गुंतवणूक म्हणजे कर वाचवणे. गुंतवणूक म्हणजे एक जुगार. गुंतवणूक म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी. गुंतवणूक म्हणजे मुदत ठेवी. गुंतवणूक म्हणजे शेअर्स. सोने, पैसे कमावणे. कुणासाठी आणखी काही, तर कुणासाठी आणखीही काही. प्रत्यक्षात गुंतवणूक म्हणजे फक्त आणि फक्त स्वत:च्या स्वप्नांसाठी केलेला lok06आणखी एक प्रयत्न. आजपेक्षा येणारा उद्या थोडा जास्त उज्ज्वल असेल या आशेने येणाऱ्या उद्यामध्ये सुखकर जीवन जगण्यासाठी आपले थोडे पैसे थोडा वेळ घालवून एखाद्या ठिकाणी कामाला लावणे म्हणजे गुंतवणूक! हे करत असताना त्या पैशापासून आज मिळू शकणारा आनंद बाजूला सारताना कदाचित उद्या मिळणारा आनंद जास्त असेल अशी आशा गुंतवणूकदार बाळगतो.
निराशावादी माणूस गुंतवणूक करू शकत नाही. शेअर्समध्ये शॉर्ट सेलिंग करून मंदीमध्ये पैसे कमावणाऱ्या माणसालाही शेअर्सचा भाव कोसळण्याची आशा असते. उद्या आहे यावर त्याचाही विश्वास असतो व त्या येणाऱ्या दिवसाला सुखकर करण्यासाठी तोदेखील प्रयत्नात असतो.
पण याचा अर्थ आंधळेपणाने गुंतवणूक करायची का? एखादा शेअर वधारला की खरेदी कर, किंवा गेल्या वर्षभरात मिडकॅप म्युच्युअल फंडांनी पैसे दुप्पट केले म्हणून सगळे पैसे त्या फंडांत गुंतवून डबल होण्याची वाट बघत बसण्याला काही अर्थ नाही. पुढील वर्षी बाजाराने १०-१२ टक्के उत्पन्न दिले तरी पुरे, असे मी याच स्तंभात गेल्या पंधरवडय़ात लिहिले होते. त्यानंतर मला प्रामुख्याने दोन प्रकारचे ई-मेल वाचकांकडून आले. पहिला प्रकार म्हणजे छोटय़ा गुंतवणूकदारांना शेअर बाजारापासून दूर करण्याचा हा प्रयत्न आहे असे म्हणणारे ई-मेल. दुसरा प्रकार भयकंपित मंडळींचा. आता सगळे म्युच्युअल फंड विकून हाती आलेले पैसे मुदत ठेवीत ठेवायचे का, असे प्रश्न काही मंडळी विचारत होती. अशा प्रश्नांना उत्तर देणे कठीण असते.
आंधळा आशावाद जितका धोकादायक आहे तितकीच जग उद्या संपणार, ही भीतीदेखील अनाठायी आहे. घरदार विकून, कर्जाऊ पैसे घेऊन पुढील ‘बुल रन’मध्ये पैसे कमावण्यासाठी लागणारे भांडवल उभे करा, असे सांगणारे बाजार पंडित त्यांचे खिसे भरण्यासाठी असे सांगतात. सेन्सेक्स एक लाख होणार, वगैरे गप्पा सुरू झाल्या की बाजारातून बाहेर पडावे, हे खरे. पण त्याचे दुसरे टोकही गाठू नये. पुढील वर्षी बाजार दोलायमान राहील, याचा अर्थ म्युच्युअल फंडांच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’च्या माध्यमातून पैसे गुंतवणाऱ्या मंडळींना चांगली संधी असेल असा होतो. पुढील वर्षी बाजारात कन्सोलीडेशन झाल्यावर मोठी तेजी सुरू झाली तर त्याचा फायदा दोलायमान शेअर बाजारात खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना होईलच. अशा प्रकारे पुढील वर्ष ही एक खरेदीची संधी ठरू शकेल. पडत्या बाजारात चांगल्या शेअर्समध्ये खरेदी केल्यास आगामी तेजीत चांगले उत्पन्न मिळू शकेल असा विचार केवळ एक आशावादी गुंतवणूकदारच करू शकतो. अर्थात हे करत असताना आपण आपल्या गुंतवणुकीला किमान पाच वर्षे देऊ शकतो का, याचाही विचार व्हायला हवा.
गुंतवणूक करताना थोडी शिस्त तर हवीच, पण त्याचबरोबर हवा भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन. आज वेतनवाढ पुरेशी होत नसताना, रोज नवनवीन खर्च उभे राहत असताना पैसे आणायचे कुठून, हा एक यक्षप्रश्न आहे. चंगळवादामुळे पैशाला पाय फुटले आहेत. पुढील पिढीच्या शिक्षणाचा खर्च डोंगराएवढा भासतो आहे. अशा कठीण प्रसंगी सकारात्मक मनोभूमिका घेऊन धनवृद्धीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ पैसे नाहीत म्हणून ओरड करणे किंवा पैसे वाचवले म्हणजे झाले, अशी बोटचेपी भूमिका घेणे यात काही अर्थ नाही. पैसे वाचवून ते चांगल्या प्रकारे गुंतवणे अपेक्षित आहे. आपण आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ‘वाचवूनिया धन’ हा इतिहास आहे. ‘वाढवूनिया धन’ असा भविष्यकाळ असायला हवा आणि त्या दिशेने वाटचाल करून आपण आपले समाजऋण फेडायला हवे. 
(समाप्त)