अरुंधती देवस्थळे: गोटीपुआ आणि माहरी या परंपरागत लोकनृत्यातलं अभ्यासपूर्वक निवडून केलुचरण महापात्रांनी फारशा प्रचलनात न राहिलेल्या ओडिसी अभिजात नृत्यशैलीचं पुनरुज्जीवन केलं. तिला दीर्घ साधनेनंतर रसिकांसमोर सादर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं. हे त्यांचं ओडिसीला दिलेलं कायमस्वरूपी योगदान नृत्यकलेच्या इतिहासात मानाच्या पानावर नमूद…
आपल्या महत्तेबद्दल खराखुरा बेखबर असणारा, अमाप ऊर्जेबरोबर सहज प्रसन्न मनाचं वरदान लाभलेला कलाकार म्हणजे ओडिसीचे गुरू केलुचरण महापात्र (१९२६-२००४). एका उंचीवर पोहोचलेल्या बहुतेक कलाकारांची मने चाहत्यांसाठी उदार, प्रेमळ झालेली असतात असं वाटतं, पण केलुबाबूंइतका लोभस आणि साध्या मनाचा ज्येष्ठ कलाकार अजून पाहण्यात आलेला नाही.
स्वत्व विसरून केलेल्या त्यांच्या अतुलनीय नृत्यात एक निखळपणा आपोआपच येई. प्रत्यक्षात तो दिसेच, पण रेकॉर्डेड प्रस्तुतींमध्येही जाणवत असे. नृत्यमंचामागे भेटताना जाणवायचं की, त्यांची महत्ता ते स्टेज सोडलं की क्षणार्धात उतरवून ठेवत आणि प्रेमळ ज्येष्ठ स्वत्वात परतत. कलेची स्वत्व विसरायला लावणारी साधना आणि साधंसरळ माणूसपण इतक्या सहजतेनं त्यांच्यात नांदत असे की अवाक् व्हायला होई.
ओरिसातून पद्मविभूषणाने सन्मानित झालेले ते पहिलेच. त्यानंतर कधीतरी आयोजित कार्यक्रमांत प्रणाम केल्यावर त्यांनी डोक्यावर हात ठेवला होता. मला विचारल्याशिवाय राहवेना, ‘‘स्वत:साठी नसेल, पण ओडिसीसाठी खूप आनंद झाला ना?’’ त्यांनी शांतपणे हसत म्हटलं होतं, ‘‘हो झाला ना, शिष्यमंडळींना जास्त झाला… सम्मान अपनी जगह ठीक है, कला की यात्रा तो चलतीही रहती है।’’ इतक्या सहजपणे जगणारं मोठेपण, हे नृत्याइतकंच आनंद देणारं. एकदा कुठल्याशा फॉर्मवर रकाना भरताना, ते धर्माच्या पुढे ‘नृत्य’ असं लिहून गेले होते म्हणे.
ते दिवस आपलं व्यावसायिक ‘व्हिजन आणि मिशन’ जगासमोर घोषित करण्याचं नव्हतं. पण त्यांचं जागोजागी उद्धृत केलं जाणारं विधान : ‘‘खरं नृत्य तेच- ज्यातून अखंड जीवनाची भावना प्रवाहित होत राहते. पाहणार्याला वाटलं पाहिजे की, जे समोर पाहतोय त्याचा मीही एक भाग आहे.’’ केलुबाबूंच्या नृत्यात जाणवणारी रसिकांबद्दलची आत्मीयता, नवरसांच्या सिद्धीइतकीच महत्त्वाची.
त्यांचं नृत्य लोकांपर्यंत पोहोचायला ओडिसीचे कोणी जाणकार असणं आवश्यक नव्हतं; संवेदनशील मन आणि पुराणकथांशी ओळख पुरेशी होती. जयदेवांच्या ‘गीतगोविंदा’तल्या वेगवेगळ्या प्रसंगांच्या भक्ती आणि प्रेमरसात नाहून निघालेल्या प्रस्तुती (‘सखी चारुशीले’, ‘ललिता लवंग लता’) बघताना हा अनुभव माझ्याही वाट्याला आला होता.
कधी राधा तर कधी श्याम बनून प्रेमिकांमधल्या एकेक भावोत्कट क्षणांना खुलवत मूर्त रूप देण्याचं विलक्षण कौशल्य त्यांच्यात होतं, जे समजण्यासाठी सांस्कृतिक फरकाचा अडसर अजिबात नसे. म्हणून त्यांनी हाती घेतलेलं काहीही जागतिक मंचावर जाणार हे ठरल्यासारखंच. केलुबाबू त्यांच्या ‘याज्ञसेनी’ (द्रौपदी ) वर नृत्यनाट्य बसवत आहेत हे सांगताना आनंदाने डवरून आलेला ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय यांचा चेहरा अजून आठवतोय.
लेखिका यशोधरा आणि केंद्र सरकारी अधिकारी सत्यानंद मिश्रा, कवी जे. पी. दास, जेएनयूमध्ये शिकवणारे अनुवादक राजेंद्र मिश्र, कवयित्री प्रवासिनी महाकूड, दूरदर्शनमधले निर्माते प्रफुल्ल मोहन्ती यांसारखी (टिपीकल ओरिया उच्चारांत नेहमी हर्षला ‘हॉर्स’ आणि महेशला ‘म्होएस’ म्हणणारी) मित्रमंडळी नेहमीच्या उठण्याबसण्यातली. शक्य ते कार्यक्रम तर पाहतच असू.
त्यांच्या नृत्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पुराणकथेतला प्रसंग कुठलाही असो, ते दरवेळेला प्रस्तुतीत काहीतरी उस्फूर्ततेने नवीन, काहीतरी बदल करून मांडत असत. त्यामुळे नृत्य दरवेळी नवं वाटे. हे काहीसं नर्तकाच्या वैयक्तिक समज आणि कौशल्यानुसार केलेल्या इम्प्रोव्हाइजेशननं खुलत जाणार्या कथकलीसारखं.
एकदा अतिशय रंगलेल्या ‘अष्टपदी’ नंतर इतके भारावलो होतो की एकमेकांशी एकही शब्द न बोलता आपापल्या घरी निघून गेलो होतो. देशातील सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या, शीघ्रकोपी असून अजातशत्रू राहिलेल्या केलुबाबूंबद्दल काही ना काही कळत राहायचं. केलुबाबू मूळचे पुरीजवळच्या भार्गवी नदीकाठी वसलेल्या हिरव्यागार रघुराजपूर खेड्यातले! प्राचीन कालापासून ओरिसाच्या पट्टचित्र कलेसाठी जाणलं जाणारं रघुराजपूर, आता आंतरराष्ट्रीय ‘हेरिटेज व्हिलेज’ झालं आहे.
केलुबाबूंनी नृत्याची सुरुवात ओरिसाच्या मंदिरात पुरीच्या आराध्य दैवत श्री जगन्नाथाच्या आराधनेसाठी केल्या जाणार्या गोटीपुआ लोकनृत्यापासून केली होती ती केवळ आवड म्हणून. गोटीपुआचे पुरुष नर्तक स्त्रीवेष धारण करून हे नृत्य करत. पारंपरिक पट्ट-चित्रकार वडिलांना ते स्वत: उत्कृष्ट मृदुंग वादक असूनही, लेकाचं गोटीपूआच्या नाचगाण्याला लागणं प्रतिष्ठेला मुळीच न शोभणारं वाटत होतं म्हणून त्यांनी त्याला घराबाहेर काढलं.
ती दहा वर्षं केलुबाबूंनी रोजी- रोटीसाठी मिळेल ती कामं करत, सांगोपांग नृत्यसाधनेत घालवली. केलुबाबूंनी कामकाजाची सुरुवात पारंपरिक पट्टचित्रांचे चित्रकार म्हणूनच केली होती, असं कलाइतिहासतज्ज्ञ डॉ. जे. पी. दास यांनी बोलता-बोलता सांगितलं होतं. या गावाच्या मातीतच कला असावी, पण ती तेव्हा आर्थिक संपन्नतेकडे नेणारी नसावी.
त्या काळातल्या सच्च्या पट्टचित्रं कलाकारांनी नाजूकपणाने केलेलं आडव्या कापडाच्या पट्ट्यांवर डिटेलिंग म्हणजे कौशल्य आणि मेहनतीची परीक्षा पाहणारं, ते आता दुनियेतल्या कलासंग्रहालयांचंच धन बनलं आहे. पण तो एक वेगळा विषय. केलुबाबूंच्या नृत्याविष्काराचं केंद्र कृष्णभक्ती होती. ओरिसाचे भक्ती-कवी उपेंद्र भांज, बनमाली आणि जयदेव यांच्या वेगवेगळ्या कृष्णस्तुतींच्या रचनांवर आधारित, ‘बाल्य लीला’(केलुबाबूंची खट्याळ माखनचोरी आणि गोपींचा कृतक कोप), ‘राधाप्रेमामृत’ म्हणजे त्यांच्या मुद्राभिनयाचा मुकुटमणि : मुग्ध अभिसारिका राधेच्या वेगवेगळ्या भावछटा आणि शेवटी आध्यात्मिक उंचीवर पोहोचत मनमोहन कृष्णाचं तिच्यावरचं प्रेम दर्शकांना वृंदावनाच्या तुलसीकुंजात नेऊन सोडणारं…
आणि ‘बिदग्ध माधव’मध्ये राधा, कृष्ण आणि गोपींनी रचलेल्या रासक्रीडेतून पूर्ण पुरुष माधवाची विविध रूपं साकार होत. आराध्य कृष्णाची या अवतारातली सगळी रूपं केलुबाबू पूर्ण दैहिक अभिनयातून अपार भक्ती आणि कौशल्याने सादर करत. केलुबाबूंच्या नृत्यामागची प्रेरणा प्रेमाचा परमोच्चबिंदू झालेली भक्ती असली तरी त्याचं सौंदर्य अनुभवण्यासाठी, पाहणार्याचं सश्रद्ध होणं आवश्यक नव्हतं. नृत्याभिनय कौशल्यातून होणारी रसनिष्पत्ती सर्वांपर्यंत पोहोचणारी.
कधीकधी वाटतं, राधा-कृष्णाचं प्रेम हेही उत्तरेइतकंच ओरिसाच्या जनमानसावर आधिराज्य करणारं असावं. कवी रमाकांत रथ यांचं सरस्वती सन्मान प्राप्त दीर्घकाव्य ‘श्रीराधा’, हा असाच उत्कट, तरल मुक्तछंदातला आविष्कार. केलुबाबूंचा आणखी एक छंद म्हणजे जमिनी खरेदी करून स्वत:च्या आणि साधकांच्या खुल्या उपयोगासाठी इमारती बांधणं. दोन्ही घरं, एक देऊळ आणि सृजन नावाची नृत्य संस्था त्यांनी अशीच एकाच्या दोन, दोनाच्या चार खोल्या करत वाढवत नेलेली. ती आता १०-१२ खोल्यांची झाली आहे, विशेष म्हणजे स्वत:च्या देखरेखीखाली बांधून घेतलेली.
कोणी इंजिनीअर वा आर्किटेक्ट वापरायचा संबंधच नाही. ही भुबनेश्वर आणि कटकची घरं म्हणजे गुरुकुलतर होतीच, पण कलाकारांना येण्या-जाण्याला, राहण्याला मुक्तद्वार होतं, आधी स्वत:ही ओडिसीच्या साधक आणि रेडिओ आर्टिस्ट असलेल्या त्यांच्या पत्नी, शिष्य परिवारासाठी घट्ट- मुट्ट गुरू माँ बनून तो व्याप कशा सांभाळत होत्या ते त्याच जाणोत. संसाराच्या सुरुवातीला दोघांनी कोलकात्याला उदय शंकर यांच्या कंपनीत जाऊन बॅलेचं प्रशिक्षण घेतलं होतं.
कोणार्कच्या सूर्यमंदिरातील शिल्पांवर आधारित एक अभिजात नृत्यप्रस्तुतीही तयार केली होती, हे त्या काळच्या लोकांच्या आठवणीत आहे. तरुणपणाची अनेक वर्षं नृत्ये आणि नृत्य नाटिका जोडीने केल्या. ‘दशावतार’ हे दोघांचं गाजलेलं नृत्यनाट्य. केलुबाबू देशातच नव्हे तर जगभरात सर्वांत अधिक प्रवास केलेले भारतीय नृत्यकार असावेत. त्यांच्या नृत्याने मोहीत होऊन त्यांचं शिष्यत्व करायला युरोप, अमेरिकेतूनच नव्हे तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मधूनही इच्छूक येत, वर्षानुवर्षं भारतात राहत आणि आपापल्या देशांत परतून शिकलेली विद्या इतरांना देत.
बिरजू महाराजांशी गहिर्या दोस्तीचं एक कारण हेही होतं की त्यांच्याप्रमाणेच केलुबाबूंचं संगीत आणि रागदारीचं ज्ञान पक्कं होतं, नृत्यशैलीत लागणारं प्रत्येक वाद्य मर्दाला (पखावज), पेटी, तबला, बासरी, मंजिरा सतार आणि तानपुरा त्यांना वाजवता येई. या चौफेर ज्ञानाचा फायदा म्हणजे शिष्यांना भक्कम पाया मिळे. पखावज आणि मृदंग वादनाचा सराव, त्यांच्या रोजच्या नृत्याच्या रियाजाचा भाग होता. ज्येष्ठ शिष्यांना शिकवताना ते स्वत: साथीला बसत.
या अष्टपैलुत्वाबद्दल विचारल्यावर त्यांनी पुराणकथेतल्या कलेच्या विद्वान मार्कंडेय ऋषींची कहाणी सांगितली होती : ‘‘एक राजा त्यांच्याकडे शिल्पकला शिकण्याच्या मिषाने गेला होता. त्याला मुनी म्हणाले, ‘‘त्यासाठी तुला आधी चित्रकला शिकावी लागेल, कारण शिल्पाचं मूळ चित्रात असतं.’’ राजा त्याला तयार झाला तेव्हा ते म्हणाले, ‘‘चित्रातली रेखा समजण्यासाठी तुला नृत्यकला आत्मसात करावी लागेल.’’ राजा त्यालाही तयार झाल्याचं पाहून ते म्हणाले, ‘‘नृत्याचं मूळ संगीतात आहे, संगीताशिवाय नृत्य अशक्य असतं.’’
राजा चिकाटीने हो म्हणाला तेव्हा ते म्हणाले, ‘‘संगीताचा आत्मा काव्य / गीत असतं म्हणून अभ्यास गीतशास्त्राचाही आवश्यक ठरतो.’’ ‘‘म्हणजे एवढं सगळं शिकल्यावरच कलेची साधना परिपूर्ण होऊ शकते आणि त्याच्यासाठी एक आयुष्यकाळाचा अवधी कमीच की नाही?’’ नृत्यबोलीत साभिनय ऐकलेल्या कहाणीची तर्कसंगती निर्विवाद्य, कलांची परस्परावलंबित्व साजरी करणारी आख्खी इकोसिस्टीम ! इतरांचं माहीत नाही, पण मी ती कधी विसरू शकलेली नाही.
गोटीपुआ आणि माहरी या परंपरागत लोकनृत्यातलं अभ्यासपूर्वक निवडून केलुचरण महापात्रांनी फारशा प्रचलनात न राहिलेल्या ओडिसी अभिजात नृत्यशैलीचं पुनरुज्जीवन केलं आणि तिला दीर्घ साधनेनंतर जगभर रसिकांसमोर सादर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं. हे त्यांचं ओडिसीला दिलेलं कायमस्वरूपी योगदान नृत्यकलेच्या इतिहासात मानाच्या पानावर नमूद !
‘‘आज माझे शेकडो शिष्य नृत्य करत -शिकवत आहेत, त्यांच्यातून मीही नाचतोय असं मला वाटत असतं,’’ म्हणणार्या केलुबाबूंना संयुक्ता पाणिग्रही, कुमकुम मोहंती, माधवी मुदगल, प्रोतिमा गौरी बेदी, झेलम परांजपे अशा प्रतिभाशाली शिष्या लाभल्या होत्या. कलावैभवात वृद्धी म्हणून की काय, मलेशियातील त्यांच्या शिष्यांनी बांधलेल्या टेम्पल ऑफ फाईन आर्टस्मध्ये त्यांच्या नावे वेगवेगळ्या नृत्यशैलींतून कलासाधना होते. हाही जीवनगौरवच!
