डॉ. पी. विठ्ठल

‘नाही फिरलो माघारी’ या मोहन शिरसाठ यांच्या कवितासंग्रहात मूल्यात्मक स्वरूपाच्या सार्वत्रिक पडझडीच्या अनेकपदरी पीडा आणि व्यक्ती म्हणून होणाऱ्या अवमूल्यनाच्या अनेक नोंदी एकवटल्या आहेत. आजच्या काळाची विविधांगी स्पंदनं यातून ऐकू येतात. वर्तमान जगण्यातले ताणेबाणे हा समकालीन कवितेचा ताजा स्वर राहत आलेला आहे. हा संग्रहसुद्धा याला अपवाद नाही. परंतु हा संग्रह केवळ उद्वेग व्यक्त करत नाही वा हताशपणे तथाकथित नैतिकतेवर बोलत नाही. तर परिवर्तनाचा आग्रह धरतानासुद्धा एक सकारात्मक आशावाद आपल्यापुढे ठेवतो. जातवास्तव ही एक अटळ आणि अपरिहार्य अशी आपल्या जगण्याची एक बाजू. कवी या वास्तवाकडे व्यापक समजुतीने बघतो. साहित्य, समाज आणि संस्कृतीचे विविध स्तरांवरील हे अनुभव मांडताना कवीचा हा समजूतदार सूर महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे या कवितेतले कवीचे सामाजिक संवेदन खूप प्रभावी वाटते. मोहन शिरसाठ यांची ही कविता बदलत्या सांस्कृतिक आणि सामाजिक जगण्याचा एक सर्वोत्तम कोलाज आहे. जात, धर्मासह त्यात अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. परंपरांची नाना वळणं आणि मोठय़ा गतीने बदलत चाललेले आधुनिक जगणे यांच्यातला हा अंत:स्वर नव्या काळातला अंतर्विरोध प्रकट करतो. जागतिकीकरणानंतरच्या काळात मराठी कवितेत जी प्रतिमांची एकसुरी रेलचेल झाली, त्या लाटेपासून ही कविता पुष्कळच मुक्त आहे. म्हणजे तशा प्रतिमा नाहीत असेही नाही; परंतु भाषेची आणि प्रतिमांची कृत्रिम ओढाताण इथे दिसत नाही.

या कवितेतील जग खूपच वैशिष्टय़पूर्ण आणि वैविध्यपूर्ण आहे. कवीच्याच शब्दांत सांगायचे तर – ‘हे माणसांचे रान / पेरलं तसं उगवतं यात धान’ या स्वरूपाचे आहे. त्यामुळे अनेक स्वरूपाच्या परंपरागत धारणा घेऊन जगणारा समाज यात गृहीतच आहे. या समाजाच्या पावित्र्याच्या तथाकथित संकल्पनांचा ऊहापोह ही कविता करते. युगानुयुगाचे दबलेले जगणे वाटय़ाला आल्यामुळे ‘कोळशातच निपजतात हिरे /अपारदर्शक काचनीतीला चिरणारे’ या ओळी खूप काही सुचवून जातात. या कवितेच्या अंतरंगात आपापल्या जीवनजाणिवांसह जगणारे खूप लोक आहेत- ‘पिकल्या केसांचा बालपणाचा दोस्त आहे’, ‘पहाटेच्या आशेवर जगणारी माय आणि उन्हाचं ओझं दडवून खस्ता खाणारा बाप आहे’, ‘शेतात राबणारा भाऊ  आहे’, ‘कसलेल्या जरठ हातांचा मित्र आहे’.. ही सगळी माणसं कवीच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. ही माणसं कवीच्या भोवतालातली असली तरी ती दु:खाची प्रातिनिधिक रूपं आहेत. अनिवार्य मध्यमवर्गीय जगण्याच्या चौकटीत बंदिस्त असलेला कवी आणि अभावग्रस्त भूतकाळातली तितकीच अभावग्रस्त माणसं यांच्यातला हा एक परंपरागत पेच आहे. संकोचून गेलेली माणसं आणि कवीचं आजचं प्रतिष्ठित जगणं यांच्यातले हे मानसिक द्वंद्व अस्वस्थ करणारे आहे. कवी या माणसांचं दु:ख समजून घेतो ते खोटय़ा सहानुभूतीसाठी नाही, तर आपल्या सामाजिक पर्यावरणातल्या एका अलक्षित वास्तवाचं दर्शन घडवण्यासाठी. दारिद्रय़ आणि जात-धर्माची ही रूपे मानवी समूहाचे दुभंगलेपण अधोरेखित करतात. अशा वेळी ‘सज्ञानी सरावाशिवाय हाती लागत नाही / कोणतेच रसाळ फळ’ ही कवीची विवेकी प्रगल्भता लक्षात घ्यायला हवी. गाडगेबाबा, डॉ. आंबेडकर, फुलन अशी काही व्यक्तिचित्रे या संग्रहात आहेत. परंतु या व्यक्तींचे चरित्र या कविता सांगत नाहीत, तर त्यांच्या अफाट कर्तृत्वाचे स्मरण करून देतात.

या संग्रहात खरे तर दोन जगातला संघर्ष आहे. जातीसह वाटय़ाला आलेली आर्थिक दुर्बलता हे गुलामांचे वा सर्वसामान्यांचे जग, तर दुसरीकडे वैभवसंपन्न, प्रतिष्ठित असे जग. दुर्बल जगाविषयीची कणव या कवितेतून जागोजागी प्रतीत होते. ‘ब्रँडेड कपडय़ात समारंभात मिरवणं / कसं रुबाबदार दिसतं रॅम्पवर कॅटवॉकसारखं / इकडे मोलमजुरी करणाऱ्यांची / फाटक्या चड्डीतली पोरं भटकताहेत रस्त्यावर’ – अशा शब्दांत विरोधाभासाकडे कवी लक्ष वेधतो. या संग्रहात प्रेमकविता म्हणता येतील अशाही काही कविता आहेत. परंतु त्या रूढ प्रेमकवितेसारख्या नाहीत. या कवितांमधूनही एक विचारसूत्र दिसतेच. शिवाय स्त्री-दु:खाविषयीची कमालीची अनुकंपा कविमनात आहे. स्वत:तला पुरुषपणा दूर ठेवून कवी स्त्री-दु:खाशी एकरूप होतो. खरे तर ही परकाया प्रवेशाची डोळस कृती आहे. ‘समजू शकतो तुझा आकांत’, ‘पुरुष म्हणून केलेल्या अन्यायाची कबुली’, ‘नदी’, ‘धग’ अशा काही कविता यासंदर्भात विचारात घेता येतील. ‘खरंच गं / हा काळाचा पडदा बाजूला केला तर / अनंत अंधारच आहे तुझ्या भोवती / म्हणून ही जाहीर कबुली देतोय / तुझ्या समक्ष पुरुष म्हणून केलेल्या अन्यायाची’ – नात्यातील परात्मता दूर करून लिंगभावाधारित संरचनेची पुनर्माडणी करणारी ही कविता वर्चस्ववादी आणि पुरुषप्रधान धारणांनी निर्माण केलेल्या विसंवादाला छेद देण्याचा प्रयत्न करते.

या संग्रहातलं हे दु:ख व्यक्तिनिष्ठ नाही, ते समूहनिष्ठ आहे. त्याला व्यापक सामाजिक संदर्भ आहेत. जातिसंस्था हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. ‘जात काही शाश्वत नाही / म्हणून हरेक मोर्चातील / असंख्य पावलांच्या ठशांवर उमटत नाही कोणतीच जात’ असा माणूसकेंद्री विचार महत्त्वाचा आणि विधायक वाटतो. या कवितेतील आशावाद माणूसपणावरचा विश्वास दृढ करणारा आहे. ‘मी सत्तेवर नाही, सत्यावर विश्वास ठेवतो’ हे कवीचं सांगणं विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवं.

‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला मुलाचे पत्र’सारखी एखादी कविता वर्तमान विषयाकडे लक्ष वेधून घेण्याच्या असोशीमुळे अधिक विधानात्मक होते आणि आपले काव्य हरवून बसते. तर ‘पहाटेची चाहूल’सारखी भावकवितेच्या वळणाने प्रकटणारी कविता या संग्रहाच्या विचारसूत्राला फारशी सुसंगत वाटत नाही. विशेषत: या कवितेतल्या पारंपरिक स्वरूपाच्या प्रतिमा चटकन ध्यानात येतात. अर्थात, अशी उदाहरणे अगदीच नाममात्र!

‘नाही फिरलो माघारी’ – मोहन शिरसाठ,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे – ११४, मूल्य – १३० रुपये.

shoonya2018@gmail.com