वरुण सुखराज
हे सारे तुम्ही-आम्ही माध्यमांच्या चित्रफितींतून आणि समाजमाध्यमांवरील रील्समार्‍यातून पाहिलेय. पुढल्या दिवसांत त्यात नवी भर पडेलच.
पेपरफुटीच्या निषेधासाठी सुरू झालेले आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांमुळे आता दिल्लीच्या जंतर-मंतरपुरते मर्यादित उरले नाही. देशातल्या प्रत्येक राज्यात तरुणाईचा धुम्मस निषेधमोर्चांतून व्यक्त होतोय. दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून गेलेला तरुण चित्रकर्मी नव्या पिढीच्या ऊर्जेकडे भविष्यातील बळकट लोकशाहीसाठी पूरक म्हणून कसा पाहतो, दडपशाही करून शासन यंत्रणेचे काय चुकले, या मुद्द्यांची चर्चा. त्याशिवाय ‘सीजेपी’सारखे तरुणकेंद्री आंदोलन तयार होण्यात सरकारच्या निष्क्रिय धोरणांनी कसा हातभार लावला त्याचे चिंतन…

जंतर-मंतरला आंदोलनाच्या ठिकाणी मी जेव्हा पोहोचलो, त्यावेळी माझ्या हातात किंवा माझ्याबरोबर कॅमेरा नव्हता. तो न्यायचा नाहीच हे मी ठरवूनच आलो होतो. यापूर्वी, ज्यावेळी शेतकरी आंदोलनांवर आम्ही ‘टू मच डेमोक्रसी’ चित्रित केली, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जप्रक्रियेवर ‘जमूरा’ बनवली किंवा आता बँकिंग क्षेत्रावर ‘द ग्रेट इंडियन इल्यूजन’ तयार केली. या प्रत्येक फिल्मच्या वेळी लोकांना जे माहिती नाहीये किंवा लोकांना जे दिसतंय त्याच्यापेक्षा सत्य वेगळं आहे आणि असेल तर ते सत्य काय आहे, हे नोंदवून ठेवावं, हा त्याच्यामागचा मुख्य विचार असायचा.

आत्ता मात्र लोकांना सत्य पूर्णपणे अगदी पारदर्शकपणे दिसतंय. असं असताना, मी आज जे आंदोलन घडतंय त्याची इतिहासात नोंद राहावी, ते डॉक्युमेंट व्हावं, त्यावर आधारित सिनेमा करण्यापेक्षाही, आम्ही याआधी केलेल्या सिनेमांचं, कामांचं भविष्य काय आहे? हे अनुभवायला खरं तर इथं आलो.
मला या आंदोलनात खूप सारी मुलं भेटली. वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातलेली, वेगवेगळ्या भाषा बोलणारी, वेगवेगळ्या प्रांतांतून आलेली. त्यातल्या अनेकांनी मला सांगितलं, त्यांनी फिल्म्स पाहिल्या आहेत किंवा त्यांना ‘जमूरा’मधलं हे आवडलं, ‘टू मच डेमोक्रसी’मधलं ते आवडलं. एक मुलगा फार इंटरेस्टिंग गोष्ट म्हणाला, ‘‘मी जेव्हा ‘टू मच डेमोक्रसी पाहिली त्यावेळी खूप रडलो होतो आणि मी खूप हतबल, हेल्पलेस फील करत होतो. मला असं झालेलं की मी काहीच करू शकत नाहीये का? या सगळ्या परिस्थितीत आम्हाला करण्यासारखं काहीच नाहीये का? आणि या आंदोलनात आम्ही काहीतरी करतोय आणि त्यानं खूप बरं वाटतंय.’’

मला असं वाटतं, प्रत्येक पिढीतील मोठ्यांना असं वाटतं की ‘क्रांती आम्हीच केली’ पण इतिहास खूप वेगळंच सत्य सांगतो. स्वातंत्र्यलढ्यात विद्यार्थ्यांनी दिलेलं योगदान असेल, त्यांचा त्याच्यातला सक्रिय सहभाग असेल, आणीबाणीचा काळ असेल, जे. पी. आंदोलन असेल, निर्भया आंदोलन असेल, अगदी शेतकरी आंदोलन असेल, सीएए, एनआरसीचं आंदोलन असेल या सगळ्यांत विद्यार्थ्यांनी नेहमीच फार महत्त्वाची भूमिका बजावलीय. यांतील प्रत्येक आंदोलनामध्ये जरी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची होतीच, तरीही समाज म्हणून आपल्याला सतत हा प्रश्न पडायचा की ही मुलं गेली कुठे? नंतर या मुलांनी काय केलं असेल? भारताची तरुण पिढी काय करतेय? आणि आज थेट हे आंदोलन आपल्यासमोर उभं आहे.

आपल्याला पडलेल्या त्या सर्व प्रश्नांतील भारताची तरुण पिढी, भारताची मुलं काय करतायत आणि काय करू शकतात याचं हे आंदोलन एक जळजळीत उदाहरण आणि उत्तर आहे. या आंदोलनात घोषणा ऐकू येतायत, मुलांचा व्यवस्थेवरचा राग दिसून येतोय, कोणी एकच नेता आहे आणि त्या नेत्याच्या मागे लागून, त्याच्या भाषणांनी प्रभावित होऊन ही सगळी मुलं बोलतायत असं नाहीये. पण या आंदोलनामध्ये मला या सगळ्याच्याही पलीकडे जे दिसलं ते हे की, अगदी लहान-लहान मुलीसुद्धा आपल्या खांद्यांवरून पाण्याच्या बाटल्यांचे क्रेटच्या क्रेट घेऊन जातायत, तुम्हाला त्यांच्या चेहर्‍यावर दिसतंय की ते ओझं त्यांना पेलवत नाहीये तरीही ते आनंदानं आणि उत्साहानं ते काम करतायत.

का करत असतील बरं हे?

लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आपल्यासोबतच्या अनोळखी, पण आंदोलनात असणार्‍या मुला-मुलींची काळजी घेतायत. कचरा काढतायत, संध्याकाळी तिथे मोठ्या बांबूला झाडू बांधण्याचं काम चालू होतं आणि मग नंतर ही मुलं आंदोलनाच्या ठिकाणाचा कचरा स्वच्छ करतायत. पोलिसांचा लाठीचार्ज चालू आहे, कोणी तरी मित्र किंवा कदाचित अनोळखी कुणीही यांच्यासमोर येऊन त्यांना वाचवणारा एखादा मुलगा, मुलगी दिसते. थोडा वेळ मी सुरजित भवन येथे काही नेत्यांशी बोलत असताना बघितलं की ऑनलाइन डिलिव्हरी ॲप्स वापरून- ज्यावर कुणाचं नाव नव्हतं, फक्त पत्ता होता, ज्यात गरजेच्या वस्तूंचा ओघ जंतर-मंतरमधील मुलांसाठी येतोय, तोही असा की आलेल्या सामानात २०-२५ छत्र्या पाठवून दिल्यात, रेनकोट होते, बिस्किटं होती. मी होतो त्या तीसेक मिनिटांत जवळ जवळ अर्धी खोली भरेल इतकं सामान तिथं जमा झालेलं. मागे शेतकरी आंदोलनाच्या वेळी ते कसे पिझ्झा खातात यावरून जो गदारोळ झाला होता त्याउलट आता इथं एका माणसानं दीडशे पिझ्झा पाठवून दिले होते! …आणि मुलांनाही या मदतीचं भान आलंय. तेही अगदी काळजीपूर्वक या गोष्टी वापरतायत.

हा… भारताचा वर्तमान आहे आणि तो फार आशादायी वाटतो.

ही फक्त एका रागाची गोष्ट नाहीये. ही एका जबाबदारीची गोष्ट आहे, जी आपल्यावर आहे, हे त्यांना माहिती होतंच आणि आता त्यांनी ते सिद्ध करून दाखवलंय. लोकांना खरं तर आंदोलन म्हणजे अस्थिरता वाटते, आंदोलन म्हणजे काहीतरी डिसरप्टिव्ह (विघटनकारी) असं काहीतरी की ज्याच्यातून समस्या निर्माण होऊ शकते. पण माझ्या आधीच्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे ‘आंदोलन हा लोकशाहीचा लखलखता दागिना आहे.’ आणि जेव्हा सर्व काही संपतंय की काय, लोकशाही उरतच नाही की काय, अशा सगळ्या निराशादायी प्रश्नांमध्ये या देशातले ज्येष्ठ आणि इतर नागरिक अडकलेले असताना, हे आंदोलन आपल्यासमोर आलं.

इतिहासात अमेरिकेतील सिव्हिल राइट्स मूव्हमेंट असेल, दक्षिण कोरियातील असेल, पोलंडची सॉलिडारिटी चळवळ असेल… अशा खूप आंदोलनांनी राजकारण पूर्णपणे ढवळून काढलंय आणि बदललंय. पण आंदोलनानं सगळ्यात आधी जर काही बदललं असेल तर ती नागरिकांमधली ‘स्वत:ची’ जाणीव- जी या आंदोलनानं बदलली.

शेतकरी आंदोलनाच्या वेळी, कितीही सिनेमे केले, काही केलं तरी शेतकर्‍यांना आतंकवादी, खालिस्तानी म्हणणारा एक फार मोठा वर्ग होता या देशामध्ये. आज हे चित्र बदललेलं दिसतंय. आज देशाचा मोठा वर्ग, देशाची मोठी लोकसंख्या ही या मुलांच्या बाजूनं बोलतेय, उभी आहे. त्यांना या बीभत्स हुकूमशाहीचा चेहरा पूर्णपणे ओळखता आलेला आहे आणि ते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे.

आपण एक समजून घेतलं पाहिजे- जेव्हा केव्हा आपण आपल्या लोकशाहीविषयी बोलतो, त्यावेळी आपल्याला असं वाटतं की, ‘अरे, आता भारतात लोकशाही शिल्लकच नाही राहणार’, ‘आता लोकशाही पद्धतीनं काही चालत नाही’ वगैरे… आपण हे समजून घेतलं पाहिजे की भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असली तरी सर्वात तरुण आहे. एखाद्या २०-२५ वर्षाच्या मुलाकडून आपण ८० वर्षाच्या माणसाच्या परिपक्वतेची अपेक्षा करू शकतो का? तेच आपल्या लोकशाहीच्या बाबतीत आहे.

मला हे मान्य आहे की आपण ज्या काळात जगतोय, आपल्या उमेदीच्या काळात हे सगळं बघायला लागतंय याचं जरी आपल्याला वाईट वाटत असलं आणि त्यामुळं नैराश्य येत असलं तरी काळाच्या पटलावर ज्यावेळी आपण या गोष्टीचा विचार करतो, त्यावेळी आपल्याला दिसतं की भारत आता परिपक्व लोकशाहीच्या दिशेनं, एका प्रौढ लोकशाहीच्या दिशेनं प्रवास करायला लागलाय.

तुम्हाला कदाचित हे चुकीचं वाटेल, पण हे आंदोलन हे मला फार आशादायी वाटतं.

हे आंदोलन सुरुवात आहे आपल्या प्रौढत्वाकडे होणार्‍या वाटचालीची…

ज्या पोस्टर्स, ज्या घोषणांवरून अनेक जण नाकं मुरडतायत, खरं तर तसे पोस्टर्स, तशा घोषणा या जुन्या, मजबूत लोकशाहीमध्ये अगदी सर्रास वापरल्या जातात. किंवा अगदी त्याही पलीकडे जाऊन तशा कधी भारतात वापरल्या गेल्या नव्हत्या. आपल्याकडे अजूनही आपली आंदोलनं, आपलं राजकारण, आपलं सत्ताकारण हे त्या जुन्या पठडीतच सुरू होतं. तुम्ही जर नीट निरखून बघितलं, तर ती कात टाकण्याचं काम या आंदोलनापासून सुरू झालंय. आपले नेते- ज्यांना आपण एकेकाळी डोक्यावर घेतलं, त्यांना आपण खाली आदळून आपटू शकतो! ही जी ताकद आहे, ही जी ताकद लोकशाही आपल्याला देते, ती खर्‍या अर्थानं वापरताना ही मुलं दिसतात.

आता कदाचित याच्यामागे त्यांचं एक निरागस धाडस असेल. त्या भीतीचा लवलेशही त्यांच्या मनात नाहीये. त्याचं कारण असं की या मुलांना सगळ्यात जास्त आणि सगळ्यात प्रिय काही असेल तर त्यांचं स्वातंत्र्य. या आधीच्या पिढ्या ज्यांना आपण ‘मिलेनियल्स’ म्हणतो त्यांच्यापर्यंतसुद्धा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केला म्हणजे खूप मोठी क्रांती समजली जायची. ही आताची मुलं त्याच्या फार पलीकडे गेलीयेत. त्यांना स्वत:ची ठाम मतं आहेत आणि त्या मतांसाठी ते स्वत:च्या पालकांबरोबर, घरातल्यांबरोबरसुद्धा वाद घालू शकतात, बंड करून उठतात; तर सरकार, यंत्रणा हे तर त्यांच्यासाठी फारच मामूली गोष्ट ठरते आणि ते त्यांनी सिद्ध केलंय.

लोकशाही म्हणजे मुळातच मला जे मान्य नाहीये ते व्यक्त करण्याची ताकद किंवा हिंमत. ही हिंमत या मुलांमध्ये आहे आणि ते ती अतिशय जबाबदारीने वापरतायत. ही रसरशीत लोकशाहीची भाषा आहे.

आपल्यापैकी अनेकांना, खास करून वयाने थोड्या जास्त असलेल्या तज्ज्ञांना, या क्षेत्रातल्या दिग्गजांना या भाषेची, या अशा मीम्सची, या अशा डायरेक्ट, बोल्ड स्टेटमेंट्सची सवय नाहीये. पण मला असं वाटतं आता तुम्ही ती करून घ्यायला हवी. ही भाषा चूक करणार्‍याचा मुलाहिजा ठेवत नाही. ‘पार्लमेंटरी प्रोटोकॉल्स’च्या नावाखाली वाटेल तो अन्याय ही भाषा सहन करत नाही. ही या मुलांची, येणार्‍या काळाची आणि प्रौढ लोकशाहीची भारताची नवी भाषा आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलंत, तर लहान-लहान १० वी, ११ वी, १२ वीतली मुलं मेलडी चॉकलेट वाटतायत. आता याचा संदर्भ तुम्हाला वेगळा द्यायला नको!

ही मुलं, या देशाच्या सर्वोच्च नेत्याला अशा पद्धतीनं अतिशय धारदार व्यंगाने आणि ठामपणे विरोध करतायत किंवा मला असं वाटतं की ते थट्टा करतायत. आणि ही थट्टा जर तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर याच नेत्यांनी या लोकशाहीची, या देशातल्या तरुणांची, इथल्या पर्यावरणाची आणि अनेक प्रश्नांची चालवलेली थट्टा ही तुम्ही विसरताय असं मला वाटतं. त्यासमोर ही तर फारच सशक्त, सुंदर अशी थट्टा मला वाटते.

इथे अनेक वेगवेगळ्या वर्गामधून आलेली मुलं आहेत. वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातून आलेली मुलं आहेत आणि ती सगळी एकमेकांच्या बरोबर उभी आहेत. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, प्रत्येकाचा व्यक्त होण्याचा प्रकार वेगळा आहे.

हे आंदोलन जरी नीट परीक्षेचे पेपर फुटण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी आता मात्र हे आंदोलन एकंदरीतच व्यवस्थेच्या गैरकारभाराविषयी, व्यवस्थेच्या भयानक अशा परिस्थितीविरोधात बोलत आहे. इथे येणारा प्रत्येक मुलगा आपलं एक दु:ख, आपला एक प्रश्न घेऊन आलेला आहे आणि त्यासोबतच त्याला उरलेल्या सर्व प्रश्नांचीदेखील जाण आहे. इथं हे आंदोलन फार वेगळं ठरतं इतर अनेक आंदोलनांपेक्षा- जी इतिहासात झालीत. अनेकदा आपण बघतो आंदोलकांची एक ठाम मागणी असते, जी इथेही आहे. पण त्यासोबतच हा जो एकूण परिस्थितीवरचा राग आहे तो माध्यमांवर निघतोय. काही ठिकाणी त्याचा अतिरेक होत असला तरी तसं का होतंय? याचा विचार माध्यमांनीसुद्धा केला पाहिजे.

ज्यावेळी मी ‘वेस्टर्न सिनेमे’ किंवा ‘वेब सिरीज’ पाहायचो, त्यावेळी असं वाटायचं की अरे, इथे राष्ट्राध्यक्ष म्हणजे अगदी अमेरिकेतसुद्धा राष्ट्राध्यक्षांविरोधात किती खुलेआमपणे भाष्य केलं जातं. त्यांचे ‘कॅरिकेचर्स’ कसे बनवले जातात किंवा त्यांचे मुखवटे घालून काय केलं जातं. कधी-कधी ते बीभत्स होत असलं तरीसुद्धा इतकं स्वातंत्र्य जी देते त्यालाच खरं लोकशाही म्हणतात. आपल्याकडे असं का बरं होत नसेल? हा प्रश्न मला कायम पडायचा. याचा अर्थ ते बीभत्स असावं असं नाही, पण ते पूर्णपणे निर्भय (फिअरलेस) असावं, रोकठोक असावं अशी माझी कायम इच्छा असायची, अनेकांची असेलच. ते आज घडताना दिसतंय. हे या आंदोलनाचं मोठं यश आहे.

आता सिनेमाच्या भाषेत बोलायचं झालं तर मला इथे जे जाणवतंय ते असं आहे की सिनेमामध्ये कधी-कधी असं असतं की पडद्यावर खूप हिंसक असं एक दृश्य सुरू असतं. पण त्याचं पार्श्वसंगीत मात्र एकदम प्रेमळ, आश्वासक अशा पद्धतीचं असतं. ‘काउंटर पॉइंट’ असंदेखील काही जण त्याला म्हणतात. इथे मला तेच जाणवतंय.

समोर बरिकेड्स आहेत, सशस्त्र पोलीस आहेत, सीआरपीएफ आहे, हजारोंनी सुरक्षा दलाचे लोक इथे तैनात आहेत, अश्रूधूर आहे, जखमा आहेत, सगळं आहे. पण या सगळ्याच्या मागे मला एक आश्वासक संगीत ऐकू येतंय आणि ते संगीत या दृश्याला फार परिणामकारक बनवतंय.

हे आंदोलन आता फक्त जंतर-मंतरपुरतं उरलेलं नाही. भारताच्या कानाकोपर्‍यात या आंदोलनाने आता वेग पकडलेला आहे. आणि त्याचं कारणच असं आहे की कानाकोपर्‍यात असलेला, वेगवेगळ्या वर्गात असलेला जो राग आहे, जी अस्वस्थता आहे, तो अनेक वर्षं सरकारनं, सत्ताधार्‍यांनी दडपून ठेवला होता. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं काढून त्या रागाला बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण तो तसा होत नसतो, हे मात्र हे सत्ताधारी विसरलेले दिसले.
या आंदोलनाने हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी वास्तवतेपासून दूर जाऊ शकत नाही. आणि आज हा देश आपल्या वास्तव परिस्थितीकडे डोळे उघडे ठेवून बघतोय आणि त्याचं श्रेय या लहान मुलांना जातं. म्हणून मला असं वाटतं की या मुलांचं बोट धरून आपण लोकशाही म्हणून आता प्रौढत्वाकडे प्रवास सुरू केलाय आणि त्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे.

सत्ताधार्‍यांनी, तज्ज्ञांनी मोठमोठ्या शब्दांचा वापर करून विश्लेषण करणार्‍यांनी हे समजून घ्यावं की रसरशीत लोकशाही ही अशी थेट असते!

जगाच्या इतिहासात हे अनेकदा सिद्ध झालंय. भारताच्या इतिहासात ते आता सिद्ध होतंय. त्याच्या आड कृपया तुम्ही येऊ नका. या आंदोलनांविषयी मत-मतांतरं असतील, याच्या नेतृत्वाविषयी, उपोषणांविषयी काहीही असेल, पण हा राग हा १०० टक्के खरा आहे. या रागाची कारणं ही १०० टक्के योग्य आहेत, आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धती नव्या आहेत. त्याच्याशी सत्ताधार्‍यांनी तर जुळवून घ्यावंच, पण नागरिक म्हणून आपणही जुळवून घ्यायला हवं.
आज इथं फिरताना सगळ्यात समाधान एका गोष्टीचं वाटतं की गेली अनेक वर्षं आम्ही काही जण हे असे सिनेमे बनवत होतो, सरकारविरोधात बोलत होतो, टीका करत होतो, धोरणांवर टीका करत होतो, मुलाखती देत होतो, लेख लिहित होतो. अशा प्रत्येक वेळी… अनेकांनी आमच्यावर शंका उपस्थित केल्या की तुम्हालाच का असं दिसतं? तुम्हीच का हे असं बोलत राहता? किंवा हे बोलत राहणं तुम्हाला का गरजेचं वाटतं? खूप टिका झाल्या, खूप पद्धतीनी अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईकसुद्धा दुरावले. त्यावेळी बोलणारे थोडेथोडके होतो. पण आम्ही बोलत राहिलो. बोलत राहण्याचा मार्ग आम्ही स्वत:हून निवडला. आज त्या गोष्टीचं समाधान वाटतं.

कारण आता ही लाखो मुलं बोलतायत. आणि ती बोलतायत म्हणून लाजेखातर का होईना आता त्यांचे पालकही बोलतायत. माध्यमंही बोलतायत. इतर सगळेच जण बोलतायत. मला असं वाटतं की बोलत राहणं हा लोकशाही सक्षम ठेवण्याचा सगळ्यात ठोस मार्ग आहे. त्या मार्गावरून आपण ढळता कामा नये, परिस्थिती कितीही वाईट येवो. आज कदाचित मी हे लिहीत असताना ते आंदोलन तिथं शांततापूर्वक चालू आहे. हे छापून येईपर्यंत तिथं काहीतरी वेगळं घडलेलं असू शकतं. तशा पद्धतीची चिन्हं दिसतायत, तशा पद्धतीची तयारी दिसतेय. पण तरीही काहीही घडलं तरी या आंदोलनाने या देशाला बोलण्याची ताकद पुन्हा दिलीये, हे आपण नाकारू शकत नाही. ज्यावेळी आम्ही या फिल्म्स करत होतो त्यावेळी आम्हाला माहिती होतं की एका फिल्मनं किंवा एका लेखानं किंवा एका मुलाखतीनं काही जग बदलणार नाहीये.

पण आम्हाला कायम असं वाटायचं की त्या आपल्या कुठल्याही कृतीनं, आपल्या बोलण्यानं एका जरी मनात प्रश्न उभा राहिला तरी ते फार मोठं यश असेल. कारण इतिहास अनेकदा अशा छोट्या प्रश्नांपासूनच सुरू होतो. तो होताना आता आपल्याला दिसतोय. सरकार आंदोलनात किती लोक आले हे मोजतं, माध्यमंसुद्धा ते करतात. पण इतिहास आंदोलनातून किती नागरिक घडले, हे मोजतो. मला असं वाटतं की आपण झाडाला पहिल्यांदा फळं लागतात, तेव्हा आपण फक्त फळांकडे पाहतो. पण त्या फळांच्या मागे अनेक वर्षं शांतपणे जमिनीत वाढत गेलेल्या मुळांची कथा दडलेली असते. आज जंतर-मंतरवर मला ती मुळं दिसली. वर्षानुवर्षं चित्रपटात, पुस्तकात, चर्चांमध्ये, वर्गखोल्यांमध्ये, घरांमध्ये आणि असंख्य सामान्य माणसांच्या छोट्या-छोट्या हिमतीमध्ये रुजत गेलेली ही मुळं होती. आज ती पहिल्यांदा जमिनीवर दिसू लागली.

मी जसं सुरुवातीलाच म्हणालो, मी या आंदोलनावर चित्रपट करायला, डॉक्युमेंट्री करायला आलेलो नाही. मी हे आंदोलन कॅमेर्‍यातून पाहत नाहीये. मी हे आंदोलन एका सार्वभौम देशाचा नागरिक म्हणून, रसरशीत लोकशाहीचा भाग म्हणून या तरुणांचाच, यांच्यापैकी एक बनून जिवंतपणे अनुभवतोय. हा अनुभव माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आठवण असेल- जी कुठल्याही सिनेमापेक्षा, लेखांपेक्षा खूप काहीतरी देऊन जाईल असं मला वाटतंय.

होय, यावेळी मी पहिल्यांदा अतिशय स्वार्थी विचार करतोय.

प्रश्न विचारणारी मुलं, त्यांचा आवाज, त्या सगळ्याचा आनंद टिपून ठेवण्यापेक्षा तो जगतोय. शक्य झाल्यास तुम्ही जिथं कुठं असाल, तिथं तुम्हीसुद्धा हे क्षण जगण्याचा प्रयत्न करा. येणार्‍या काळामध्ये या क्षणांचं महत्त्व काय आहे? हे आपल्याला सर्वांनाच दिसेल. जितकं लवकर दिसेल तितकी हानी कमी होईल, एवढं मात्र नक्की.

लोकशाही केवळ मतदानाच्याच दिवशी जिवंत होत नसते, ती प्रश्न विचारणार्‍या नागरिकांमुळे जिवंत राहत असते. ती तशी मतदानापर्यंत जिवंत ठेवणं हे आपल्याला नक्कीच करता येईल. या मुलांचा, या देशाचा आणि आमच्या लोकशाहीचा प्रचंड अभिमान वाटतो. जंतर- मंतरवरून पुढील घटना, पुढील अनुभव कळवत राहीनच. तुम्हीसुद्धा जिथं कुठं असाल, तिथं जे शक्य आहे ते करा. लोकशाहीच्या पुढच्या टप्प्यात आपण निघालेलो आहोत. त्याचे साक्षीदार तर बनाच, पण त्यात योगदान करा. फार समाधान मिळेल!

office.varrun@gmail.com