scorecardresearch

पुस्तक परीक्षण: चळवळीने घडवलेला हाडाचा कार्यकर्ता!

महाराष्ट्राच्या राजकारणात आत्मचरित्र न लिहिता, आपल्या कामाची नोंद आपणच न करता स्मृतिशेष झालेले असंख्य कार्यकर्ते आहेत. स्वत:कडे कमीपणा घेत अनेकांनी आपले कार्य तडीस नेले.

जयदेव डोळे
महाराष्ट्राच्या राजकारणात आत्मचरित्र न लिहिता, आपल्या कामाची नोंद आपणच न करता स्मृतिशेष झालेले असंख्य कार्यकर्ते आहेत. स्वत:कडे कमीपणा घेत अनेकांनी आपले कार्य तडीस नेले. त्यांच्याबाबत मग कहाण्या, किवंदती, किस्से एवढेच शिल्लक राहते. आत्मचरित्र समजा लिहावेसे वाटत नसेल तर आठवणी, मुलाखती, प्रासंगिक लेख यांतूनही गतकाळ उभा करता येत असतो. परंतु त्यासही नकार देणारे भरपूर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राने पाहिले. अजूनही कित्येक तेवढय़ाच तोलामोलाचे आहेत आणि अगदी तसाच स्वत:कडे कमीपणा घेऊन आपल्या कार्याची आपणच उपेक्षा करीत आहेत. यश-अपयश यापेक्षा एक सामाजिक इतिहास आणि माणसाचा संघर्ष म्हणून आपले अनुभवकथन अथवा आत्मघडण जगासमोर आणणे हे महत्त्वाचे असते. जात, धर्म, प्रथा, अंधश्रद्धा, विषमता, दारिद्य्रा आदी भयंकर समस्या ओलांडत एखादी व्यक्ती त्याच समस्यांचे निराकरण करीत मागाहून येणाऱ्यांसाठी कशी वाट सुकर करते याचा एक प्रेरक, उद्बोधक इतिहास चरित्रे-आत्मचरित्रे उलगडतात. संत, सुधारक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक यांच्या भल्यामोठय़ा परंपरेत आपण कोण, कुठले असा एक न्यूनगंड बऱ्याच कार्यकर्त्यांना असतो. त्यातून त्यांची बचावात्मक भूमिका जन्मते. खरे तर त्या परंपरेचे तेही एक कडी असतात; पण का कोण जाणे आपण जे करत आहोत ते तेवढे भव्यदिव्य नाही असे त्यांच्या मनाने उगाचच बजावलेले असते. अशा स्वत:ला बजावणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महंमद खडस हे एक बिनीचे कार्यकर्ते होऊन गेले. उत्तम कार्यकर्ता, उत्कृष्ट संघटक आणि उमदा विचारक हे त्यांचे वैशिष्टय़. पुढारपण त्यांच्या अंगी खिळलेले. पण ना ते कधी मिरवले, ना गौरवले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची समाजवादी विचारसरणी त्यांनी संघटना, पक्ष, संस्था, आंदोलने यांतून अनुभवली. सुरुवात राष्ट्र सेवा दलाची चिपळूणमधील शाखा.. दारिद्रयामुळे शिक्षण थोडे आणि वणवण अधिक.. मग मुंबईत खलाशी, आचारी, धान्यबाजारातील व्यापारी, दाणेबाजारामधील तज्ज्ञ असा त्यांचा व्यवसायात्मक प्रवास. पण या साऱ्या धकाधकीतही त्यांनी वाचन, अभ्यास, ज्ञान आणि राजकीय जाणिवा वाढवत नेल्या. त्यात हमीद दलवाई यांच्यासारख्या समाजसुधारक व सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या बहिणीशी विवाह. नाथ पै, मधु दंडवते, एस. एम. जोशी, विनायकराव कुलकर्णी आदी ज्येष्ठ समाजवादी नेत्यांचा सहवास. बैठका, अधिवेशने, सभा, चळवळी आदी कार्यक्रमांमधून समाजवादी विचारांचे भरणपोषण. त्यामुळे महंमद खडस आणीबाणीत तुरुंगातही जातात आणि जनता पक्षाच्या स्थापनेनंतर मुंबईच्या एका मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून जागाही उत्पन्न करतात.
पण तेव्हापासूनच आपल्या वैचारिक निष्ठा अभंग अन् अव्यभिचारी ठेवायचा आटोकाट प्रयत्न करणारा हा समाजवादी संसदबाह्य पुरोगामी राजकारण करणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींचा ‘महंमदभाई’ बनतो, त्याचीच कहाणी ‘महंमद खडस : मिस्टर पब्लिक’ या लेखसंग्रहातून आपल्यासमोर उलगडत जाते. लिहिणारे सारे कार्यकर्तेच आहेत. कुणी कुलगुरू, तर कुणी खासदार, कुणी पत्रकार, प्राध्यापक, आमदार झाले तरी साऱ्यांशी खडस कार्यकर्त्यांसारखेच राहिले. त्यांच्यावरची माया आणि त्यांना मार्गदर्शन कधी कमी केले नाही. खडस नामांतरवादी कृती समितीचे कोषाध्यक्ष होते. राममनोहर लोहिया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र कार्य करण्याचे ठरवले होते. त्यांचाच वारसा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी पुढे नेला.
कामगार चळवळींशी जवळचा संबंध असल्याने खडस यांनी पुन्हा जात व श्रम यांचा एक भयंकर संबंध एका अभ्यासातून महाराष्ट्राला सांगितला. तो म्हणजे ‘नरकसफाईची गोष्ट’ हा अरुण ठाकूर यांच्यासोबत त्यांनी तयार केलेला एक संशोधन ग्रंथ. मानवी विष्ठा साफ करणारी जात, तिचे श्रम, तिला मिळणारी बहिष्कृत वा तुच्छतापूर्ण वागणूक या साऱ्यांची नोंद हे पुस्तक करते. घाणेरडय़ा जातिव्यवस्थेचा नायनाटच केला पाहिजे अशी प्रेरणा खडस-ठाकूर या पुस्तकामधून देऊन गेले. खडस २१ नोव्हेंबर, तर ठाकूर १९ मार्च २०१९ रोजी निधन पावले. महंमदभाई ८३ व्या वर्षी गेले. त्यांचा बोलका, मैत्रीपूर्ण आणि उत्साही सहवास जितक्यांना मिळाला, त्यांना या संग्रहाचे संपादक भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे भाई लवकर गेले असेच वाटले. हुसेन दलवाई, लक्ष्मण माने, निशा शिवूरकर, संजय मं. गो., संजीव साने, गौतम सोनावणे, किशोर ढमाले, गजानन खातू अशा एकूण १७ प्रकारच्या कार्यकर्त्यांनी जे महंमदभाई वर्णिले आहेत, ते खरोखर अजब अन् विस्मयकारी आहे. जणू समाजवादाच्या ‘क, ख, ग’मधले ते ‘ख’च!
मुंबईतील साधारण ५०० चौ. फु.च्या घरात राहणारे खडस दाम्पत्य. त्यांचा मुलगा समर याच्यासह सदासर्वकाळ कार्यकर्ते येत-जात असत आणि फातिमाताई सर्वाची अपत्यासम काळजी करीत आहेत असे वर्णन तर प्रत्येक लेखक करतोच; सोबत धुवांधार चर्चा, वाद, दाखले, वाचन, मार्गदर्शन हेही चालू असल्याचे सांगतो. या साऱ्यात महंमदभाईंचाही तेवढाच वाटा असे. त्यांची सम्यक, पुरोगामी दृष्टी प्रत्येक मुद्दय़ांतून प्रकटे. घराबाहेरही भाई अनेक कार्यक्रम आपल्या वडिलकीच्या नात्याने यशस्वी करीत.. परंतु प्रकाशझोतात न येता! भारतीय राजकारण जनता पक्षात समाजवादी-संघ असे एकत्र आल्याने बदलले. संघ फॅसिस्ट व जातीय असल्याने त्यासोबत जायचे नाही असे ठरवून खडस जनता पक्षातून बाहेर पडले व त्यांनी समाजवादी विचारांच्या काही संघटनांचा अनुभव घेत ‘समता आंदोलन’ अखेरीस उभे केले. असंख्य त्यागी व तळमळीचे कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि महाराष्ट्रातील विषमता, अन्याय, शोषण नष्ट करत जाण्याचे कार्यक्रम दिले व ते राबवूनही घेतले.
हिंदू-मुस्लीम ऐक्य, सलोखा यावर त्यांचा दांडगा विश्वास. तरीही १९९२ पासून सुरू झालेल्या जातीय, धर्मवादी राजकारणाने ते व्यथित होत गेले आणि २०१४ पासून भारतावर राज्य करू लागलेल्या कट्टर हिंदूत्ववादी सरकारमुळे तर ते पार खचले. त्यांच्या पत्नी फातिमा ऊर्फ फाफा त्यांच्या लेखात म्हणतात, ‘माणूस शरीराने खूप नंतर मरतो, पहिल्यांदा त्याच्यातील जगण्याची ऊर्मी संपते. आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य अमानवी घटना त्याची जगण्याची ऊर्मी संपवून टाकतात. खडसांच्या बाबतीत असेच झाले. एका अर्थी या बदललेल्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेचे केलेले हे ‘लिंचिंग’च होते. समाजपुरुष एखाद्या भुताने झपाटल्यासारखा आपले उलटे पाय घेऊन भूतकाळात स्वत:ला खेचत खेचत घेऊन जाताना बघणे किती दु:खकारक असते, हे मी खडसांच्या रूपाने बघितले.’
समाजवादी चळवळीने महाराष्ट्रात अव्वल दर्जाची राजकीय-सामाजिक माणसे घडविली. महंमद खडस त्यांतलेच एक. विविध लेखांतून प्रकटलेले त्यांचे चरित्र म्हणजे महाराष्ट्रीय पुरोगामित्वाचा एक इतिहासच. लोभस आणि प्रेरक.
‘महंमद खडस : मिस्टर पब्लिक’, संपादक- डॉ. भालचंद्र मुणगेकर, लोकवाङ्मय गृह,
पृष्ठे- २१२, किंमत- २५० रुपये. ६

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jaydev dole author article in the politics maharashtra activists amy

ताज्या बातम्या