सिद्धार्थ खांडेकर
siddharth.khandekar@expressindia.com
विविध क्रीडा क्षेत्रांतील घटना-घडामोडींचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक बाजूंनी विश्लेषण करणारे आणि खेळाडूंच्या मनोकायिक प्रश्नांच्या अंतरंगात डोकावणारे सदर..
अलीरझा फिरूझा या १६ वर्षीय तरुणाचं नाव बुद्धिबळ वर्तुळाबाहेर फार कुणाला माहीत असण्याची शक्यता कमीच. अलीकडे एका विचित्र कारणास्तव त्याच्या नावाची चर्चा जगभरच्या माध्यमांमध्ये सुरू आहे. अलीरझा हा इराणचा क्रमांक एकचा बुद्धिबळपटू. अतिशय हुशार आणि बुद्धिबळ जगतातील भल्याभल्यांशी (जगज्जेता मॅग्नस कार्लसन, माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, माजी आव्हानवीर फॅबियानो करुआना यांच्यासह) बिनदिक्कत टक्कर घेणारा. अत्यंत चपळाईनं अचूक चाली रचणारा अशी त्याची ख्याती आहे. काहींना त्याच्यात पूर्वीचा विश्वनाथन आनंद दिसतो. झटपट चाली रचणारा एक चष्मिस मुलगा!
पण अलीरझा आता इराणकडून खेळणार नाही. हा लेख लिहिला जात असताना नेदरलँड्समध्ये टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत तो उत्तम खेळत होता. कार्लसनकडून तो हरला खरा; पण अनेक दिग्गजांना त्यानं हरवलं. या स्पर्धेत तो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना अर्थात् ‘फिडे’च्या झेंडय़ाखाली खेळला. सरत्या वर्षांच्या अखेरीस मॉस्कोत जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा रंगली. तिथंही अलीरझा फिडेच्या ध्वजाखालीच खेळला. कारण काय? तर त्याला इराणी बुद्धिबळ संघटनेनं- म्हणजे खरं तर इराण सरकारनं स्पर्धेत खेळण्यास मनाई केली होती. याचं कारण त्या स्पर्धेत काही इस्रायली बुद्धिबळपटूही सहभागी झाले होते. इस्रायलशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत असं इराणचं धोरण आहे. जागतिक स्पर्धेच्या आधी एका स्पर्धेत आणखी दोन इराणी बुद्धिबळपटू इस्रायली प्रतिस्पध्र्याशी खेळले होते. आमचे प्रतिस्पर्धी इस्रायली होते हे ठाऊक नव्हतं, असं सांगून त्या दोघांनी वेळ निभावून नेली. जागतिक स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला आपापल्या देशाच्या झेंडय़ाखाली खेळावं लागणार असल्याने ही सबब चालण्यासारखी नव्हतीच. पण खेळायचं नाही, याचा अर्थ डाव सोडून फुकटचा गुण प्रतिस्पध्र्याला बहाल करायचा! अर्ध्या गुणासाठी जिथं तीव्र चढाओढ असते, तिथं ही चैन परवडण्यासारखी नव्हती. हे ताडूनच अलीरझानं स्वतंत्रपणे फिडेच्या झेंडय़ाखाली खेळण्याचा निर्णय घेतला. तो सध्या पॅरिसमध्ये राहतो. भविष्यात तो पुन्हा इराणचं प्रतिनिधित्व करण्याची शक्यता जवळपास शून्य. कठोर आणि कालविसंगत कडव्या धोरणापायी आपण एक गुणी बुद्धिबळपटू गमावला याचा इराणमधील कुणाला विषाद वाटल्याचं अजून तरी वाचनात आलेलं नाही. कारण इराणचा त्याग करणारा तो पहिला खेळाडू नाही!
किमिया अलीझादे ही इराणची पहिली ऑलिम्पिक पदक विजेती महिला. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं ५१ किलो वजनी गटात तायक्वांडो प्रकारात कांस्य पदक मिळवलं. तिची ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी! कारण इराणमध्ये आजही महिलांवर अनेक बंधनं आहेत. नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच तिनं इराणचा त्याग करत असल्याचं इन्स्टाग्रामवरून जाहीर केलं. ती बहुदा नेदरलँड्समध्ये गेली असावी असा अंदाज आहे. आपल्या यशाचा वापर इराण सरकारनं स्वत:च्या प्रचारासाठी केला, असा तिचा आरोप. किमिया नेमानं हिजाब वापरते, त्यामुळेच यशस्वी झाली असा तो प्रचार. खुद्द किमियानं ‘अन्याय, खोटारडेपणा, दांभिकपणा, खुशामतखोरी’चा विलक्षण कंटाळा येऊन देश सोडताना सांगितलं की, कुणीही मला बोलावलेलं नाही. भविष्यातील कष्टांची आणि देश सोडण्याच्या दु:खाची मला कल्पना आहे. पण माझ्यासारख्या हजारो जणींवर होत असलेला अन्याय सोसत राहणं आता शक्य नाही.
निव्वळ हिजाब वापरला नाही म्हणून इराण सरकारकडून रीतसर हकालपट्टी झालेली शोहरे बायात ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच आहे. महिला बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठी नुकत्याच झालेल्या लढतीची ती मुख्य पंच (आरबिटर) होती. आशियामध्ये या क्षेत्रात ‘अ’ दर्जा मिळवलेली ती एकमेव महिला. स्पर्धास्थानी हिजाबविना वावरतानाची तिची छायाचित्रं प्रसिद्ध झाल्यावर तिला जाब विचारला गेला. तिनंही इराणला न परतण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोतील स्पर्धेचा सुरुवातीला उल्लेख झाला, त्यात इराणची मित्रा हेजाजीपूर ही बुद्धिबळपटू हिजाब किंवा स्कार्फही न घालता खेळत असल्याची छायाचित्रं प्रसिद्ध झाल्यानंतर तिचीही इराणमधून हकालपट्टी झाली.
खरं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर इराणी क्रीडापटू बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करू लागले आहेत. एशियाडमध्ये पहिल्या पाचांत आणि ऑलिम्पिकमध्ये पाच-दहा पदकं अशी त्यांची अलीकडची कामगिरी आहे. कबड्डीमध्ये हा संघ भारतालाही भारी पडू लागला आहे. कुस्ती, तायक्वांडो, ज्युदो, बुद्धिबळ, वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये इराणी खेळाडू उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर चमकत आहेत. क्रीडापटू एकीकडे उत्तम प्रगती करत असताना जागतिक राजकारणात इराणी नेत्यांकडून दाखवला जात असलेला आडमुठेपणा क्रीडापटूंच्या बाबतीतही दाखवला जातो आणि त्यामुळे क्रीडापटूंबरोबरच इराणचंही नुकसान होत आहे. काही वेळा स्पर्धा संघटक स्वत:हून यातून मार्ग काढतात आणि इराणी क्रीडापटूंना साह्य़ करतात. गेली काही वर्ष फिडेनं महत्त्वाच्या जागतिक स्पर्धामध्ये इराणी आणि इस्रायली बुद्धिबळपटूंमधील द्वंद्व शक्य तेव्हा आणि शक्य तितक्या वेळा टाळलं. पण अलीकडे अशी सूट फिडेकडून दिली जात नाही.
इस्रायलशी खेळायचं नाही म्हणजे नाही, हे धोरण काही वेळा हास्यास्पद प्रकारांना कारणीभूत ठरतं. २०१७ मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत इराणचा अलीरझा करिमी-मचियानी हा मल्ल रशियाच्या अलीखान झाब्रायलॉवशी दोन हात करत होता. ही कुस्ती सुरू असताना अलीरझाचा प्रशिक्षक हमीदरझा जामशिदी याला कळलं, की लगतच्याच आखाडय़ामध्ये झालेल्या कुस्तीत एक इस्रायली मल्ल जिंकला. अलीरझा त्याची कुस्ती जिंकला असता तर त्याची गाठ पुढील फेरीत या इस्रायली मल्लाशी पडली असती. प्रशिक्षक हमीदरझानं त्याच्या पठ्ठय़ाला- अलीरझाला रशियन मल्लाविरुद्धची कुस्ती मुद्दामहून हरण्याविषयी सूचना केली! पुढे दोघांवरही जागतिक कुस्ती संघटनेनं बंदी घातली. इस्रायली मल्लाशी खेळण्यापेक्षा किंवा कुस्ती लढण्याआधीच हार पत्करण्यापेक्षा आखाडय़ातली हार अलीरझानं स्वीकारली.
सईद मोलाई हा तर ज्युदोमधला जगज्जेता. २०१८ मध्ये त्याला जगज्जेतेपद राखण्याच्या स्पर्धेदरम्यान एका लढतीत न खेळण्याचा हुकूम मिळाला. त्यावेळी सईद ८१ किलो वजनी गटात रशियाच्या एका ज्युदोकाशी खेळत होता. कारण उघड होतं. पुढील फेऱ्यांमध्ये केव्हातरी त्याची गाठ सागी मुकी या इस्रायली ज्युदोकाशी पडणार होती. सईदनं आदेश झुगारून लावला. त्याची आणि मुकीची गाठ अंतिम फेरीत पडली नाही, कारण उपान्त्य लढतीतच सईद पराभूत झाला आणि अखेरीस अंतिम फेरी जिंकून मुकी जगज्जेता बनला. निव्वळ इस्रायलद्वेषापायी आपल्याच एका जगज्जेत्या ज्युदोकाची कारकीर्द इराणी अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवली. वैतागलेल्या सईदनंही इराण सोडला. इराणच्या धोरणांना वैतागून आंतरराष्ट्रीय ज्युदो संघटनेनं इराणवरच बंदी घातली – जी आजही लागू आहे. यात सर्वाधिक नुकसान इराणी ज्युदाकांचं झालं आणि पुढेही होत राहील.
इराणमधून गुणवान क्रीडापटूंचं होत असलेलं पलायन किंवा परित्याग ही क्रीडा क्षेत्रासाठी नवीन बाब नाही. पूर्वी सोव्हिएत महासंघ किंवा सोव्हिएत प्रभावाखालील पूर्व युरोपिय देश, अलीकडच्या काळात चीन किंवा उत्तर कोरिया, आफ्रिकेतले काही देश येथून खेळाडू बाहेर पडतच असतात. इराणचं वेगळेपण म्हणजे अशा खेळाडूंचं प्रमाण तिथं अधिक आहे. नागरी विमानाला क्षेपणास्त्र समजून ते पाडणाऱ्यांच्या या देशाला खरं तर हजारो वर्षांची परंपरा आहे. नैसर्गिक स्रोतांनी हा देश समृद्ध आहे. निर्बंधपूर्व काळात काहीशा मुक्त धोरणांमुळे तेथील क्रीडाक्षेत्र बऱ्यापैकी फुलू लागलं होतं. ती मालिका तूर्त खंडित झाल्यासारखी आहे. त्यामुळे भविष्यात आणखी मोठय़ा प्रमाणात या देशातून क्रीडापटूंनी पलायन केल्यास आश्चर्य वाटू नये.
हिजाबच्या दुराग्रहापायीच तेथील एका बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यास आपल्या काही महिला बुद्धिबळपटूंनी नकार दिला होता. इराणचं राजकीय आणि आर्थिक विलगीकरण होण्यास काही प्रमाणात अमेरिका जबाबदार असेलही; पण क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या विलगीकरणास सर्वस्वी इराणी राज्यकर्त्यांनाच जबाबदार धरावं लागेल.