नीता कुलकर्णी
बाईच्या मनातला सल, वेदना आणि खंत या अजब गोष्टी आहेत. त्याचा थांग लागणं अवघडच! ‘काय बोचतंय?’ असा नेमका प्रश्न बाईला विचारायलासुद्धा खूप काळ लोटला. आपली वेदना नेमक्या शब्दांत मांडली तर त्या देवाणघेवाणीतून इतर कित्येकींना आपलं प्रतिबिंब दिसू शकेल, हा विचार रुजत गेला. नेमका काय सल आहे, हे लक्षात येऊन त्याविषयी जेव्हा बोलणं सुरू होतं तेव्हा ते केवळ भाबडं, भावुक आणि संवेदनाप्रधान राहत नाही. ते तरल होतं. अनेक पापुद्रे, अस्तरं त्यातून उलगडत जातात आणि वेदना नेमकेपणाने बोलकी होते.

जुई कुलकर्णी यांचा ‘चेशायर’ हा कथासंग्रह असाच अनुभव देतो. जुई कुलकर्णी कवयित्री आहेत. ‘चेशायर’ नावाच्याच कथेने या संग्रहाची सुरुवात होते. प्राण्यांची दुनिया आणि माणसांचं जग याचा अद्भुत संवाद या कथेत आहे. एकूणच परीकथा, गूढरम्य साहित्याच्या दुनियेबद्दल लेखिकेला वाटणारं कुतूहल या कथेमध्ये दिसतं. पण इतर कथांमध्येही ते डोकावत राहतं. करोनाकाळात अख्खं जग ठप्प झालेलं असताना मिळालेला हा मार्जारमित्र आणि कथा नायिका यांच्यातला संवाद वरकरणी जसा खुसखुशीत आणि गमतीचा वाटतो, तितकाच तो पुढे खोल होत जातो. अनेक अर्थ आणि सत्य यांचे पदर सुट्टे करत नेणारी ही कथा आहे. जुई कुलकर्णी यांचं मिथकांविषयीचं कुतूहल, चित्रकला, शिल्प-स्थापत्य, प्रवास, गजल, शायरी, भाषा, या सगळ्यावरच्या प्रेमाचं प्रतिबिंब त्यांच्या कथेत चित्रासारखंच उमटलेलं आहे. म्हणूनच त्यांची कथा भीमबेटका, हम्पी, कोलकाता अशा अनेक ठिकाणची वैशिष्ट्यं सांगत घडते.

‘कॅशबॉक्स कॅफे’ या गोष्टीतली रूही हम्पीच्या उद्ध्वस्त, पण राजस व्यक्तिमत्त्वासारखी वाटत राहते. वास्तविक त्यांच्या सगळ्याच कथांच्या नायिकांमध्ये एक उद्ध्वस्त वेदना जाणवत राहते. मग ती ‘ब्युटी अँड द बीस्ट’ मधली जास्वंदी असो, ‘ॲन एप्रिल डे’ मधली शालीन असो, ‘जीम स्टोरी’ मधली फॅटी, ‘रामजन्म’मधली नायिका असो… कोणत्या ना कोणत्या दु:खात पोळणार्‍या या नायिका आहेत. ‘ययाती आणि देवयानी’ मधली देवयानीसुद्धा शेवटी निखरून उजळून निघालेली असली, तरी तिच्याही मुळाशी असणारा एकाकीपणा ठसठशीत व्यापून उरतोच. एकूणच जुई यांच्या लेखनात मनोव्यापारांचा आलेख मांडणार्‍या, व्यवहारी जगातल्या उघड्यावाघड्या समीकरणांची उत्तरं शोधताना कासावीस होऊन गेलेल्या स्त्रिया अस्वस्थ करणार्‍या आहेत. कारण त्यांच्याशी साधर्म्य असणार्‍या अनेक जणी आपल्या भोवताली भेटत असतात. एकूणच माणसांचं निरीक्षण आणि मानवी वर्तनामागच्या प्रेरणा जाणून घेण्याची जिज्ञासा, यातून त्यांच्या लेखनातली पात्रं तपशीलवार घडत गेली आहेत. फिक्शन लिहिणार्‍या कोणत्याही लेखकासमोर पात्र उभी करण्याचं आव्हान मोठं असतं.

कुलकर्णी यांची नायिका लादलेल्या चौकटीमध्ये घुसमटणारी आहे. तिची ही घुसमट अनेक स्तरांवरची आहे, शारीरिक आहे, आर्थिक आणि सामाजिकही आहे. हा कथासंग्रह त्यांनी मराठी साहित्य जगतातल्या पाच महान कथालेखकांना अर्पण केला आहे. ती नावं वाचली तर लेखिका म्हणून त्यांच्यावरचे प्रभाव जाणवतील.

kulkarnineeta1973 @gmail.com