अरुंधती देवस्थळे
जेपींची खासियत म्हणजे ओरिसापासून साठेक वर्षं दूर दिल्लीत राहूनसुद्धा ते राज्याशी आणि ओडिया संस्कृतिकर्मीच नव्हे, तर सामान्यांशीही जोडलेले होते. हे कसं घडायचं कोणास ठाऊक? श्रेय त्यांच्या स्मरणशक्ती आणि मदतशील माणूसप्रेमाला. ओरिसाच्या लहान-मोठ्या शहरांतून दिल्लीत काम असलेली माणसं त्यांना भेटायला येत. कारण कला क्षेत्रात विशेषत: साहित्यात, ते कुठल्याही कंपूत नसत…
फुलपाखरी वृत्ती बहुधा गोजिरवाण्या पोरीबाळींना चिकटवली जाते. सृजनशीलतेच्या फुटणार्या धुमार्यांमुळे कदाचित, तशाच बेचैन, चंचल वृत्तीचा झालेला एक भ्रमर मला भेटला- जो कवितांमधून बोलायचा, चित्रं काढायचा, कलासमीक्षा करायचा, विशाल ऐतिहासिक पटावर कादंबर्या, नाटकं लिहायचा. पण यांपैकी कशातच किंवा कोणा एका व्यक्तीतही फार काळ रमायचा नाही. एकंदरीत प्रत्येक क्षण स्वत:ला हवा तस्साच जगू पाहणारा… मागल्या महिन्यात जगाच्या बगीच्यातून तो उडून गेला. मस्त कलंदर वृत्तीचे प्रयोगशील ओरिया लेखक, कवी, चित्रकार, कला- इतिहासतज्ज्ञ जेपी ऊर्फ जगन्नाथ प्रसाद दास फारशा मराठी वाचकांना माहीत नसावेत. त्यांच्या छोट्या छोट्या उत्कट प्रेम कविता आणि दीर्घ चिंतनशील कविता, नाटकं आणि त्या इतकंच ओरिसाच्या पारंपरिक तालचित्र कला आणि हस्तलिखितांवरील अभ्यासपूर्ण भाष्य आपल्या विविधभाषीय देशाच्या लेखनसंस्कृतीत नक्कीच दखलपात्र होतं!
आयएएसमधली उच्चपदस्थ नोकरी केवळ आपल्याला स्वच्छंद जगता यावं, हवं तसं लेखनात डुंबता यावं, मित्रमैत्रिणींमध्ये जीव रमवता यावा म्हणून सोडून देणारे… जेमतेम स्वेच्छानिवृत्ती गाठून मुक्त झालेल्या जेपींची पैसा आणि सत्तेबद्दलची निरासक्ती अपवादात्मकच! खरं तर कालाहंडीचा दुष्काळ अत्यंत सक्षमतेने हाताळण्यासाठी त्यांचं कौतुक सरकारदरबारी होत होतं. पण स्तुती वा टीका अंगी लावून घेण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. आपण जे केलं ते नियोजन कुठल्याही जिल्हाधिकार्यानं केलं असतं, असा रोखठोक बाणा!
हाती असलेली सत्ता आणि मध्यवर्ती असणारं सरकारी निवासस्थान सोडवत नाही सरकारी बाबूंना- विशेषत: दिल्लीतल्या. पण जेपींना त्या पदाचंच बंधन व्हायला लागलं. यंत्रणेत राहून फारसं काही करण्यासारखं नसतं म्हणून या ना त्या मंत्र्यांची मर्जी सांभाळण्यात हयात घालवण्यापेक्षा, आपण स्वान्त सुखाय जगावं हे त्यांना तर्कसंगत वाटलं. असंही नव्हतं की खूप पैसा साठवून ठेवलाय, आर्थिक स्थिती भक्कम आहे, दिल्लीत घर, मूळ गावी घर वगैरे… स्वेच्छानिवृत्तीनंतर अगदी छोट्याशा सदनिकेत राहणारा, आयुष्यभर मारुती- ८०० वापरणारा सरकारी उच्चपदस्थ विरळाच. पत्नी मित्रा आकाशवाणीवर ओरिया वृत्त निवेदिका, मुलीचं लग्न होऊन ती अमेरिकेत स्थायिक म्हणून ते कौटुंबिक जबाबदार्यांतूनही मुक्त झाले होते. मग दीर्घकाळ दिल्लीत स्वातंत्र्य उपभोगून, गेली वीसेक वर्षं ते भुबनेश्वरला स्थायिक झाले. आता मात्र नव्वदीत प्रवेशलेले, प्रकृतीने हल्लक झालेले… तरीही बौद्धिकदृष्ट्या इतके तंदुरुस्त की जायच्या दोनच दिवस आधीपर्यंत फेसबुकवर लिहीत होते.
जेपींच्या ‘प्रथम पुरुष’ (१९७१) या पहिल्याच कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठासाठी सत्यजित रे यांनी त्यांचं पेंटिंग दिलं होतं- आनंदानं! हा काव्यसंग्रह आधुनिक अस्तित्ववादाची रूपं, रूढ चौकट मोडून रोजच्या भाषेत मांडणारा, समकालीन ओडिया कवितेला एक नवं वळण देणारा म्हणून राज्यात बहुचर्चित ठरला. जेपींची खासियत म्हणजे ओरिसापासून साठेक वर्षं दूर दिल्लीत राहूनसुद्धा ते राज्याशी आणि ओडिया संस्कृतिकर्मीच नव्हे, तर सामान्यांशीही जोडलेले होते. हे कसं घडायचं कोणास ठाऊक? श्रेय त्यांच्या स्मरणशक्ती आणि मदतशील माणूसप्रेमाला. ओरिसाच्या लहान-मोठ्या शहरांतून दिल्लीत काम असलेली माणसं त्यांना भेटायला येत. कारण कला क्षेत्रात विशेषत: साहित्यात, ते कुठल्याही कंपूत नसत. मानसन्मानांत आणि त्या अनुषंगानं खेळल्या जाणार्या राजकारणात रस नसल्यानं त्यांना मित्र कमी, पण शत्रूही नसत. गेली काही दशकं सरकारी संस्थांच्या पुरस्कारांची निवड, गुणवत्तेशी नाममात्र इमान राखून साटंलोटं तत्त्वावर चालते, हे दुर्दैवी सत्य आहे! हे रिंगणातल्या खेळाडूंना माहीत असूनही लोक त्यासाठी का हपापलेले असतात? हू ईज किडिंग हूम? यांसारखे प्रश्न वारंवार विचारणारे जेपी निवड समितीत सामील होत ते स्वभावाला विनोदाची झालर असल्यानं मनोरंजनासाठी, साहित्यिक गॉसिप ऐकण्यासाठी…
रोज लिहायला आवडे म्हणून त्यांनी इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या लायब्ररीत एक क्यूबिकल राखून ठेवली होती. तिथं बसून त्यांचं लिहिणं-वाचणं चाले. कोणाला भेटायचं असलं तर फॉयरमध्ये भेटता येई. नव्वदीच्या दशकात जेपी व आयआयसीचे ग्रंथपाल एच. के. कौल यांनी काही मित्रांच्या सहयोगानं ‘पोएट्री सोसायटी ऑफ इंडिया’ स्थापन करून ‘जर्नल ऑफ पोएट्री’ असं अनियतकालिक सुरू केलं होतं. त्यात विविध भारतीय भाषांतील कवितांचे इंग्रजी अनुवाद प्रकाशित होत. उपक्रम स्तुत्य होता. अनेक भारतीय भाषा त्यांच्या इंग्रजी अवतारात एका ठिकाणी भेटत होत्या. सगळा प्रकार ‘लेबर ऑफ लव्ह’ प्रकारात मोडणारा आणि म्हणूनच जाहिरातींविना तगून राहिलेला. पुढे-पुढे लक्षात आलं की देशीवाद जिंकतोय. भारतीय मनातून जन्मलेल्या बहुसंख्य कविता इंग्रजीमध्ये अवघडल्यासारख्या दिसताहेत, त्याहूनही अधिक उत्कृष्ट कविता तर परभाषेत उतरायला नकार देत आहेत. म्हणून तो भरपूर मेहनत मागणारा प्रयत्न जड मनाने सोडून दिला.
जेपींशी माझी चांगली ओळख झाली आणि पुढे मैत्रीही- ती ओरिया लेखिका यशोधारा मिश्रामुळे. यशोधारा आणि मी अकादमीत केबिन शेअर करत असू. माझे जितके ओरिया मित्रमैत्रिणी आहेत, त्यांपैकी अधिकांश यशोधारामुळेच. त्यात जेपींच्या ‘आन्हिकं’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा ओरिया भाषेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला. जंग जंग पछाडलं, जेपींनी तो स्वीकारायला ठाम नकार दिला. त्या प्रकरणादरम्यान जेपी एक स्पष्ट विचारवंत म्हणून जाणवले. तोवर त्यांची कविता सुपरिचित झालीच होती. त्यामुळे ‘आन्हिकं’ ही ‘खानापूर्ति’ होतेय : तो संग्रह त्यांच्या काव्यप्रतिभेचं प्रतिनिधित्व करणारा नव्हे हा त्यांचा आक्षेप समजण्याजोगाच होता. दोन-चार नामी संस्थांचे पुरस्कार असू द्यावेत आपल्या गुलदस्त्यात अशी त्यांची वृत्ती नव्हती. अनेक वर्षांनी अकादमीनं २००७ मध्ये त्यांना ‘महत्तर सदस्यता’ या तिच्या सर्वोच्च सन्मानानं गौरवान्वित केलं आणि ते मात्र त्यांनी सहर्ष स्वीकारलं. जेपींची ‘सूर्यास्त’ आणि ‘सुंदरदास’सारखी नाटकं एनएसडीनं केली होती आणि एक ‘ॲब्सर्ड प्लेज’ची मालिकाही. त्यांच्या अनेक नाटकांचे अनुवाद हिंदी व इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले. कवितांचे अनुवाद ते स्वत:च करत. माझ्यासाठी त्यांचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक होतं- ‘पाम-लीफ मिनीएचर्स’. हे त्यांनी अमेरिकन कलाइतिहासतज्ज्ञ जोआना विल्यम्स यांच्याबरोबर ओरिसाचे कलाकार रघुनाथ पृस्थींच्या चित्र- लेखन शैलीवर भरीव शोधकार्य करून लिहिलेलं पुस्तक आणि त्याच्या आधीचं ‘चित्र-पोथी’!
आधी ज्ञानपीठ प्रकाशन विभागाचे आणि नंतर के. के. बिर्ला फाऊंडेशनचे संचालक बी. एन. टंडन आम्हा सर्वांचे मित्र. जेपींबरोबर तर त्यांचं जुनंपुराणं मैत्र. जेपींची १९ व्या अर्धशतकाचा भव्य राजकीय- ऐतिहासिक पट उलगडून दाखवणारी कादंबरी ‘देश काल पात्र’ आली आणि ती गाजलीही. निवड समितीसमोर विचारार्थ म्हणून आलेला तिचा इंग्रजी आणि हिंदीत अनुवादित अंश वाचताच तिला त्या वर्षीचा ‘सरस्वती सन्मान’ द्यायचा निर्णय जवळपास निश्चित झाला. स्वत:ला कायम चिकित्सक मानदंडानं मापणार्या जेपींनी हा पुरस्कार कादंबरीच्या गुणवत्तेबद्दल समाधानी असल्यामुळे स्वीकारला की टंडनजींच्या स्नेहाचा मान राखण्यासाठी कोणास ठाऊक, पण नंतर दिलेल्या छोट्याशा पार्टीत जेपी हसत म्हणाले होते, ‘‘माझ्या अमेरिकेतल्या नातीनं यंदा उंची व्हायोलीनची फर्माईश केली आहे, ती वाजवते छानच. या गोष्टी महाग असतात तिकडे! पण या पुरस्कारामुळे सगळं जमेल आता.’’ टिपिकल मध्यमवर्गीय आजोबांची सहज प्रतिक्रिया पाहून कुटुंबवत्सल टंडनजींच्या डोळ्यात आलेलं पाणी… हे मात्र साम्य होतं माझ्या या दोन ब्यूरोक्रॅट ज्येष्ठ मित्रांमध्ये… एकुलत्या लेकी आणि नातवंडं म्हणजे काळजाचे तुकडे!
जेपी आणि माझ्या मैत्रीला तसं कारण काहीही नव्हतं, पण ती झाली खरी आणि शेवटपर्यंत टिकलीही! त्यांच्या पुस्तकांचे हिंदी व इंग्रजीमधील अनुवाद प्रकाशित झाल्यावर मला आवर्जून एक प्रत येई. ज्ञानपीठ आणि के. के. बिर्ला फाऊंडेशनच्या समित्यांमध्ये संचालक टंडनजींबरोबर काम करताना अनेक बाबतीत सहमती होई. मी सर्वार्थानं त्यांच्यापेक्षा लहान असूनही त्यांची विश्वासू बनले. अनेक मित्रमैत्रिणींबरोबरचे चढउतार, अचानक फोनवरून किंवा ई-मेलवरून त्यांना मला सांगून टाकावंसं वाटे. आणि हे सगळं उस्फूर्तपणे होई. मागल्या पानावरून महिन्यांच्या/ वर्षांच्या अंतरानं अचानक सांगितलं जाई : ‘‘जोआनाला कॅन्सर झालाय. ट्रीटमेंट सुरू झालीय. मी जातोय अमेरिकेत भेटायला.’’ किंवा ‘‘(अमुक एका विषयावर) आम्ही बरोबर काम करत होतो ना, ते एलिझाबेथचं पुस्तक छापलंय, तिच्याच युनिव्हर्सिटीनं. माझी कॉपी आली की दाखवीन तुला.’’ अशा आत्ता दिलेल्या खबरीचा धागा कितीही वर्षांपूर्वी सांगितलेल्या कहाणीशी किंवा तुकड्याशी मी आठवणीनं जोडावा ही माफक अपेक्षा असायची.
गेली काही वर्षं प्रकृतीच्या तक्रारींमुळे जेपी घरात स्थानबद्ध असूनही ओरिया साहित्याच्या केंद्रस्थानी होते. कोणी संपर्क करून काही विचारावं तर तत्परतेनं सांगत, घडामोडींवर नजर ठेवत, सवयीप्रमाणे मोकळेपणानं आपलं मत देत. ती उंची गाठणारं पुढल्या पिढीत कोणी नाही दिसत समोर याची कल्पना त्यांना कितपत गांभीर्यानं होती कोणास ठाऊक… इथं त्यांच्या एक-दोन कविता द्यायला हव्या होत्या, पण ते ऋण नंतर फेडावं कधीतरी!
arundhati.deosthale@gmail.com
