वरुण सुखराज
जुलै महिन्यात जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनात गोळ्या लागलेली, छर्यांनी जखमी झालेली, कानामागे १४-१५ टाके पडलेली, डोक्यात खिळे लावलेल्या काठ्यांच्या जखमा असलेली, भारताचे भविष्य असलेलीच तरुणाई होती. तिथे तेव्हा जे घडले त्याची स्वतंत्र, लोकाभिमुख आणि निर्भीड चौकशी व्हावी म्हणून नेमण्यात आलेल्या ‘स्वतंत्र लोक लवादा’ने (‘पीपल्स ट्रिब्युनल’) अहवाल तयार केलाय. त्यात कार्यरत असलेल्या सजग चित्रकर्त्याने मांडलेला अनुभव… ‘जन-गण-मन…’ आपल्या राष्ट्रगीताची सुरुवात ऐकल्यानंतर आपल्या मनात नेमकं काय येतं? एखादं गाणं, एखादी धून, एखादा प्रसंग, एखादं स्थळ? आपल्याला कधीकधी एखाद्या गंधामुळे ते आठवत राहतं. पुलं एका लेखात म्हणतात, ‘‘काही आठवणी या केवळ दृश्य किंवा श्राव्य नसतात, तर त्या गंधाशी जोडलेल्या असतात.’’
काही काळापासून, विशेषत: उदारमतवादी भारताच्या स्व-सजग आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी, राष्ट्रगीत म्हटलं की आताशा कोणता गंध आठवत असेल? …मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा सुरू होण्याआधीचं वातावरण, चीज पॉपकॉर्नचा वास, नाचोज्, साल्सा सॉस, एसीमध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेला तो एक सुगंध. हे सगळं मिळून तयार झालेली एक सुगंधस्मृती. राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं, राष्ट्रप्रेमाची भावना अनुभवायची आणि मग पडद्यावर सुरू होणार्या सिनेमात आपण एका अत्यंत शक्तिशाली देशाच्या भूमिकेतून आपल्या शेजारील (बिचार्या) देशाला धडा शिकवताना पाहायचं. हिरोची एंट्री, बंदुका, फटाके, प्रचंड आवाज आणि त्यानंतर टाळ्या (नवभारताचे नागरिक शिट्या वाजवणं ‘लो मार्केट’ समजतात)!
अशा सिनेमांमधून तयार होणारी राष्ट्रभक्तीची एक झिंग आपल्या डोक्यात रुजत चालली आहे. हा काहीशे कोटींचा एकूण खेळ आहे. पूर्वी तीनचा खेळ, सहाचा खेळ आणि नऊचा खेळ असायचा. आज जवळपास प्रत्येक सिनेमाचा प्रत्येक शो हा देशासोबत होत असलेला खेळ आहे का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.
एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून या गोष्टीचा त्रास होणं स्वाभाविक आणि दुर्दैवी आहेच, पण कोणताही सिनेमा असो किंवा कोणतंही सिनेमागृह- प्रत्येक खेळाआधी आपलं राष्ट्रगीत वाजायला हवं असा एक नियमच बनलाय. सिनेमात काय वाट्टेल ते होऊ दे, शिव्यांचा भडीमार, अश्लील व्यापार… पण सुरुवात व्हावी ती टागोरांच्या ‘जन गण मन’ने! आजकाल लाज वाटून ते ‘इंस्ट्रुमेंटल’ वाजवायची पद्धत आहे म्हणा, असो! आजचा विषय वेगळा आहे… ‘जन-गण-मन’ या शब्दांची आज आपल्या देशात, समाजात आणि समाजमनात नक्की काय किंमत उरली आहे?
साहिल लोचब नावाचा एक मुलगा आहे. दिल्लीजवळ नजफगडमध्ये राहतो. दिल्ली विद्यापीठात पदवीच्या दुसर्या वर्षाला आहे. राज्यशास्त्र शिकतोय. त्याचे वडील दिव्यांग आहेत. घर कसं चालवायचं, स्वत:चं शिक्षण कसं पूर्ण करायचं… या सगळ्या प्रश्नांशी झुंजताना साहिलने ‘पार्टटाइम ड्रायव्हिंग’ करण्याचा निर्णय घेतला. ‘ओला’, ‘उबर’, बदली चालक अशा कामांतून तो स्वत:चं शिक्षण आणि घरखर्च भागवण्याचा प्रयत्न करतो. मन लावून शिकतो आणि जीव लावून गाडी चालवतो.
…पण हा त्याचा इतिहास झाला. जून २०२६ पर्यंत हे सगळं बर्यापैकी सुरू राहिलं. साहिल गाड्या चालवत होता आणि उरल्या वेळेत शिकत होता. देशातील एका विद्याथ्र्याचं हे असं आयुष्य अभिमानास्पद नसलं तरी टाळता न येण्यासारखं आहे. असे कित्येक विद्यार्थी आहेत… ही संख्या वाढत चाललीय.
अशा विद्यार्थ्यांना काही प्रश्न असणं, त्यांना त्यांची उत्तर हवी असणं स्वाभाविक आहे, असायला हवं… आणि ते विचारायला त्यांना जो योग्य, शांततापूर्ण, संवैधानिक मार्ग मिळेल तो त्यांनी स्वीकारणं हे त्यांच्या सुशिक्षितपणाचं प्रमाण आहे. आणि आपल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ओळखदेखील!
२७ ऑगस्टला एका बंद खोलीत देशातील अत्यंत महत्त्वाची आणि अनुभवी, मुत्सद्दी मंडळी साहिलला ऐकत होती… २० जुलैच्या दिवशी साहिलसोबत घडलेली घटना तो सांगत होता, सोबत त्याचं शरीर, मेडिकल रिपोर्ट दाखवत होता… बघणार्या आणि ऐकणार्या आम्हा सर्वांच्या डोळ्यांत पाणी साचत होतं, पण ते दिसू नये म्हणून प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करत होतो… आणि यात असलेली मंडळी कोण होती?… न्यायमूर्ती अंजना प्रकाश, अदिती मेहता, गोपालकृष्ण पिल्लई, मोहन गोपाल, राधा कुमार, तनिका सरकार आणि २००२ च्या गुजरात दंगलींनंतर त्या घटनांचा लोकाभियोग चालवणारे हर्ष मंदार.
मी त्या खोलीत एका खुर्चीत बसून साहिलचं म्हणणं ऐकत होतो. त्याच्या शरीरात काहीशे मेटल पेलेट गोळ्या होत्या- अगदी त्या क्षणाला जेव्हा तो आमच्या समोर बोलत होता (कायद्याच्या भाषेत ‘साक्ष’ देत होता). गेल्या पाच-सात दिवसांत त्याच्या शरीरातून आपसूक सात-आठच गोळ्या बाहेर फेकल्या गेल्या होत्या, उरलेल्या अजून शरीरातच होत्या आणि आजसुद्धा तो वाट बघतोय ते छर्रे (लहान लोखंडी गोळे) त्याच्या शरीराबाहेर पडायची. त्याचं दुखणं, जखमा आम्ही बघत होतोच, पण त्यापुढे त्याने जे सांगितलं ते ऐकून आम्ही सुन्न झालो. त्याच्या उजव्या डोळ्याच्या मागे दोन-तीन छर्रे घुसले आहेत. डॉक्टर म्हणतात. त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी परत येण्याची शक्यता फक्त एक टक्का आहे.
साहिल घर चालवायला आणि स्वत:चं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गाड्या चालवायचा… एका डोळ्याने आता ते शक्य नाही! साहिल या सार्वभौम देशाचा एक नागरिक, विद्यार्थी आणि एका वाईट अर्थानं कामगारदेखील आहे. स्वतंत्र भारताच्या राजधानीत, राजधानीतील विद्यापीठात शिकणारा एक मुलगा स्वत:चं शिक्षण पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतोय. घर चालवण्यासाठी गाडी चालवतोय आणि आता त्याच्या शरीरात घुसलेल्या छर्यांमुळे त्याच्या आयुष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
त्याचं कारण काय?
पेलेट गन्स.
तांत्रिकदृष्ट्या या बंदुकांना ‘शॉर्ट गॉज’ म्हणतात, पण त्यांतून सुटणार्या गोळ्यांचे वेगवेगळे ा्रकार असू शकतात; आणि त्यातला सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे बर्डशॉर्ट बुलेट्स. साहिल आणि त्याच्यासारख्या १० जणांवर या गोळ्या चालवल्या गेल्या… देशाच्या राजधानीमध्ये.
पार्श्वभूमी :
२० जुलै रोजी, देशातील विद्यार्थी, तरुण आणि त्यांचे समर्थक जंतर मंतर या देशाच्या परवानगीकृत आणि नियोजित आंदोलन स्थळाहून संसदेच्या दिशेने मोर्चा घेऊन जाणार होते. नीट परीक्षेच्या गोंधळाची चौकशी व्हावी, देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी प्रश्न विचारणार्या मुलांचा ‘झुरळ’ अशा केलेल्या अवहेलनेचा निषेध करावा म्हणून देशभरातून हजारो मुलं जमली होती. देश आणि देश चालवणारं सरकार हे दोन वेगळे घटक आहेत. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशाला प्रश्न विचारणं नव्हे. सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह नव्हे. उलट, सरकारला प्रश्न विचारता येणं ही लोकशाहीची मूलभूत गरज आणि ताकद आहे.
या दिवशी या सार्वभौम देशाच्या राजधानीत जे घडलं त्याची स्वतंत्र, लोकाभिमुख आणि निर्भीड चौकशी व्हावी म्हणून ‘कल्लिीस्र्ील्लिील्ल३ ढीःस्र्’ीह्ण २ ३१्रु४ल्लं’’ (स्वतंत्र लोक लवाद) ची गरज आहे असा देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या मंडळींना वाटलं.
मी एक चित्रपट दिग्दर्शक आहे. गेल्या काही वर्षांत देशातील विविध विषय कॅमेर्यात टिपण्याचा, त्यातून गोष्ट गुंफण्याचा आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. या आंदोलनाचं दृश्य दस्तऐवजीकरण (व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन) इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं की नव्याने कॅमेरा घेऊन तिथे जाण्याची गरजच वाटत नव्हती. मी दिल्लीला गेल्यावर ‘पीपल्स ट्रिब्युनल’च्या ‘सेक्रेटरीएट’ची जबाबदारी अंगावर येऊन पडली. हर्ष मंदारसारख्या मोठ्या माणसाला नाही म्हणायचा विषयच नव्हता, पण ‘हो’ बोलून पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही नव्हता. पण एक गोष्ट ठाम होती, यावेळी दृश्यांची कमी नाहीये, माझा कॅमेरा अजिबातच नकोय, पण जर एक कलाकार, नागरिक आणि बाप म्हणून मला या देशात ताठ मानेनं जगायचंय तर ही सर्वांत मोठी आणि एकमेव संधी आहे.
गोळ्या लागलेले, छर्यांनी जखमी झालेले, कानामागे १४-१५ टाके पडलेले, डोक्यात खिळे लावलेल्या काठ्यांच्या जखमा असलेले, दिवसाला बलात्काराच्या १०० धमक्या येणारे… असे हे सगळे भारताचे भविष्य म्हणून गौरविलेले आणि होरपळलेले सगळे भेटत-बोलत होते. सोबतच इंस्टाग्राम ते यूट्युबपर्यंत अक्षरश: हजारो व्हिडीओ समोर दिसत होते. ही केवळ दृश्ये नव्हती. ती या देशात लोकशाही, नागरिकांचे अधिकार आणि सरकारी यंत्रणांची जबाबदारीची भावना यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत होती. आणि म्हणूनच यावेळी मी चित्रकर्ता म्हणून नव्हे, तर एक नागरिक आणि एका लहान मुलीचा बाप म्हणून लिहितोय. जे कधी-कधी उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत, ते आज जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.
‘पीपल्स ट्रिब्युनल’ म्हणजे काय?
ही न्यायव्यवस्थेची जागा घेणारी यंत्रणा नव्हे, तर नागरिकांचे अनुभव, साक्ष, पुरावे आणि तज्ज्ञांची मतं स्वतंत्रपणे ऐकून त्यांचं दस्तऐवजीकरण करण्याचा एक प्रयत्न. २००२ मधील गुजरात दंगलीनंतरही अशा प्रकारच्या लोकन्यायाधिकरणाच्या प्रक्रियांमधून पीडितांचे अनुभव आणि सत्तेला अस्वस्थ करणारे प्रश्न सार्वजनिक चर्चेत आणण्याचे प्रयत्न झाले होते. त्यांचं यश तुम्ही पडताळून पाहायला हवं, कारण ते या देशाचे नागरिक म्हणून आपलं यश होतं. २४ वर्षांनंतर आपण नागरिक म्हणून तेवढीच ताकद, हिंमत आणि नियत टिकवून आहोत का? प्रत्येक वेळी सरकारला शिव्या देण्यापेक्षा आपण स्वत:ला हा प्रश्न विचारूया का?
त्याने साक्ष दिली…
तो सांगतो, शांतपणे रिपोर्टिंग करत असताना त्याच्या डोक्यावर मागून वार करण्यात आला. तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर पोलीस पुन्हा त्याच्यासमोर आले. त्याने आपल्याला आधीच मारहाण झाल्याचं सांगितलं, तरी त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली आणि त्याच्या जबड्यालाही दुखापत झाली.
होय, ही घटना २०२६ मधील आहे. आपल्या राजधानीत घडलेली. या ट्रिब्युनलच्या अहवालात अशा घटनांचे व्हिडिओ, साक्ष आणि इतर पुरावे मांडण्यात आले आहेत. या पुराव्यांमधून समोर येणारे प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चिंताजनक मुद्दा म्हणजे ‘पेलेट गन्स’चा वापर.
पेलेट गनला अनेकदा जीवघेणं नसलेलं शस्त्र असं म्हटलं जातं. पण तरी त्याने गंभीर दुखापत होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. डोळ्यांना, चेहर्याला आणि शरीराच्या इतर भागांना कायमस्वरूपी इजा होऊ शकते. पेलेट गन्सच्या वापराविषयी सुरक्षा दलांच्या कार्यपद्धतीत मर्यादा आणि खबरदारी अपेक्षित असते. त्यांचा वापर कोणत्या परिस्थितीत करता येतो, कोणत्या पर्यायांचा आधी विचार करावा लागतो आणि नागरिकांना होणारी इजा कशी टाळावी, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. यापूर्वी श्रीनगर आणि मणिपूरसारख्या ठिकाणी पेलेट गन्सच्या वापरावर चर्चा झाली. पण त्याचा अर्थ असा नाही की, सगळीकडेच त्यांचा वापर योग्य ठरतो. विशेषत: शांततेत आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर त्यांचा वापर का करण्यात आला, हा प्रश्न अधिक गंभीर आहे.
साहिल लोचब, ईशाद शेख आणि इतर जखमींचे अनुभव या प्रश्नाला मानवी चेहरा देतात. अहवालात ‘आऊटलूक’च्या माध्यम प्रतिनिधीलाही पेलेटमुळे इजा झाल्याची नोंद आहे. नूतन टोपो नावाची एक विद्यार्थिनी या आंदोलनाचा भाग होती. तिच्या वैद्यकीय अहवालात गन शॉटमुळे झालेल्या दुखापतीची नोंद असल्याचं ट्रिब्युनलसमोर मांडण्यात आलं. तिच्या कानाला गंभीर दुखापत झाली आणि पंधरा टाके पडले. त्यानंतरही तिला ऐकण्यास त्रास होतो आहे. दहा ठिकाणी पेलेट गन्सचा वापर झाल्याचे पुरावे या अहवालात मांडले गेलेत. छर्यांच्या प्रकाराबाबतही निष्कर्ष नोंदवलेत. बर्ड शॉट प्रकारच्या गोळ्यांमधून अनेक छर्रे विखुरले जातात. त्यामुळे कोणत्या व्यक्तीला, शरीराच्या कोणत्या भागाला आणि किती गंभीर इजा होईल, यावर नियंत्रण ठेवणं कठीण असतं.
पेलेट गन वापरण्याविषयी ज्यावेळी सुरुवातीला माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली, बातम्या आल्या, त्यावेळी सुरक्षा दलांकडून, सरकारकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं की, ही मुलं आणि त्यांच्या आड काही ‘असंवैधानिक तत्त्व’ ही देशाच्या संसदेवर चालून येत होती आणि म्हणून पेलेटचा वापर करणं आमच्यासाठी बंधनकारक होतं. ही त्यावेळची बातमी आणि ती बातमी डोक्यावर घेऊन नाचणारे अनेक जण आपण पाहिले. आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये विविध गोष्टींचा अभ्यास करून हे सिद्ध केलंय की पेलेट गनचा वापर हा संसदेपासून सर्वात जवळ ज्या ठिकाणी झालाय ते संसदेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. याचा अर्थ पेलेट गनचा वापर हा संसदेच्या रक्षणासाठी नसून, सरकारला स्वत:ची भीती, स्वत:ची दहशत सिद्ध करायची होती, म्हणून केलेला आहे.
‘जन गण मन’ यातले जन म्हणजे एक-एक व्यक्ती- जी आपल्याच ससरकारच्या भयंकर हिंसेला सामोरी गेली. त्याविषयी आज जर आपण बोललो नाही तर आपल्याला हे राष्ट्रगीत म्हणण्याचा कोणताही अधिकार उरत नाही. रुचिका नावाची सोळा वर्षांची मुलगी या ट्रिब्युनलसमोर आपलं म्हणणं मांडते. संविधानातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करून तिने आपले विचार मांडले. तिचं म्हणणं योग्य की अयोग्य, यावर चर्चा होऊ शकते. पण त्यानंतर तिच्यावर झालेली कथित ऑनलाइन छळवणूक, तिच्याविषयी केलेली अपमानास्पद विधानं आणि तिच्यावर घर सोडण्याची वेळ येणं, हे गंभीर आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करणार्या अल्पवयीन मुलीला तिच्या मतांमुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल तर समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत? अहवालात आणखी एका तरुणीने पोलिसांकडून तिच्या खासगी अवयवांवर लाठीने मारहाण झाल्याचा अनुभव सांगितल्याची नोंद आहे. अशा आरोपांची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. या देशातल्या मुलांना रस्त्यांवरून फरफटत नेलं जातं आणि हे जर आपल्याला योग्य वाटत असेल, तर हे कदाचित आपलं शेवटचं आंदोलन आहे आणि हा कदाचित आपल्या लोकशाहीचा शेवटचा अनुभव आहे.
लोकशाही मार्गाने सुरू असलेले कोणतेही आंदोलन हाताळण्यासाठी कायदेशीर चौकट आणि ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर’ (SOP) असते. जमावाशी संवाद साधणं, त्यांना सूचना देणं, परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने उपाययोजना करणं, ही अशा प्रक्रियेची महत्त्वाची तत्त्वं आहेत. या प्रक्रियेमध्ये तुम्ही आधी मुलांशी संवाद साधणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना समजावणं, हे अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्ही जाहीर घोषणा करणं अपेक्षित आहे. (या घोषणेत वापरायची वाक्यंदेखील नियमांत नमूद आहेत) त्यानंतर तुम्ही पाण्याच्या फवार्यांचा वापर करणं अपेक्षित आहे. त्या सगळ्या नंतर तुम्ही अश्रुधुराचा वापर करू शकता आणि तरीही जर जमाव हिंसक होत असेल तर तुम्ही लाठीचार्ज करू शकता, जर समोरचा जमाव हा ‘अनलॉफुल असेंबली’, बेकायदेशीर असेल तरच…
आणि इथे मी दुसर्या शब्दावर येतो… गण. टागोरांना अभिप्रेत ‘गण’ म्हणजे देशातले विविध समूह, तर या राजधानीत जमा झालेला हा समूह हा या देशाच्या विद्यार्थ्यांचा, तरुणांचा समूह होता. त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना तुम्ही या देशाच्या संविधानाशी, नियमांशी, ‘एसओपी’शी प्रामाणिक राहिलात का? विद्यार्थ्यांवर ‘पेलेट-गन’ सारखे भयंकर हत्यार वापरण्याचे आदेश नक्की कुठून आले, कोणी दिले? हा या अहवालाचा थेट प्रश्न आहे.
या ट्रिब्युनलच्या कामादरम्यान हजारो व्हिडिओंची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी काही निवडक व्हिडीओंचं जिओलोकेशन, प्रामाणिकता आणि दृश्यांमधील तपशील तपासून २५ व्हिडीओ अहवालात पुरावा म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत.
हा देश स्वतंत्र झाल्यापासून या देशात अनेक स्थित्यंतर घडली, अनेक गोष्टी सरकारविरुद्ध, अमुक सरकारविरुद्ध तमुक अशा घडल्या, सरकार आणि विरोधक या कुस्तीत आपण टोकाच्या काही गोष्टी बघितल्या, लाज वाटतील अशाही गोष्टी बघितल्या, पण गेल्या काही काळात सरकारविरुद्ध जनता हा एक नवा प्रकार आपण पाहतोय, अनुभवतोय आणि त्याची भयंकर भीती वाटते.
आपण या देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून अनेक विषयांवर बोलतो, मग त्यात भीमाशंकरचा आत्ताचा महाराष्ट्रातला विषय असेल, ढाअर सारखा विषय असेल, केन बेटवासारखा विषय असेल, इतर अनेक विषय असतील… अशा वेळी ‘जंतरमंतर – २० जुलै’ हा या सरकारनं स्थापित केलेला नवा एसओपी आहे, या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसनुसार जर हा देश चालणार असेल, तर विचार करा या देशाच्या, या देशाच्या तरुणांच्या, मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या मनावर काय परिणाम होत असेल? राष्ट्रगीतात अपेक्षित ‘मन’… प्रत्येक व्यक्तीचं आणि समाजाचंदेखील!
मी हे जे काही किस्से सांगितले, हे अतिशय प्रातिनिधिक आहेत. मला एवढंच सांगायचंय, आज सुपात, उद्या जात्यात, आज अमुक, उद्या तमुक, या सगळ्याच्या फार पलीकडे, फार भयंकररीत्या आपण पोहोचलोय. आज आणि इथून पुढे ‘जन-गण-मन गात’ असताना दोन प्रकारचे अनुभव आपल्याला येऊ शकतात.
एक- चीज पॉपकॉर्न, नाचोज्, साल्सा सॉस, तो एक कृत्रिमरीत्या तयार केलेला आनंदी सुगंध किंवा मग राष्ट्रगीत म्हणत असताना तुमच्या अंगावर आपला तिरंगा असतानादेखील तुमच्या मनात या देशाविषयी प्रचंड प्रेम असतानादेखील, लाठ्या काठ्यांनी झोडलं जाईल आणि तुमच्या नाकात जो वास असेल तो अश्रुधूर आणि गन पावडरचा असेल.
अहवालाची लिंक : bit.ly/4isJ2ro
uoffice.varrun@gmail.com
