पंकज भोसले

मुंबई हे अगदी दीड-दोन दशकांपूर्वीपर्यंत राज्यभरात पतंगांचे सर्वात मोठे व्यापारकेंद्र होते. ती बनविणाऱ्या देशभरातील अव्वल कारागिरांना पोसणारे. मकरसंक्रांत हा एकटाच काही पतंगसणाचा दिवस नव्हता. गिरगाव-गिरणगाव ते टोकाच्या उपनगरांपर्यंत पावसाच्या मध्यापासून पतंगींना सुरुवात व्हायची ती दिवाळीनंतरच थांबायची. पुन्हा एप्रिल-मेच्या सुट्टय़ांमध्ये काही पतंग मोहल्ले गाजत ते वेगळे. करोनोत्तर काळात निष्णात कारागीरच न उरल्यामुळे यंदा पहिल्यांदाच मुंबईत बहुतांश पतंगी राज्याच्या इतर भागांतून किंवा परराज्यांतून आणण्यात आल्यात. आज एक दिवसापुरते आकाश पतंगांनी रंगलेले पाहायला मिळेल. त्यापोटी मैदानी खेळाने तयार केलेली मुंबई-उपनगरांतील पतंग-भाषासंस्कृती विलुप्त कशी होत चालली आहे त्याचा वेध आणि राज्यातील काही शहरगावांमध्ये ती अजूनही टिकून कशी राहिली आहे, याचा शोध..

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

नव्वदीपूर्वी मुंबई कशी दिसत होती, हे सांगताना चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक आणि बऱ्याच अंशी साहित्यिकांना इथल्या लक्षवेधी खुणेसारखा संदर्भ द्यावा लागतो तो पतंग या खेळाचा. कोटय़वधीची उलाढाल करणारा पतंगींचा उद्योग इथून हळुवार पावलांनी गुजरातमध्ये कधी आणि कसा गेला, याची जाणीव व्हायला ना पतंग उडविणारी नवी पिढी उरली, ना खंत करायला त्यातले विज्ञान जाणून घेणारे कसबी पतंगबाज. दोन हजारोत्तर काळात दक्षिण मुंबईतून उपनगरांत फेकला गेलेला बराचसा मराठी टक्का गुजरातमधील पतंग महोत्सवांकडे कौतुकाने पाहण्यापुरता आणि स्थानिक राजकारण्यांच्या हौसे-मौजेने भरवल्या जाणाऱ्या किडूक-मिडूक उत्सवांमध्ये मिरवण्यापुरता उरला.

गिरगाव-गिरणगाव पट्टय़ात राहणारा मध्यमवर्गी मराठी समुदाय या आकाशी खेळाशी शतकभरापासून एकरूप होता. मिलमजुरांच्या वस्त्यांपासून ते चाळींच्या गच्च्यांमधून पतंगांची एक भाषा तयार झाली आणि ती दरदशकांत पिढीकडे संक्रमित होत गेली. पतंग उडविणाऱ्यांची संख्या विविध कारणांनी जशी कमी होत गेली, तसा त्या भाषेचा वापर रोडावला. मृतवत बोलीभाषांसारखीच तिची स्थिती झाली.

‘ती पतंग’ की ‘तो पतंग’ याबाबतचा वाद अजूनही शाबूत आहे. (या लेखात दोन्ही प्रकारे उल्लेख होईल.) लहानपणापासून पतंग उडविणाऱ्यांना कधीच तो ‘पुल्लिंगी’ शब्द वाटत नाही. तर कन्नीचे (कण्णी) मापदेखील माहिती करून न घेता त्यावर काव्याग्रहाचा ठसा उमटविणाऱ्या पद्यप्रभूंनी, नभप्रेमाची गाथा मांडणाऱ्या कथाकारांनी त्याचे ‘स्त्रीलिंग’ अमान्य केले. ‘कन्नी कापणे’, ‘वावडय़ा उडविणे’, ‘एखाद्याला लपेटणे’ या शब्दमाळाच नाही, तर मैलो-मैलोगणिक या खेळाची बोली-संपदा बहरली. सामाजिक -सांस्कृतिक भवतालातूनही तिचे उपयोजन होत गेले.

पतंगाची गणितीय रचनेत कन्नी बांधण्याचे आणि त्या सुरळीतपणे आकाशात उडवण्याचे समीकरण ज्याला कळते, तो उत्तम पतंगबाज बनू शकतो. पण त्याही पुढली अवस्था गाठायची तर दुसऱ्याची पतंग ‘घसटून’ वा ‘ढिल देऊन’ कापण्याचे कौशल्य हस्तगत करणे आवश्यक ठरते. याशिवाय प्रतिस्पध्र्याला ‘घसटून’ न देता, त्याचा घशिटण्याचा वेग चुकवण्याची कळही उमजणे गरजेचे असते. पतंगाच्या ताणलेल्या काडीला एका बाजूला दोऱ्याचा गुंता जुळवून ‘झोक’ (झुकणी) बांधत तिचे स्थिर राहण्याचे सामथ्र्य वाढविण्याची ‘डॉक्टरकी’ समजून घेणे महत्त्वाचे असते. या सगळय़ा बाबी पतंग उडवता-उडवता निरीक्षणातून सहज आत्मसात व्हायच्या- जे आता जवळपास अशक्य आहे.

साधारण आकारापेक्षा मोठय़ा पतंगीला दक्षिण मुंबईत ढॅप म्हटले जाते. ठाणे-डोंबिवली ते बोरिवलीपर्यंत उपनगरांत त्याचे ‘ढप’, ‘ढप्पा’, ‘ढोम’, ‘कौआ’,‘म्हातारी’ असे वाटेल तसे नामकरण झाले. नाशिक-येवल्याकडे या पतंगांना ‘ढोल्या’ म्हटले जाते तर औरंगाबादमध्ये ढांचा. पतंगींची रंगांनुसार ‘बाण’, ‘रॉकेट’(डोंबिवलीत भांग, ठाण्यात आरसा), ‘डोळा’, ‘हॅण्डिक्लास’, ‘चॉकोबार’, ‘चाँदतारा’, ‘डोळा’, ‘दुरंगा’ (अर्धा फोकस), ‘तिरंगा’, ‘चौरंगा’ ही मुंबई-उपनगरांतील ठरलेली नावे. पण भारद्वाज पक्ष्याच्या द्विरंगी रचनेप्रमाणे पांढऱ्या रंगांचे दोन उलटे त्रिकोण असलेल्या पतंगींना ‘कावळा’ हे नाव का आणि कसे देण्यात आले असेल, हे कोडे आहे. काळा असेल तर ठीक पण लाल-निळा-हिरवा किंवा कोणताही रंग या उलटय़ा त्रिकोणाच्या रचनेत दिसला, तरी त्याला पतंगबाजांच्या दुनियेत ‘कावळा’च म्हटले जाते. डोंबिवलीत चौकटी असणाऱ्या रंगांच्या पतंगींना ‘ब्रिटिश’ हे नामकरण ब्रिटनच्या झेंडय़ाशी साधम्र्य असल्यामुळे झाले. पण पतंग उडविणाऱ्यांनी तो झेंडा पाहिला असला-नसला तरी या पतंगनामाचा प्रचार मात्र व्यवस्थित केला.
नाशिक येवल्याकडे संपूर्ण एकाच रंगाची पतंग ‘बक्कस’ म्हणून ओळखली जाते. पतंगीच्या वरील भागात टिळा असणारी पतंग मुंबई-ठाण्यात डोळा म्हणून ओळखली जाते, तर येवल्यात टिळेदार. नगरजवळ याच रंगांच्या पतंगीला ‘बालाजी’ पतंग संबोधले जाते. शुभ्र-पांढऱ्या पतंगीची येवला परिसरातील ओळख ‘धोबी’. याशिवाय अंडेदार (पतंगीच्या खालच्या बाजूचा भाग अंडाकृती), कल्लेदार (खालील बाजूला कल्ले असणारी), कवटण (कवटीचे चित्र असणारी), गोंडण (खालील भाग झुपकेदार, गोंडय़ासारखा) या नावांनी दुकानदारांकडे अजूनही पतंग मागितली जाते. हैदराबादी, औरंगाबाद, कानपुरी बरेली पतंग, येवलावाला पतंग, चमकीदार, मुंबईदार, शेपटीदार, मच्छीदार, डोळेदार, गोल्डन, गोंड बाहुली, कवटी, पट्टय़ाचा अशीदेखील पतंगींची विभागणी केली जाते.

‘मांजा’ हा शब्द मुंबईत फक्त बदामी-गुलाबी रंगांसाठी वापरला जातो. मुंबईपासून उपनगरांपर्यंत लढविण्यासाठी खास वापरला जाणारा-काच लावलेला मांजा हा ‘छडी’ म्हणून अधिक प्रचलित. मुंबईत ‘रबरी छडी’ हा आणखी एक वेगळा, हात कापण्याची शक्यता नसलेला प्रकारही वापरला जात असे. आता तो अजिबातच दिसत नाही. उडवून उडवून किंवा जमिनीवर लोळून, इतर पतंगांच्या मांजांना घासून ‘घसरा’ पडत ‘छडी’ची धार कमी होते. राज्याच्या अनेक भागांत या प्रकाराला मांजाला ‘रग्गे पडणे’ असेही संबोधतात.

‘टिचक्या’ अधिक मारणे मुरब्बी पतंगबाजाचे लक्षण नाही. पतंग ‘भरदौर कापणे’ म्हणजे प्रतिस्पध्र्याचा खूप मांजा वाया घालवून त्याची काटणे (गुल करणे). या ‘भरदौर’ला पर्यायी शब्द ‘फुलसादा’. कदाचित यातला एक मराठीबहुल भागातून आलेला तर दुसरा हिंदीबहुल भागात बारसे झालेला. ‘घशिटण्या’ला विहिरीच्या हापशासारखे ‘हापसणे’ हा शब्दही वापरला जातो. घशिटण्यासाठी खास ‘छडी’ डोंगरी किंवा तारमांजाची असे. पण हात किंचितही न थांबता घशिटण्याचा वेग जपणाऱ्यालाच त्यात मास्तरी हस्तगत होई. बोटांवरचे ‘घसरे’ या ‘मेडल्स’ मिळाल्याच्या खुणा ठरत.

डोळय़ांचा व्यायाम, झोक खाणाऱ्या पतंगीवर नियंत्रण ठेवताना नियोजनाचे धडे, कटलेला पतंग पकडताना धावता-धावता इतरांच्या आधी त्याच्या दोराला हेरून मारल्या जाणाऱ्या उडय़ा या एकाच वेळी शरीराला प्रचंड ऊर्जा मिळवून देऊ शके. पुढे नगरांतील सौंदर्यविस्तार, गाडय़ांचे रस्ता आक्रमण, गगनचुंबी इमारती, केबल टीव्हीच्या वायरींचे वेटोळे यांनी शहरांतला पतंग उत्साह उतरत गेला. त्यात चिनी मांजाने केलेल्या उपद्रवामुळे, प्राणी-पक्षीप्रेमी संघटनांचा प्रचार समाजमाध्यम काळात इतका फोफावला की, पुढल्या पिढीला पतंग न उडविण्याचे निमित्त मिळाले. पालकांनी या खेळापासून आपल्या मुलांना जाणून-बुजून वंचित ठेवत अधिकाधिक नाजूक बनवले. पतंगांमुळे झालेल्या अपघात घटनांनी या खेळाला सर्वाधिक बदनाम केले. सोसायटय़ांच्या गच्च्या पतंग उडविण्यासाठी निषिद्ध ठरविल्या गेल्या. या सगळय़ाचा परिणाम म्हणजे मुंबईच्या उपनगरांसह राज्यातील विविध भागांत पतंगी पुरविणारा डोंगरीमधील पतंगनिर्मितीचा उद्योग थंडावला. बरेली आणि उत्तर प्रदेशमधील काही गावांतून या पतंगी बनविण्यासाठी खास कारागीर येत असत. हे कारागीर स्वत:ला ‘कलाकार’ म्हणवून घेत. थड्डा (उभी काडी) आणि कमान (आडवी काडी) यांची अचूक बांधणी करून हे कलाकार मुक्की (स्थिर राहणारी), लप्पू (लहान मुलांची लाडकी), कंदिलवाली (जाड काठय़ा वापरून वजनदार आणि मोठय़ा आकाराची), लटकविणारी (गोल गिरक्या घेणारी) पतंग बनवू शकत. आकाशात पतंग कशी उडू शकेल, याचे भाकित ते काडय़ा जुळवून करीत. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ते दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आपल्या गावी जात. पुढे दोन महिन्यांनी हे कलाकार पुन्हा डोंगरीमध्ये येऊन दिवसाला तीनशे ते चारशे पतंगी बनवत. आता या कलाकारांना गुजरात आणि पतंग सर्वाधिक उडणाऱ्या राज्यांमधूनच आधार मिळत आहे. करोनानंतर मुंबईमध्ये तुरळक प्रमाणातही हे कलाकार राहिले नाहीत.
इतर कोणत्याही खेळात झाल्या नसतील, इतक्या संज्ञा या एकटय़ा खेळात सापडतात. त्या तयार व्हायला पन्नास ते सत्तर वर्षे जावी लागली. हा खेळच भाषाअभ्यासक वा समाजअभ्यासकांच्या कक्षेत येत नसल्याने त्यांची नोंद होणे अवघड. मात्र पतंग उडविण्याचा (मकर संक्रांत सोडून) घटलेला वेग सध्या इतका आहे की, पाच-दहा वर्षांत मुंबई-पुण्यासारखी शहरांमध्ये पतंगींसह बोलली जाणारी वैशिष्टय़पूर्ण भाषा ऐकू येणे पूर्णपणे थांबलेले असेल. त्यासाठी अद्याप पतंगींसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील गावांचे किंवा फक्त गुजरातचेच पर्यटन करणे अटळ राहील.

येवल्याने जपलेले ‘वेड’
येवल्याच्या पैठणीप्रमाणेच पतंग महोत्सवही प्रसिद्ध आहे. येवला हे पतंगबाजांचे गाव म्हणून ओळखले जाते. सलग तीन दिवस चालणारा पतंगोत्सव बघण्यासारखा असतो. या काळात सगळे येवलेकर घराच्या गच्चीवर अवतरलेले असतात. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले जातात. या उत्सवातून कोटय़वधींची उलाढाल होते. संपूर्ण कुटुंबच पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटतात. पुरुषांच्या बरोबरीने युवती, महिलादेखील पतंग उडविण्यात पारंगत झाल्याचे दिसून येते. पुरुषांसारख्याच इथल्या बायकाही पतंग उडविण्यात निष्णात आहेत.भोगी, संक्रांत आणि कर हे तीन दिवस येवल्यात दिवाळीसारखे साजरे केले जातात. सहकुटुंब, मित्र परिवारासमवेत आसारीवर मनसोक्त पतंग उडविली जाते.

शिवाय, मकरसंक्रातीची सांगता दीपोत्सवाने होते. दिवाळीत होत नसेल इतकी आतषबाजी या दिवशी होते. प्रदीर्घ काळापासून चालत आलेली पतंगोत्सवाची परंपरा नवी पिढी पुढे नेत आहे. त्यामध्ये कालानुरूप बदल होत असले तरी उत्सवाचा मूळ बाज मात्र कायम आहे. गुजरातमधून आलेल्या व्यापाऱ्यांनी येथे पतंगी आणल्या. पण इथल्या लोकांनी पतंगप्रेम गेल्या शंभर वर्षांपासून विस्तारत नेले.

येवल्यात पतंग व मांजाची सुमारे शंभरहून अधिक दुकाने आहेत. पतंगनिर्मिती हा मोठा व्यवसाय आहे. काही व्यावसायिकांच्या घरात दोन-तीन महिने वगळले तर वर्षभर पतंगनिर्मितीचा उद्योग चालतो. त्यामध्ये ८० ते ८५ वर्षांपर्यंतच्या वयोवृद्धांचाही समावेश आहे. संक्रातीच्या आधीच बाहेरील व्यापारी पतंगी घाऊक दरात घेऊन जातात. पतंगोत्सवापर्यंत फारशा शिल्लकही राहत नाही.

येथे बरेलीप्रमाणे मांजा बनविला जातो आणि तो लोकप्रियदेखील आहे. घरोघरी खलबत्त्यात काच कुटून तो तयार होतो. मसाले बनवणारेदेखील काच कुटून देतात. पूर्वी लुकदी मांजा होता. घोटीव म्हणून तो ओळखला जायचा. हा मांजा तयार करायला बरीच मेहनत लागते. वेळही द्यावा लागतो. बरेलीचा तयार मांजा येथेही विक्रीला असतो, पण तरीसुद्धा तीन पदरी, सहा पदरी, नऊ व बारा पदरी असे दोऱ्याचे प्रकार आणि सर्व जर्सी मांजा तयार होतो.
पतंगोत्सवात येवलेकरांनी अनेक शब्द प्रचलित केले. गोल घिरटय़ा मारणाऱ्या पतंगाला गिर्रेबाज म्हटले जाते. आकाशात उडताना एकसारखा डुगडुगणारा पतंग डुगडुग्या म्हणून ओळखला जातो. शंकरपाळय़ा, ढेकूण, बसका ही पतंगांची नावे त्या प्रकारच्या पतंगी तयार होत नसल्याने लुप्त झालीत. पण त्याऐवजी नवनवे प्रकार दरवर्षी तयार होत असल्याने त्यांची नामकरण प्रक्रिया अबाधित आहे.

गावाची छाप..
येवल्याची पतंग अतिशय कमी वाऱ्यात उडते. पतंगाच्या काडय़ांवर ते अवलंबून असते. पतंगीत वजनाने हलक्या काडय़ा वापरल्या जातात. कागदही वेगळा असतो. त्यामुळे अन्य पतंगींच्या तुलनेत येवल्यातील पतंग हलकी असते. फारसा वारा नसला तरी ती आकाशात झेपावते. पतंगीच्या कमान- दट्टय़ा (काडीची रचना) पूर्वी बांबू फोडून तयार केली जात असे. हा बांबू कोलकाता, तुळशीपूर येथून येतो. आता तयार कमान-दट्टय़ाही मिळतात.

प्रसिद्ध प्रकार..
लंगर पतंग, बालाजी पतंग, अजिंठा पतंग, प्रकाश, फाईन, अश्फाक, जिव्हेश्वर, कोहिनूर, ए-वन हे सर्वात लोकप्रिय पतंगांचे ब्रँड. अण्णा ढोल (ढप) नावाचा पतंग चार फूट बाय चार फूट व आठ बाय आठ फूट असतो. अण्णा ढोल छोटा ४०० रुपये, अण्णा ढोल मोठा ७०० रुपये अशा किमती आहेत.

आसारीची खासियत..
आसारी (फिरकी) ही येवल्याची खासियत. पतंग उडविण्यासाठी देशभरात सर्वत्र फिरकी (मांजा गुंडाळण्यासाठी) वापरली जाते. येवल्यातील आसारीवर एकच व्यक्ती सहजपणे पतंग उडवते. ही आसारी घरात शोभेची वस्तू म्हणून दिमाखात मिरवू शकते.

नगरमधील बागडपट्टी आता पतंगगल्ली..
नगर शहरात पतंगाचा व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक आहेत. काही कुटुंबे वाडवडिलांपासून या व्यवसायात आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात बागडपट्टी नावाचा रस्ता आहे. संक्रांतीच्या किमान पंधरा-वीस दिवस आधी या रस्त्यावर पतंगविक्रीचे स्टॉल थाटले जातात. लाखो रुपयांची उलाढाल होते. शहराच्या अनेक भागांत विक्रेते आहेत, मात्र बागडपट्टीतूनच पतंग, चक्री, आसरी, मांजा खरेदी करण्याचा नगरकरांचा अट्टहास असतो. पूर्वी हा भाग हातमाग, यंत्रमागासाठी ओळखला जायचा. या भागातून जाताना या हातमाग, यंत्रमागाचा सट्टाक.. फट्टाक.. असा आवाज कानी पडायचा. काळाच्या ओघात हातमाग, यंत्रमाग बंद पडले, नामशेष झाले. या व्यवसायात बहुतांशी पद्मशाली, साळी, कोष्टी समाज होता. या समाजातील तरुणांनी नंतर हंगामी व्यवसाय म्हणून पतंगविक्रीला प्राधान्य दिले. त्यातून बागडपट्टीची ओळख पतंगगल्ली अशी निर्माण झाली. आता शहराच्या इतर भागांतील विक्रेतेही बागडपट्टीत येऊन पतंगाचे स्टॉल लावतात. या रस्त्यावर गाळे, दुकान भाडय़ाने घेऊन पतंगविक्री करतात.

मांजा विक्रीत कंपन्या
आता मांजाविक्रीत कंपन्या उतरल्या आहेत. त्यांनी आपले ब्रँड बाजारात आणले आहेत. बरेली, ग्रीन अथवा रेड पांडा, विजय, सुती अशी अनेक नावे आहेत. त्यामुळे मांजा सुतवण्यातील मजा संपली. तेवढा वेळही आता कोणापाशी राहिला नाही. ब्रँडेड मांजालाही आता नायलॉन किंवा चायना मांजाचे आव्हान अलीकडच्या काळात निर्माण झाले आहे.

नागपूरातही हौस अपरंपार..
नागपुरात ‘ओ काट ’हा शब्द पतंगीमुळेच प्रसिद्धीला आलेला. हंगाम जरी एका महिन्याचा असला तरी पंतग तयार करण्यासाठी राबणारे हात वर्षभर कष्ट उपसतात. यासाठी लागणारा ताव हा कलकत्त्याहून येतो, पेचा लावण्यासाठी लागणारे सूत व मांजा दिल्ली, मध्यप्रदेशातून येतो.
अनेक कुटुंब पिढय़ान्पिढय़ांपासून हा व्यवसाय करीत आहेत. शहरातील हसनबाग परिसरात मोबीन मोहमंद खान आणि राजकुमार शाहू यांची पाचवी पिढी यात उतरली आहे. संक्रांतीच्या काळात नागपूरमध्ये पतंग उडवली जाते. येथे मोठा पतंग असेल तर त्याला ढग्गा, दोन रंगाचा असेल तर दुरंगा, अनेक रंगाचा असेल तर बहुरंगा, उभ्या आकाराची पट्टी असेल तर खडा सब्बल अशी वेगवेगळी नावे आहेत. पूर्वी मुले घरीच काच कुटून मांजा तयार करीत होते. आता तयार मांजा बाजारात विकला जातो. मात्र नॉयलॉन मांज्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही तो छुप्यापद्धतीने विकला जात आहे.

औरंगाबादमध्ये राष्ट्रीय ऐवज.
हैदराबादहून आणले गेलेले रंगबेरंगी ताव. पतंगाच्या ‘कामटय़ा’ अहमदबादच्या. जयपूरची चक्री आणि बरेलीचा मांजा.. असा राष्ट्रीय ऐवज आहे एका पतंगाचा. औरंगाबाद शहरातील बुढीलेन भागात महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या जवळ राजपूत समाजातील मंडळी पतंग बनवितात. एका घरातील चार-पाच व्यक्ती दिवसाला ५०० पतंग बनवतात. मुस्लीम, राजपूत या व्यवसायात असणाऱ्या पतंगाच्या जगातील भाषाही निराळी. मोठा पतंग म्हणजे ढांचा. ज्या पतंगाच्या चारी बाजूला दोर गुंफलेला असतो किंवा त्याला गोट म्हणतात त्याला ‘दोरभरी पतंग’ म्हटले जाते. छोटा पतंग म्हणजे ‘डुग्गी’. ज्या पतंगाचा वरचा भाग वेगळ्या रंगाचा त्याचे नाव ‘टोक्का’. पतंग उभा धरला आणि त्याच्या वरच्या बाजूला गोल चिठ्ठी असेल तर तो पतंग ‘परी’ नावाने ओळखला जातो. पतंगाला लागणारा मांजा विक्री करणारी मंडळी करंगळी आणि अंगठय़ांच्या दोन बोटात इंग्रजी आठचा आकडा तयार करत मांजा विक्री केली जाते. आठ आकाराचे २५ वेढे म्हणजे एक ‘लच्छा’. हे खरे तर एक तोळय़ाचे माप. बहुतेक मांजा विक्रेते मुस्लीम असल्याने ते तोळा या शब्दाला ‘तोडा’ म्हणतात. एक तोडा मांजा आता कोणी घेत नाही. सरळ चक्रीला दोरा लावून पतंग उडवतात. पतंग उडवताना बाजी लागतेच. ही बाजी लागणे म्हणजे दोन पतंगातील लढाई. एका पतंगाने दुसऱ्यावर मांजाच्या साहाय्याने वार केल्यानंतर त्यावरची धार कमी होते. तेव्हा पतंग कटला नाही, पण मांजाला ‘रग्गे’ पडले असा शब्दप्रयोग औरंगाबादमध्ये होतो.

वावडी फक्त उडेना..
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात विशेषत: मराठवाडय़ाला लागून असलेल्या भागात पतंगाइतकाच वावडी उडवली जायची. ‘वावडय़ा उडवणे’ या अर्थाची एक म्हणही ग्रामीण भागात प्रचलित आहे. वावडी म्हणजे पतंगासारखाच एक प्रकार. मात्र मोठय़ा आकाराचा आणि उभ्या आयताकृतीचा. वावडी बनवण्यासाठी आदल्या दिवशी बांबू भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याच्या बारीक कामटय़ा काढाव्या लागत. पतंग जसे वेगवेगळ्या रंगात असत त्याऐवजी वावडी खाकी रंगाचीच असायची. क्वचित कधी त्याला रेग्झीनचा कागद लावला जाई. झिरमिळ्यांची सजावटही केली जाई. खाली शेपूट जोडावे लागे. मोठय़ा आकारामुळे वावडी उडवण्यासाठी मांजा उपयोगी नसे. त्यासाठी जाड दोरा लागे. जितकी वावडी मोठी तितका जाड दोरा वापरावा लागे. अनेकदा मोठय़ा आकाराची वावडी उडवण्यासाठी सुतळी किंवा काथ्याचाही वापर केला जात असे. वावडीचा ताण लहान मुलांना सहज ओढून नेत असे. त्यामुळे ती उडवण्यासाठी दोघे-तिघे आवश्यक असत. मोकळय़ा माळारानाचा वापर केला जाई. या वावडी आता हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. क्वचित कुठेतरी त्या उडवल्या जाताना आढळतात.

काही शब्दमाळा..
आसमानी गोद – खूप उंचावरून पतंग खाली आणण्याची कला.
लंगोड – पतंगांचा मांजा दगडाला बांधून खेळण्याचा प्रकार.
डबिलग – मांजा किंवा छडीचा दोन भाग एकत्र करून स्पर्धेत उतरण्याचा प्रकार.
काचा-कोची – छडीची धार तपासण्यासाठी दोन प्रकारचे मांजा फूटभर तोडून केली जाणारी तपासणी.
झुकणी- एका बाजूला झुकणाऱ्या पतंगीला स्थिर करण्यासाठी दुसऱ्या बाजूला दोरे बांधण्याचा प्रकार.
डबल काडी- लप्पू पतंगीच्या कमानीला दुसरी बारीक काठी वाकवून पतंग मजबूत करण्याचा प्रकार.

pankaj.bhosale@expressindia.com