लंडनच्या वर्तमानपत्रांत अलीकडे एक जाहिरात लक्ष वेधून घेत असते. ‘सायकलिस्टस्, राइड सेंट्रली इन् नॅरो लेन्स’ असा संदेश देणारी ही जाहिरात लंडनचे मेयर आणि ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ (टीएफएल) यांनी संयुक्तपणे प्रसारित केली आहे. ‘एव्हरी जर्नी मॅटर्स’ हे ‘टीएफएल’चे घोषवाक्य आहे. म्हणूनच लंडनच्या रस्त्यावर प्रत्येकाला सारखाच हक्क आहे. अगदी चालणाऱ्या इसमापासून आलिशान गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या हक्काच्या जाणिवा अगदी स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात. ‘ड्रायव्हर्स, गिव्ह सायकलिस्ट्स रूम टु राइड’ हा या जाहिरातीचा दुसरा संदेश!

आता जग अगदी एका क्लिक्वर आल्यामुळे लंडनचे प्रवासवर्णन हा काही अचंब्याचा भाग राहिलेला नाही. लंडनवारी हे अप्रूपही राहिलेले नाही. तरीही लंडन हे एक वेगळेपणच आहे. कारण तेथे वावरताना, ट्रेन-बसमधून फिरताना किंवा रस्तोरस्ती भटकताना क्षणोक्षणी भारताची आठवण होते. आणि एकच प्रश्न मनात येतो.. ‘भारतात हे असे कधी शक्य होईल?’

एखाद्या भल्या सकाळी नुकतीच पावसाची एक भुरभुरती सर पडून गेलेली असते. लख्ख वातावरणात सर्वत्र सूर्याची कोवळी किरणे चमकू लागलेली असतात. अशावेळी ताजेतवाने होऊन लंडनच्या रस्त्यांवर चालण्यातली मजा अनुभवताना एखादे हरवलेले सुख प्राप्त झाल्याचा आनंद आपल्याला का होतो? लंडनच्या रस्त्यारस्त्यांवर फुटपाथवरील सायकल स्टँडवरून एखादी सायकल भाडय़ाने घ्यावी आणि मनसोक्त रपेट मारून यावी असा मोह आपल्याला तेव्हाच अनावर का होतो? लंडनच्या एखाद्या निवांत हॉटेलात रात्रीचे जेवण झाल्यानंतर टीव्हीवरचा एखादा चित्रपट पाहून डोळे मिटल्यानंतरही काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखे वाटू लागते आणि डोळ्यांवर झापड असतानादेखील झोप लागतच नाही. असे का होते? ..या साऱ्यांची उत्तरे आपल्या जगण्याशी जोडली गेली आहेत, हे त्याचे उत्तर सापडायला वेळ लागत नाही. ‘हे सारे आपल्याकडे कधी शक्य होईल?’ हा सतत मनाला छळणारा प्रश्न हेच त्याचे उत्तर असते. लंडनहून परतल्यानंतर एखाद्या सकाळी तशाच आवेशात मुंबईतील आपल्या घराबाहेर पडावे, दोन-तीन मलाची पायी रपेट करून यावे असा निर्धार करून चालण्यास सुरुवात करावी, आणि सोयीचा फुटपाथच अस्तित्वात नसल्याने चालणे सोपे नाही याची जाणीव होऊन निराश मनाने घरी परतावे, हा अनुभव घेण्यासाठी खरोखरीच सकाळी फुटपाथवरून चालण्याची प्रतिज्ञा करायला हवी. पाच-पन्नास फुटांनंतर फुटपाथवरची दुकाने, अनधिकृत झोपडय़ा किंवा तुटक्याफुटक्या पेव्हर ब्लॉक्सनी तुमचा वेग रोखलेला असतो. पुढे तर फुटपाथच गायब झालेला असतो. मग तुम्ही चालण्याचा नाद सोडून देता आणि लंडनच्या रस्त्यावर झोकदारपणे सायकलच्या सफरी करणारा प्रवासी तुमच्या डोळ्यासमोर तरळू लागतो. लंडनच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांपकी जवळपास २५ टक्के लोक आपल्या प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. ही अधिकृत आकडेवारी आहे. सायकल प्रवाशांनाही तेथे मोटारवाल्यांएवढाच सन्मान दिला जातो, हे तर त्या जाहिरातीतूनच स्पष्ट होते. मग साहजिकच आपल्यालाही सायकलप्रवासाची ओढ लागते आणि मुंबईत परतताच एकदा तरी सायकल रपेट करायचीच असे आपण ठरवूनही टाकतो. एखाद्या दिवशी उत्साहाने जामानिम्यासह सायकल बाहेर काढून आपण रस्त्यावर उतरतो. पण रस्ता क्रॉस करणे मुश्कील आहे, हे पहिल्या पाच-पन्नास फुटांच्या सायकलवारीतच लक्षात येते. कर्कश्श हॉर्न वाजवत धमकावत चालणाऱ्या बेस्ट बसगाडय़ा, कुत्र्याच्या भोकाडासारखा भीतिदायक हॉर्न वाजवत प्रवाशांसह वायुवेगाने धावत अचानक बाजूला टपकणारी एखादी ऑटोरिक्षा आणि रस्त्यावरचा पहिला हक्क आपला या समजुतीत आडव्यातिडव्या धावणाऱ्या महागडय़ा मोटारींच्या गराडय़ात सापडल्यानंतर निमूटपणे सायकलवरून पायउतार होऊन घराकडची परतीची वाट पकडणे आपण पसंत करतो. भारतात लंडनसारखे चित्र कधी दिसेल, हा प्रश्न आपला पिच्छा पुरवत राहतो.

lr11

जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वी- १६६६ मध्ये लंडन शहर आगीत बेचिराख झाले होते. पण त्या आगीने लंडनला फिनिक्सचे बळ दिले. जुन्या परंपरांची आठवण राखून लंडनवासीयांनी नवे शहर वसविले. आता एकविसाव्या शतकात लंडन हे जगातील एक ‘स्मार्टेस्ट’ शहर बनले आहे. ‘स्मार्ट सिटीज्’ची स्वप्ने आपल्याला आताशा पडू लागल्याने लंडनसारखे चित्र भारतात कधी दिसणार, हा प्रश्न मनात घर करून राहिलाच पाहिजे. ती आपली गरज आहे.

लंडनची एक गंमत आहे. ती स्मार्ट सिटी आहे; पण इतिहासाचे, जुन्याचे नावीन्यपूर्ण जतन हे त्यांच्या आधुनिकतेचे वैशिष्टय़ आहे. लंडनच्या फेरफटक्यात पावलापावलावर इतिहासाच्या ताज्यातवान्या खुणा दिसतात. हे आपोआप घडत नाही. नव्या रचनेत त्या जाणिवांचे भान जिवंत असावे लागते. लंडनने त्या जाणिवा जपल्या आहेत. भारताच्या स्मार्ट सिटी मोहिमेत सहभागी होण्यासाठी इंग्लंड उत्सुक आहे. विकासाच्या या देशी प्रक्रियेसाठी मेक इन् इंडिया मोहीमही महत्त्वाची ठरणार आहे. या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर असतील, तेव्हा मेक इन् इंडियाच्या माध्यमातून भारताच्या स्मार्ट सिटी योजनेतील लंडनच्या सहभागाची रूपरेषा कदाचित स्पष्ट होईल. भारतातील शहरांना नवा चेहरामोहरा देताना लंडनचा सहभाग असेल तर ‘भारतात लंडनसारखे चित्र केव्हा दिसेल?’ हा प्रश्न मनात जागा ठेवूनच स्मार्ट सिटी योजनेकडे पाहावे लागेल.

इंग्लंडच्या एकूणच वाटचालीत तेथे वास्तव्य करून असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांचा मोठा वाटा आहे. जवळपास सोळा लाख भारतीयांनी लंडनच्या सामाजिक, सांस्कृतिक, आíथक आणि राजकीय क्षेत्रावरही आपला ठसा उमटवलेला आहे. लंडनची वाहतूक (टीएफएल) हा भारतीयांसाठी औत्सुक्याचा आणि कौतुकाचाही विषय आहे. या वाहतूक व्यवस्थेवर शशी वर्मा या भारतीयाचे नियंत्रण आहे. त्यांच्या एका इशाऱ्यावर लंडनमधील बस, टय़ूब ट्रेन, मेट्रो आणि सिग्नल यंत्रणा चालते आणि थांबते. लंडनमध्ये वाहतुकीच्या समस्या नाहीत असे नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्नही कधी कधी भेडसावतो. पण त्या वाहतुकीला उतावीळपणा नाही. वाहतुकीत सापडलेल्या प्रत्येकाला या व्यवस्थेने संयम शिकवला आहे. म्हणूनच गजबजलेल्या रस्त्यावर चालतानाही कर्कश्श हॉर्नचे आवाज कानावर आदळत नाहीत. त्यामुळे चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागते.

विकासाच्या प्रत्येक पायरीवर पाऊल टाकताना त्या विकासाचे भविष्यातील परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे संभाव्य प्रश्नदेखील विचारात घ्यावे लागतात. लंडनमध्ये तसे झाल्याचे प्रकर्षांने जाणवते. आधी विकास आणि मग पायाभूत सुविधांची उभारणी असा काहीसा उतावीळपणा भारताच्या विकासप्रक्रियेत आढळतो. म्हणूनच विकासाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच विकासग्रस्त वा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या उग्र होतात. या समस्यांची अगोदर सोडवणूक करण्याचे धोरण प्राधान्याने राबवून मग विकासाचे टप्पे हाती घेण्याचे इंग्लंडचे धोरण भारतात राबवले तर समस्यांची तीव्रता कमी होईल असा दावा शशी वर्मा करतात. कारण दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांतील विकासाची प्रक्रिया त्यांनी जवळून पाहिली आहे. वर्मा म्हणतात तसे झाले तर भारतात कदाचित लंडनसारखे चित्र दिसणे अवघड नाही असा विश्वास आपल्यालाही मग वाटू लागतो.

लंडनच्या नागरी संस्कृतीला एक वेगळेपण आहे. हे श्रीमंतांचे शहर आहे असे म्हटले जाते. साहजिकच भारतातून तेथे गेलेला एखादा नवखा लंडनमधील भिकाऱ्याचे रूप न्याहाळण्यासाठी उत्सुक असतो. ‘चायना टाऊन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरात संध्याकाळच्या वेळी लंडनची सारी रूपे एकवटलेली दिसतात. याच परिसरात भिकाऱ्यांची विविध रूपेही पाहावयास मिळतात. तीन-चारजणांचे एखादे टोळके संगीताच्या तालावर आधुनिक नृत्याचे लालित्यपूर्ण पदन्यास करून प्रेक्षकांची वाहवा मिळवते आणि त्यासोबत त्यांच्या टोपीत पशाच्या राशी जमा होऊ लागतात. कुणी एकाकीपणे रस्त्याच्या बाजूला उभे राहून गिटारच्या सुरावटीसोबत गात असतो, तर कुणी एखादा विचित्र मुखवटा चढवून पुतळ्यासारखा तासन् तास उभा असतो. लंडनच्या भिकाऱ्यांची एक गंमत आहे. एखादे कुटुंब तेथील रस्त्याकडेला शाली लपेटून पहुडलेले दिसते. त्याच अंथरुणात त्यांचे एक गोंडस कुत्रेही सोबत शांतपणे बसलेले असते. ही शहरातील भिकाऱ्यांचीच एक जमात. पाळीव कुत्रे हा त्यांच्या ‘व्यवसाया’चा एक अनिवार्य भाग. कारण अशा भिकाऱ्यावर कारवाई करायची झाली तर कुत्र्याला वाऱ्यावर सोडता येत नाही. भिकाऱ्यासोबत कुत्र्यालाही अटक करावी लागते आणि त्याची योग्य देखभाल करण्याची जबाबदारीही पोलिसांवरच पडते. ही जबाबदारी फारच नाजूक आणि संवेदनशील असल्याने शक्यतो कुत्र्याला ताब्यात घेणे टाळले जाते आणि भिकाऱ्यावरील कारवाईही आपोआपच टळते. कुत्रे हे या भिकाऱ्यांचे संरक्षक कवच असते.

असे काही तिथे दिसले तरीही कळत-नकळत भारतातील भिकाऱ्यांशीदेखील त्यांची तुलना आपलं मन करू लागतं आणि तोच प्रश्न पुन्हा मनात जागा होतो- भिकाऱ्यालाही प्रतिष्ठा देणारे असे चित्र भारतात कधी दिसेल?

लंडनवासी आणि भारतवासीयांच्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत एक फरक असावा असे वाटते. स्मार्ट सिटीची संकल्पना भारतीयांच्या मनात अजूनही नेमकी स्पष्ट झालेली नाही, हे लंडनवासीयांशी बोलताना जाणवते. सगळीकडे मोफत ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध असणारे शहर म्हणजे स्मार्ट सिटी असा भारतीयांचा समज असल्याचे लंडनवासीयांचे मत आहे. त्यांची स्मार्ट सिटीची संकल्पना मात्र वेगळी आहे. लंडनवासीयांच्या मते, स्मार्ट शहर तेच असते, जेथे वाहतुकीची सुविधा सर्वोत्कृष्ट आणि सुनियंत्रित असते.

हे वास्तव मान्य करायचे ठरवले तर पुन्हा तोच प्रश्न डोकावू लागतो- ‘भारतात हे चित्र कधी दिसेल?’ लंडन शहरातील रस्ते दिल्ली-मुंबईच्या तुलनेत बरेच अरुंद आहेत. उड्डाणपूल तर तेथे दिसतच नाहीत. कारण उड्डाणपुलांच्या आड शहराची ओळख लपून जाते असे ते मानतात. त्यामुळे जुनेपणाची ओळख कायम ठेवूनही एखादे शहर स्मार्ट बनवता येते याचे लंडन हे अनोखे उदाहरण ठरते. लंडनला आधुनिकतेचे वावडे आहे असा याचा अर्थ नाही. इमारतींच्या सारखेपणामुळे येथील रस्ते नटलेले दिसतात. त्यात वेडेवाकडेपणा अजिबात दिसत नाही. अर्थात गगनचुंबी इमारतींना या शहरात थारा नाही असे नाही. ते आधुनिक रूप मात्र शहराच्या एका बाजूला जवळपास १०० एकर जागेवर वसले आहे. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील साऱ्या आघाडीच्या संस्था या आधुनिक, गगनचुंबी इमारतींमध्ये दिमाखाने वसल्या आहेत. जवळपास दीड लाख कर्मचारी तेथे दररोज कामानिमित्त दाखल होतात. पण जेमतेम पाच हजार मोटारी पार्क करता येतील एवढीच जागा या परिसरात राखीव आहे. साहजिकच बाकीच्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो रेल्वेसारखी सार्वजनिक व्यवस्था हाच पर्याय असतो. तो त्यांच्यासाठी पुरेसा सक्षम आहे, असा लंडनच्या वाहतूक व्यवस्थेचा गाडा हाकणारे  शशी वर्मा यांचा दावा आहे. ते असे काही सांगू लागले की गर्दीने खचाखच भरून रडतखडत चालणारी मुंबईची लोकल डोळ्यापुढून पळू लागते आणि पुन्हा तोच प्रश्न मनातून उसळी मारू लागतो.. ‘हे चित्र आपल्याकडे कधी दिसणार?’

– दिनेश गुणे
dinesh.gune@expressindia.com