प्रा. विजय तापस

‘‘The new-come stepmother hates the children born to a first mother.ll – Euripides ( Greek philosopher &  playwright )

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

‘विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीचा, वर्तनबंधाचा किंवा गोष्टीचा प्रातिनिधिक नमुना म्हणजे आदिरूप, आदिबंध किंवा मूलाकार..’ अशी ‘आदिबंध’ या संज्ञेची व्याख्या केली जाते. या अर्थाने पाहिलं तर २७ डिसेंबर १९१९ या दिवशी ‘लोकमान्य नाटक मंडळी’ने फैजपूर श्रीराम नाटय़गृहात ज्या ‘माईसाहेब’ या नाटकाचा प्रयोग सादर केला, ते नाटक म्हणजे ‘सावत्र माता’ या आदिबंधाचाच आविष्कार आहे. या नाटकाचे सलग चारेक वर्ष महाराष्ट्रात प्रयोग चालू होते. यावरून तर ही गोष्ट अगदीच स्पष्ट आहे की, नाटक वा रंगभूमीला ‘प्रत्यक्षातल्या जीवनाचं प्रतिबिंब दाखवणारा आरसा’ मानणाऱ्या महाराष्ट्रीय जनतेने या नाटकाला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दिला. या प्रतिसादाचा उगम कशात आहे वा होता याची चिकित्सा तर आपल्याला करता येईलच. ती आपण करूही; मात्र इथेच हे  सांगितलं पाहिजे की, ‘माईसाहेब’ नाटक हा त्या काळातल्या रंगभूमीवरचा ‘माइलस्टोन’ ठरलं हे  नि:संशय सत्य! या नाटकाचे लेखक होते नारायण विनायक कुलकर्णी! हे कुलकर्णी म्हणजे हरहुन्नरीपणा आणि मराठी सारस्वताची भूमी ही उपजाऊ भूमी आहे यावर अढळ निष्ठा ठेवून लेखन करणारे सव्यसाची लेखक होते, हेही निखालस सत्य!   

‘जन्मदा माता’ आणि ‘सावत्र माता’ यांत स्वाभाविकच एक मूलभूत भेद आहे. पहिलं नातं नैसर्गिक आहे, तर दुसरं नातं ‘पर्याय’ वा ‘सोय’ म्हणून अस्तित्वात आलेलं आहे. जन्मदा नसलेली, पण तिच्या हरपलेल्या अस्तित्वाची जाणीव तिच्या मागे राहिलेल्या लेकराला कणमात्रही जाणवणार नाही, जाणवू नये या अपेक्षेने विधुर असलेल्या पुरुषाने दुसरं लग्न केलं की त्याच्या पहिल्या संबंधापासून झालेल्या मुलांना जी ‘नवी आई’ प्राप्त होते तिला ‘सावत्र आई’ ही उपाधी येऊन चिकटते. सर्वच धर्मीयांमध्ये अशा सावत्र आईला फारसं उदात्त स्थान म्हणा किंवा खरीखुरी प्रतिष्ठा म्हणा- कधीच मिळाल्याचं दिसत नाही. सावत्रतेचं हे वास्तव केवळ बहुधर्मीय वीण असलेल्या भारतीय समाजातच दिसून येतं असं नाही, तर ते जगभरचं दाहक आणि क्लेशदायी वास्तव आहे. खरोखरच शुद्ध वास्तव हेच आहे की, एका विधुराच्या आयुष्यात बाहेरून आलेल्या (स्वेच्छेने वा नाइलाजाने) स्त्रीला नको असलेली ‘सावत्र आई’ ही स्थिती स्वीकारावीच लागते. ज्या मुलांना आपण आपल्या गर्भात वाढवलं नाही, ज्यांच्याशी आपला रक्तामांसाचा संबंध नाही, त्यांना ‘आपलं’ वा ‘माझं लेकरू’ म्हणणं हे त्या स्त्रीला केव्हाही सोपं नसतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. ‘सावत्र आई’ वा ‘सावत्र बाप’ असणं/ होणं ही पराकोटीची अवघड, विलक्षण गुंतागुंतीची आणि जगण्याच्या प्रत्येक क्षणी द्यावी लागणारी अ‍ॅसिड टेस्ट आहे. एखादी जन्मदात्री आई जेव्हा स्वत:च्या मानसिक असमतोलातून पोटच्या मुलांशी सावत्रभावाने वागते तेव्हा तिच्यावरही टीकेचे जहरी आसूड ओढले जातात. मात्र त्या आसुडांपेक्षा हजारो पटींनी अधिक तीव्र आसूड तेच वर्तन करणाऱ्या सावत्र आईवर ओढले जातात. हे आपण आपल्या अवतीभवती नेहमीच पाहत असतो. मातृपूजक असलेल्या भारतीय समाजात ‘सावत्र आई’ ही शंभरातल्या नव्याण्णव वेळेला सर्व कथाबिथांमधून जमेल तेवढय़ा  काळ्याकुट्ट रंगातच रंगवलेली आपण पाहतो ती उगीच नाही. याच कुट्टकाळ्या रंगाचा जोरकस नाटकीय आविष्कार म्हणजे नारायण विनायक कुलकर्णी यांचं ‘माईसाहेब’! या काळ्या रंगाचं माहात्म्यच इतकं मोठं, की नाटक सलग चार वर्ष अत्यानंदाने प्रयोगामागून प्रयोग करत राहिलंच; तसंच या नाटकाची मोहिनी महाराष्ट्रातले नटश्रेष्ठ गणपतराव जोशी आणि बालगंधर्व यांनाही पडली म्हणजे बघा! मराठी नाटक अकराशे प्रतींच्या आवृत्तीत पुस्तकरूपात आलं तरी ती आवृत्ती संपवताना प्रकाशक शोकांतिकेच्या दिशेने वाटचाल करतो. असं असताना अवघ्या पंधरा वर्षांच्या काळात प्रत्येकी दोन हजार प्रतींच्या ‘माईसाहेब’ नाटकाच्या तीन आवृत्त्या संपल्या होत्या. हा खप नाटकाची लोकप्रियता दाखवतो, की कजाग सावत्र आई हा विसाव्या शतकातल्या महाराष्ट्रातला दिसणारा आणि सहज अनुभवालाही येणारा प्रकार होता असंही सुचवतो? काय असेल ते असो.

‘माईसाहेब’ हे तीन अंकी सामाजिक गद्य नाटक आहे. अंकानुसार प्रवेशांची संख्या सहा-सहा-चार अशी आहे. सोळा प्रवेशांतून उलगडत जाणारं हे  नाटक म्हणजे सुष्ट आणि दुष्ट प्रकृतीच्या पात्रांच्या गृहरणांगणात चाललेल्या शह-प्रतिशहांची, ठिणग्या-वणव्यांची प्रत्यक्ष भूमीच आहे. घरचा कर्ता पुरुष असणाऱ्या अण्णासाहेबांचा अपवाद वगळता नाटकातली बाकी सारी पात्रं प्रत्यक्ष डाव-प्रतिडाव टाकणारी आणि त्याचे परिणाम भोगणारी/ भोगायला लावणारीच आहेत. घरातला एकमेव मिळवता पुरुष म्हणजे अण्णासाहेब. त्यांचा नाटकात वारंवार उल्लेख होत असला तरी ते एक प्रतिक्रियावादी- एका अर्थाने जडत्व लाभलेलं ‘पॅसिव्ह’ पात्र आहे. जे समोर येतं तेच सत्य अशी खुळचट कल्पना उराशी जपणारं, मर्यादित वैचारिक आवाका असणारं आणि मुलांच्या सावत्र आईच्या कपटीपणाचा वा मानभावीपणाचा तिळमात्र संशय न घेणारं हे पात्र आहे. हे थंड पात्र सोडलं तर बाकीची पात्रं चांगलीच क्रियाशील आहेत. तुम्ही बारकाईने पाहिलंत आणि नाटककाराने उभारलेल्या संघर्षांत सहभागी होणाऱ्या पात्रांच्या स्वभावविशेषांचा विचार केलात तर हे नाटक म्हणजे रामायणातल्या दशरथ-कैकयी-राम संबंधांचं आणि महाभारतातल्या कौरव-पांडव संघर्षांचं मिनीएचर पेंटिंग आहे असं म्हणता येईल. नाटकातल्या सर्व युद्धसदृश्य घटनांची घडवती शक्ती असलेल्या कजाग, कपटी, स्वार्थाध माईसाहेब म्हणजे कैकयीचं १९१९ मधलं रूप होय! अण्णासाहेब म्हणजे अंशत: का असेना, पण राजा दशरथ आणि जन्मांध राजा धृतराष्ट्र यांचा अपूर्व संगम. नाटकातल्या कौरवपक्षात सावत्र मातेची भूमिका अत्यंत समर्पितभावाने, तनमनपूर्वक पार पाडणाऱ्या माईसाहेब, मंथरेच्या विषाक्त मनाशी होड घेणारी प्रेमाबाई आणि शकुनीमामाची कर्तृत्वशक्ती सर्वथैव अंमलात आणणारा केशवमामा (ज्याला केवळ स्वहित- आणि जमल्यास भाची असलेल्या माईसाहेबांचं हित उमजतं!) हे त्रिकुट आहे. अर्थातच उरलेला पक्ष पांडवांचा. यात समावेश आहे तो उत्तम आणि कमला या निष्पाप भावाबहिणीचा, (उत्तम हा तत्कालीन मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवतो की  प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त करतो, याबद्दल नाटककाराचा बहुधा गोंधळ आहे. तो पदवीची परीक्षा देत असेल तर कमला ही मॅट्रिकच्या वर्षांत असू शकेल. साहेबांना गळ घालून अण्णासाहेबांना उत्तमला आपल्याच मुंबईच्या ऑफिसात ‘चिकटवून’ घ्यायचं आहे!)  अण्णासाहेब देशपांडे यांच्या घरात दीर्घकाळ चाकरी करणाऱ्या निष्ठावंत शाळीग्रामचा, माईसाहेबांचं ‘फस्र्ट अँड फायनल टार्गेट’ असलेल्या उत्तमचा कायमचा हितैषी असलेला त्याचा वर्गमित्र भय्यासाहेबाचा आणि माईसाहेब-केशवमामा यांना पुरून उरणाऱ्या आणि त्यांना प्रत्येक वेळी सवाई खेळी करून हतप्रभ करणाऱ्या अमृतमामाचा! हा अमृतमामा म्हणजे साक्षात् श्रीकृष्णच! उत्तम व कमला यांच्या जीवनरथाचं सारथ्य हे त्याचं इथलं आद्यकार्य आहे.

नाटकाच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत ज्या ज्या घटना घडतात, त्या घटनांचं कर्तेधर्तेपण स्वत:चं तान्हं बाळ पदरात असणाऱ्या माईसाहेब यांच्याकडेच आहे. अण्णासाहेबांना अंधारात ठेवून, किंबहुना त्यांना सत्य कळूच नये याची पूर्ण काळजी घेऊन उत्तम व कमला यांचा छळ, प्रसंगी मारहाण करण्याच्या अनेक तऱ्हा माई केशवमामा आणि प्रेमाबाई यांच्या उदार मदतीने साकारत असतात. एखाद् दोन प्रसंगीच नाटकातल्या घटना घराबाहेर घडताना दिसतात. या प्रसंगांचा अपवाद केला तर संपूर्ण नाटक घराच्या चार भिंतींमध्येच घडतं. नाटकातल्या काही प्रसंगांची हाताळणी नाटककार ‘सस्पेन्स थ्रिलर’ आणि ‘ड्रामा ऑफ क्रुएल्टी’ या अंगानेच करताना दिसतो. या सूत्रानुसार नाटकात विषप्रयोग आहे, खोटे आळ घेणं आहे, उत्तम-कमला यांना गोत्यात आणू पाहणाऱ्या अनेक घटनांची वीण आहे. तसंच माई-केशवमामा-प्रेमाबाई यांनी सभ्यतेचा वा वात्सल्यभावाचा बुरखा पांघरून केलेली अनेक बदर्कमही आहेतच. संपूर्ण नाटकात या सर्व कटांना विफल करणाऱ्या अमृतमामांच्या ‘स्मार्ट मूव्हज्’ नाटककाराने अशा काही नजाकतीने पेरल्या आहेत की विचारता सोय नाही. शकुनीने रचलेल्या प्रत्येक कपटाला श्रीकृष्णाने जसं विफल केलं, अगदी तसंच नाटकात अमृतमामा करतात आणि त्यांच्या अर्जुनाचं- उत्तमाचं रक्षण करतात. शिवाय त्यांच्याच पुढाकाराने ते पदवीधर भय्यासाहेबासह कमलाचा विवाहही निश्चित करतात. नाटकाच्या अखेरच्या पर्वात सावत्रतेचा बेलगाम आविष्कार करणाऱ्या माईसाहेबांची सगळी पापकरणी उघडय़ावर येते आणि त्या उत्तम व कमलाचा सावत्र आई म्हणून नव्हे, तर ‘आई’ म्हणून स्वीकार करतात. ‘ज्याचा शेवट गोड, ते सारंच गोड’ या पॉप्युलर  समजुतीने नाटकाचा शेवट होतो.

‘माईसाहेब’ नाटक लिहिणारे नारायण विनायक कुलकर्णी हे सिद्धहस्त नाटककार होते याची साक्ष त्यांनी जी दहा-बारा नाटकं लिहिली ती देतातच; पण त्यांना नाटक कसं बेतावं हे किती समग्रपणे, किती तळामुळापासून कळलं होतं याचा ऑल टाइम ग्रेट नमुना म्हणजे ‘माईसाहेब’! थोडक्यात बोलायचं तर ते त्यांच्या काळातले वसंतराव कानेटकर होते. व्यावसायिक नाटककार नुसता उत्तम लेखक, उत्तम टेलर असून चालत नाही, त्याला समाजातल्या सर्व स्थितीगतींचं सूक्ष्म भान असावं लागतं, त्यावर त्याचं असं एक चिंतन असावं लागतं.. जे नारायण विनायक कुलकर्णी यांच्यापाशी होतं, जसं ते ‘शारदा’ साकारणाऱ्या गो. ब. देवल मास्तरांपाशी होतं! असं स्थितीगतींचं सूक्ष्म भान असल्यानेच त्यांनी १९०० ते १९५० या पन्नास वर्षांतला जाणत्या लोकांना अस्वस्थ करणारा ‘सावत्र’तेचा प्रश्न नाटय़विषय केला. नाटकाने समाजवास्तवाला भिडण्याची अपेक्षा करायची तर मुळात नाटककाराने टीपकागद असायला हवं, हेच शेष सत्य नाही का?

vijaytapas@gmail.com