गणेशाचं रूपवैविध्य आपल्या इतिहासानं आपल्याला दिलं आहे. ते कुणीही कितीही नाकारलं तरी उरणारच. मात्र ‘आज दिसणारे’ बरेच गणेशाकार हे पाश्चात्त्य कलातंत्र शिकलेल्या लोकांनी घडवलेले आहेत. व्यक्तिगत कल्पनांतून आकारनिर्मिती हे पाश्चात्त्यांच्या ‘आधुनिकतावादी’ कलेतिहासाचं एक टोक. गणपती निरनिराळ्या रूपांमध्ये, आकारांमध्ये स्वीकारणं हे भारतीय समाजमनाचं वैशिष्टय़. या दोहोंचं एकत्रीकरण झाल्यावर जे होईल, तेच आपल्याकडेही झालं.. गणपतीचं आकारवैविध्य कलेतून जोमकसपणे उमटत राहिलं खरं; मात्र गेल्या २५ वर्षांत हे चित्र बदललं.. असं काय घडलं?

तामिळनाडू किंवा अन्य दाक्षिणात्य राज्यांतल्या मंदिरांमधले गणपती बसके, गोलसर आकाराचे, काळ्या दगडातले आणि पेशव्यांनी महाराष्ट्रात स्थापलेले गणपती शुभ्र संगमरवरी, शांत भासणारे आणि सुबक आकाराचे.. त्याआधीचे महाराष्ट्रातलेच- हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाची खूण ठरलेले अष्टविनायक मात्र जवळपास निराकार; पण बौद्धांच्या हीनयान पंथानं स्वीकारलेल्या गणपतीचा आकार मात्र तुंदिलतनुच असला तरी उभट आणि बारीक रेषांनी बनलेला आणि एकंदर रूप उग्र.. असं गणेशाचं रूपवैविध्य आपल्या इतिहासानं आपल्याला दिलं आहे. ते कुणीही कितीही नाकारलं तरी उरणारच. ख्रिस्ती प्रभावाचा इतिहास असणाऱ्या पाश्चात्य देशांमध्ये गणेशरूपं दिसत नाहीत; पण तिथल्या इतिहासाचंही एकापरीनं आपल्याला आज दिसणाऱ्या गणपतीच्या आकारांशी नातं आहे! कसं? ‘एकापरीनं’ म्हणजे कोणत्या प्रकारे?

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

– याचं उत्तर सांगण्याआधी मूळ प्रश्नातले ‘आज दिसणाऱ्या गणपतीच्या आकारांशी नातं’ हे शब्द अधोरेखित केले पाहिजेत. हे जे ‘आज दिसणारे’ आकार आहेत, त्यातलेही बरेच गणेशाकार पाश्चात्त्य कलातंत्र शिकलेल्या लोकांनी घडवलेले आहेत. हा झाला एक भाग. पण प्रश्न इतिहासाबद्दल होता. ते अप्रत्यक्ष नातं असं :

पाश्चात्त्य देशांमधलं ख्रिस्ती इतिहासाचं बायबली थोतांड नाकारण्याची, आपल्याच धर्माला प्रश्न विचारण्याची सुरुवात तिथल्या काहीजणांनी पाचशे वर्षांपूर्वी केली होती. त्या ‘रेनेसाँ’मधून पुढे विवेकवाद, विज्ञानवाद आला. विज्ञानाच्या प्रगतीतून दीडेकशे वर्षांपूर्वी आधुनिकतावाद आला. या आधुनिकतावादाला रेनेसाँपासूनच्या व्यक्तिवादी कल्पनांची जोड मिळाली आणि व्यक्तिवाद हे आधुनिकतावादाचं अविभाज्य अंग झाल्यामुळे कलांची अभिव्यक्तीदेखील व्यक्तीगणिक बदलत गेली. त्याला समाजमान्यताही काही प्रमाणात मिळाली आणि मग साधार विसाव्या शतकापासून आधुनिक कलेचा इतिहास हा व्यक्तींनी- एकेका कलावंतानं- काय निराळं केलं, याचा इतिहास ठरला! कलेतला हा व्यक्तिवाद आपल्याकडे येण्यास उशीरच लागला. एकोणिसाव्यात शतकाच्या मध्यावर सुरू झालेल्या ‘जे. जे. स्कूल’च्या पाश्चात्त्य कलातंत्र शिक्षणात तरी कुठे व्यक्तिवादाला वाव होता? पण पाश्चात्त्य आधुनिकतावाद आणि व्यक्तिवाद यांना (त्यावेळी) विरोध नसलेल्या काही भारतीयांनी कलेमधला व्यक्तिवाद म्हणजे काय, हे समजून घेतलं. मुंबईतल्या ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’चं अतिकौतुक होतं, ते त्यांच्या व्यक्तिवादी भूमिकेमुळे. व्यक्तीगणिक, कलाकारागणिक आकार बदलू शकतात, हे गेल्या ७० वर्षांत आपल्या भारतीय चित्रकला क्षेत्रानं मान्य केलं. ही व्यापक मान्यता मिळण्यासाठी काय कामी आलं असेल? गणपतीचे आकारसुद्धा इथं कामी आले! ‘क्रिएटिव्ह’ किंवा खरोखरच व्यक्तिगत कल्पनाशक्तीच्या आधारानं तयार केलेले गणेशाकार आपल्याकडे लग्नपत्रिकांवर दिसू लागले ते १९७० च्या दशकात. पण त्याआधी अनेक वर्षांपूर्वी मकबूल फिदा हुसेनसारखे एकेकाळचे ‘प्रोग्रेसिव्ह’ चित्रकार व्यक्तिगत कल्पनाशक्तीच्या आधारानं गणेशरूपं साकारत होते (चित्र ७). आज हुसेनचा उल्लेखही अनेकांना आवडत नाही, पण हुसेनसारख्या अनेकांनी १९५० च्या दशकापासून विविधाकारी गणेशरूपं साकारली. त्यामागे पाश्चात्त्य इतिहासाचा धागा हा असा अप्रत्यक्षपणे होता.

व्यक्तिगत कल्पनांतून आकारनिर्मिती हे पाश्चात्त्यांच्या ‘आधुनिकतावादी’ कलेतिहासाचं एक टोक. गणपती निरनिराळ्या रूपांमध्ये- कितीही विविध आकारांमध्ये- स्वीकारणं, हे भारतीय समाजमनाचं वैशिष्टय़. या दोहोंचं एकत्रीकरण झाल्यावर काय होईल? तेच आपल्याकडे झालं! तुम्ही तुमच्याच घरात जपून ठेवलेल्या लग्नपत्रिका काढून पाहा.. किती वेगवेगळ्या आकारांचे गणपती! भारतीय कलेच्या अर्वाचीन इतिहासाचा विचार करताना गेल्या ५० ते ७० वर्षांत गणपतीचं आकारवैविध्य पुन: पुन्हा दिसत राहतं. फक्त लग्नपत्रिकांवरच नव्हे, तर ही गणेशरूपं अगदी आर्ट गॅलऱ्यांमध्येही दिसत राहिली होती.

होती? म्हणजे आता नाही दिसत? दिसतात ना.. सुजाता बजाज यांच्या गणेशशिल्पांचं प्रदर्शन तर गेल्याच वर्षी भरलं होतं (चित्र १). पण हल्ली अशी प्रदर्शनं  कमी प्रमाणात दिसतात. खरं तर गेल्या २५ वर्षांचा (१९९२ पासूनचा) काळ हा ज्याला ‘हिंदुत्ववाद’ असं म्हटलं जातं, त्या कल्पनासमूहाच्या प्रसार-प्रचाराचा काळ होता. गणपती हे फक्त हिंदू दैवत मानलं, तर त्याचाही प्रसार-प्रचार अधिक जोमानं व्हायला हवा होता, आणि चित्रकलेतही तो जोम दिसत राहायला हवा होता. पण तसं फारसं झालेलं नाही. का नाही झालं? सगळे चित्रकार काय ‘तथाकथित पुरोगामी’ बनले की काय? – उत्तर : तसं अजिबात म्हणता येणार नाही. जर, ‘नाही’, तर मग-  तरीही कसं काय?

त्याचं उत्तर म्हणून इंटरनेटचा/ समाजमाध्यमांचा प्रसार, चित्रकलेचं वाढतं बाजारीकरण यांच्याशी संबंधित कारणं देता येतीलच. पण महत्त्वाचं कारण जगाच्या अर्वाचीन कलेतिहासातही आहे. आधी अन्य कारणांबद्दल बोलू. ‘गिफ्ट शॉप’मधून कलावस्तू विकल्या जाणं आपल्याकडे फोफावलं, ते गेल्या २५ ते फार तर ३० वर्षांपूर्वीपासून. ‘सत्यम’, ‘आर्चीज’ अशा भेटवस्तू विक्री केंद्रांच्या साखळ्याच त्या काळात उभ्या राहिल्या. एखाद्या शिल्पकाराकडून त्यानं बनवलेल्या कलात्मक आकाराचे सर्व हक्क खरेदी करायचे.. मग तो आकार फुलदाणीचा असो की गणपतीचा.. त्याच्या आवृत्त्या काढायच्या आणि विकायच्या, असं सुरू झालं.  शिल्पकलेचा मोठा स्टुडिओ चालवणारे भगवान रामपुरे यांनी मातीच्या गोळ्यातून बनवलेला, गोलाकारातल्याच अवघ्या काही उंचवटय़ा-खलोटय़ांतून साकारलेला गणपती पुढे हलक्या वजनाच्या फायबरमध्ये आणि मोटारगाडीवर असतात तशा चमकदार रंगात मिळू लागला, हे अनेकांना आठवत असेलच. याच भगवान रामपुरे यांनी पुढे एक गणेशरूप घडवलं. त्यात सोंडेच्या आधारानं गणपतीच्या डोक्याचा तोल साधलेला होता (चित्र ६)! आकार म्हणून तोही काही प्रमाणात लोकप्रिय झाला. पण गोलाकार गणपती आज कुठेही दिसतात. त्याच आकारात थोडे थोडे बदल करून दुसऱ्यांनी घडवलेली गणेशरूपंही नंतर विकली जाऊ लागली. पुढे मोटारगाडय़ांच्या खपासोबत अशा छोटय़ा विविधाकारी गणेशरूपांची मागणीही वाढू लागली. हे बाजारीकरण एकंदर ‘कलाबाजारा’पेक्षा निराळं होतं. पण ते लक्षणीय होतं. पण बाजारीकरणाचे फायदेही असतात. या मजकुरासोबत अगदी थोडय़ा आकारांमधून जे गणेशरूप आहे (चित्र २), ते साकारणाऱ्या डॉ. नंदिता शर्मा या चित्रकलेत पीएच. डी. झालेल्या आहेत. १९७७ साली कलेची पदवी घेतलेल्या डॉ. शर्मा यांना संधीच कधी मिळाली नाही. ती इंटरनेटनं दिली, हेही खरंच! त्यांचं हे गणेशरूप एका वेबसाइटवर विक्रीला आहे, म्हणून लोकांना दिसू शकलं.

दुसरीकडे इंटरनेटच्या प्रसारासह फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांवर ‘हा मी आज काढलेला गणपती’ म्हणून ‘अपलोड’ करणारे उत्साही कलाकार वाढू लागले तेही गेल्या फार तर दहा वर्षांत. यामुळे झालं असं की, केवळ महाराष्ट्रीय किंवा भारतीय नव्हे, तर जमैकात जन्मलेल्या आणि आता अमेरिकेतल्या फ्लोरिडात राहणाऱ्या अलेक्स विल्यम्सनं काढलेला ‘गणेशा’सुद्धा ट्विटरवर अवचित दिसू लागला (चित्र ४). अलेक्स विल्यम्सनं अन्य आकारांमध्ये जसे चक्षुभ्रमकारी रंग वापरलेत, तसेच इथेही वापरले. पॅसिफिक बेटांवरल्या लोकचित्रांमध्ये असते तशी कारागिरी त्याच्या ‘गणेशा’त दिसते. पण तो असा काही एकटाच नव्हे, तर अशा कित्येकजणांचे कित्येक ‘गणेशा’ इंटरनेटवर दिसत राहतात. त्यांच्या कर्त्यांना काही चित्रकार वगैरे होण्याची महत्त्वाकांक्षा नसते. तरीही गणपतीचा आकार त्यांना खुणावतो.

याउलट चित्रकारांचं झालं असावं. गणपतीचे इतके आकार, इतक्या प्रकारची रूपं त्यांना दिसताहेत, की त्यात स्वत:ची नवी भर काय घालायची, हा जणू प्रश्नच पडला असावा त्यांना. अनेक चित्रकार-मित्रांशी झालेल्या गप्पांमधून हे जाणवत राहिलं. पण मग त्यांनी (मित्र नसलेल्याही चित्रकारांनी) प्रयत्न करून पाहायला हरकत काय होती? इथं.. या प्रश्नाच्या उत्तराशी.. पुन्हा कलेतिहासाचा संबंध जोडता येतो.

आकार शोधणं, ‘आपल्या’, ‘स्वत:च्या’ ‘कल्पनाशक्ती वापरून घडवलेल्या’ आकारांमध्ये रमणं असा एक काळ कलेच्या इतिहासात होता. होता म्हणजे- पाश्चात्त्य देशांमध्ये तो साधारण १९६० सालापर्यंत होता असं मानलं जातं. आपल्याकडे तो १९९० च्या दशकापर्यंत होता. त्यानंतरचे चित्रकार-शिल्पकार आकार घडवण्यात फार रमलेच नाहीत. किंबहुना आकारांमधून- आकारांच्या मोडतोडीपासून ते पुन्हा जोडणीपर्यंत सारे प्रकार करून- मग चित्रं/ शिल्पं घडतात, हा ‘आधुनिकतावादी’ दृष्टिकोनातून घेतला गेलेला पवित्राच हळूहळू अस्तंगत होत गेला. अनेकांनी अनेक आकार (गणपतीचे असं नव्हे, बाकीचे!) केलेले आहेत, आपण नवं काही करायचं असेल तर आकारांपासून आता अर्थाकडे गेलं पाहिजे, हे दृश्यकलावंतांना जाणवू लागण्याचा हा काळ होता. कालक्रमणेतले बदल नेहमीच संथगतीनं दिसतात. कलेतले बदल तर व्यक्तिगणिक होत असल्यानं ते दिसण्याचा वेग आणखी कमी. पण आपल्याकडेही हा बदल दिसतो आहे. समकालीन चित्रकर्ती/ दृश्यकलावंत प्राजक्ता पालव हिच्या चित्रांमध्ये जेव्हा ‘मुंबईचं समाजजीवन’ हा विषय असायचा तेव्हा (सात-आठ वर्षांपूर्वी) गणपतीलाही तिच्या चित्रांमध्ये स्थान मिळालं. पण ते कसं? तर चिंचपोकळीच्या पुलावरून एका ‘राजा’ची मिरवणूक जाते आहे.. खाली रुळांची ‘चाकोरी’ आहेच. ती चाकोरी ठरीव आकारांची; तर गणपती, त्यापुढले लोक अधिक मुक्तपणे रंगवलेले (चित्र ५). पुढे हा रोजच्या जगण्यातला मुक्तपणा कुठे कुठे असतो, निम्न मध्यमवर्ग कसा जगतो, याचा शोध याच प्राजक्ता पालव सध्या आणखी गांभीर्यानं घेत आहेत. त्याची बीजं या चित्रात दिसली होती!

त्याहीआधी ज्येष्ठ चित्रकार व कलाविषयक लेखक सुहास बहुळकर यांनी वाडा-संस्कृती आणि त्यातल्या आठवणी यांचं आजच्या नजरेनं समालोचन करणाऱ्या मालिकेतलं एक चित्र

(चित्र ३) अनेकांना आठवत असेल.. वाडय़ाच्या भिंतीवर ऋ द्धी-सिद्धीसह गणेश आणि त्याखाली फोटोतल्यासारखे दिसताहेत ते- ‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा’ तोवर लागू झाला नसल्याने आपल्या दोन्ही पत्नींसह फोटो काढवून घेणारे एक पंत.. असं ते चित्र होतं. नर्मविनोद हे बहुळकरांचं वैशिष्टय़ त्यांच्या लेखनातून जसं दिसतं, तसं इथंही दिसतंच. पण जुन्या स्मरणरंजनातून लोकशिक्षण या मार्गाशी त्यांच्या लिखाणाचा जसा संबंध आहे, तसाच इथेही दिसतो. म्हणजे इथे बहुळकर दिसतात! ‘शैली’ फक्त आकारांपुरती मर्यादित नसते, ती अशी.

दृश्यकला म्हणजे काय? तर पाहायचं.. पाहून समजून घ्यायचं.. अशी एक समजूत आहे. ती योग्यच आहे. पण त्या समजुतीच्या पुढेही आणखी खूप आहे.. चित्रकाराचं एकात्म रूप एकेका कलाकृतीतून हळूहळू समजत जातं. वेळ लागतो, पण प्रेक्षकानंही तेवढा वेळ द्यावा लागतो. हे जर केलं, तर आशयचित्रांमधले गणपती अधिक भावतील. ही आजच्या चित्रकारांना वाटणारी अपेक्षा आहे. ती अर्थातच फक्त गणपतींना नव्हे, तर सर्वच आशयाला लागू पडते. कुठे कुठे अगदी क्वचित गणपतींचे संदर्भ अशा आशयघन कलेमध्ये येत राहतात. आकार लक्षणीय ठरतात.
त्यांचं वेगळेपण खुणावतं. हा आकार नवा आहे असं लक्षात येऊन अधिक आत्मीयतेनं आपण तो पाहू लागतो, हे तर आहेच.. पण आशयप्रधान कलेतही गणपती येऊ लागणं, ही आपला भारतीय कलेतिहास पुढे गेल्याची एक महत्त्वाची खूण आहे.

भारतीय कलेतिहास मोठाच आहे. तो काही पाश्चात्त्यांवर किंवा आधुनिकतेवर अवलंबून नव्हता. पण कलेचा इतिहास भारतीयच न राहता जागतिक होत चालला आहे आणि त्यामुळे जागतिक कलेतिहासाचे पडसाद कलेच्या भारतीय वाटचालीतही उमटत आहेत, हेही खरं आहे. दक्षिणेकडल्या राज्यांत केवळ अमुकच प्रकारचा दगड सापडतो म्हणून त्याच दगडाचे गणपती- असं जे दिसत होतं, ते महाराष्ट्रात बदललंच की नाही? पुणे वा हेदवीसारख्या ठिकाणाच्या जवळपास कुठेही संगमरवर मिळत नसूनसुद्धा पेशव्यांच्या काळात संगमरवरीच मूर्ती घडल्या की नाही? बदलती तंत्रं, बदलत्या अभिरुची, बदलता लोकाश्रय आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कलानिर्मात्यांच्या ऊर्मी आणि कलेपासूनच्या त्यांच्या अपेक्षा हे सारे बदल कलेच्या इतिहासावर परिणाम करत असतात. आजही लोकांचा ओढा आकारांकडेच आहे, हे मान्य. पण अभिरुचीतले बदल हळूहळूच घडतात.

आकारांमधलं आणि आकारांच्या पलीकडचं बुद्धितत्त्व शोधायला लोक तयार होतील, हळूहळू. गणपती हे तर अशा बुद्धितत्त्वाचं उदाहरणच आहे!

अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com