आसपासच्या घटनांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि विज्ञाननिष्ठ विचारप्रवृत्ती खोडकर, खुसखुशीत शैलीत करणार्या खुशवंत सिंगांचे चाहते देशभरात पसरलेले. फक्त इंग्रजीच नव्हे तर अनेक प्रादेशिक भाषांतले पत्रकार आणि लेखक त्यांच्या संध्याकाळच्या किस्से कहाण्यांची, अनुभव आणि शेरोशायरीची लयलूट असणार्या दरबारात दाखल होत. खोडील स्वभावामुळे त्यांनी स्वत:ची ‘पियक्कड किंवा नॉटी ओल्ड मॅन’ ही प्रतिमा उगीचच जनमानसांत निर्माण केली होती…
दिल्लीत खुशवंत सिंगांच्या किस्से कहाण्यांना अंतच नसायचा. झमीरभाईंशी त्यांची पेंग्विन काळापासून जवळची ओळख, मैत्री. एके दिवशी ‘आज मी आपली पुस्तकं घेऊन खुशवंतकडे जाणार आहे,’ असं मला सहज म्हणाले आणि मी त्यांच्याबरोबर अनाहूतच जायचं ठरवलं. इतक्या वर्षांनी त्यांना भेटायचा मौका कोण सोडणार आणि तेही झमीरभाईंबरोबर? माझ्या अंदाजाप्रमाणे आम्ही नेलेल्या पुस्तकांपैकी ‘व्हॉट अ ब्यूटिफुल वर्ल्ड’ हे लुई आर्मस्ट्राँगच्या गाण्यावरचं रंगीबेरंगी चित्रपुस्तक आणि ‘बीथोवन लिव्हज अपस्टेयर्स’ हे मुलांसाठी बार्बरा निकोल लिखित बीथोवनवरचं कमालीचं सुंदर पुस्तक त्यांना नक्की आवडणार होती आणि झालंही तसंच.
‘ही पुस्तकं तुमच्यासाठी अरुंधतीने निवडली आहेत,’असं झमीरभाईंनी सांगितल्यावर त्यांनी स्मितहास्य केलं. ‘‘मैं इन्हे एक अर्से से जानता हूँ,’’ असं सहज म्हणाल्यावर मी बापडी बेशुद्धच व्हायची बाकी राहिले होते! आपल्या देशात कला आणि कलाकारांवर मुलांसाठी पुस्तकं नसल्याची खंत व्यक्त झाली आणि अशा पुस्तकांनी एक नवं दालन उघडावं असं ते म्हणाले. बोलता बोलता कोणाचा तरी एक शेर बोलून गेले. धीर करून मी तो त्यांना हळू सांगायची विनंती करून लिहून घेतला : ‘सिमटते देखा है तमन्नाओं को/ तहजीब के दायरे में अक्सर/ वर्ना अरमान और ख्वाहिशें कब/ बेजुबां होती हैं.’ मग मला सुंदरशा इ्स्कक्रिप्शनसह ‘ट्रूथ लव्ह ॲण्ड अ लीटल मॅलीसचा’ खंड स्वत: आणून दिला. इतक्यात त्यांची एक पुतणी आणि तिचा मुलगा तिथे दाखल झाले, ते त्यांना अंकल शाली म्हणत होते. ते मला खूप मायेचं, उबदारसं वाटलं होतं. मी तसं म्हणाले तर त्यांनी त्यांचं मूळ नाव खुशाल सिंग असल्याचं सांगितलं… ती शेवटची भेट ठरली.
खुशवंत सिंगांशी पहिल्यांदा भेट झाली ती जर्नालिझमच्या विद्यार्थिदशेत, त्यांच्या कार्यालयात. ते तेव्हा दिल्लीच्या ‘हिंदुस्तान टाइम्स’चे हाय प्रोफाइल संपादक होते. ‘‘मी पत्रकारितेत आवडीने किंवा प्रशिक्षण घेऊन नव्हे तर अपघाताने आलो आणि आल्यावर वाटलं, बरं आहे की हे क्षेत्र! वकिलीत मन रमणार नाही हे इंग्लंडमध्येच कळलं होतं, लेकीन वह जमाना हुक्म-उदुली का (हा शब्द त्या दिवशीपासून माझ्या शब्दसंपदेत जमा झाला) नहीं था. मैंने आठ साल वकालत की…’’ असं मोठे डोळे फिरवत त्यांनी सांगितलं होतं. त्या १५-२० मिनिटांत त्यांच्या टेबलावर गुण्यागोविंदाने नांदत असलेली क्रिएटिव्ह मेस आणि चेहर्यावर हास्य उमटू न देता, काही तरी विनोदी फटकारे मारण्याची लकब लक्षात आली होती. हेही की, समाजातलं त्यांचं स्थान ते अजिबातच गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांनी दिलेली आणखी एक टीपही पुढे अनुभवास येणार होती, ती जवळपास त्यांच्याच शब्दांत : ‘‘तुमच्यापैकी जे सफल पत्रकार होतील त्यांना सांगून ठेवतो. या व्यवसायात नाव भर्रकन होतं. तुमचे चाहते जगभर पसरलेत असा भ्रमही व्हायला लागेल, पण घरात तुमच्या बायलाइनचं कोणाला कवडीचं कौतुक नसतं. जरा नाव झालं, की हा तर काय लिहीतच असतो, असं आणि एवढंच!’’ याच संवादांत पुढे हसवत कोपरखळी मारली होती. ‘‘माझी मुलगी माझ्या लिखाणाला नाक मुरडत असते, पण माझ्या पुस्तकांच्या रॉयल्टीचे चेक्स स्वीकारण्यास मात्र तिची काही हरकत नसते.’’ यावर उठलेल्या हंशाने आम्ही त्यांचा निरोप घेतला होता.
खुशवंत सिंगांचे वडील सरदार सोभा सिंग नवी दिल्लीतले नामांकित बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते. अर्धीअधिक नवी दिल्ली त्यांनीच बांधली आहे, असं एके काळी म्हटलं जात असे. त्यांनी वडिलांचं नाव देऊन बांधलेल्या मध्यवर्ती दिल्लीतल्या सुजानसिंह पार्कमधील एका प्रशस्त अपार्टमेंटमध्ये खुशवंत सिंग त्यांच्या पत्नी कंवल यांच्यासह राहत. बैठकीत कुटुंबाची श्वेत श्यामल छायाचित्रं. फायर प्लेसजवळ खुशवंत सिंगांची लाडकी आरामखुर्ची, त्यांचं सिंहासन! कंवलजींमुळे घरात शिस्त राहिली आणि आरोग्य राखण्याच्या सवयीही. खुशवंतजी ऐंशीच्या उत्तरार्धातही टेनिस खेळत आणि जवळच्याच लोधी गार्डन्समध्ये चालायला जात. चालणं थांबल्यावर व्हीलचेअरने चक्कर मारत. रोज घरी येणार्या वर्तमानपत्रांतून शब्दकोडं सोडवण्याचं व्यसन.
शेजारच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांची मुलगी माला आणि जावई रवी दयाल राहत. तरीही एकाकडे आलो आहोत तर दुसर्याकडेही डोकावून जाऊ असलं काही अजिबातच करता येत नसे. दोन्ही पुस्तकप्रेमी, सुसंस्कृत, सुखवस्तू घरं आणि कुटुंबं आपापली स्वायत्तता आणि खासगीपणा काटेकोरपणे सांभाळून असलेली. माला बालसाहित्याच्या उत्कृष्ट संपादक, विशेषत: त्यांची चित्रांची असामान्य जाण आणि गुणवत्तेबद्दलचा आग्रह त्यांचे दशकभर सहयोगी असलेल्या अरविंदना आजही आठवतात! ‘नॅशनल बुक ट्रस्ट’मध्ये त्या प्रमुख संपादक होत्या, पण वडिलांच्या नावाचा वापर त्यांनी चुकूनही केला नाही, जे काही केलं ते स्वबळावर, तत्त्वांना धरून.
मालाला रोज संध्याकाळी ऑफिसमधून परत न्यायला त्यांची आई गाडी घेऊन यायची, ही त्यांनी स्वत:ला दिलेली एकमेव ‘प्रीव्हिलेज्ड’ सूट! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे नेतृत्व करणार्या रवींच्या प्रकाशन क्षेत्रातल्या उत्तम कामाबद्दल खुशवंतजींना अतिशय प्रेमादर असे.
खुशवंत सिंगांना त्यांच्या सासर्यांकडून हिमाचल प्रदेशच्या कसौली गावांत ब्रिटिशांच्या काळात बांधलेला दगडी बंगला, राज व्हिला भेट मिळाला होता. इथे त्यांचा जीव रमे. शांत, थंड वातावरणात लेखन वाचन चाले. उन्हाळ्यात त्यांचा मुक्काम इथेच असे. संध्याकाळचा गप्पागोष्टींचा मुशायरा इथेही भरे. लांब लांब फिरायला जाण्याची आवड असलेले खुशवंत सिंग अनेकदा इथून पर्वताच्या पायथ्याशी, १५ कि.मी अंतरावर असलेल्या काल्का हिल्स पर्यंत चालत जात. आता या वाटेला खुशवंत सिंग ट्रेल्स असे नाव दिले आहे. इथे दरवर्षी खुशवंत सिंगांच्या नावानं काही मोजक्या आमंत्रितांच्या साथसोबतीत एका साहित्य समारोहाचं आयोजन करण्यात येतं.
एकदा शायर फराजबरोबर त्यांना भेटायला गेले तेव्हा आधीच्याच वर्षी माझ्या मुलीच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकांत त्यांच्या आजीवर लिहिलेला ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी’ हा आठवणीचा अतिशयच सुंदर लेख होता. आता पाकिस्तानात असलेल्या हडाली नामक खेड्यात आजीच्या घरातलं त्यांचं साधंसं बालपण आणि नंतर शहरी जीवनात, वाढत्या वयामुळे निरपेक्ष आजीशी बदलत गेलेलं नातं, आजीचं वृद्धत्व आणि शेवटी अंगणात येणार्या पक्ष्यांशी जुळलेला मायेचा बंध, अतिशय हृद्य कहाणी. हा धडा तिच्या आणि माझ्या खूप आवडीचा! हे ऐकल्यावर मात्र ते मनापासून खूश झाल्याचं जाणवलं. त्यांच्याजवळचं रस्किन बॉन्ड यांचं एक पुस्तक त्यांनी तिला भेट दिलं. फैझची आठवण निघाली. फराजने एक फैझची आणि नंतर एक स्वत:चीही कविता सुनावली. खुशवंत सिंगांनी व मी एकमेकांच्या मदतीने त्यात त्यांचे लाडके लाँगफेलो आणि ऑडेन जोडले, संध्याकाळ रुपेरी, सोनेरी होऊन गेली.
खुशवंतजींचा सामाजिक व्यासपीठावरून स्पष्टवक्तेपणा आणि लोकांना धक्कादायक वाटणारी विधानं हाही एक मजेदार प्रकार! तो यासाठी की अशा विधानांमागे त्यांची अतिशय तर्कशुद्ध भूमिका असे. अकादमीच्या एका इंडिया इंटरनॅशनल सेन्टरमधल्या सेमिनारमध्ये संगीत नाटक, ललित कला तसेच साहित्य अकादमी या तिन्ही अकादम्यांनी ज्या कलांसाठी त्या स्थापन केल्या होत्या त्यांच्याकडे पाठ फिरवून वेगळेच अजेंडे कसे चालवले आहेत आणि त्यामुळे गुणवत्तेचे अवमूल्यन आणि परस्परसंबंध सांभाळणारी यंत्रणा कशी बळावत चालली आहे याची कारणमीमांसा करत त्या ताबडतोब बरखास्त कराव्यात असे विधान यजमानांच्या मंचावरून केले होते. ब्युरोक्रसीवर त्यांचा सकारण अविश्वास! ‘हिज क्लीन कॉनसायन्स वॉज हिज ग्रेटेस्ट स्ट्रेंग्थ’ हे त्यांच्याबद्दलचं अरविंदचं सटीक अनुमान.
आसपासच्या घटनांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि विज्ञाननिष्ठ विचारप्रवृत्ती खोडकर, खुसखुशीत शैलीत करणार्या खुशवंत सिंगांचे चाहते देशभरात पसरलेले. फक्त इंग्रजी पत्रकारच नव्हे, तर अनेक प्रादेशिक भाषांतले पत्रकार आणि लेखक त्यांच्या संध्याकाळी ७ ते ९ च्या किस्से कहाण्यांची, अनुभव आणि शेरोशायरीची लयलूट असणार्या दरबारात दाखल होत, असा दिवस अगदी विरळच की कोणी भेटीस आलेलं नाही. यातून आणि आठवणींच्या खजिन्यातून त्यांना ‘विथ मॅलीस टोवर्डस वन ॲण्ड ऑल’ची सामग्री मिळायची. नऊच्या ठोक्याआधीच सगळ्या पाहुण्यांची पाठवणी होई. परिचितांचं आणि मित्रमैत्रिणींचं जाळं जगभर पसरलं होतं.
खोडील स्वभावामुळे त्यांनी स्वत:ची ‘पियक्कड किंवा नॉटी ओल्ड मॅन’ ही प्रतिमा अक्षरश: उगीचच जनमानसांत निर्माण केली होती. चिडवाचिडवी भरपूर असे, खुल्या मनानं दिलेल्या कॉ्प्लिलमेंट्स आणि कधी मिस्कील फ्लर्टिंगही. सौंदर्याला भुलणारे नव्हते, त्यांना बुद्धिमान, सुसंस्कृत ्त्रिरयांची, पोरी-बाळींची संगत आवडे. त्यांनी कधीही कोणा स्त्रीला अस्वस्थ करणारं वर्तन केल्याचं किंवा मद्यपानाने तोल गमावल्याचं प्रत्यक्षात घडलं नव्हतं. राजकीय नेत्याकडून कसल्याही फिअर वा फेव्हरची गरज नसणारे, ते स्पष्टवक्ते होतेच आणि हजरजबाबीही. तो दर शनिवारी येणारा कॉलम अत्यंत लोकप्रिय असल्याने वाचक जाणतातच की त्यात खरं तर ‘मॅलीशीअस’ टिपूसभरही काही नसे, कारण तो खुशवंत सिंगांच्या स्वभावाचा भागच नव्हता. स्वत:ची मनमुराद थट्टा मात्र बेबाक शैलीत आणि राकट विनोदबुद्धीत कमालीचा प्रांजळपणा!
संता-बंताचे विनोद खुलून- खुलवून सांगणारे खुशवंत सिंग सच्चे सर्वधर्मसहभावी होते हे खरंच. त्यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या विरोधात आपलं पद्मभूषण एका खासदाराहाती राष्ट्रपती असलेल्या ग्यानीजींना परत पाठवली होती, हे त्यांनी कुठल्याही श्रद्धास्थानासाठी केलं असतं असं ते म्हणाले होते. त्या वेळी घरी प्रेस कॉन्फरन्स बोलावून आँखोंदेखी जगासमोर आणली होती. विख्यात चित्रकार अर्पणा कौर यांनी केलेलं गुरू नानकांचं पोर्ट्रेट त्यांच्या घरात होतं आणि सुवर्णमंदिराचंही एक स्केच.
डॉ. मनमोहन सिंगांच्या पत्नी गुरशरण कौर शांत, साध्या सुशील व्यक्तिमत्त्वाच्या धनी… अनेक कारणांनी आदरणीय! त्या अतिशय सुंदर शबद (गुरू ग्रंथ साहेबमधली गेय वचनं) साध्या गोडव्यानं गात. दरवर्षी ‘कॅन- सपोर्ट’ या संस्थेने कॅन्सरसंबंधी जागृतीसाठी आयोजित केलेल्या वॉकमध्ये त्या सामील होत, अगदी सर्वसामान्यांसारख्या- बिना किसी तामझाम के! त्या कदाचित एकमेव भारतीय पंतप्रधानांच्या पत्नी असाव्यात, ज्या कधी ड्रायव्हर नसला तर स्वत:ची मारुती ८०० चालवत किराणा किंवा भाजीपाला घ्यायला जात. गुरशरणजी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासाठी खुशवंतजींच्या मनात दाट अकृत्रिम स्नेह होता. हा किस्सा २०१४ मधला… एका संध्याकाळी त्या अशाच खुशवंतजींच्या मैफलीत चेष्टा- विनोदात रमलेल्या पाहून खुशवंतजीनी त्यांना मोकळेपणाने सल्ला दिला, ‘‘ गुरशरन, तू हूण घर जा.’’ घरात आलेल्या पंतप्रधानांच्या सुजाण पत्नीला असं काही सहज सुचवू शकणारे खुशवंतजी एक वल्लीच होते. त्यांच्या सल्ल्यामागची काळजी की पंतप्रधानांच्या बायकोचा वेळ फार घेता कामा नये व सूचनेमागचा हेतू उभयपक्षी ज्ञात असल्याने गैरसमज/ राग वगैरेचा प्रश्नच नव्हता. ‘‘मला अजून १० मिनिटांनी गेलं तरी चालणार आहे,’’ असं म्हणून गुरशरणजी परत गप्पांत सामील झाल्या.
१९४७ मधली देशाची फाळणी त्यांच्या हृदयातला दुखावलेला कोपरा. त्यांची ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही भारतीय साहित्यात मॉडर्न क्लासिक ठरलेली कादंबरी. इतिहासाचा तो दाहक कालखंड चित्रित करणारी. आता पाकिस्तानात असलेला मूळ गाव हडालीशी भावबंध अखेरपर्यंत मनात जागे होते. शाळा सोडल्यावर, ६० वर्षांनी तिथं परतून भाषण करताना त्यांचे अश्रू अनावर झाले होते. लोकांना थट्टेखोर स्वभावाने कायम हसवत ठेवणार्या, वैचारिक स्वातंत्र्याचा कायम पुरस्कार करणार्या खुशवंत सिंगांचं हे रूप चाहत्यांना लोभस वाटलं होतं, आजीवरच्या त्या लेखाशी सुसंगतच. त्यांच्या शाळेत त्यांच्या नावाचा एक स्मृतिफलक लावला आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या राखेचा एक अंश तिथं विसर्जित केला होता… एक मनस्वी वर्तुळ पूर्ण झालं होतं.
arundhati.deosthale@gmail.com
