एकही प्रसिद्ध, नाववाला कलावंत नसताना ‘काका किशाचा’ आणि ‘संभूसाच्या चाळीत’ या दोन नाटकांच्या प्रयोगांनी १०० च्या वर मजल मारली. चार दशकांपूर्वी ही अपूर्व घटना होती. ख्यातनाम कलावंतांच्या नावावर नाटक चालतं, ही समजूत या दोन नाटकांनी खोटी पाडली. नाटक प्रेक्षकांना आवडेल असं असेल आणि कलावंत गुणी असतील तर स्पर्धेतलं नाटक व्यावसायिक रंगमंचावरही भरपूर यश संपादन करू शकते, हे या नाटकांनंतर मच्छिंद्र कांबळी यांनी सादर केलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकानंही सिद्ध केलं. स्पर्धेतलं यशस्वी नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणणं व्यावसायिक निर्मात्यांना पूर्वी धोकादायक वाटत असे. ती भीती ‘संभूूसाच्या..’ ‘काका’नी प्रथमच घालवली.
‘या दिवसांत स्वित्र्झलडला थंडी असेल नाही?’
‘थंडी? भलतीच थंडी! थंडी काय, बर्फ काय, विचारू नका!’
‘बर्फसुद्धा?’
‘अहो, सगळीकडे नुसतं बर्फच बर्फ! घरावर बर्फ, दारावर बर्फ, कौलावर बर्फ, रस्त्यावर बर्फ, गाडीवर बर्फ. इतकंच काय..?’
‘काय?’
‘बर्फावरदेखील बर्फच! मी साखरेच्या पाकात बुडवलेली काडी घेऊन घराबाहेर येतो आणि घराला, घराला..’
‘घराला काय?’
‘घराला एक चक्कर मारतो. तो काय..?’
‘काय?’
‘आईसफ्रूट!’
प्रचंड हशा दुमदुमायचा. मला काही वेळ थांबावं लागत असे. हे संवाद बोलणारा मीच होतो. ‘काका किशाचा!’ १९६७ सालच्या राज्य नाटय़स्पर्धेत शाम फडके लिखित या फार्सने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. दिग्दर्शनाचं दुसरं पारितोषिक किशोर प्रधानला मिळालं, तर वैयक्तिक अभिनयाचं रौप्यपदक मला मिळालं.
तालमीच्या अगोदर नाटक मला वाचायला दिलं तेव्हा मी दिग्दर्शक किशोर प्रधानला म्हणालो होतो, ‘या नाटकात मला काही राम दिसत नाही. आपण नाटक बदलूया का?’ किशोर म्हणाला, ‘हेच नाटक स्पर्धेत करणं भाग आहे. कारण मी स्पर्धेच्या अर्जावर ‘काका किशाचा’ हेच नाव दिलं आहे. शिवाय काही प्रयोगाचे पैसेही लेखकाला मी चुकते केले आहेत.’
इलाजच नव्हता. आम्ही कसोशीनं तालमी करायला सुरुवात केली. किशोरनं खूप मेहनत घेतली. प्रत्येकाला नवीन काही ना काही सुचत जायचं आणि नाटकात भर पडत जायची. कॉलेजचं हॉस्टेल हे नाटय़स्थळ आणि प्रेयसीच्या पित्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी मित्रांनी घेतलेली ‘काकां’ची सोंगं हा विषय असल्यामुळे कॉलेज तरुणांत हे नाटक खूप लोकप्रिय झालं होतं. मीच तीन-चार कॉलेजच्या वार्षिक उत्सवांतले प्रयोग दिग्दर्शित केले होते.
पंचविसाव्या प्रयोगापर्यंत नाटककार शाम फडके वही घेऊन प्रयोगाला बसायचे. नटांचे उत्स्फूर्त विनोद टिपून घ्यायचे. नाटकाच्या छापील पुस्तकात हे सगळे विनोद समाविष्ट केले आहेत. या नाटकाचे सुमारे १७० प्रयोग प्रमुख मूळ कलावंतांच्या संचात झाले. परंतु नाटकाच्या पुस्तकात मात्र पहिल्या प्रयोगाची तारीख, वार, स्थळ कसलाच उल्लेख नाही. इतकंच काय, पण कलावंतांची नावेही दिलेली नाहीत. वेगवेगळ्या प्रसंगांची बोटभर लांबीची छोटी छायाचित्रे आहेत. पण त्याखालीही कलावंतांची नावे नाहीत. फार्समध्ये लेखकाइतकेच कलावंतही महत्त्वाचे असतात. त्यांची नावे पुस्तकात देणे आवश्यक होते. (पहिल्या प्रयोगातील कलावंत- किशोर प्रधान, महेश गोंधळेकर, कमलाकर नाडकर्णी, किशोर कोहोजकर, विश्वनाथ वैद्य, कुमार कर्णिक, शोभा प्रधान आणि पुष्पा वर्टी असा नटसंच होता.) नाटकाच्या यशाचे श्रेय फक्त नाटककाराचेच असते असा समज बहुधा असावा. या नाटकानं किशोर प्रधान नावाचा एक चांगला विनोदी नट मराठी रंगभूमीला दिला. त्याच्या आविष्कारात विविधता असती तर तो अधिक लोकप्रिय झाला असता. अलीकडचे लोकप्रिय विनोदी नटही कालांतराने तोच तोचपणा करू लागतात आणि जुने होतात. अभिनयातलं कुठचंही नवं आव्हान पत्करण्याची त्यांची तयारी नसते. अशा परिस्थितीत विनोदी ‘भूमिका’ करायच्याऐवजी ते एकामागोमाग एक फक्त विनोदी ‘कामे’च करीत राहतात. दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ आणि गेल्या पिढीतले आत्माराम भेंडे मात्र अजूनही जुने झालेले नाहीत.
१९६७ च्या नाटय़स्पर्धेत प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली होती- ‘संभूसाची चाळ.’ श्री. ना. पेंडशांची ही ‘चाळ’ गंभीर होती. पु. लं.ची ‘बटाटय़ाची चाळ’ तुफान हास्यकारक होती. तर ‘संभूसाची..’ करुण, भेदक होती. रंगभूमीचं बोधचिन्ह म्हणून हसरा व करुण असे दोन चेहरे दाखवले जातात. या दोन चाळी त्याच चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत होत्या.
या चाळीतलं वास्तव प्रेक्षकांच्या अंगावर यायचं. दिग्दर्शक टी. एस. साटम यांनी भेदकता प्रभावी करण्यात कमालीचं यश मिळवल्यामुळेच त्यांना दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. चंद्रकांत कोलापकर यांनी उभं केलेलं चाळीचं नेपथ्य म्हणजे यथार्थदर्शी नेपथ्याचा अव्वल नमुना होतं. रंगमंचाच्या मध्यभागी चाळीचा चौक. एका बाजूला वरून खाली येणारा आणि आहे त्या मजल्यावरून खाली उतरणारा जिना व एका बाजूला चाळीतली एक प्रातिनिधिक खोली (नाटकातील प्रमुख घटनांचं स्थळ) असं नेपथ्याचं स्वरूप होतं. हीच चाळ त्यानंतर अनेक नाटकांतून पुनरावृत्तीत झाली.
या नेपथ्याबद्दलची एक कथा मजेदार आहे. प्रत्यक्ष नाटय़संहिता हातात पडली तेव्हा दिग्दर्शक नाटकाच्या परिणामाबद्दल साशंक होता. पण जेव्हा नेपथ्य डोळ्यासमोर आलं तेव्हा त्या नेपथ्यानेच दिग्दर्शकाला अनेक गोष्टी सुचवल्या. (एका कोपऱ्यात बसलेला आळशी मनुष्य, उगाचच जिन्यावरून वर-खाली जाणारी नखरेल बाई, चाळीतल्या रहिवाशांचे एकूण व्यवहार..) चाळीचं एक जग मूर्तिमंत उभं राहिलं. दिग्दर्शक व नेपथ्यकार यांचा त्यात महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्यामुळेच नाटकातील कच्चेपणा झाकला गेला.
या स्पर्धेतील ही दोन पारितोषिकविजेती नाटकं नंतर खूप गाजली. एकही प्रसिद्ध, नाववाला कलावंत नसताना या दोन्ही नाटकांच्या प्रयोगांनी १०० च्या वर मजल मारली. चार दशकांपूर्वी ही अपूर्व घटना होती. ख्यातनाम कलावंतांच्या नावावर नाटक चालतं, ही समजूत या दोन नाटकांनी खोटी पाडली. नाटक प्रेक्षकांना आवडेल असं असेल आणि कलावंत गुणी असतील तर ते नाटक व्यावसायिक रंगमंचावरही भरपूर यश संपादन करू शकते, हे या नाटकांनंतर मच्छिंद्र कांबळी यांनी सादर केलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकानंही सिद्ध केलं. स्पर्धेतलं यशस्वी नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणणं व्यावसायिक निर्मात्यांना पूर्वी धोकादायक वाटत असे. ती भीती ‘संभूूसाच्या..’ ‘काका’नी प्रथमच घालवली.
त्यावर्षीच्या अंतिम स्पर्धेतून रंगायनच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाला पूर्णपणे वगळलं होतं. इतक्या सवरेत्कृष्ट नाटकाची किंचितही दखल न घेतल्याबद्दल मला तीव्र संताप आला होता. मी किशोर प्रधानला म्हणालो, ‘हे उद्वेगजनक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत ‘शांतता’ला डावलून ‘काका’ला उचलून धरणं घोर अन्यायाचे आहे.’ किशोर म्हणाला, ‘तू ‘काका’मधला मुख्य कलावंत आहेस. तू प्रतिस्पध्र्याच्या बाजूने बोलू नयेस असं मला वाटतं.’ मी म्हणालो, ‘कुठल्याही कलाकृतीचा वस्तुनिष्ठपणे व तटस्थपणे विचार करायला शिकलं पाहिजे. ‘आपला तो बाळ्या’ असं करून कसं चालेल?’ (माझ्यातला समीक्षक स्पर्धक असल्यापासूनच जागा होता का?) ‘शांतता’ डावलण्याचं एक कारण त्यावेळच्या एका परीक्षकाकडून कानावर पडलं. ‘काय यावेळी रंगायनची जिरवलीच की नाही? दरवेळी रंगायनलाच वरचा क्रमांक का द्यायचा?’
एखाद्या कलाकृतीबाबत व्यक्तिगत दृष्टिकोनाची ही दोन रूपं रंगकर्मीनी नोंद करून ठेवण्यासारखी आहेत. राज्य नाटय़स्पर्धेतून डावललं गेलं तरी ‘शांतता’चे स्पर्धेबाहेर खूप प्रयोग झाले. गंमत म्हणजे याच नाटकाचा हिंदी प्रयोग पुढील वर्षी रंगायनने सादर केला आणि त्या प्रयोगाला प्रथम पारितोषिक मिळालं. सुलभा देशपांडे यांना बेणारेबाईंच्या उत्कृष्ट भूमिकेबद्दल रौप्यपदक मिळालं. उत्कृष्ट भारतीय नाटकांत ‘शांतता’ची गणना झाली. मराठी स्पर्धेच्या परीक्षकांचे हसे झाले.
अरविंद देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला हा प्रयोग बघताना थरारून जायला व्हायचं. ‘गिधाडे’तल्या माणसांचं क्रौर्य अपेक्षितच असतं. कारण ती त्याच प्रवृत्तीची माणसं आहेत हे प्रथमपासूनच समजतं. पण ‘शांतता’मधली माणसं नेभळट आहेत, बावळट आहेत. पण समूहात आली की याच माणसांतलं जनावर जागं होतं आणि हातात मिळालेलं सावज ती माणसं रक्तबंबाळ केल्यावाचून सोडत नाहीत. बेणारेबाईंचं या नाटकातील अखेरचं स्वगत नाटय़लेखनाच्या इतिहासातील सवरेत्कृष्ट स्वगतांत गणना होण्याच्या तोडीचं आहे. स्पर्धेच्या काळात या नाटकाच्या अखेरच्या भागाच्या लिखाणासाठी नाटककार तेंडुलकरांना एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं. त्याचंच फलित म्हणजे हे स्वगत!
या स्वगताबद्दल सुलभा देशपांडे ‘तें आणि आम्ही’या पुस्तकात म्हणतात, ‘तेंडुलकरांनी मनाविरुद्ध आणि नाटक लिहून संपल्यानंतर स्वतंत्रपणे लिहिलेलं स्वगत- तसं खरंच स्वतंत्र, उपरं होतं काय? बेणारेची स्वगतातून उमटलेली ती तडफड, तिची जीवनदृष्टी, तिचा बंडखोरपणा, तिचा चाकोरीबद्ध, दिशाहीन जगणाऱ्या समाजाविरुद्धचा संताप, त्याने तिची केलेली ससेहोलपट, त्यामुळे आलेला अगतिकपणा, उद्याच्या एका हसत्या, नाचत्या, बागडत्या जीवनाविषयीची ओढ आणि त्याला जन्माला घालायचा निर्धार हे सगळं ज्या स्वगतात उमटलंय, ते काय नाइलाजानं लिहून प्रकटलंय?’
आशयाप्रमाणेच या नाटकाचा आकृतिबंधही वैशिष्टय़पूर्ण होता. अभिरूप न्यायालयाचं स्वरूप या नाटकाला दिलं गेलं होतं. त्यापूर्वी ‘साक्षीदार’ (ले. विद्याधर गोखले) हे रूपांतरित नाटक न्यायालयीन नाटक होतं. तर त्यानंतरचं तुफान लोकप्रिय झालेलं न्यायालयीन नाटय़ म्हणजे आचार्य अत्र्यांचं ‘तो मी नव्हेच’!
अहमदनगरच्या थिएटर ग्रुपने सादर केलेल्या ‘काळे बेट लाल बत्ती’ या प्रा. मधुकर तोरडमल लिखित नाटकानं एक जबरदस्त दणकाच दिला. ‘स्पर्धेतलं एक सशक्त नाटक’ असाच या नाटकाचा उल्लेख करावा लागेल. आघाती नाटय़, गूढ, रहस्यमय वातावरण, अनोखं कथानक आणि या सर्व विशेषांना पुरून उरेल असा गढीवरच्या इंद्रसेन आंग्रे यांचा- म्हणजेच प्रा. मधुकर तोरडमल यांचा शैलीदार, दमदार अभिनय. भव्य व्यक्तिमत्त्व, शुद्ध वाणी, आवाजाची उत्कृष्ट फेक आणि नजरेतील जरब या आविष्कारीय विशेषांनी त्यांनी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वच उभं केलं. नटवर्य नानासाहेब फाटक यांच्या रंगमचीय प्रभावी व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारे जे दोन गुणी कलावंत या स्पर्धेनं मराठी लोकप्रिय रंगभूमीला दिले, त्यात प्रा. तोरडमल यांची गणना करायला हरकत नाही. दुसरे होते डॉ. शरदचंद्र भुथाडिया. प्रा. तोरडमल यांच्या रूपाने केवळ एक अस्सल नटच नव्हे, तर एक चांगला व्यावसायिक नाटककारही रंगभूमीला दिला. साहित्य संघाने या नाटकातीला मूळ कलावंतांना घेऊन त्याचे सुमारे १७५ प्रयोग व्यावसायिक रंगमंचावर केले. आपल्या विविध प्रकारच्या नाटकांनी व भूमिकांनी व्यावसायिक रंगमंचावर प्रा. तोरडमलांनी आपली मुद्रा पावशतकभर उमटविली.
बंगाली नाटककार, तिसऱ्या रंगभूमीचे प्रणेते बादल सरकार यांची महाराष्ट्राला पहिली ओळख करून दिली ती या स्पर्धेनेच! १९६९ सालच्या स्पर्धेत त्यांचं ‘वल्लभपूरची दंतकथा’ हे नाटक पहिलं पारितोषिक घेऊन गेलं. एका वेगळ्याच वाडय़ाची, वेगळीच कथा सांगणारे हे नाटक एका नव्या प्रकारच्या विनोदाचं प्रकटीकरण करण्यात तुफान यशस्वी झाले होते. या नाटय़प्रयोगाचे दिग्दर्शक पं. सत्यदेव दुबे व अमोल पालेकर हेही पारितोषिकविजेते ठरले. व्यावसायिक रंगभूमीवरही हे नाटक लोकप्रिय झालं. तिसऱ्या रंगभूमीच्या संकल्पनेच्या जन्माअगोदरचं बादल सरकारांचं हे कमानी रंगमंचावरचं नाटक होतं.
‘अशी पाखरे येती’ या विजय तेंडुलकरलिखित नाटकानं (दिग्दर्शक- जब्बार पटेल) १९७० साल गाजवलं. भालबा केळकरांच्या पी.डी.ए. या संस्थेनं हे नाटक सादर केलं होतं. ‘रेनमेकर’ या नाटकाशी साम्य दाखविणाऱ्या या नाटकानं एक वेगळीच मजा आणली. सर्व घराचाच चेहरामोहरा बदलणाऱ्या यातल्या नायकाच्या व्यक्तिरेखेबरोबरच संघाच्या स्वयंसेवकाची- ‘बंडा’ची व्यक्तिरेखाही लक्षणीय होती. नाटकाच्या वाटचालीत आत्मभान येणाऱ्या ‘सरु’ या नायिकेची व्यक्तिरेखा तर सामान्यातून असामान्यत्व प्रकट करणाऱ्या अनोख्या मुलीची होती. स्पर्धेतलं हे नाटक चिरतरुण ठरलं. या नाटकाचे अन्य भाषांतील प्रयोगही मी पाहिले आहेत. पण स्पर्धेतल्या जब्बार पटेलांच्या अभिनयाच्या तोडीचा अभिनय अन्यभाषिक प्रयोगांतून पाहायला मिळाला नाही. गुजराती प्रयोगात अलिबागचं घर वगैरे नाटय़स्थळ चारकोल स्केच काढावं तसं रेखाचित्राच्या स्वरूपात उभं केलं होतं. स्पर्धेतील नाटय़प्रयोगात सरुची भूमिका करणाऱ्या कल्पना भालेराव हिचा अभिनयही अविस्मरणीय होता. अमोल पालेकर यांनी या नाटकावर आधारीत ‘थोडासा रुमानी हो जाय’ हा चित्रपटही तयार केला होता. नाना पाटेकर यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. अगदी अलीकडेच हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर लोकप्रिय झाले होते. त्यात संजय नार्वेकरने प्रमुख भूमिका केली होती. व्यावसायिक रंगमंचाला तेंडुलकरांच्या नाटकांचं मोठेपण कळायला बराच अवधी लागला.
राज्य नाटय़स्पर्धेमुळे लोकमान्य रंगभूमीला किती दर्जेदार नाटकं मिळाली, याची ओझरती कल्पना आजच्या रसिकांना या लेखावरून यावी.
स्पर्धेच्या आठवणींतली आणखी काही नाटकं पुढील लेखी..