवण्यापर्यंतच्या घटना कथेत घडत जातात.
‘इन्व्हेस्टमेंट’मधील सर्व कथा महानगरीय करणाऱ्या आहेत. परंतु महानगरातील हे जग उच्चभ्रू आहे. साहित्य, सिनेमा, संगीत, राजकारण आदींशी संबंधित आहे. विशेषत: आर्थिक उदारीकरणानंतर महानगरांमधील जो वर्ग जसजसा श्रीमंत बनत गेला, तसतसशी त्याच्याकडे आर्थिक सुबत्ता आली, पण त्याच वेगानं सांस्कृतिक व सामाजिक घसरणही झाली. पैसा हेच सर्वस्व हे मूल्य मानणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा या संग्रहात भेटतात. ‘इन्व्हेस्टमेंट’मधील आशिष आणि माणीक या श्रीमंत दाम्पत्याच्या मुलानं प्रेम नाकारणाऱ्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा जीव घेतलेला असतानासुद्धा माणिक आपल्या मुलाला पाठीशी घालते. तो निदरेष सोडवून आणण्याची व्यवस्था करते. तो सुटल्यानंतर पार्टी देते. तेव्हा माणिक म्हणते, ‘आम्ही सोहेलला पॉलिटिक्समध्येच घालणार!.. आजची सर्वात मोठी इंडस्ट्री म्हणजे पॉलिटिक्स! जास्तीत जास्त टर्नओव्हर! जास्तीत जास्त प्लॅनिंग, स्टॅटेजीज आणि जास्तीत जास्त कॉम्पिटिशन! सोहेलचं सगळं ब्रूमिंग आम्ही त्याच दृष्टीनं करत आलोय.’ तर केसमधून सोहेलला निदरेष सोडवणाऱ्या वकीलला चेक देताना आशिष म्हणतो, ‘क्रिमिनल लॉयर अडकर यांना दिलेला हा चेक ही आम्ही सोहेलच्या भविष्यावरची इन्व्हेस्टमेंट समजतो.’
ही जी जागतिकीकरणानं लादलेली करन्सी सिस्टीम आहे ती किती भयंकर आहे, याचा पडताळा पुढे अनेक कथांमधून येत राहतो.
एकंदर ही सारी माणसे ‘मूल्यव्यवस्था’ नावाची गोष्ट अडगळीत टाकून जगू पाहणारी आहेत. त्यांचे ‘आतले आवाज’ त्यांना अस्वस्थ करतातही, नाही असं नाही. पण फार थोडा वेळ. पुन्हा त्यांच्यातला हुशार, तल्लख, व्यवहारवादी आणि पैसा हेच सर्वस्व मानणारा माणूस डोकं वर काढतो. पुन्हा ती आपल्या पूर्वपदावर येतात.
आर्थिक सुबत्ता आली की माणूस भोगवादाकडे वळतो. यातूनच अलीकडे चंगळवादानं थैमान घातलं आहे. याचा परिणाम असा झाला की परंपरागत नीतीमूल्यं कूचकामी वाटू लागली. त्या मूल्यांची गळचेपी होत असती तरी स्वाभाविक होतं, परंतु त्यांना नाकारताना जी एक सांस्कृतिक घसरण सुरू झाली ती फार वेगवान बनली. भ्रष्टाचार, अनैतिक संबंध याच गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटू लागल्या. या मार्गानं जाताना जे एक मुर्दाडपण अभिप्रेत असतं, तेच आजच्या व्यवस्थेचं मुख्य बनू पाहत आहेत. त्यातून नवश्रीमंतांची सुटका होणं कठीण बनलं आहे. कोळ्याच्या जाळ्यात एखादा कीटक अडकून पडावा आणि सुटण्यासाठी धडपडताना तो अधिकच गुंतून जावा, अशी विचित्र अवस्था या माणसांची होते. अशी माणसं या कथांमधील पात्रांच्या रूपानं भेटत जातात. ही सगळी पात्रं मूळची गरीब, मध्यमवर्गीय, संधी मिळताच वाट्टेल त्या मार्गाचा वापर करून संपत्ती गोळा करतात आणि तिचा उपभोग घेण्यासाठी पुन्हा वाटेल त्या मार्गानं जाणं पसंत करतात. परंतु मतकरी इथंच थांबत नाहीत. आजची ही भ्रष्ट व्यवस्था माणूसच कसा संपवू लागला आहे, याचं भान ते सातत्यानं व्यक्त करतात. मग ‘पप्पूदादा’मधला पप्पू असो, ‘वाल्याची बायको’मधील प्रज्ञा असो किंवा ‘चरित्र’मधला लेखक असो, ही माणसं शक्य तेवढय़ा कसोशीनं आपली नैतिकता सांभाळू पाहतात. संपत्तीलाच मूल्य मानणाऱ्यांना ते काही सांगू पाहतात, पण ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, तेव्हा ही पात्रं त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या पापांपासून फारकत घेऊन आपलं सत्त्व आणि स्वत्त्व जपण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात ती मोडून न पडता ठामपणे उभी राहू शकतात आणि त्यांची ही वृत्ती कशी महत्त्वाची आहे, हे  मतकरी या व्यक्तिरेखांमधून अधोरेखित करताना दिसतात.
या कथांमधील आणखी एक विशेष जाणवतो. तो म्हणजे ही नवश्रीमंत माणसंही केवळ दुष्टपणाचं प्रतीक म्हणून वावरत नाहीत. त्या पद्धतीनं ती चढत-चढत आलेली आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर भ्रष्ट होताना त्यांची जी उलाढाल होत आहे ती कथांमधून डोकावत राहते. ती दृश्यरूपानं मोठी होत असली तरी आतून मात्र पोकळ होत चालल्याचा भास त्यांना सतत होत जातात. त्या भासांना दूर ठेवण्यातही काहीजण यशस्वी होतात. ‘इन्व्हेस्टमेंट’मधला आशिष, ‘वाल्याची बायको’मधला पद्मनाभ ही याची उदाहरणं आहेत. आपण जे करतो आहोत ते चुकीचं आहे याचं भान येऊनही ती त्याच मार्गानं जाणं पसंत करतात. परंतु आतून मात्र ती मोडलेली असतात. अशा मार्गानं जाताना सुरुवातीचा काही काळ छान वाटतो. जगणं सुंदर वाटतं. पण त्यातूनच शेवटी वाटय़ाला एकाकीपण आणि दु:खच येतं. मग आत्महत्या करून जीवनप्रवास संपवल्याशिवाय पर्याय उरत नाही याचा प्रत्यय ‘इमोशनल ब्रेक’ या कथेत येतो. याचाच अर्थ असा की, सारीच मूल्यव्यवस्था नाकारून चैनीचे आणि रानटी आयुष्य आपण मजेत जगू शकू, हा जो एक भास आहे, तो कसा केवळ भासच राहतो याचा प्रत्यय मतकरींची कथा देताना दिसते. हाही या संग्रहाचा महत्त्वाचा विशेष आहे.
या संग्रहातील ‘रोझ डे : वन लाईन’ ही कथा प्रयोगाच्या अंगानं महत्त्वाची आहे. कथेतील कथा, पटकथा, नाटक अशा तीन रूपबंधांचा वापर करून ही कथा लिहिली आहे. पटकथेच्या अंगानं व्यक्त झालेली ही कथा रूपाच्या अंगानं महत्त्वाची आहे. भाऊ पाध्ये यांच्यानंतर पटकथेचा परिणामकारक वापर मतकरींच्या या कथेत दिसतो. कथेचा आशय जरी रोमँटिक असला तरी रूप मात्र लक्षणीय आहे.
असं असूनही मतकरींची कथा असमाधान देते. कथेचा जो एकत्र किंवा समग्र परिणाम जाणवायला हवा तो जाणवत नाही. अधिक वेगवान आणि दृश्य तपशीलांनीच कथेचा अवकाश भरला जातो. त्यामुळे गंभीर विषयही सिनेमातंत्राच्या अंगानं व्यक्त होताना दिसतात. घटनेच्या पाठीमागच्या व्यक्ती, त्यांचे संबंध आणि मानसिक घालमेल या कथांमध्ये फारशी येत नाही. कथा दीर्घ असूनही केवळ पृष्ठस्तरीय वास्तवावर त्यांची भिस्त असल्यामुळे आणि कादंबरीचा आशय कथेत मांडण्याच्या प्रयत्नामुळे कथा उणावते. परंतु एकून महानगरीय जीवनाचं चित्रण समजण्यासाठी या कथा उपयोगी ठरू शकतात, यात शंका नाही.
‘इन्व्हेस्टमेंट’ – रत्नाकर मतकरी,
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,
पृष्ठे – १९०, मूल्य – २२५ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-04-2014 at 01:01 IST

संबंधित बातम्या