आपल्याला निव्र्यंग, आनंदी बालक व्हावे असे प्रत्येकच पालकाला वाटते; पण तसे सर्वांच्याच बाबतीत घडते असे नाही. वेगवेगळ्या समस्यांशी झगडत, चिवटपणे जीवनव्यवहार करणारी कर्णबधिर बालके पाहिली की मन गलबलून येते. संवेदनशील ज्येष्ठ लेखिका, समाजसेविका उषा धर्माधिकारी यांचे ‘कर्णबधिरांच्या विश्वात’ हे पुस्तक अशा पालकांसाठी आशा निर्माण करते. लेखिका लोकमान्य टिळक रुग्णालय येथे समाजसेवा विभागात नोकरी करीत होत्या. तेथे सुलभाताई वर्दे यांच्या प्रेरक प्रोत्साहनामुळे त्यांच्या कामाला गती आणि दिशा मिळत गेली. अनुभवांची साठवण झाली. ती या पुस्तकरूपाने साकारली आहे.

ज्येष्ठ लेखिका विजयाताई वाड प्रस्तावनेत लिहितात, ‘कर्णबधिरांच्या विश्वाचे दार उघडून सर्वसामान्य माणसाला एका अनोख्या जगाची ओळख हे पुस्तक करून देते. हे मोठे काम आहे. यामुळे ज्यांच्या पदरी ऐकू येऊ न शकणारी, बोलू न शकणारी बालके जन्माला आलीत त्या पालकांनाच नव्हे, तर इतर सामान्य लोकांनाही उद्बोधन होईल. कुतुहल हा शब्द सहजतेत बदलेल, दृष्टिकोन निकोप होईल. अशा मुलांकडे बघणारा एक सशक्त समाज उभा राहील.’

कर्णबधिरांच्या संपर्कात आल्याखेरीज त्यांचे अपंगत्व लक्षात येत नाही. ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही याचा परिणाम या मुलांच्या जगण्यावर होतो. नवीन क्षेत्रे, माहिती व तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून इंटरनेट, स्मार्ट फोन, सोशल मीडिया इत्यादींना पूर आला आहे; अशा परिस्थितीत कर्णबधिरांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होऊ नये, तसेच पालक, शिक्षक, समाज यांनी त्यांना समजून घ्यावे-आपलेसे करावे, आणि समाजसेवी संस्थांमार्फत त्यांना सहकार्य मिळावे, त्यांचे पुनर्वसन व्हावे, हा उद्देश या पुस्तकलेखनामागे आहे.

या पुस्तकात कर्णबधिरांच्या शिक्षण-प्रशिक्षण देणार्‍या ‘टीच इंडिया डीड्स’ सारख्या समाजसेवी संस्थेचा परिचय होतो. कर्ण-बधिर शिकू शकत नाहीत, अशी समाजात असलेली धारणा दूर करणार्‍या, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शाळा तसेच विविध क्षेत्रातील, जागतिक स्तरावरील कर्तृत्ववान कर्णबधिर यांची प्रेरक उदाहरणे या पुस्तकात वाचायला मिळतात. ती थक्क करून सोडतात. उदारणादाखल काहींची नावे उद्धृत करते. आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, चेन्नईचे कर्णबधिर मुरली कुप्पुस्वामी, अमेरिकेतील विद्यापीठातील पहिले कर्णबधिर भारतीय प्राध्यापक मदन वशिष्ट, इंदूर येशील कर्णबधिर पति-पत्नींची मुलगी उषा पंजाबी, संपूर्ण कर्णबधिर कर्मचारीवृंदाद्वारे ‘मिरची ॲन्ड माईम’ रेस्टॉरंट चालवणारे अनुज व प्रवीण… इत्यादींच्या प्रेरणादायी योगदानातून लेखिका कर्णबधिरांचे विश्व वाचकासमोर मांडते.

या पुस्तकातील कर्णबधिर मुलांच्या अनुभवसिद्ध कथा वाचकांना, कर्णबधिर मुलांना, पालकांना, शिक्षकांना, समाजाला मार्गदर्शक ठरतील अशा आहेत. कर्णबधिरांच्या बौद्धिक क्षमतेची, उपजत गुणांची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. नीलेश जाधव यांचे मुखपृष्ठचित्र विषयाची ओळख करून देणारे आहे. श्रवण समस्या असलेला कर्ण व त्या समस्येवर केलेली मात अर्थात श्रवणयंत्राच्या रूपातील फुलपाखरू! त्या उंच आभाळात विविधांगी स्वप्नांना घेऊन जाणार्‍या रंगीत इंद्रधुनुच्या कमानीवर बसलेले, कानाच्या वरच्या कडेला असलेले रंगीत, देखणे, गोऽड फुलपाखरू! हे मुखपृष्ठ पुस्तकवाचनाबद्दल उत्सुकता वाढविणारे, पुस्तकाच्या अंतरंगाला साजेसे, आकर्षक, अर्थपूर्ण, कलात्मक, समर्पक तसेच परिणामकारक आहे. हे पुस्तक कर्णबधिरांसंबंधीचे समज-गैरसमज नाहीसे करत कर्णबधिरांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते. कर्णबधिरांना समजून घ्यावे, त्यांना समान संधी मिळावी हीच हे पुस्तक लिहिण्यामागे लेखिकेची तळमळ आहे. ‘कर्णबधिरांच्या विश्वात’, उषा धर्माधिकारी, ग्रंथाली, पाने-१६६, किंमत- २५० रुपये