‘सत्य, सत्ता आणि साहित्य’ हा नितीन रिंढे आणि प्रफुल्ल शिलेदार या दोन व्यासंगी संपादकांनी कथाकार आणि नाटककार म्हणून विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या सांध्यावरील सर्वात महत्त्वाचे मराठी साहित्यिक जयंत पवार यांच्या साहित्येतर लेखनाचा हा संपादित ग्रंथ. मराठी साहित्य विश्वाला वैचारिक वळण देणारा दिशादर्शक ग्रंथ ठरावा.

जयंत पवार हे नि:संशयपणे विद्रोही साहित्य प्रवाहाचे प्रवक्ते आणि नायक होते. त्याचबरोबर त्यांनी एका बाजूला प्रस्थापित अभिजन वर्गातील साहित्यिकांशी संवादी नाते टिकवून ठेवले होते. समग्र वैश्विक साहित्य प्रवाहाचे त्यांचे भान आणि समतोल आकलन, यामुळे जयंत पवार यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.

फ्रान्झ काफ्का, मुराकामी, मार्खेज, पामुक अशा जागतिक साहित्यात महत्त्वाच्या ठरलेल्या अनेक साहित्यिकांविषयी जयंत पवार यांचे आकलन चकित करणारे आहे. त्याच वेळेस भारतीय समाजातील जातिव्यवस्था, वैदिक-अवैदिक, सांस्कृतिक प्रवाह, शतकानुशतके सुरू असलेले त्यातील सांस्कृतिक संघर्षाचे पैलू यांविषयीचे सम्यक आकलन जयंत पवार आपल्या लिखाणात सहजपणे व्यक्त करतात. या ग्रंथाच्या रचनेचे स्वरूप जयंत पवार यांनी लिहिलेले लेख, भाषणे, विविध पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना आणि टिपणे…

चंद्रकांत खोत आणि तेंडुलकर या दिग्गज साहित्यिकांचे संस्मरण, समकालीन लेखकांच्या लिखाणाचे मूल्यमापन आणि वेळोवेळी त्यांनी दिलेल्या दीर्घ मुलाखती यांचे संकलन असे आहे. या ग्रंथातील मांडणी एक समग्र भूमिका म्हणून जाणून घेणे आवश्यक आहे, तरच या लिखाणाचे मूल्य जोखता येते. या सर्व लिखाणात साहित्यनिर्मिती, लेखकाची सर्जनशीलता, लेखकाचे सामाजिक पार्श्वभूमी, सामाजिक आणि राजकीय भान, मराठी तसेच भारतीय साहित्यातील विविध प्रवाह यांविषयी अत्यंत चिकित्सक भूमिका जयंत पवार यांनी मांडलेली आढळते. चंद्रकांत खोत, शफाअत खान, प्रेमानंद गजवी, पुरुषोत्तम बेर्डे, रघुनंदन त्रिवेदी, गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे अशा अनेक महत्त्वाच्या समकालीन नाटककार आणि साहित्यिकांच्या मोजक्या आणि महत्त्वाच्या कलाकृतींचे विश्लेषण या लेखनात समोर येते.

साहित्यिक आकलनाबरोबरच जयंत पवार नव भांडवली जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस वर्षांत उत्क्रांत होत गेलेली सत्ता समीकरणे, सामाजिक रचनेतील उलथापालथी आणि आर्थिक हितसंबंधांचे सखोलभान सक्षमपणे व्यक्त करतात. या समतोल समग्र मांडणीमुळेच जयंत पवार हे केवळ विद्रोही साहित्य प्रवाहाचे प्रवक्ते राहत नाहीत. त्यांच्या या ठोस वैचारिक भूमिकेमुळे मराठी साहित्यातील प्रस्थापित अभिजनवादी आणि कलावादी साहित्याला केंद्रस्थानातून बाजूला सारत जनवादी, विद्रोही साहित्य प्रवाह, बहुजन आणि दलित साहित्य प्रवाह हाच आधुनिक मराठी साहित्यातील मुख्य प्रवाह म्हणून प्रस्थापित करण्यात पवार अशस्वी होतात. जयंत पवार यांचे हे ऐतिहासिक कार्य एकसंधपणे या ग्रंथातून प्रस्थापित होते, हे या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य.

जयंत पवार यांचा सर्जनशील साहित्यिक म्हणून कार्यकाल हा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण होता. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या औद्योगिक कामगार कष्टकर्‍यांच्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. बहुजन कष्टकरी संस्कृती, अस्मिता अतिशय टोकदारपणे याच काळात आकाराला येत होती. मुंबईतील कापड उद्योग आणि गिरणी कामगार या कष्टकरी संस्कृतीचे अग्रणी होते. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे, शाहीर अमर शेख आणि पुढच्या टप्प्यात दलित चळवळीने दिलेले महान साहित्यिक, विशेषत: नामदेव ढसाळ या पिढीच्या संचित जाणिवांवर पोसली गेलेली ही पिढी.

चंद्रकांत खोत आणि लिटिल मॅगझीन चळवळीतील अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे, तुळशी परब, जयंत नेरुरकर, मन्या ओक अशा समकालीन साहित्यिकांबरोबरच्या वैचारिक घुसळणीतून जयंत पवार यांच्या साहित्यिक जाणिवा तयार होत गेल्या. विकसित झाल्या. याचे अत्यंत मनोवेधक चित्रण या लेखनात वाचायला मिळते. त्याच वेळेस उमेदीच्या काळातील पत्रकारितेमुळे गिरणगाव आणि मुंबईतील अधोविश्वाचा सजग अभ्यास जयंत पवार यांनी केला. अत्यंत खुलेपणाने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पुन: पुन्हा आपल्या जाणिवा, भूमिका आणि वैचारिक निष्ठा ते तपासून पाहताना दिसतात. त्यातील त्यांचे स्वयंभू आणि एकात्मिक आकलन म्हणजे जनसाहित्याचा जाहीरनामा म्हणावा लागेल.

जयंत पवार यांच्या सर्जनशील साहित्यनिर्मिती कालखंडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील कष्टकर्‍यांची संस्कृती विकसित होऊन ती लयाला जाण्याची प्रक्रिया त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. सन १९८२ नंतर म्हणजेच गिरणी संपानंतर सुरुवातीला आस्ते कदम आणि नंतर पुढील पंचवीस वर्षांत वेगाने जागतिकीकरणाचा रेटा वाढला.

विविध समाजमाध्यमे आणि सत्याचा विपर्यास करत भ्रामक सत्याचा वेढा समाजाला पडत गेला, तो हाच कालखंड. त्याचे भलेबुरे पडसाद त्यांनी अनुभवले. जवळून पाहिले. या मोठ्या स्थित्यंतराचे तटस्थपणे; परंतु अत्यंत संवेदनशील पद्धतीने वैचारिक विवेचन करण्याची क्षमता अन्य कोणत्याही साहित्यिकाने दाखविल्याचे उदाहरण नाही. नव भांडवली, जागतिकीकरणानंतर तयार झालेली सामाजिक परिस्थिती म्हणजे ‘शतखंडित समाज आणि मानवी जाणिवा’ असे वर्णन ते करतात. त्यांच्या साहित्यिक आणि नाट्यकलाकृतीत तर ते दिसतेच; परंतु या विशिष्ट ग्रंथांतील त्यांच्या लिखाणात अधिक समग्रपणे ते समोर येते.

भांडवली औद्योगिक विकासाच्या या प्रचंड मोठ्या कालखंडात बहुजन कष्टकरी संस्कृतीची पार्श्वभूमी आणि अवैदिक वारशाशी असलेले आपले नाते जयंत पवार अत्यंत प्रभावीपणे मांडतात. किंबहुना त्यामुळेच त्यांच्या सर्व लिखाणाला एक व्यापक वैचारिक पट प्राप्त होतो. त्या संपूर्ण वैचारिक पटाचा पाया ‘सत्य’ हे चिरंतन मानवी मूल्य आहे. या ग्रंथातील प्रत्येक लेख, नोंद आणि मुलाखत म्हणजे वैचारिक इमान बाळगत आपल्या वर्तमानाचे सत्यान्वेषण ठरते.

जयंत पवारांच्या वैचारिक भूमिकेचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे या ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेले त्यांचे बुलढाणा येथे झालेल्या तेराव्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण होय. वाचकाची साहित्यविषयक संवेदना विस्तारणारा हा लेख आहे. ‘सत्य, सत्ता आणि साहित्य’ या ग्रंथाने जयंत पवार यांचे आधुनिक मराठी साहित्याचे मुख्य भाष्यकार म्हणून स्थान अधोरेखित केले आहे.

आपल्या मांडणीत अनेक ठिकाणी जयंत पवार लेखकाने सृजनशील कलाकार म्हणून तटस्थ भूमिकेशी कठोरपणे एकनिष्ठ असले पाहिजे अशी भूमिका मांडतात. त्याच वेळेस प्रत्येक लेखकाला स्पष्ट सामाजिक, राजकीय भूमिका असलीच पाहिजे हेसुद्धा स्पष्टपणे मांडतात. या पार्श्वभूमीवर सन २०१५ मध्ये कोकण मराठी साहित्य संमेलनातील आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखक आणि सत्ता यातील परस्पर गुंतागुंतीचे नाते ते उलगडून दाखवतात, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. त्याच भाषणात आजच्या सत्तेतील ब्राह्मणी वर्चस्ववादी शक्तींचा धोका आणि त्यामुळे हिंदू धर्माची लवचीकता नष्ट होण्याची भीती ते व्यक्त करतात. वाढत्या सरकार बाह्य समांतर सेन्सॉरशिपची अनेक उदाहरणे मांडत पवार साहित्यिक म्हणून आपली भूमिका स्पष्ट करतात.

भक्कम साहित्य विचार देणार्‍या या ग्रंथाच्या आकर्षक मुखपृष्ठाची रचना करताना लेखक चित्रकार गणेश विसपुते यांनी आधुनिक शिल्पकलेचे जनक मानल्या जाणार्‍या फ्रेंच शिल्पकार ऑगस्ट रोदॅं यांच्या टेराकोटा शिल्पाचा वापर केला आहे. त्यामुळे पुस्तकाला देखणे रूप मिळते, हे आवर्जून नमूद करायला हवे.

सत्य, सत्ता आणि साहित्य
संपादक – नीतीन रिंढे, प्र्रफुल्ल शिलेदार, पपायरस प्रकाशन,
पाने- ३९२, किंमत- ६५० रुपये.

mujumdar.mujumdar@gmail.com