मिलिंद ढमढेरे milind.dhamdhere@expressindia.com

एकेकाळी प्रकाशझोतात वावरलेल्या व्यक्ती त्यातून बाहेर गेल्यावर पुढे  कसं आयुष्य व्यतीत करतात, हे जाणून घेणारे लेखांक.. आपल्या शैलीदार खेळाने भारताला बॅडमिंटनमध्ये ओळख निर्माण करून देणारे नंदू नाटेकर!

बॅडमिंटन म्हटले की आजच्या पिढीसमोर नावे येतील ती सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, ज्वाला गट्टा, श्रीकांत किदंबी यांची. थोडे आधीच्या पिढीला दीपंकर भट्टाचारजी, पुलेला गोपिचंद यांची नावे आठवतील. त्याही आधीच्यांना प्रकाश पदुकोणचा खेळ आठवेल. परंतु या साऱ्यांच्याही आधी- १९५० ते ७० या काळात भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर एकच नाव तळपत होते, ते म्हणजे.. नंदू नाटेकर! त्याकाळी आपल्या शैलीदार खेळाने नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले. आज बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मात्र, कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच नाटेकरांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ते सहाव्यांदा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा जिंकले आणि त्यांनी ‘यापुढे मी एकेरीत खेळणार नाही, फक्त दुहेरी आणि सांघिक लढतींमध्येच भाग घेईन..’ असे जाहीर केले. हा निर्णय त्यांच्या सहकाऱ्यांबरोबरच चाहत्यांनाही धक्का देणारा होता. बॅडमिंटनमध्ये उत्तम करिअर सुरू असतानाच नाटेकरांना संगीत क्षेत्र खुणावत होते. साहजिकच बॅडमिंटनच्या सरावातील काही वेळ शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी द्यायचा असे त्यांनी ठरवले आणि एकेरीतून स्पर्धात्मक निवृत्ती स्वीकारली.

बॅडमिंटनमध्ये लोकप्रियता मिळवणारे आणि कारकीर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असा निर्णय घेणारे हे ज्येष्ठ क्रीडामहर्षी सध्या काय करतात याबद्दल उत्सुकता होती. त्यांना भेटण्यासाठी बाणेर परिसरातील त्यांच्या घरी गेलो तेव्हा वयाच्या ८५ व्या वर्षीही ते एकाग्रतेने शास्त्रीय संगीताचा सराव करीत होते. हा खरोखरच आश्चर्याचा सुखद धक्का होता. बॅडमिंटनच्या कोर्टवर अतिशय तन्मयतेने खेळलेले नाटेकर या वयातही शास्त्रीय संगीतात इतके तल्लीन झाले होते, की जणू काही एखादा शागीर्द आपल्या गुरूपाशी बसून एकाग्रतेने रियाज करतो आहे.

सुरुवातीला टेनिस व बॅडमिंटन या दोन्ही खेळांमध्ये त्यांची कारकीर्द सुरू होती. मात्र, बॅडमिंटनमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर त्यांनी बॅडमिंटनच्या सरावावर अधिक लक्ष केंद्रित केले. बॅडमिंटनमध्ये दहा वेळा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी स्थान मिळवले होते. त्यापैकी सहा वेळा ते विजेते ठरले. हे सुरू असताना फावल्या वेळेत अनेक गायकांचे शास्त्रीय गायन ऐकण्याची संधी ते कधी वाया दवडत नसत. त्यांच्या लहानपणी टेलिव्हिजन नव्हता. साहजिकपणेच रेडिओवर गाणी ऐकणे व्हायचे. त्यातून मिळणारा आनंद त्यांना खेळासाठी मनोधैर्य उंचावण्यास उपयोगी पडे. सरावानंतर थोडा विरंगुळा म्हणूनही ते गाणी ऐकत.

बॅडमिंटनमध्ये सर्वोच्च यश मिळवले तरी या खेळाची अकादमी काढणे किंवा प्रशिक्षक म्हणून काम करण्यात त्यांना फारशी रुची नव्हती. १९६१ ते १९९२ या काळात हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये त्यांनी नोकरी केली. त्यामुळे आंतर-पेट्रोलियम कंपन्यांच्या स्पर्धामध्येही ते खेळत. तेथेही त्यांना प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी होती. स्पर्धात्मक खेळासाठी वा प्रत्यक्ष कोर्टवर शिकवण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक तंदुरुस्तीही त्यांच्यापाशी होती. परंतु बॅडमिंटनमधील व्यग्रतेमुळे संगीताकडे आपण फारसे लक्ष देऊ शकलो नाही याची त्यांना कोठेतरी खंत वाटत असे. म्हणूनच त्यांनी प्रशिक्षकाची ‘सेकंड इनिंग’ पत्करली नाही. आज शास्त्रीय संगीत शिकतानाही त्यांना बॅडमिंटनइतकाच आनंद मिळतो. आग्रा घराण्याच्या शिक्षिका संध्या काथवटे यांच्याकडे आठवडय़ातून दोन दिवस ते संगीत शिकतात. प्रत्यक्ष शिकवणी जरी दोन दिवसच असली तरी त्याचा नियमित सराव करण्यासाठी आठवडय़ातील इतर पाच दिवस ते भरपूर वेळ देत असतात.

खेळामुळे शिस्तबद्ध जीवनाची नाटेकर यांना सवय झाली आहे. पुण्यातील बाणेर परिसरातील त्यांच्या घराजवळ भरपूर वृक्षराजी आहे. त्यामुळे पहाटे साडेपाच वाजल्यापासून अनेक पक्ष्यांचे मंजूळ आवाज ऐकण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.  पक्ष्यांचं कूजन त्यांना सकाळी झोपेतून जागे करत असतं. या पक्ष्यांमध्ये भारद्वाज पक्ष्यांची एक जोडी आहे. भारद्वाज पक्ष्याचे दर्शन लाभदायक असते असे म्हटले जाते. ही जोडी दिसल्यावरच नाटेकरांची दिनचर्या सुरू होते. सकाळी त्यांचा नातू शाळेत जातो, त्याला कधी कधी बसपाशी सोडून त्याला ‘टाटा’ करणे हा त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे. तो शाळेत गेल्यानंतर ‘विविध भारती’वर ‘संगीत सरिता’सह अनेक कार्यक्रम ते नियमितपणे ऐकतात. ‘संगीत सरिता’मध्ये अनेक ज्येष्ठ कलाकार विविध रागदारीबाबत माहिती सांगत असतात. ती ऐकणे हा त्यांच्यासाठी अभ्यासच असतो. ते आग्रा घराण्याचे गाणे शिकत असले तरी अन्य घराण्यांची गायनशैलीही ते तितक्याच आवडीने ऐकतात. मनाला रुचेल ते ऐकावे असे त्यांचे मत आहे.

सकाळी न्याहरी घेताना ते नियमितपणे वृत्तपत्र वाचतात. पण खून, मारामाऱ्या, राजकीय उखाळ्यापाखाळ्यांच्या बातम्यांमुळे त्यांचे मन वृत्तपत्रवाचनात फारसे रमत नाही. दुपारच्या भोजनानंतर झोप येईपर्यंत ‘विविध भारती’वरील अनेक कार्यक्रम ते न चुकता ऐकतात. ‘सखी सहेली’सारख्या कार्यक्रमांद्वारे गाण्यांबरोबरच खूप चांगले संदेशही दिले जातात, तेदेखील आवडतात असे ते सांगतात. लहानपणापासूनच रेडिओ ऐकण्याची सवय असल्यामुळे टेलिव्हिजनसमोर बैठक ठोकून बसणे त्यांना पसंत नाही. त्यापेक्षा रेडिओवरील बातमीपत्रे ते आवर्जून ऐकतात. संध्याकाळी सोसायटीच्या आवारात ते पाऊणएक तास चालतात. पूर्वी रस्त्याच्या कडेने ते चालत. मात्र आता रस्त्यावरील वाहनांची गर्दी त्यांना सहन होत नाही. शिवाय वयाच्या ८५ व्या वर्षी शारीरिक तंदुरुस्तीच्या मर्यादाही जाणवू लागल्या आहेत.

नाटेकर सांगतात, ‘‘काथवटे यांच्याकडून जे शिकायला मिळते त्याचा मी व्हिडीओ करून ठेवतो. घरी रोज एक तास त्याच्या साहाय्याने रियाज करतो. त्याकरता इलेक्ट्रॉनिक तंबोरा व तबलादेखील आणला आहे.’’ पूर्वी ते सवाई गंधर्व महोत्सवास जात असत. आता वयोपरत्वे अशा कार्यक्रमांना जाणे त्यांना शक्य होत नाही. त्याऐवजी रेडिओ व टेलिव्हिजनवर सादर होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा ते आनंद घेतात. महिन्यातून किंवा पंधरवडय़ात एकदा मित्रांसमवेत ते जुनी गाणी ऐकतात. या गाण्यांबद्दलच्या त्यांच्या चर्चाही मग रंगतात आणि दोस्त मंडळी भेटल्याचे समाधानही मिळते, असे नाटेकर म्हणतात. चालण्याचा व्यायाम करून घरी परतल्यावर साधारणपणे संध्याकाळी साडेसात वाजता ते भोजन घेतात. त्यानंतर टेलिव्हिजनवरील बातम्या, चर्चात्मक कार्यक्रम, गायन स्पर्धाचे कार्यक्रम, विविध स्पर्धाचे थेट प्रक्षेपण आदीचा आनंद घेत साधारणपणे रात्री अकरा-साडेअकरा वाजता ते झोपायला जातात. ठरावीक वेळी वयाला योग्य असा आहार, नियमित चालण्याचा व्यायाम यामुळे शरीराला नाना व्याधींपासून कसे लांब ठेवता येईल याकडे ते कटाक्षाने लक्ष देत असतात.

त्यांचा मुलगा गौरव व सून आरती हे दोघेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटू होते. आता दोघेही प्रशिक्षक झाले आहेत. मात्र मुलाच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देता यावे म्हणून आरती यांनी प्रशिक्षकाचे काम सध्या कमी केले आहे. कुटुंबीयांबरोबर गप्पागोष्टी करणे, नातवाबरोबर मनोरंजक खेळ खेळण्याचा आनंद घेणे या गोष्टी नंदू नाटेकर न चुकता करत असतात. ते अधूनमधून पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धानाही उपस्थिती लावत असतात. अर्थात, वयोपरत्वे या गोष्टींवरही बंधन येऊ लागले आहे.

अनेक लोक त्यांना, तुम्ही बॅडमिंटन प्रशिक्षक का झाला नाहीत, असे विचारतात. मात्र, स्पर्धात्मक बॅडमिंटनमधल्या निवृत्तीनंतर प्रशिक्षक झालो असतो तर शास्त्रीय संगीत ऐकण्याच्या आणि शिकण्याच्या आनंदाला मुकलो असतो, असे प्रांजळ उत्तर ते देतात. याबाबत ते जेव्हा गांभीर्याने विचार करतात तेव्हा प्रशिक्षकाऐवजी संगीत क्षेत्राकडे वळण्याचा आपला निर्णय चुकलेला नाही याचे त्यांना समाधान वाटते.