Premium

मराठी विज्ञानकथेची शतसंवत्सरी

१९३४ मध्ये भा. रा. भागवतांची ‘मंगळावर स्वारी’ ही विज्ञानकथा ‘विविधवृत्त’मध्ये प्रसिद्ध झाली.

खऱ्या अर्थानं स्वतंत्र मराठी विज्ञानकथा प्रसवली ती १९१६ साली. या गोष्टीस यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
खऱ्या अर्थानं स्वतंत्र मराठी विज्ञानकथा प्रसवली ती १९१६ साली. या गोष्टीस यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

मराठीत विज्ञानसाहित्याच्या निर्मितीस १९०० साली अनुवादित स्वरूपात प्रारंभ झाला. परंतु खऱ्या अर्थानं स्वतंत्र मराठी विज्ञानकथा प्रसवली ती १९१६ साली. या गोष्टीस यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मराठी विज्ञानकथेच्या शतकी वाटचालीचा मागोवा घेणारा लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीमध्ये विज्ञान साहित्यनिर्मितीस- म्हणजे सायन्स फिक्शनच्या लेखनास अनुवादित स्वरूपात इ. स. १९०० मध्ये सुरुवात झाली. त्या वर्षी ‘केरळ कोकीळ’च्या जून १९०० च्या अंकात ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अँड बॅक’च्या क्रमश: अनुवादाला सुरुवात झाली. या अनुवादाला ‘क्रमश:’ म्हणणं तसं अवघड आहे; कारण अनुवादकाला जमेल तसा हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. पण त्यावर अनुवाद करणाऱ्याचे नाव नसे. म्हणजे त्याकाळच्या प्रथेप्रमाणे तो अनुवाद ‘केरळ कोकीळ’चे संपादक चित्रमयूर कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केला असावा असे गृहीत धरता येते. त्या काळात संपादक त्यांच्या नियतकालिकांमधील लेखनावर त्यांचे नाव छापत नसत. ही कादंबरी होती आणि ती अनुवादित होती, हे इथे लक्षात घ्यायला हवे.
‘विज्ञानकथा’ हा साहित्यप्रकार मराठीत सर्वप्रथम १९१६ मध्ये अवतरला. श्री. बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ ही कथा त्या वर्षी ‘मासिक मनोरंजन’च्या अंकात मार्च महिन्यात प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी वामन मल्हार जोशी यांच्या दोन कथा त्यांच्या ‘नवपुष्प करंडक’ या संग्रहात प्रकाशित झाल्या. ‘वामलोचना’ आणि ‘अदृश्य किरणांचा दिव्य प्रताप’ या त्या दोन गोष्टी त्या काळात विज्ञानकथा ठराव्यात, असं म्हणावं लागतं. याचं कारण त्याच सुमारास क्ष-किरणांचा खूप गाजावाजा होत होता आणि स्त्रियांना डाव्या डोळ्यानं कमी दिसतं, अशा प्रकारचं संशोधन प्रसिद्ध झालेलं होतं. हे संशोधन कालांतराने चुकीचं असल्याचं सिद्ध झालं हे खरं; पण प्रचलित विज्ञानाला बाधा येऊ न देता भविष्यात या विज्ञानाचे कोणते परिणाम घडू शकतील, याचा विचार या कथेत केला होता.
एखादी गोष्ट एखाद्या काळात वैज्ञानिक सत्य मानली जाते. पुढे इतर वैज्ञानिक अधिक संशोधन करून ती सत्य मानली गेलेली विज्ञानकल्पना ही ‘कल्पना’च होती, किंवा ती चुकीची होती, हे सिद्ध करतात. पण जेवढा काळ ती कल्पना सत्य मानली जात होती तोपर्यंत त्या कल्पनेवर आधारित साहित्य हे विज्ञान साहित्यच असतं. याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे मेरी शेलीची ‘फ्रँकेन्स्टाइन ऑर द मॉडर्न प्रॉमेथिअस’ ही कादंबरी. इंग्रजी विज्ञान साहित्याची- किंबहुना, पाश्चात्त्य विज्ञान साहित्याची सुरुवात या कादंबरीपासून झाली असं मानलं जातं. म्हणजे इ. स. २०१८ साली पाश्चात्त्य विज्ञानकथेला २०० वर्षे पूर्ण होतील. मेरी शेलीची विज्ञानकथा कशी लिहिली गेली, ही हकिगत मोठी मजेदार आहे. पर्सीबिसी शेली, त्याची पत्नी मेरी, लॉर्ड बायरन आणि त्यांचा एक मित्र स्वित्र्झलडमधील लॉर्ड बायरन यांच्या घरात गप्पा मारत बसले होते. बाहेर हिमवादळ सुरू होते. त्यावेळी चाललेल्या गप्पांमध्ये लेखनाचा विषय निघाला. त्यावेळी तिथं असलेल्या पुरुषांपैकी एकजण ‘स्त्रिया साहित्यनिर्मिती करू शकत नाहीत. जरी त्यांनी ती केली, तरी ती काळाच्या कसोटीवर टिकू शकत नाही,’ असं म्हणाला. हे ऐकताच ‘आपण सर्वजण कादंबरी लिहू या. बघू कुणाची कादंबरी चांगली ठरते!’ असं मेरी शेली म्हणाली. तिनं झपाटून कादंबरी लिहिली. त्या काळात स्थिर विद्युतनिर्मिती तसेच विद्युतघट निर्मितीचे अलेस्सांड्रो व्होल्टा यांचे प्रयोग गाजत होते. विजेच्या तारेचा स्पर्श होताच मेलेला बेडूक पाय हलवतो- ही बातमी तेव्हा गाजत होती. त्यामुळे विजेच्या साहाय्यानं मृत जीवाला संजीवनी मिळाल्याप्रमाणे पुनरुज्जीवित करता येतं, या कल्पनेची युरोपभर चर्चा चालू होती. मेरीनं हीच कल्पना तिच्या कथेत वापरली.
मेरीची कादंबरी लिहून झाली. बाकी कुणीही ती गोष्ट मनावर घेतलेली नव्हती. कारण ही चर्चा त्या घरातील आगोटीसमोर वेळ घालवायला मद्यपान करत असताना झालेली होती, हेही असू शकतं. पण एकटय़ा मेरीनं ती गोष्ट मनावर घेऊन तिची कादंबरी पूर्ण केली. ती १८१८ साली- म्हणजे आपल्याकडे शनिवारवाडय़ावर युनियन जॅक फडकला त्या वर्षी लंडनमध्ये प्रसिद्ध झाली. तिच्यावर लेखिकेचं नाव नव्हतं. कारण एखादी कादंबरी स्त्रीनं लिहिलीय, हे कळल्यावर एकतर त्या घटनेचा निषेध होईल ही भीती तर होतीच; शिवाय त्यामुळे ती खपणार नाही अशीही प्रकाशकाला भीती वाटत होती. पण ती कादंबरी खपली. त्यानंतर १८३१ मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती निघाली. गेली जवळजवळ दोनशे वर्षे या कादंबरीच्या सटीक आणि विशेष भाष्यासह, मानसिक पृथक्करणासह अशा विविध प्रकारच्या आवृत्त्या बाजारात आल्या.. आणि येत आहेत. मेरी शेलीनं जे गृहीत सत्य मानलं होतं ते- विजेचे झटके देऊन मृत जीव सजीव करता येतो, हे गृहितक खोटं ठरलं. तरीही तिच्या या कादंबरीला अजूनही विज्ञान साहित्याचाच दर्जा देण्यात येतो.
या कादंबरीच्या प्रथम प्रकाशनानंतर ९८ वर्षांनी मराठीतील पहिल्या चार विज्ञानकथा छापल्या गेल्या. त्यांना २०१६ सालात शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. पहिल्याच वर्षी चक्क चार विज्ञानकथा छापल्या गेल्या तरी त्यानंतरच्या काळात विज्ञानकथालेखन बरेच मंदावलेले दिसते. १९१६ सालीच श्री. बा. रानडे यांनी ‘उद्यान’ या मासिकात ‘रेडियम’ ही कथा लिहिली. ही ती चौथी विज्ञानकथा. यानंतर दोन वर्षांनी त्र्यं. र. देवगिरीकरांनी ‘२०१८’ ही विज्ञानकथा ‘चित्रमयजगत’मध्ये १९२३ साली लिहिली. त्यांनीच १९३६ मध्ये ‘शरद लोकाची सफर’ ही कथा ‘चित्रमयजगत’मध्ये लिहिली. १९३६ मध्येच ना. वा. कोगेकरांची ‘मृत्यूकिरण’ ही कथा ‘सह्य़ाद्री’ मासिकात प्रसिद्ध झाली. या कथा प्रसिद्ध होत असतानाच वि. वा. शिरवाडकर यांची ‘कल्पनेच्या तीरावर’ आणि ना. के. बेहेरे यांची ‘ध्येयाकडे’ या दोन ‘युटोपियन’ (४३स्र््रंल्ल)- म्हणजे आदर्श समाजाचं स्वप्न रंगवणाऱ्या, भविष्यकाळात विहार करणाऱ्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. दुसऱ्या महायुद्धापूर्वी मराठीतलं विज्ञानसाहित्य हे इतकंच मर्यादित होतं. याच काळात इंग्लंड-अमेरिकेत भरपूर विज्ञानसाहित्य निर्माण होत होतं. आयझ्ॉक अ‍ॅसिमोव्ह, आर्थर सी. क्लार्क, रॉबर्ट हाइनलाइन, ब्रायन आल्डिस आणि इतरही अनेक लेखक ‘अस्टाउंडिंग सायन्स फिक्शन’, ‘वंडर स्टोरीज्’सारख्या मासिकांमधून लिहीत होते.
१९३४ मध्ये भा. रा. भागवतांची ‘मंगळावर स्वारी’ ही विज्ञानकथा ‘विविधवृत्त’मध्ये प्रसिद्ध झाली. मात्र, त्यांचा पहिला विज्ञानकथासंग्रह ‘उडती छबकडी’ हा १९६६ साली प्रसिद्ध झाला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये मात्र मराठीत विज्ञानकथांनी जोर धरलेला दिसतो. भा. रा. भागवतांनी या काळात बऱ्याच विज्ञानकथा आणि विज्ञान कादंबऱ्या लिहिल्या. त्याच सुमारास नारायण धारप, द. चिं. सोमण, द. पां. खांबेटे, ग. रा. टिकेकर आदी मान्यवरही विज्ञानकथा लिहू लागले होते. भालबा केळकरही ‘वाङ्मयशोभा’मध्ये विज्ञानकथा लिहीत होतेच. मी या मंडळींच्या कथा वाचतच वाढलो. आणि आपणही अशाच कथा लिहून विज्ञानकथालेखन करतोय अशी स्वप्ने पाहू लागलो. हे स्वप्न १९७० मध्ये पूर्ण झालं.
‘उडती छबकडी’ या विज्ञानकथा संग्रहाच्या प्रस्तावनेत भा. रा. भागवत म्हणतात, ‘‘मंगळावर स्वारी’ ही कथा ‘विविधवृत्ता’च्या दिवाळी अंकासाठी स्वीकारली गेली. मात्र, आपल्या पत्रामध्ये कै. तटणिसांनी ‘कथा ओरिजनल आहे की ट्रान्सलेशन?’ अशी पृच्छा केली. त्या पत्राला मी जे उत्तर पाठवलं ते या संग्रहातील सर्व कथांना लागू पडण्यासारखं आहे. ‘मध्यवर्ती कल्पना बहुधा उचललेली असते, कथानक माझे असते. इंग्रजी विज्ञानकथा वाचताना एखादी कल्पना- किंवा वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर ‘जर्म’ सापडतो आणि मग त्याला प्रेमावर पोसून मी वाढवतो.’ मराठीत बऱ्याच विज्ञानकथाकारांनी असंच केलं. पण विज्ञान साहित्य म्हणजे काय, हे समजावून सांगायचं काम फार थोडय़ाजणांनी केलं.
ज्या थोडय़ा लेखकांनी विज्ञान साहित्य म्हणजे काय, हे सांगायचा प्रयत्न केला त्यात दोन प्रयत्न महत्त्वाचे आणि सर्वच विज्ञान साहित्यिकांना मार्गदर्शक ठरतील असे आहेत. यशवंत रांजणकर यांच्या ‘शेवटचा दिस’ या कथासंग्रहाची प्रस्तावना यादृष्टीनं महत्त्वाची आहे. भालबा केळकरांच्या ‘विज्ञानाला पंख कल्पनेचे’ या छोटेखानी कथासंग्रहात त्यांनी मराठीमधला एक आगळावेगळा प्रयोग केलाय. तो म्हणजे- एक विज्ञानकथा घ्यायची आणि ती विज्ञानकथा का व कशी, हे समजावून द्यायचे. असे प्रयत्न आजही नव्यानं करायला हवेत. रांजणकर म्हणतात, ‘विज्ञान काल्पनिकांविषयी (त्यात विज्ञानकथा आणि कादंबरी या दोन्ही आल्याच.) आपल्याकडे कुतूहल, आकर्षण निर्माण झाले आहे, ही कितीही समाधानाची गोष्ट असली, तरी या साहित्यप्रकाराविषयी अजूनही आपले वाचक, लेखक आणि समीक्षक यांच्या मनात बराच गोंधळ वा गैरसमज असावेत असे एतद्विषयक अधूनमधून जे काही लिहिले, बोलले व चर्चिले जाते, किंवा विज्ञान काल्पनिकेच्या लेबलाखाली ज्या तऱ्हेचे कथासाहित्य सादर केले जाते, त्यावरून वाटते.’ यातील कंसातील मजकूर माझा आहे. रांजणकरांनी हे उद्गार १९८२ साली काढले. आजही ते लागू पडताहेत, हे विशेष.
मराठीत विज्ञानकथेत दोन पंथ आहेत. एक म्हणजे विज्ञानकथा ही विज्ञान शिकविण्यासाठीची शर्करावगुंठित गोळी आहे असं म्हणणारा आणि दुसरा- केवळ साहित्यनिर्मिती म्हणून विज्ञानकथा लिहिणारा. यातल्या पहिल्या प्रकारच्या लेखनामुळे काही वेळा विज्ञान प्रसारकांची पंचाईत होते. विशेषत: अलीकडच्या काळात रामायणातील विमानं आणि महाभारतातल्या अणुबॉम्बचा डंका वाजत असताना विज्ञान शिकवण्याची शर्करावगुंठित गोळी म्हणून विज्ञानकथा लिहिणाऱ्यांकडून आणि विज्ञानकथेत जे प्रचलित विज्ञान वापरलं जातं ते सिद्ध झालेलं असणं आवश्यक आहे, असं म्हणणारे विज्ञानकथा लेखक ‘वीस हजार वर्षांपूर्वी भारतात प्रगत संस्कृती नांदत होती..’ अशा तऱ्हेची विज्ञानकथा लिहितात तेव्हा रामायण-महाभारतातील तथाकथित विमानं आणि अणुबॉम्ब यांच्या विरोधात बोलणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे विज्ञानकथा लेखकांवर बरीच जबाबदारी येऊन पडते.
२०१६ हे पहिली मराठी विज्ञानकथा प्रकाशित झाल्याचं शतसांवत्सरिक वर्ष आहे. आज मराठीत बरेच लेखक विज्ञानकथा लिहू लागले आहेत. ‘सायफाय कट्टा’ म्हणून एक ई-विज्ञान साहित्यलेखन चळवळही गेली काही वर्षे जोमात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या मराठी विभागामार्फत २०१६ सालात विज्ञान साहित्यविषयक चर्चासत्रे, कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करावीत, तसेच चर्चासत्रांमधील भाषणे व चर्चा यांचे ग्रंथ प्रसिद्ध व्हावेत असे सुचवावेसे वाटते. १९८३ साली मुंबई विद्यापीठाने मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्यानं भरवलेल्या चर्चासत्राचा ग्रंथ तयार झाला. ‘मराठी विज्ञान परिषद, मुंबई’नेही अशा तऱ्हेचे गं्रथ छापले. तथापि गेल्या दहा-पंधरा वर्षांत मात्र अनेक चर्चासत्रे होऊनही त्यांतल्या निबंधांचे संकलन झालेले नाही. त्यामुळे मराठी विज्ञानकथेच्या या शतकमहोत्सवी वर्षांत तरी नव्यानं चर्चासत्रं भरवावीत आणि त्यांतल्या निबंधांचे संकलन व्हावे, हीच इच्छा!

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 100 year of marathi science literature

First published on: 31-01-2016 at 01:01 IST
Next Story
इंदिरापर्वाची पन्नाशी