नांदणीच्या मठातली महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीण केंद्रस्थानी असलेली ‘खेळखंडोबा’ ही लघुकादंबरी धर्म, त्याचे ठेकेदार, अहिंसा, दया अशा विविध अंगांना स्पर्श करते. माधुरी हत्तिणीला गुजरातमधल्या वनतारामध्ये नेल्याच्या निमित्ताने लेखिकेच्या मनातील चिंतन म्हणजे ही लघुकादंबरी होय. या घटनेमुळे केवळ कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याचा मागोवा घेत काही काल्पनिक प्रसंगांची जोड देत ही कादंबरी लेखिकेने लिहिली आहे. परंतु ही कादंबरी या हत्तिणीपुरतीच मर्यादित राहत नाही तर ती समाजमनाचाही शोध घेते. त्या शोधाचे निमित्त मात्र माधुरी हत्तीण.

एका सत्य घटनेला काल्पनिक प्रसंगांची जोड देत लेखिका समाजकारण, राजकारण या घटकांनाही स्पर्श करते. माणसाप्रमाणेच प्राण्यांना, या चराचर सृष्टीला तिचं अस्तित्व राखण्याचा हक्क आहे. तोच जर आपण हिरावून घेतला तर भयानक परिस्थिती ओढवेल याची जाणीव होते. विविध प्रसंगांची पेरणी, त्यातील सहजता, प्रवाही भाषाशैली ही कादंबरीची बलस्थाने. माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्यांचे विविध पैलू या कादंबरीत आहेत.

खेळखंडोबा, नीलम माणगावे, अक्षरदीप प्रकाशन,
पाने- १०८, किंमत- २०० रुपये.