मित्रा,

खेड्यापाड्यांतली अनेक मुलं शाळा सांभाळून घरासाठी (चूल, स्टोव्ह, गॅस कशावरही) संपूर्ण स्वयंपाक बनवतात. अभ्यास, खेळ, इतकाच किचनमध्येही वेळ देतात. तू दिवसातून किती वेळा किचनमध्ये जातोस/ जातेस? ५, १०, १५? फ्रीज/ मडक्यातले पाणी प्यायला, आईला जेवणात मदत करायला, जेवणाची ताटे आणायला, न्यायला, जेवण गरम करायला, एखादा नवा पदार्थ बनवून पाहायला, भांडी घासायला… असं कशाकशासाठी जात असशील? आई-बाबा घरात नसताना माझ्यासाठी तरी ती एक छोटी प्रयोगशाळाच होती.

पण आज आपल्याला तुझ्या किचनमध्ये फक्त ‘पाहायला, बघायला’ जायचे आहे.

का? तर संपूर्ण घरात किचनसारखी बघणीय जागा दुसरी नाही. विविध प्रकारचे चमचे, वाट्या, ताटे, झारा, उलतने, चिमटा, वाट्या, पाहुण्यांसाठी असलेले टी सेट… ट्रॉली, डबे, टोप, भगुली, कुकर, ओव्हन, शेगडी आणि गुप्त खजिना असणारा फ्रिज… यांचे आकार, त्याची मजा किती वर्णावी. जेव्हा मला कागदावर काय काढू ते सुचत नसते तेव्हा मी किचनच्या म्युझियममध्ये एक फेरफटका मारतो.

आज माझ्यासोबत तूही चल. आपण किचनचा अनुभव कागदावर आणू. आज रविवार सकाळी किचन जरा उशिराच जागे होते. तू मात्र लवकर ऊठ. कुणाचेही लक्ष नसताना आईच्या कपाटातल्या भांड्यांची एक गुप्त सफर कर. आईबाबांची परवानगी घेत बसू नकोस. ते किचन जितके त्यांचे आहे तितकेच तुझेही आहे. तर मी काही वस्तू थोड्या वेळासाठी ढापणार आहे. हा बघ, माझा सर्वांत आवडता चाकू, दोनशे डोळे असणारा झारा, चोचीसारखा पकड (चिमटा), मिक्सरमधील डेंजर पाते (ब्लेड) सोबत घेतले आहे.

हे घेऊन मी एका कागदावर ठेवतो. एकापुढे एक, एकामागे एक, एक या बाजूला तर एक त्या बाजूला. वर किंवा खाली. मनासारखी रचना झाली की पेन्सिल वापरून त्यांना ट्रेसिंग करतो. एकेक भांड्यांची बाह्यरेषा (आऊटलाइन) काढताना दिसतेय की आकारांच्या आतही काही आहे. जसे की, झार्‍याची शंभर भोके. ती काढली नाही तर झारा झारा राहणार नाही. आऊटलाइन झाली की आता कागदावर फक्त आकार उरत आहेत. ही भांडी किचनमध्येही एकत्र असतात, पण ती वेगवेगळी दिसतात. कागदावर मात्र एकमेकांत मिसळल्याने त्यांची भेसळ झाली आहे. ओळखीची अनोळखी.

आता गडद ब्रश आणि रंगाने ही आऊट लाइन गडद करतो. आकाराच्या आत आणि बाहेर संपूर्ण आवडीचे रंग देतो. आकाराप्रमाणे एकमेकांत मिसळलेले. व्वा, मनातले किचन मस्त उतरले आहे. माझ्या किचनच्या अनुभवाचे चित्र आहे ते फक्त मलाच कळणार. लोकांसाठी मात्र हे अमूर्त चित्र. त्यांना चित्र पाहून काय उलटसुलट तर्क लावायचे ते लावू देत. आपण मोठ्या चित्रकारांसारखे दुर्लक्ष करून निवांत दुसर्‍या कागदाकडे वळायचे.

अरे, माझे नेहमीचे कप्प्याकप्प्यांचे जेवणाचे ताट घ्यायचेच राहिले. ते मी आणायला जातो. तोवर तू तुझ्या आवडीच्या वस्तू अशा छापून (ट्रेसिंग) काढ. रंगव आणि मला ईमेल कर.

शिक्षक आणि पालकांसाठी सूचना…

१. चित्र काढण्यासाठी प्रत्येक वेळी विषयाचा पट्टा गळ्यात बांधण्याचा हट्ट कशाला? जोडाक्षरे, जोडशब्द असतात तसे जोडचित्रही घडतील. वेगवेगळे आकार आणखी वेगळ्या आकारांना जन्म देतात. नवीन आकार नवे अर्थ आणि मग पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतात.

२. वर्गात उपक्रम घेण्यासाठी तुम्ही काही काळ प्रयोगशाळा किंवा खेळाचे कपाट उघडे करून देऊ शकता. अशाही त्या सर्व वस्तू त्यांच्यासाठीच असतात.

तुझा चित्र मित्र

श्रीबा

shriba29@gmail.com