लेखकाने लिहितं असणं, विविध ‘ट्रिगर्स’मुळे लिहितं असणं, वाचकांना वाचन थांबवणं अशक्य करणं, विलक्षण सूक्ष्म निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि लेखकीय ‘कारागिरी’ अजिबात दिसू न देताही तिचा योग्य तो उपयोग करून घेण्याचं कौशल्य यांच्या बळावर रंगीबेरंगी माणसांनी नटलेलं ‘चित्रमय जगत’ उभं करणं, लोकांना त्यात रमवून टाकणं ही ‘लेखकपणा’ची वैशिष्ट्यं वाचकांसाठी कुतूहलाचा विषय असतात. त्यातही मग एखादा लेखक जेव्हा तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग होतो आणि त्याचा प्रभाव लक्षणीय काळापर्यंत राहतो तेव्हा तर अशा लेखकाबद्दल अधिकच कुतूहल वाटतं. लेखकाने लोकांच्या जगण्यात स्थान मिळवणं ही त्याच्या सर्जनशीलतेला मिळालेली पावती असते. महाराष्ट्र देशी हे ज्या लेखकांच्या वाट्याला आलं त्यातले पु. ल. देशपांडे अग्रणी! पुलं वयाच्या साठीत होते तेव्हा ‘टीन एज’मधली माझ्यासारखी मुलं त्यांची प्रवासवर्णनं, व्यक्तिचित्रं, ललित लेख, नाटकं वाचून हरखून जात होतो. आजच्या ‘मीमांसक’ भाषेत (पण नकारात्मक नव्हे तर सकारात्मक अर्थाने) बोलायचं तर आमच्यासाठी पुलंचं लेखन म्हणजे ‘डोपामाइन’चा आद्या स्राोत होतं! (नाटक ‘वाचणं’ याबद्दल कुणाचं काय मत असेल ते असो; पण टेबलावर किंवा एका हातात जेवणाचं ताट आणि एकीकडे ‘तुझे आहे तुजपाशी’चं कितव्यांदा तरी वाचन हे दृश्य आमच्या घराने असंख्य वेळा पाहिलं होतं! आता पुस्तकाची जागा स्क्रीनने घेतली आहे. यावर वेगळी चर्चा संभवते. पण ते असो).

एकविसाव्या शतकाची पहिली पंचवीस वर्षं पूर्ण होण्याच्या टप्प्यावर विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या पुलंबद्दल एक नक्की म्हणता येईल की, हा लेखक शिळा व्हायला तयार नाही. म्हणजे ‘एके काळी पारायणं केलेली पुलंची पुस्तकं आजही वाचतो’ या अर्थी नव्हे. त्या वाचनाने तेव्हा जे आत उतरवलं ते अजूनही टवटवीत आहे या अर्थाने. त्यासाठी ती पुस्तकं पुन्हा वाचायची गरज नसते. नंदा प्रधान/ लखू रिसबूड/ नारायण/ चितळे मास्तर/ नाथा कामत/ सखाराम गटणे/ अंतू बर्वा/ बबडू/ हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका आणि इतर ‘लोकोत्तर’ वल्ली किंवा ‘असा मी असामी’तले धोंडोपंत, शंकऱ्या, नानू सरंजामे, ‘गुरुदेव’ आणि कायकिणी गोपाळराव, ‘बटाट्याच्या चाळी’तले आचार्य बाबा बर्वे, कोचरेकर मास्तर, सोकरजी त्रिलोकेकर, म्हाळसाकांत पोंबुर्पेकर, जनोबा रेगे, एच्च. मंगेशराव आणि वरदाबाई, नागूतात्या आढ्ये, ‘वाऱ्यावरची वरात’मधली ‘रविवार सकाळ’ आणि ‘साक्ष’, ‘म्हैस’मधली ‘सुबक ठेंगणी’, मधू मलुष्टे, झंप्या दामले, उस्मान शेठ, ‘‘तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ, सर्व धर्म सारखे… ऑम्लेट!’’ म्हणणारे बगूनाना, ‘स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर’ टेप लावणारे बाबासाहेब मोरे, धर्मा मांडवकर, ‘ती फुलराणी’मधली मंजुळा, अशोक जहागीरदार, विश्वनाथ जोशी आणि मटक्याच्या अड्ड्यावरील तत्त्वज्ञ दगडोबा साळुंके, पुलंच्या लेखणीतून आपल्याशी थेट बोलणारे अनेक प्रसंग, व्यक्ती आणि ठिकाणं- हे सगळं पुन्हा वाचायची गरजच नसते इतकं ते तुमच्या आत भिनलेलं असतं. दैनंदिन संवादात पुलंच्या पात्रांचे संदर्भ आणि संवाद आजही हजेरी लावतात. पुलंच्या लेखनाचं साहित्यिक मूल्यमापन जे व्हायचं ते होवो; मराठी वाचकांनी त्यांना दिलेला कौल अबाधित आहे.

हेही वाचाभुंड्या डोंगरांची भटकंती?

पुलंचं साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रांत केवळ वावरले इतकंच नाही तर त्यांनी त्या त्या क्षेत्रात एक उंची गाठली. मात्र त्यांचं पहिलं प्रेम संगीतावर होतं. एकाच वेळी एका ठिकाणी गाण्याची मैफल आणि दुसऱ्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम असं असेल तर मी गाण्याच्या मैफिलीला जाईन असं ते म्हणाल्याचं अनेकांना माहीत असेल. म्हणूनच बहुधा त्यांनी चितारलेल्या व्यक्तिचित्रांमध्ये गायक, संगीतकारांची व्यक्तिचित्रं विशेष उठून दिसतात. पुलंची व्यक्तिचित्रं म्हणजे त्यांच्या ‘गुण गाईन आवडी’ स्वभावाची द्याोतक आहेत. गायक, लेखक, अभिनेते, नातलग, मित्र, शिल्पकार, सामाजिक-राजकीय विचारवंत, कार्यकर्ते, बाबा आमटेंसारखे मोठे समाजसेवक अशांविषयी लिहिताना पुलंची लेखणी कमालीची कृतज्ञ होई, भारावून जाई. त्यामुळे पुलंनी ‘व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ गुणवर्णन’ असा पायंडा पाडल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो. पण त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रं विशेषत: भास्करबुवा बखले आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर- तर हा समज पूर्णपणे बरोबर नाही याची खात्री पटते. बखले आणि पलुस्कर या दोन्ही व्यक्तिचित्रणात पुलंमधल्या गुणग्राहक, भावुक रसिकाइतकाच त्यांच्यातला संगीताच्या इतिहासाचा अभ्यासकही ठसठशीतपणे दिसतो. इतरही बऱ्याच व्यक्तिचित्रांमधून त्यांच्यातल्या सामाजिक-सांस्कृतिक भाष्यकाराची झलक मिळत असते. (‘विश्रब्ध शारदा’च्या दुसऱ्या खंडाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना हे आणखी एक उदाहरण). फक्त होतं असं की, त्या व्यक्तिचित्रणाचा एकूण बाज प्रेमाचा, भारावलेपणाचा असल्याने काही गंभीर तपशील वाचक/ समीक्षकांकडून निसटून जातात. पुलं गेल्यानंतर पुढच्याच वर्षी, २००१ साली प्रकाशित झालेल्या ‘एक शून्य मी’ या त्यांच्या लेखसंग्रहातले काही लेख (विशेषत: ‘एक शून्य मी’ हाच लेख) वाचून ‘अरे! पुलंनी गंभीर लिखाणही केलेलं आहे की!’ असा बऱ्याच वाचकांना साक्षात्कार झाला (त्यात मीही होतो). या संग्रहातल्या त्यांच्या ‘नामस्मरणाचा रोग’ या लेखाने समाजमाध्यमांची वारी केल्याचं अलीकडे दिसलं.

हेही वाचाकचकड्या विकासाची बटबटीत वाळवंटं…

माणसाच्या जगण्यात साहित्याचं प्रयोजन काय, किंवा कलेचं प्रयोजन काय, उत्तम साहित्य/ कला कशाला म्हणायचं यावर आजवर अगणित पानं खर्ची पडली असतील. माणूस आणि त्यातही समीक्षक माणूस, स्वत:ची दृष्टी, स्वत:चा काहीएक विचारव्यूह घेऊन जगत असल्याने हे होतच राहणार. पण समीक्षेच्या अदृश्य दडपणाखालीदेखील कलावंत त्यांची निर्मिती करत राहतात, समीक्षेला खाद्या पुरवत राहतात, हे मला अधिक विशेष वाटतं. ‘मोनालिसा स्माइल’ या चित्रपटात कला इतिहास शिक्षक कॅथरीन (ज्युलिया रॉबर्ट्स) एकदा विद्यार्थिनींना चेम सूटीन या फ्रेंच इंप्रेशनिस्ट चित्रकाराचं ‘कॅरकस ऑफ बीफ’ या शीर्षकाचं एक चित्र दाखवते. ते चित्र मुलींनी आजवर पाहिलेल्या चित्रांमधून तयार झालेल्या त्यांच्या सौंदर्यदृष्टीला धक्का देणारं असतं. आणि मुख्य म्हणजे ते ‘सिलॅबस’चा भाग नसतं. या ‘आउट ऑफ सिलॅबस’ चित्राबद्दल चर्चा सुरू होते. त्यात कॅथरीन म्हणते की, तुम्हाला हे चित्र ‘आवडायला’च हवं असं अजिबात नाही; पण तुम्ही ते ‘विचारात’ मात्र जरूर घेतलं पाहिजे. मला वाटतं, हा विचार कलात्मक अभिव्यक्तीबाबत, कला क्षेत्रातील पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही आविष्कारांबाबत साधकबाधक चर्चा करताना लक्षात घ्यावा असा आहे. पुलंना वाचकांचं उदंड प्रेम मिळालं आणि दुसरीकडे समीक्षकीय दंडुक्यांनीही त्यांना सोडलं नाही. त्यांच्या काही लेखांमधून (उदा. ‘विनोदी लेखन म्हणजे साहित्य? हॅट्, हडत् किंवा हुडुत!’ हा ‘अघळपघळ’मधला लेख) त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. सुधीर बेडेकर, फ. मुं. शिंदे यांना दिलेल्या मुलाखतींमध्येही ते याबद्दल बोलले आहेत. (दोन्ही मुलाखती ‘पुरचुंडी’ या पुस्तकात आहेत. फ. मुं. शिंदेंना दिलेल्या मुलाखतीत भालचंद्र नेमाड्यांनी पुलंवर केलेल्या टीकेबद्दल पुलं जे बोलले आहेत ते ज़रूर वाचावं. आणि सुधीर बेडेकरांना दिलेल्या मुलाखतीत पुलंवर होणाऱ्या ‘मध्यमवर्गीय लोकांचा मध्यमवर्गीय लेखक’ आरोपाबद्दल ते जे बोलले आहेत तेही अवश्य वाचावं. पुलंसारखा लेखक ‘माणूस’ म्हणून कसा मोठा होता आणि वाचकांना तो का आवडतो हे लक्षात येईल!). स्वत: पुलंनी थिएटर ऑफ द अॅब्सर्ड, नवकविता, एकूणच त्यांना ‘अनाकलनीय’ वाटणाऱ्या कलाविष्कारांबद्दल विडंबनात्मक लेखन केलं आहे. भाऊ पाध्येंच्या लेखनशैलीचीही त्यांनी टोपी उडवली आहे. साहित्याच्या, कलेच्या क्षेत्रात भिन्न वृत्तीच्या, भिन्न विचारप्रवाहांचे पाईक असलेल्या कलाकार- समीक्षकांकडून टीकेची जी देवाणघेवाण चालते ती ही मंडळी ‘माणूस’ आहेत हेही लक्षात घेत पाहावी लागते. मला जाणवणारं पुलंचं एक वैशिष्ट्य असं की, ते जेव्हा भक्कम आणि निर्विष विनोदाचा आधार घेत टोप्या उडवत तेव्हा त्यातून होणारी ‘रसनिष्पत्ती’ लाजवाब असे! आज ‘रोस्टिंग’ हा विनोदाचा प्रकार चांगला रुळला आहे; पण त्या वेळी पुलंनीही काही प्रमाणात हे रोस्टिंग केलं होतं. प्रश्न मुळात विनोदाला मान्यता आणि प्रतिष्ठा देण्याचा आहे. ‘विनोद’ या साहित्यप्रकाराच्या स्वरूपातच अतिशयोक्ती, थोडी आक्रमकता, थोडे बोचकारे काढण्याची क्षमता हे सगळं असतं हे मान्य करण्याचा आहे. समाज म्हणून, वाचक-प्रेक्षक म्हणून तुम्ही हे करू शकलात तरच पुढची चर्चा संभवू शकते.

हेही वाचादर्शिका: शृंगारिक आणि अभिजात

आणि या आघाडीवर आज पुलंचं काय झालं असतं हा विचारही करवत नाही. जेव्हा पुलं विनोद करत होते (आणि जोडीला ‘ठणठणपाळ’ची अद्भुत वटवट सुरू होती) तेव्हाही काही प्रमाणात त्यांना त्याचे काही उलट फटके बसत होते. ‘वाऱ्यावरची वरात’ सुरू होताना पुलं प्रेक्षकांसमोर येऊन ‘आमचा हा कार्यक्रम मजेचा आहे. म्हणजे हसून सोडून द्यायचा आहे. त्यात साहित्यिक मूल्य वगैरे शोधू नका. सापडणार नाही,’ असं म्हणून पुढे अगदी काकुळतीने ‘कृपा करून कुणी रागवू-बिगवू नका हं’ असं म्हणायचे. पण तरी एकुणात बघता लोकांची विनोद स्वीकारण्याची, सहन करण्याची तयारी बरीच बरी होती असं म्हणता येतं. आज कदाचित पुलंचं अवघड झालं असतं. ‘या भारतमातेनं एक वैताग आणलाय. जरा कुठे थोडा वेळ नातवंडांना खेळवेल तर नाव नाही. ऊठसूट आपली सुपुत्रांना हाका मारत असते,’ असं त्यांनी एके ठिकाणी ओघात लिहिलं आहे. परदेशात स्त्री-पुरुषांचा मुक्त वावर पाहून ‘आम्ही मात्र स्वत: प्रभू रामचंद्र असल्यासारखे सीतामायांना आमच्या मागून वागवत चाललो होतो’ असं ते एका प्रवासवर्णनात लिहितात. आणखीही काही उदाहरणं आहेत. आता आज त्यांनी हे विनोद केले असते तर कदाचित संस्कृतिरक्षक आणि देशभक्तांनी त्यांच्या घरावर मोर्चे नेले असते आणि पुलंवर ‘अर्बन नक्षल’चा शिक्काही बसला असता.

१९२० ते २००० हा पुलंचा ऐंशी वर्षांचा कालखंड राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक बदलांच्या संदर्भात ज्या वेगाने पुढे सरकत गेला, तितकाच वेग बहुधा २००० ते २०२५ या पंचवीस वर्षांच्या काळाला आहे. या काळातला बदलाचा वेग अचंबित करणारा आहे. डिजिटल जग वेगवान, सोयी-सुविधांचं असलं तरी ते बऱ्याच प्रमाणात हिंसकही आहे. एकीकडे ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी’ आहे तर दुसरीकडे (ऐतिहासिक) अभावग्रस्तताही आहे. असं असतानाही बाजाराच्या तावडीतून कुणीच सुटलेलं नाही. लेखकही नाही. पुलं ज्या काळात वावरत होते तेव्हा लेखक आजच्याइतका असुरक्षित, प्रभावक्षम नव्हता. लेखक त्याच्या काळाचं अपत्य असतो असं म्हणतात, पण त्याचबरोबर तो त्याच्या काळाला काही प्रमाणात आकारही देत असतो. आज लेखकापुढे ‘काळाचं अपत्य’ असण्याला पर्याय नसल्यासारखी स्थिती आहे. वाचक आपल्या लेखकाचा शोध घेत असत; पण आता लेखकाला आपला ‘टारगेट’ वाचक शोधावा लागतो. कारण वाचकांचं लक्ष प्रचंड विभागलेलं आहे. एक तर वाचकाचा प्रेक्षक झाला आहे. त्यामुळे चोवीस तास स्क्रीनवर गळणाऱ्या ‘कंटेंट’वरचे त्यांचे डोळे आपण लिहिलेल्या कथेकडे वळवण्याची उस्तवार लेखकालाच करावी लागते. यातून आजचा लेखक या काळासारखाच विखंडित, विस्कळीत झालेला दिसतो. (हे म्हणणं म्हणजे काही अंतिम निवाडा नाही. एक ढोबळ निरीक्षण आहे इतकंच). आज पुलं असते तर कदाचित ते स्वत:देखील समाजमाध्यमांच्या जंजाळात हरवले असते. कारण त्यांचा स्वभाव माणसांमध्ये रमण्याचा होता, पण त्यामुळे ते स्वत: भरभक्कम निर्मिती करण्याऐवजी समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांना उत्तरं देत बसले असते. अंतहीन चर्चांमध्ये अडकले असते. (अर्थात सुनीताबाईंनी त्यांना बाहेर काढलं असतं!) पुलंनंतर त्यांच्यासारखा हरहुन्नरी, अष्टपैलू लेखक-कलावंत मराठी जगतात अद्याप झाला नाही; पण भविष्यात कधी होईल का, असा प्रश्न काही जणांच्या मनात येत असेल. मला हा प्रश्न तितकासा प्रस्तुत वाटत नाही. कारण कलाकृती आणि कलावंत या दोहोंच्या ‘निर्मिती’बाबत आपण गणिती पद्धतीने काहीच सांगू शकत नाही. (शिवाय वर उल्लेख केलेली ‘काळाची दुखणी’ आहेतच!) पुलंसारखा लेखक होवो अथवा न होवो, जे लेखक होतील त्यांनी त्यांच्यासारखा ‘माणूस’ लेखक व्हावं असं मात्र मनापासून वाटतं. पुलंमधला लेखक, रसिक आणि सहृदय माणूस वेगळा काढता येत नाही इतके ते एकजीव झालेले दिसतात. पुलंबद्दल आत्मीयता वाटण्याचं हे एक मुख्य कारण आहे.

‘कृतज्ञ असणं ही सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि कृतघ्न असणं सर्वात कुरूप गोष्ट आहे,’ असं पुलंनी म्हटलं आहे. सांस्कृतिक-वैचारिक क्षेत्रात चर्चा, समीक्षा, ‘विचारधारा आणि व्याख्यांची युद्धं’ हे सगळं सुरू असायला हरकत नाही, पण पुलंचं हे साधं म्हणणं लक्षात ठेवून ते केलं तर कदाचित हा प्रवास सुसह्य होईल. पुलंना ‘आनंदयात्री’ म्हटलं जातं त्याची अशा वेळी आठवण होते. ते आज असते तर त्यांनी काय केलं असतं किंवा नसतं याचं मला फारसं कुतूहल नाही, पण त्यांच्यासारखा ‘सहयात्री’ आपल्याबरोबर आहे याचा मला अतीव आनंद झाला असता!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

utpalvb@gmail.com (लेखक सामाजिक-सांस्कृतिक विषयांचे अभ्यासक आहेत.)