मेघश्री दळवी

त्या सकाळी धरा आणि अभिराज घराबाहेर पडले तेव्हा समुद्रावर जायचं की आंब्यांच्या बागेत फिरायचं, हे ठरत नव्हतं. अखेर गावाच्या मागील मोकळ्या पठाराकडे दोघे वळले. वाळलेल्या गवताची सळसळ आणि लांबून येणारा समुद्रावरचा वारा यामुळे पठारावर प्रसन्न वाटत होतं. धरा चालता चालता थोडी बाजूला वळली. तिला पायाखाली काहीतरी खरखरीत लागलं. तिने वाकून पाहिलं तर तांबूस रंगाच्या जांभा कातळावर एक रेषा होती. सरळ आणि ठरवून काढलेली. तिच्या अंगावर सरसरून काटा आला.

‘‘अभि,’’ ती हळूच म्हणाली. ‘‘इकडे बघ, या दगडावर रेषा आहे ती कोणीतरी कोरलेली दिसतेय.’’
‘‘हो ताई!’’ त्यालाही आश्चर्य वाटलं. दोघांनी त्या कातळावरची माती झटकली. गवत बाजूला केलं तशी भेगांमध्ये अडकलेली पांढरट धूळ उडाली आणि खालच्या रेषा ठसठशीत झाल्या. हळूहळू त्यात एक आकृती दिसू लागली. मोठा प्राणी, मोठा कान, आणि सोंडेसारखी रचना.
‘‘अरे! हा हत्ती आहे का?’’ अभिराज म्हणाला.

‘‘हो रे! आणि इकडे बाजूला आणखी चित्रं आहेत. काही गोल, काही नुसत्या रेषा आणि काही तर चक्क माणसासारख्या दिसतात! हे आपण कुणाला तरी दाखवायला हवं.’’
संध्याकाळी दोघे आजीला घेऊन तिथे परत आले. आजी हातात काठी घेऊन सावकाश चालत होती.
‘‘इथे बघ,’’ धराने दगड दाखवला.

आजी थांबून बघत राहिली. मग म्हणाली, ‘‘अरे, हे तर कातळशिल्प आहे.’’
‘‘कातळशिल्प?’’ अभिराजने विचारलं.

‘‘हो. एरव्ही शिल्प म्हटलं की उभी किंवा दगडी भिंतीत कोरून काढलेली असतात. ही मात्र आडव्या कातळावर कोरलेली असतात.’’
‘‘वाव! अशी कुठे आणखी आहेत का?’’
‘‘बरीच आहेत,’’ आजी म्हणाली. ‘‘रत्नागिरीच्या बाजूला उक्षी, बारसू, देवाचे गोठणे, कासेली या गावांजवळ सापडली आहेत. काही ठिकाणी तर शेतात नांगरताना अचानक रेषा दिसल्या आणि कातळशिल्प निघालं.’’

अभिराजने डोळे विस्फारले. ‘‘म्हणजे ही फक्त इथेच नाहीत?’’
‘‘नाही रे,’’ आजी हसली. ‘‘कोकणभर विखुरलेली आहेत. आणि फक्त कोकणातच नाही. माणूस जिथे जिथे गेला, तिथे तिथे त्याने दगडावर कोरणं सुरू केलं म्हणतात.’’
‘‘खूप जुनी असतील ना ही शिल्पं?’’
‘‘हो.’’
‘‘पण हे किती जुनं आहे हे कसं ठरवतात? यावर तर काही तारीख लिहून ठेवलेली नसणार. मग?’’
‘‘किती प्रश्न विचारशील धरा? मलाही नीटसं माहीत नाही. पण एका लेखात वाचलं होतं की, अशा चित्रांचा काळ ठरवायला बर्‍याच गोष्टी मिळतात. इथे हत्ती आहे. कधी गेंडे मिळाले आहेत. तेव्हाचं हवामान वेगळं होतं. जंगलं जास्त होती आणि माणूस वस्ती कमी.’’
‘‘म्हणजे हजारो वर्षांपूर्वी असं म्हणते आहेस का?’’ अभिराज म्हणाला.

‘‘हो रे अभि.’’ आजी म्हणाली. ‘‘आता वरचं सगळं बाजूला करून पाहायला हवं. आपण हे सरपंचांना सांगूया. ते व्यवस्था करतील.’’
धरा एका चिन्हाकडे पाहत म्हणाली, ‘‘आणि हे गोल गोल काय असेल? गोगलगाय?’’
आजीने डोकं खाजवलं, ‘‘हे मला काही नक्की कळत नाही. काही जण म्हणतात ती पाण्याची ठिकाणं असणार, तर काही म्हणतात नक्षत्रं. अजून संशोधन चाललंय बरं. पाहिजे तर तुम्हीच शोधून काढा!’’
अभिराज हसत म्हणाला, ‘‘अगं आजी, म्हणजे या त्यांच्या नोट्स आहेत. आपण ॲपवर नोट करतो, तसे ते दगडावर नोट करायचे. हो ना?’’
‘‘तसंच समजा.’’
इतक्यात दोघांनी मोबाइल काढले. फोटो, व्हिडीओ घेतले.
आजीचं लक्ष होतं. ‘‘काढा फोटो तुम्ही. पण लगेच कुठेही टाकू नका.’’
‘का?’’ धराने विचारलं.

‘‘आधी नीट समजून घ्या,’’ आजी म्हणाली. ‘‘हे काय आहे, का महत्त्वाचं आहे. कसं जपायला हवं. नाहीतर काय होतं, लोक कुतूहलाने बघायला येतील आणि पायाखाली तुडवून खराब करून टाकतील. आधी सरपंचांना सांगून पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांना बोलवायचं. ते लोक सगळं साफ करून पूर्ण चित्र खुलं करतील. मग नीट कुंपण घालून दुरून बघण्याची व्यवस्था करतील. आलं का लक्षात?’’
धराने आपला मोबाइल खिशात ठेवला. ‘‘आलं लक्षात. म्हणजे आधी निरीक्षण, अभ्यास, संरक्षण, आणि मगच सोशल मीडिया पोस्ट.’’
‘‘बरोबर!’’ आजी म्हणाली.

धरा विचारत पडली, ‘‘पण आजी, एवढी मोठी चित्रं त्यांनी काढली कशी असतील? त्यावेळी छिन्नी, हातोडा अशी हत्यारं असतील का?’’
‘‘बहुधा त्यांनी एखाद्या कठीण दगडाने जांभा दगडावर हळूहळू कोरलं असेल. किंवा काही युक्त्या असतील त्यांच्या. आणि ही फक्त आपल्याकडेच नाहीत बरं, सातासमुद्रापार आफ्रिकेत किंवा ऑस्ट्रेलियातही माणसाने अशाच खुणा मागे ठेवल्यात!’’

धराचं लक्ष आता माणसासारख्या दिसणार्‍या एका आकृतीकडे गेलं. उभी रेषा. हात. पाय. गोल डोकं.
‘‘ही खूप पूर्वीची माणसं आपल्यासारखीच दिसतात. पण कोणाचाच चेहरा नाही दाखवलेला.’’
आजी खांदे उडवत म्हणाली, ‘‘बाळा, ही चित्रं काही एका दिवसात नाही झाली. अनेक दिवस, अनेक हातांनी घडली आहेत ही. आणि त्याकाळी शिकार असो वा उत्सव, तो समूहाचा असायचा. म्हणून या आकृत्यांना चेहरा नाही, कारण कोणा एकाची नोंद त्यांना करायची नव्हती बरं!’’
आजीचं ते बोलणं ऐकून धरा आणि अभिराज क्षणभर थबकले.

‘‘हे आजच्यापेक्षा किती वेगळं! आज इन्स्टा उघडला तर मी-मी दिसतं जागोजागी!’’ बोलत धराने स्वत:चा मोबाईल खिशात आणखी खोलवर सरकवला.
तिघेजण सावकाश परतीच्या वाटेवर निघाले, तांबूस कातळावर कोरलेल्या त्या आकृत्या आता वेगळ्या दिसत होत्या, खूप ओळखीच्या वाटत होत्या.
meghashri@gmail.com