डॉ. रवींद्र यशवंत श्रीखंडे

उस्ताद अली अकबर खान हे मैहर घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार आणि उत्तम सरोदवादक. त्यांचं संगीत आणि लताचा आवाज हा एक दुर्मीळ सुवर्णयोग! उस्ताद अली अकबर खान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि २८ सप्टेंबरच्या लतादीदींच्या जन्मदिनानिमित्त या सुवर्णयोगाचा धांडोळा..

Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

लता मंगेशकर व उस्ताद अली अकबर खान यांपैकी कोणाचीच ओळख करून देण्याची गरज नाही. दोघेही आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर विराजमान झालेले कलाकार. उभयतांच्या संगीताचा प्रभाव आजही तेवढाच टिकून आहे. मोजक्याच प्रसंगी उभयतांनी एकत्र काम केले. पण हा सुवर्णयोग गानप्रेमींसाठी सुरेल नजराणा ठरला!

अली अकबर खान यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी शिवपूर या सध्या बांगलादेशात असलेल्या लहानशा गावात झाला. मैहर घराण्याचे उस्ताद अल्लाउद्दीन खान हे त्यांचे वडील व गुरू. दिवसाचे अठरा तास शिक्षण व रियाज असा त्यांचा शिरस्ता होता. अकबर खान यांनी वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा अलाहाबाद येथील संगीत कार्यक्रमात सरोदवादन केले. अली अकबर खान मैहर येथून लखनौ येथे व नंतर जोधपूर येथे राजा उम्मेदसिंग यांचे दरबारी वादक म्हणून रुजू झाले. महाराजांनी त्यांना ‘उस्ताद’ हा किताब दिला. १९४७ साली उम्मेदसिंग यांच्या पश्चात त्यांचे पुत्र हनवंतसिंग जोधपूरचे महाराज झाले. १९५२ ला राजा हनवंतसिंग यांचे विमान अपघातात निधन झाले. हा उस्तादजींना मोठा धक्का होता. त्यातून सावरण्यासाठी व आर्थिक गरज म्हणून अली अकबर खान व त्यांचे शिष्य जयदेव वर्मा हे दोघे मुंबईला आले. त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून काम करण्याचे स्वप्न होते.

हेही वाचा >>> ‘सब कुछ सीखा हमने, ना सिखी होशियारी..’

मुंबईत आल्यावर ‘नवकेतन’चे दिग्दर्शक चेतन आनंद यांना अली अकबर खान भेटले. त्यांनी ‘आँधिया’ (१९५२) या चित्रपटाला संगीत देण्याची संधी उस्तादजींना दिली. जयदेव वर्मा त्यांचे साहाय्यक होते. ‘आँधिया’ चित्रपटाच्या पार्श्वसंगीताची श्रेयनामावली पाहिली तर अली अकबर खान, रविशंकर, रामनारायण, पन्नालाल घोष, जयदेव वर्मा अशा दिग्गज मंडळींची नावे पाहून आपण थक्क होतो.

‘आँधिया’तील‘है कहीं पर शादमानी, है कहीं नाशादिया’ हे लता मंगेशकरांचे गाणे खूप गाजले. जवळजवळ नऊ मिनिटांचे हे गाणे ७८ आरपीएम तबकडीच्या तीन बाजूंवर ध्वनिमुद्रित आहे. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा उल्लेख करताना खांसाहेब आपल्या आत्मचरित्रात लिहितात- ‘लता त्यावेळी इतक्या व्यस्त कलाकार होत्या, की माझे गाणे त्या टेलिफोनवरून शिकल्या होत्या तरी या व्यस्ततेतून वेळ काढून अनेक आठवडे रिहर्सलसाठी आल्या होत्या. ते गाणं त्यांना इतकं आवडलं की त्याचे त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यांना जे पैसे मिळाले ते त्यांनी सर्व म्युझिशियन्समध्ये वाटून टाकले. ते गाणं त्याकाळी खूप गाजलं होतं.’

‘आँधिया’पूर्वी जयदेव उस्तादजींना फिल्मिस्तानच्या शशधर मुखर्जी यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी गाण्यांना चाली लावून त्यांना ऐकवल्या. तेव्हा ते म्हणाले, ‘असे रागाश्रयी स्वर चालणार नाहीत. हातगाडीवाले, रिक्षावाले ऐकून पसंत करतील अशा चाली पाहिजेत.’ हे ऐकून उस्तादजींना खूप राग आला.

 १९५३ मध्ये ‘नवकेतन’च्याच ‘हमसफर’मध्ये उस्तादजींसाठी लता मंगेशकरांनी साहिर लुधियानवी यांनी लिहिलेले ‘दूर कोई बजाए बांसुरी’ हे गाणे गायले. हा उस्तादजींचा प्रदर्शित झालेला अखेरचा हिंदी चित्रपट. रागरागिण्या तर दूरच, पण सूर-बेसूर पण न कळणाऱ्या दिग्दर्शक मंडळींचा हस्तक्षेप उस्तादजींना पसंत नव्हता.

हेही वाचा >>> भारतीय चित्रपटांतील देशी आशय

उस्तादजींनी हिंदी चित्रपटांचे संगीत थांबवले असले तरी त्यांच्या सरोदवादनाच्या साथीचा फारच सुंदर वापर प्रस्थापित संगीतकारांनी करून घेतला. शंकर-जयकिशन यांच्या ‘सीमा’ (१९५५) या चित्रपटातील ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’ या गाण्यात उस्तादजींनी केलेली सरोदची साथ केवळ ऐकण्यासारखीच! लताचे गाणे व उस्तादजींची सरोद यांची अप्रतिम जुगलबंदी यात ऐकायला मिळते. या यशस्वी प्रयोगानंतर पुढच्याच वर्षी ‘पटराणी’ (१९५६) चित्रपटात शिवरंजनी रागावर आधारित ‘चंद्रमा मंदभरा क्यूँ झुमें बादर में’ या गाण्यात शंकर-जयकिशननी उस्तादजींची सरोद वापरली.

हळूहळू त्यांच्या देशविदेशातील सरोदवादनाच्या मैफली वाढल्या. प्रथम कोलकाता येथे १९५६ मध्ये त्यांनी संगीत विद्यालय सुरू केले. पुढे १९६७ ला त्यांनी अमेरिकेत ‘अली अकबर कॉलेज ऑफ म्युझिक’ सुरू केले. १९८५ मध्ये त्याची स्वित्र्झलडमध्ये शाखा सुरू झाली. अध्यापन व मैफली यांतच उस्तादजी अधिक गुंतले. तरीही त्यांनी ‘हमसफर’नंतर सुमारे १६ बंगाली आणि दोन इंग्लिश चित्रपटांना संगीत दिले. अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपट, माहितीपट, नाटके आणि संगीतिकांचे पार्श्वसंगीत त्यांनी केले.

गेल्या वर्षभरात लता मंगेशकरांच्या गैरफिल्मी हिंदी गाण्यांचा शोध व परामर्श घेताना दोन अनमोल रत्नांचा शोध मला लागला. भारतात आणि जगभरात विविध संगीतसमूह कार्यरत आहेत. अशाच एका समूहावर एके दिवशी लताच्या आवाजात ‘बांध दिए क्यों प्राण प्राणों से’ ही रचना ऐकायला मिळाली. ही रचना मी पूर्वी कधीही ऐकली नव्हती. यूटय़ूबवर ती रचना सापडली. त्यातून सुमित्रानंदन पंत हे कवीचे नाव समजले; परंतु संगीतकाराविषयी माहिती नव्हती. शोध घेता घेता हे गाणे १९५८ साली आकाशवाणीवर प्रसारित झाल्याचे समजले. त्या काळात आकाशवाणीतर्फे ‘सारंग’ नावाचे पाक्षिक प्रकाशित होत असे. इंटरनेटवर शोधताना या पाक्षिकाचे १९५८ चे अंक सापडले. सारंग, वर्ष- २३, अंक- ८, दि. ७ एप्रिल १९५८ च्या अंकात कवी सुमित्रानंदन पंत व गायिका लता मंगेशकर ही माहिती मिळाली. पूर्ण कविता स्वरलिपीसह उपलब्ध होती. परंतु संगीतकाराचा मात्र त्यात उल्लेख नव्हता. ‘बांध दिए’चा शोध घेताना ‘सखी मैं जब से हुई विराणी’ हे आणखी एक गाणे सापडले.. सारंग, वर्ष- २३, अंक- १५, दि. २२ जुलै १९५८ च्या अंकात स्वरलिपीसहित ही पूर्ण कविता, ‘कवी- विद्यावती, ‘कोकिल’ गायिका- लता मंगेशकर व संगीतकार- अली अकबर खान’ असा स्पष्ट उल्लेख त्यात होता. ज्या पोर्टलँड, ओरॅगॉनस्थित व्यक्तीने ‘बांध दिए क्यूं प्राण’ हे गाणे संगीतसमूहात उपलब्ध करून दिले, त्यांच्याचकडून ‘सखी मैं जब से’ हे भोपाळ येथील एका संग्राहकाकडून मिळेल अशी माहिती मिळाली. दोन्ही गाण्यांचे ध्वनिमुद्रण मिळाले. ‘सखी मैं..’ यूटय़ूबवर उपलब्ध नव्हते, ते मीच उपलब्ध केले.

 दोन्ही गाणी एकत्रित ऐकताना दोन्ही गाण्यांच्या वाद्यसाथीत सरोदचा सुंदर वापर आढळला. त्यामुळे ‘बांध दिए क्यों..’ची चाल उस्तादजींची असावी असे वाटले; परंतु निश्चित पुरावा मिळत नव्हता. कारण या दोन्ही गाण्यांची ध्वनिमुद्रिका निघाली नव्हती. दोन्ही गाणी आकाशवाणीवर किती वेळा प्रसारित झाली ते माहीत नाही. या दोन्ही गैरफिल्मी गाण्यांविषयी लता मंगेशकर व उस्ताद अली अकबर खान यांच्या विविध चरित्रांत, विविध गीतकोशांत काहीच उल्लेख सापडला नाही. दरम्यान दुबईस्थित उस्तादजींच्या कन्या लाजो गुप्ता यांच्याशी संपर्क झाला. त्यांना ही ध्वनिमुद्रणे उपलब्ध करून दिल्यावर अतिशय आनंद झाला. त्यांनी सांगितले की, ‘बांध दिए’ची चाल बाबांनी त्याच वर्षी ‘नूपुर’ (१९५८) या बंगाली चित्रपटातील संध्या मुखर्जी यांनी गायलेल्या ‘धन्य हबा जे मारोने’ या गाण्यावरून घेतली होती. अशा प्रकारे ‘बांध दिए’चे संगीत उस्तादजींचेच होते हा अंदाज अचूक ठरला. चौसष्ट वर्षांपूर्वीचे हे दुर्मीळ ध्वनिमुद्रण ज्या ज्ञात व अज्ञात संगीतप्रेमींनी जतन करून ठेवले व उपलब्ध करून दिले, त्यांना मनापासून धन्यवाद.

उस्तादजींच्या जन्मशताब्दी वर्षांतच लता मंगेशकर भूलोकीची यात्रा संपवून अनंतात विलीन झाल्या. या दिग्गजांनी आपल्यासाठी मागे ठेवलेला हा अलौकिक ठेवा!

doc_shrikhande@yahoo.com