आर्थिक अडचणींत असलेल्या पाकिस्तानात यंदा विकास कसला झाला असेल तर गाढवांच्या संख्येचा. तिथे ती दरवर्षी सातत्याने एक लाखाने वाढत असल्याचा पुरावा एका अहवालाने दिला. पूर्वी आपण भारतीय आपल्या मागासपणाच्या मासल्यासाठी अमेरिकायुरोपसिंगापूरच्या प्रगल्भतेची उदाहरणे द्यायचो. आता उगी विकासाच्या गमजांसाठी पाकिस्तानच्या बुटक्या अर्थव्यवस्थेला तुलनेसाठी धरतो, हे भारतातही गर्दभ जमात जोमाने वाढत असल्याचे लक्षण आहे काय?

भारताचा शेजारी देश पाकिस्तान गेल्या दोन-तीन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानने नुकताच त्यांचा आर्थिक वर्ष २०२३-२४ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालात वेगवेगळ्या क्षेत्रांसंबंधीची आकडेवारी जाहीर केली असली तरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते गाढवांच्या संख्येने. कारण गेल्या वर्षभरात पाकिस्तानमधील गाढवांची संख्या वाढून ती ५९ लाखांवर गेली असल्याचं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र देशाच्या जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) बाबत पाक सरकारने ठेवलेलं उद्दिष्ट त्यांना साध्य करता आलेलं नाही. एरवी पाकिस्तानचं काही बरं झाल्याचं, चांगलं चालल्याचं कळलं की आपल्याला ऊस गोड लागत नाही, मटण तिखट लागत नाही की व्हिस्की चढत नाही. पण मागील काही वर्षं पाकिस्तानातील गाढवांची संख्या दरवर्षी सातत्याने एक लाखाने वाढत आहे. पाकिस्तानच्या या प्रगतीची एकाही भारतीयाला असूया वाटत नाही. हे भारतीयांची सहिष्णुता प्रचंड वाढली असल्याचं द्याोतक आहे, असं मला नमूद करावंसं वाटतं.

Loksatta lokrang Fragmented Bharat Unbroken Folk Caste Religon Election
विखंड भारत, अखंड लोक
documentary maker
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…
lokrang article
पडसाद : नेत्यांनी आपल्या भावना वैयक्तिक ठेवाव्यात
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
Loksatta lokrang Tawaifnama is a saga
तवायफनामा एक गाथा
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले :‘कान’ महोत्सवापर्यंत नेणारा प्रवास…!

स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारतापेक्षा एक दिवस सीनियर असलेल्या पाकिस्तानातील लोकशाहीची आणि एकंदरीतच विकासाची अवस्था पाहता तिथे गाढवांचा सुकाळ झाला आहे हे सांगायला कुणा विचारवंतांची गरज नसावी. राज्यसत्तेवर धर्मसत्तेचा पगडा असल्याने, काही ठरावीक व्यक्तींच्या हाती सत्ता केंद्रित झाल्याने, स्वायत्त संस्था प्रभावहीन झाल्याने आणि विरोधी मतांचं पद्धतशीर खच्चीकरण केल्याने पाकिस्तानच्या लोकशाहीचा जो तमाशा झाला आहे तो उघड्या डोळ्यांनी दिसत असतानादेखील; आपल्या सत्ताधाऱ्यांनीही त्याच रस्त्याची कास धरावी, समर्थकांनी त्यांचा उदोउदो करावा हे सगळं भारतातही गर्दभ-जमात जोमाने वाढत असल्याचं लक्षण नाही काय?

पूर्वी आपण भारताची तुलना अमेरिका- युरोप- सिंगापूर वगैरे देशांशी करायचो आणि विकासाच्या बाबतीत आपण किती मागे राहिलो म्हणून सरकारला दूषणं द्यायचो. आता आपण आपली तुलना पाकिस्तान, अफगाणिस्तानशी करतोय आणि त्यांच्या तुलनेत आपण किती सुरक्षित आहोत म्हणून सरकारला धन्यवाद देतोय. यापेक्षा आपल्या गर्दभीकरणाचा आणखी पुरावा काय हवाय!

सर्वाधिक गाढवं असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उद्या समजा पाकिस्तान, भूतान, म्यानमार, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तानसकट अखंड हिंदुस्थान झालाच तर आपल्याला पाकिस्तानच्या गाढवांसकट तो देश आपल्यात सामावून घ्यावा लागेल या कल्पनेने आमचे लेले काका आताच भयभीत झालेले आहेत. विश्वगुरू झालेल्या भारताने उद्या चीन ताब्यात घेतल्यास जगात संख्येने दुसऱ्या क्रमांकावर असलेली चीनची गाढवंदेखील आपल्याला घ्यावी लागतील. ती चिनी गाढवांची ब्याद नको या एकमेव कारणासाठी भारत चीनशी पंगा घेत नसल्याचं संरक्षण दलातील एका गुप्त सूत्राकडून मला कळलं आहे.

आणखी वाचा-बौद्धिक चर्चेच्या पलीकडे…

मध्यंतरी, युनायटेड नेशन्सने जाहीर केलेल्या World Happiness Index नुसार आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक भारतापेक्षा खूपच अव्वल असल्याचं वाचून मला अत्यंत वाईट वाटलं होतं. पण पाकिस्तानातील गाढवांची वाढती संख्या आणि गाढवं कधीही दु:खी होत नाहीत हे वास्तव ध्यानात आल्यावर माझं दु:ख जरासं हलकं झालं आहे.

भारतातील गाढवांची संख्यादेखील पहिल्या पाच क्रमांकात येण्याइतकी असावी. मात्र योग्य ती गणना न झाल्याने आपला हा बहुमान हुकला असल्याचा मला संशय आहे. भारतातला मध्यमवर्गीय माणूस स्वत:ला वाघ समजतो. आपला शब्द, आपलं रूप, आपला पंजा, आपली डरकाळी, आपली चालण्या-बोलण्याची ढब हे सगळंच एकमेवाद्वितीय असल्याचा त्याचा समज असतो. आपण वाघ असल्याचं आधी स्वत:ला आणि मग दुनियेला पटविण्याच्या भाराखाली तो दबलेला असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा त्याचा दिवस आपण वाघ आहोत हे सिद्ध करण्यातच निघून जातो. रस्त्यात, लोकलच्या प्रवासात, ऑफिसात, मित्रमंडळीत, अनोळखी लोकांत, सोशल मीडियावर असं सगळीकडे आपण वाघ असल्याचं सिद्ध करण्यात त्याचा दिवस निघून जातो. आणि वाघ बनण्याच्या ओझ्याखाली दमून भागून संध्याकाळी तो जेव्हा घरी येतो तेव्हा घरची वाघीण म्हणते, ‘‘आलं आमचं गाढव!’’

एखाद्याची तारीफ करताना ‘‘ये मेरा शेर है’’ असं म्हणणाऱ्या, आपलं चिन्ह म्हणून आरोळी ठोकणारा सिंह किंवा जबडा वासलेला वाघ दाखवणाऱ्या माणसाला उगीच का वाघ, सिंह बनायचं असतं मला कळत नाही. असं म्हणतात की, थियेटरमध्ये शिरताना डोकं बाजूला काढून ठेवलं तरच बरेचसे हिंदी सिनेमे एन्जॉय करता येतात. मी तर म्हणेन की, केवळ सिनेमाच नाही तर रोजचं जगणंही डोकं बाजूला ठेवून जगलं की सोपं होतं. आणि हे तत्त्वज्ञान गाढवाला बरोब्बर कळलेलं आहे. खरं म्हणजे, या जगात सुखेनैव जगायचं असेल तर गाढव बनता आलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं खूप कठीण आहे.

आणखी वाचा-कामगारांच्या व्यथेची मांडणी

माणूस म्हणून जगायचं असेल तर भूक, रोटी, गरिबी, आजारपणं, मजबुरी, लाचारी, प्रेम, कर्तव्य, त्याग, मोह, माया, लोभ, लालच, आजारी आई, दारुडा बाप, बिनलग्नाची बहीण, ऑफिस, बॉस, इन्क्रिमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर, सस्पेन्शन, खड्ड्यातला प्रवास, सामाजिक जबाबदाऱ्या, धार्मिक कर्मकांडं, नैतिक कर्तव्यं, आपल्याला हवं असलेलं मोठं घर, नवी कार, बायकोच्या न संपणाऱ्या मागण्या, मुलांचं शिक्षण, त्यांना हवे असलेले स्मार्टफोन, टॅबलेट, एलईडी टीव्ही आणि आपण आहोत त्यापेक्षा अधिक चांगले आहोत असे दाखविण्याची खाज अशा हजार झंझटी सोडवाव्या लागतात. गाढव असल्यावर आपोआपच या सगळ्या जंजाळातून सुटका होते. गाढव होण्यासारखं सुख नाहीये. गाढव हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या योग्यासारखं असतं. कुठलंही सुख-दु:ख, राग-लोभ, मान-अपमान त्याला विचलित करू शकत नाही. गाढव खऱ्या अर्थाने स्थित:प्रज्ञ असतं. जरा काही मनाविरुद्ध झालं की माणूस दु:खी होतो, रडू लागतो, दारू पितो, डिप्रेशनमध्ये जातो. जरासं काही मनासारखं झालं की माणूस दारू-मटणाची पार्टी करतो, फटाके उडवतो, मिरवणुका काढतो, जोरजोरात डीजे लावून नाचतो. मात्र, गाढवं माणसाइतकी हलक्या कानाची आणि हलक्या काळजाचीही नसतात. ती ढीगभर दु:खाने कष्टी होत नाहीत आणि मणभर सुखाने आनंदीही होत नाहीत. अगदी सुक्या आणि ओल्या चाऱ्यातदेखील ती भेदभाव करीत नाहीत. दोन्ही प्रकारचा चारा गाढव सारख्याच आनंदाने किंवा अनिच्छेने खातं. त्याला ठाऊक असतं की काहीही खाल्लं तरी शेवटी ओझीच वाहायची आहेत. हॉटेलात आणि लग्नाच्या पंगतीत इतरांच्या ताटात काय आहे हे पाहून हळहळणाऱ्या, इतरांच्या बायकांकडे वळून-वळून बघणाऱ्या आणि दु:खी होणाऱ्या माणसासारखं गाढव कुणाच्या ताटात डोकावून पाहत नाही आणि पर्यायाने दु:खीही होत नाही. आपला आनंद किंवा दु:खाची तीव्रता मोजण्यासाठी, त्याची दुसऱ्या कुणाच्या आनंद किंवा दु:खाशी तुलना करण्याची त्यांना गरजच वाटत नाही.

माणूस मतलबी असतो. आपला स्वार्थ साधण्यासाठी माणूस गाढवालादेखील बाप बनवतो, पण आजवर एकाही गाढवाने आपल्या स्वार्थासाठी माणसाला पप्पा किंवा डॅडी अशी मारलेली हाक मी तरी ऐकली नाहीये. माणूस आपल्या स्वार्थासाठी बोंबाबोंब करतो, मोर्चा काढतो, आंदोलनं करतो, आमरण उपोषण करूनही जिवंत राहतो. गाढव अशी राष्ट्रद्रोही कृत्यं करीत नाही. कधी नाइलाजाने त्याला आमरण उपोषण घडलंच तर त्यातून ते जिवंत वाचत नाही. माणूस स्वार्थापायी कुत्ता-कमीना होतो, ढोंग पांघरून बोका होतो, क्रूर लांडगा होतो, विश्वासघातकी कोल्हा होतो, रंग बदलणारा सरडा होतो, प्रेतालाही न सोडणारं गिधाड होतो. पण काहीही झालं तरी गाढव हे कायम गाढवच राहतं. भले गाढवाकडे गाडी-बंगला नसेल, कुटुंब-कबिला नसेल, पद-पैसा नसेल, नोकर-चाकर नसतील, शान-शौकत नसेल, ओळखी-पाळखी, जमीन-जुमला, उच्च जातीचे विशेषाधिकार नसतील, आरक्षणाचा आधार नसेल, पण ते सुखी असतं. निदान ते दु:खी असल्याचं त्यानं आजवर कुणाला सांगितलेलं नाहीये.

आणखी वाचा-मराठी भावसंगीताच्या वाटचालीचा आलेख

माणसाची अशी इच्छा असते की आपल्या आसपास सदैव गाढवंच असावीत. जे गाढव नसतील त्यांनीदेखील आपल्यासमोर गाढव बनून राहावं. माणूस हे बोलून दाखवत नाही खरं. मात्र जे आपल्यासोबत गाढव बनून राहण्याचं अन् आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचं नाकारतात त्यांना तो गाढवांची उपमा देतो. या गोष्टीचा गाढवांना नक्कीच राग येत असणार. आपला नि:स्वार्थी त्याग, कर्तव्य-पारायण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या गुणांची माणूस कदर करीत नाही याचं गाढवांना वाईटही वाटत असणार. पण गाढवं कधी कुणाची, कुणापाशी तक्रार करीत नाहीत. गाढवं माणसाच्या मूर्खपणावर केवळ हसतात. कारण गाढवाचं आपल्या गाढवपणावर असीम प्रेम असतं.

अमेरिका आपला आशियातील हक्काचा लष्करी तळ म्हणून पाकिस्तानच्या भूमीचा बिनदिक्कत वापर करते. ओसामा बिन लादेन सारखा आंतरराष्ट्रीय दहशतवादी पाकिस्तानात लपून बसतो. दाऊद इब्राहिम सारखे माफिया निर्धास्तपणे पाकिस्तानच्याच आश्रयाला असतात… पाकिस्तानसारखा देश असो वा तुमच्या आमच्या सारखी कुणी सामान्य व्यक्ती, आपण जेव्हा आपली पाठ इतरांना मुक्तपणे वापरू देतो, तेव्हा जगातली अवघी दुष्टाई आपली ओझी त्या मोकळ्या पाठीवर लादून आपल्याला गाढव बनवून सोडल्याशिवाय राहत नाही!
sabypereira@gmail.com