साध्याशा इस्मत चुगताई आणि माफक साजशृंगार तसेच सुरुचिपूर्ण वेशभूषेतल्या सुसंस्कृत, संयत वागणार्या कुर्रतुलऐन हैदर आपापली व्यक्तिमत्त्व, भाषा, शैली आणि तौर-तरीके सांभाळून असत. लोकांवर छाप वगैरे टाकण्यात दोघींना किंचितसाही रस नसे हे त्यांच्या बोलण्या-लिखाणात जाणवे, तसे वागण्यातही….

दिल्लीच्या रशियन कल्चरल सेंटरमध्ये उर्दू लेखिका कुर्रतुलऐन हैदर (ॲनी आपा) यांना १९८९चं ज्ञानपीठ मिळालं. त्यानिमित्तानं अभिनंदनपर पार्टीत त्यांच्या पाठीवर मागून थाप पडली आणि कृतककोपानं ‘‘क्यों री चुडैल, अब भी बात नहीं करेगी मुझसे?’’ असा प्रश्न विचारला गेला! काळा पायघोळ उंची पोशाख, काळे- गडद नारिंगी वळणदार केस आणि कजरारी आँखोंवाल्या ॲनी आपांनी जाड चष्म्यातून मागे वळून पाहिलं. त्यांच्या मागे उभ्या होत्या- खरखरीत, पण स्पष्ट आवाजाची मालकीण… शुभ्र कुरळे केस, साधीशी साडी, सोनेरी काडीच्या चष्म्यामागच्या शरारती लुकलुकत्या डोळ्यांची बुलंद शख्सियत- इस्मत चुगताई! विशेष म्हणजे इस्मतना थट्टेत ‘लेडी चंगेझ खान’ म्हणणार्या ॲनी आपांना या अभिनंदनाच्या तरीक्याचं आश्चर्य वाटलं नसावं. स्वातंत्र्योत्तर उर्दू साहित्यातील या ताकदीच्या दोघी लेखिकांमधली स्पर्धा व लव्ह-हेट रिलेशनशिप राजधानीतल्या सांस्कृतिक वर्तुळात त्यांच्या साहित्याइतकीच, दोघींची तुलना व गॉसिपचा विषय होती.

अलीगढच्या इस्मत आपा (१९१५) सुरुवातीपासूनच बंडखोर, मुस्लीम समाजातील मुली- ्त्रिरयांवर परंपरेने लादलेल्या बंधनांविरुद्ध आवाज उठवणार्या… समाजातील गरीब नोकरमंडळींवर अन्याय करणार्यांवर साम्यवादी लानत भेजणार्या… विपुल वाचनामुळे एक मजबूत तार्किक बैठक असलेल्या… लहानपणापासून ‘शहाण्या मुली’च्या साच्यात न बसल्यामुळे, घरातील मोठ्यांचा, विशेषत: आईचा भरपूर मारही खाल्लेला… लेखनासाठी कुठलाही विषय वर्ज्य न मानणार्या; आणि आपल्या निडर स्वभावामुळे पहिल्याच कहाणीपासून दखलपात्र ठरलेल्या इस्मत आपांच्या यशाची कमान कायम उंचावत जाणारी… दुसरीकडे परंपरावादी समाजात या तालीमयाफ्ता (शिकल्या-सवरलेल्या) लेखिकेने ‘लिहा़फ’ किंवा ‘दोजख’सारख्या कथांमधून दाखवलेल्या बेहयाईिवरुद्ध खळबळ माजलेली. समाजातील ढोंग, अंधश्रद्धा आणि गैरसमजांवर लेख आणि ‘टेढी लकीर’ किंवा ‘जिद्दी’यांसारख्या कथांच्या माध्यमातून बुद्धिप्रामाण्यवादाच्या ऐरणीवर खेचणारं लेखन वर्तमानपत्रं आणि मासिकांतून होऊ लागल्यावर त्यांचे खप वाढले. विशेष म्हणजे हे कधी हसतखेळत विनोद तर कधी बेखौफ उपरोधाच्या माध्यमांतून इस्मत आपांचे चाहते उर्दूपेक्षा इतर भाषिकच जास्त, ही लक्षात घेण्याजोगी बाब- सध्या भूतकाळ झालेल्या समाजाचं वैचारिक खुलेपण दाखवणारी!

प्रेम आणि पैसे या दोन्हींचा हिशेब कधी न ठेवणार्या इस्मत आपा मुंबईच्या रहिवासी, नेटवर्किंग करायला कोणाबरोबर उठण्या-बसण्यात त्यांना रस नसे, म्हणून त्यांचं दिल्लीत येणं कमी. पण आयआयसीच्या फॉयरमध्ये किंवा जामिया मिलियाच्या स्टुडिओबाहेर सात- आठ मित्रांचं टोळकं जमवून चाय और नमकीनपर- ‘‘मंटो ने भी खूब ़फर्माया था, सिगरेट पीने से औरतों के भी फेफडेही खराब होते हैं, किरदार नहीं.’’ किंवा ‘‘आदमी होते अजीब हैं, औरतों को पूज लेंगे, उन्हें मोहब्बतही नहीं, चलो इज्जत भी दे देंगे, पर बराबरी का दर्जा? कभी नही!’’ सारखी फिकरेबाजी आणि गप्पाष्टकं रंगत. पानाच्या शौकीन इस्मत चुगताई आल्याची बातमी कॅम्पसभर पसरे आणि अनेक वाचक, फारसं न वाचलेले त्यांना ऐका-बघायला कोंडाळ्यात घुसखोरी करत. अशा कोंडाळ्यांत लेखन आणि सामाजिक विषयांवर मोकळ्या चर्चा होत. ते दिवस जातीय किंवा धर्मीय ‘अस्मितां’चे नव्हते. काही गणंग तेव्हाही असत, पण अल्पसंख्येत. बकवास करण्याचे प्रयत्न तत्परतेने हाणून पाडले जात. आपण दिसतो कशा याची चिंता नसलेल्या, बौद्धिक सामथ्र्यावर पूर्ण विश्वास असलेल्या, साध्याशा इस्मत चुगताई आणि माफक साजशृंगार व सुरुचिपूर्ण वेशभूषेतल्या सुसंस्कृत, संयत वागणार्या कुर्रतुलऐन हैदर आपापली व्यक्तिमत्त्व, भाषा, शैली आणि तौर-तरीके सांभाळून असत. लोकांवर छाप वगैरे टाकण्यात दोघींना किंचितसाही रस नसे हे त्यांच्या बोलण्या-लिखाणात जाणवे, तसे वागण्यातही!

फाळणीनंतर भारतात आलेल्या कुर्रतुलऐन हैदर( १९२७) म्हणजे ॲनी आपांचं सगळं कुटुंबच तरक्कीपसंद. त्यांचे आई-वडीलही लेखक. कथा, कादंबर्यांतून आचार-विचारातल्या बदलासाठी प्रयत्नशील. आई उर्दू साहित्याची जेन ऑस्टिन मानली जायची, म्हणून त्यांना बंडखोरीचं निशाण घेऊन घरच्यांशी किंवा समाजाशी कधी लढावं लागलं नाही. इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण मिळालं, लंडनला जाऊन ‘बीबीसी’त नोकरी करता आली. इंग्लंडमधल्या मुक्कामात काही आवडलेल्या पुस्तकांचे अनुवाद उर्दूत केले. (पुढे स्वत:च्या कादंबर्यांचेही स्वैर अनुवाद त्यांनी इंग्रजीत केले). ‘‘सांस्कृतिकदृष्ट्या ढवळलेल्या काळात पुरोगामी विचार मांडणारी पुस्तकं उर्दूत आली तर समाज बदलेल असं वाटायचं. परंपरा तोडल्या तरी कयामत वगैरे काही येत नाही, हे तुम्ही बघताच आहात…’’ म्हणणार्या ॲनी आपा आर्थिकदृष्ट्याही संपन्न असल्यामुळे त्यांना मर्जीप्रमाणे आयुष्य जगता आलं. त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाली नाही. भारतात परतल्यावर त्यांनी ‘इ्प्रिरन्ट’ आणि ‘इलस्ट्रेटेड वीकली’च्या संपादन विभागात काम केल्याने त्यांची गणना उच्चभ्रू वर्गात होत असे. इस्मत आपांसारखा त्यांचा तळागाळाशी फारसा संबंध नसावा आणि म्हणून त्या त्यांच्या टीकेला पात्र ठरल्या होत्या. ‘‘प्रत्येक लेखकाने हे समजून असावं की आपण छापलं जावं म्हणून लिहितो. वाचकांकडून मिळणारी दाद आणि टीका दोन्ही स्वीकारायची असते. जे टीका सहन करू शकत नाहीत ते तगत नाहीत, वाढतही नाहीत. आपल्या आरामशीर, इंग्रजाळलेल्या वातावरणातून बाहेर निघ, समाजातील गरिबी आणि सामाजिक समस्यांबद्दल काहीतरी लिहून दाखव,’’ असा तिखट सल्ला इस्मत आपा, मागून आलेल्या ॲनी आपांना लेखातून जाहीररीत्या देत. (त्यांच्या कादंबर्यांत जे आवडलं त्यावर चांगलंही बोलत असत) त्याला उत्तर म्हणून नव्हे, पण आपली भूमिका आणि शैली याबद्दल ॲनी आपा ज्ञानपीठ स्वीकारताना म्हणाल्या होत्या, ‘‘कदाचित संस्कृती आणि मानवी मूल्यांवर मी जे लिहीत असते ते लोकांना फारसं लक्ष देण्यालायक वाटत नसावं. असंही असेल की मी एका छोट्याशा पक्ष्यासारखी असेन, उमेदीनं आपले पंख पसरून पडत्या आकाशाला सावरू बघणार्या…’’ इस्मत आपांचं अजोड योगदान जाणून म्हणा किंवा वादावादीत पडण्यापेक्षा ‘पतझड की आवाज’( साहित्य अकादमी पुरस्कार) वा ‘आग का दरिया’सारखं काहीतरी मैलाचा दगड ठरणारं लिहिण्यावर मन केंद्रित ठेवत म्हणा, ॲनी आपा अविचल राहत.

इस्मत आपांची फटकळ टीका आणि ॲनी आपांचा कोरडा, अदबशीर प्रतिसाद- या दोघी एरवी कुठल्या साहित्यिक कार्यक्रमांत उपस्थित असल्या तरी दुआ- सलामपलीकडे फारशा जात नसत. या जुन्या तथाकथित शीतयुद्धाची अशी अखेर विशेष यासाठी की इस्मत चुगताई हे नाव ज्ञानपीठाच्या अंतिम फेरीसाठी अनेकदा चर्चेत आलेलं. ते त्यांना का मिळालं नाही हे कोडंच! पण कुर्रतुलऐन हैदरना ते मिळालं आणि इस्मत आपांनी दिलखुलास अभिनंदन करून त्यांना आपल्या मनाच्या मोठेपणात चिंब करून टाकलं. त्याबद्दल अनेक वर्षांनी बोलतानाही ॲनी आपांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं : ‘‘She gifted me one of the most beautiful memories in my life..’’ त्यांच्या नोएडाच्या नारिंगी आणि मरून रंगाचं साम्राज्य असलेल्या आटोपशीर, सुंदर नव्या घरात त्यांच्याकडून ‘आग का दारिया’बद्दल ऐकायला मिळालं होतं आणि अतिशय प्रेमाने दिलेली ‘रिव्हर ऑफ फायर’ची प्रतही. त्या सांगत होत्या, ‘‘दोन्ही देशांतल्या अनेकांनी फाळणीवर लिहिलंय- आपापलं दु:ख वाहतं करण्यासाठी… राजकीय मुद्दे काहीही असोत, फाळणी हा आम जनतेवर लादला गेलेला एक सरकारी निर्णय होता. आयुष्यभरात मी या निर्णयानं आनंदी झालेले लोक पाहिलेले नाहीत. दोन्ही देशांत माझे कुटुंबीय आहेत. मग हा निर्णय घेतला कोणी, कोणासाठी? मुळाशी जाऊन विचार करावा म्हणून खूप ऐतिहासिक लिखाण वाचलं दोन्ही बाजूंनी. ‘आग का दरिया’ एक शोधयात्रा होती, अनेकांनी जगलेली. भारताच्या आजवरच्या ऐतिहासिक घडवणुकीचा लेखाजोखा…’’ अंतर्मुख स्वभावाच्या ॲनी आपांना स्वत:बद्दल फार बोलणं आवडत नसे. या दुनियेतूनही त्या दब्या पावलांनी कधी उठून गेल्या ते कळलं नाही.

इस्मत आपांबद्दल त्यांचे लेखक मित्र कृष्ण चंदर म्हणत, ‘‘इस्मतचं घर म्हणजे मोहल्ला आहे, अनेक गोष्टी तिथे आपापल्या जागा सोडून सुखाने नांदत असतात.’’ चपला, बुटांचा शौक… पण घरात असलेल्या १४-१५ जोड्यांपैकी एकही जागेवर असेल तर शपथ! पाकिस्तानात मुहाजिरसारखं वाटणार्या, हमखयाल मंटोशी मुंबई आणि लाहोर कोर्टात, महागड्या मुकादमेबाजीत दोस्ती निभावणार्या इस्मत चुगताईंनी उर्दू साहित्याचं सशक्त, बंडखोर प्रतिनिधित्व केलं आणि त्याची किंमतही मोजली. चर्चाच नव्हे, त्यांना वाद घालायला प्रचंड आवडायचं. आजूबाजूच्या समाजात, जीवनपद्धतीत जे विसंगत, कालबाह्य वाटलं त्यावर निर्भीड वक्रोक्ती, धर्मांवर, अंधश्रद्धांवर हल्ला. त्या जमान्यात ‘‘अय लडकियों, अगर खुदमुख्तारी से, अपने तरीके से जीना है तो पहले नौकरी ढुंढो, और बाद में दुल्हा.’’ पोरीसोरींना अनेकदा बजावलं (पन्नास वर्षांपूर्वी!) खानदानी सामाजिक संकेत लेखणीने तोडण्यात इस्मत आपांना येणारी मजा बिनतोड युक्तिवादाची असे. लेखन खळबळजनक ठरल्याची आणि त्यामुळे कुटुंबाच्या होणार्या ‘बदनामी’ची त्यांना फारशी पर्वा नसे.

इस्मत आपांची बुलंदी व स्वत:पेक्षा जास्त मिळालेलं यश, शाहिद साहबांनी ज्या उमदेपणानं निभावलं ते असामान्यच होतं. दोघेही लेखक. निकाह दोन्ही घरच्यांची नाराजी पत्करून फक्त मित्रांच्या साक्षीनं केलेला. सासरच्यांना असलं काहीतरी लिहिणारी दुल्हन म्हणजे नसता अगोचरपणा… मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना अग्निसंस्कार दिला गेला : कारण ‘‘कब्र में हर वक्त अकेले लेटे- लेटे तो मुझे बहोत डर लगेगा.’’ वादविवादांनी घेरून इस्मत चुगताईंची कदर करण्यात समकालीन समाजाने कोतेपण दाखवलं असं वाटत राहिलं. गेली काही वर्षं नासिरुद्दीन शाह, रत्ना आणि हिबा ‘इस्मत आपा के नाम’मधून त्यांच्या ‘घरवाली’, ‘छुई मुई’ आणि ‘मुगल बच्चा’ या तीन कथांचं नाट्यरूपांतरण सादर करत आहेत. ते पाहताना त्या परत भेटल्यासारखं वाटतं. कारण त्या जमान्याचं चित्रीकरण करणारं असं काही फक्त त्याच लिहू शकत होत्या. त्यांचा विश्वास असलेला पुनर्जन्म, कदाचित असाही असावा.

uarundhati.deosthale@gmail.com