मनोरंजनाचा हुकमी एक्का म्हणून तमाशा या लोककलेकडे एकेकाळी पाहिले जात असे. विशेषत: ग्रामीण भागातील करमणुकीचे साधन म्हणूनही लोक तमाशाकडे पाहात असत. आज मात्र तशी स्थिती राहिलेली नाही. ज्या काळामध्ये तमाशाला राजाश्रय लाभला होता त्यावेळी शाहीर होनाजी बाळा, शाहीर अनंत फंदी, शाहीर राम जोशी, शाहीर परशराम आणि शाहीर सगनभाऊ असे नामांकित शाहीर तमाशा फड गाजवत होते. राजदरबारी हजेरी लावत होते. तमासगिरांना त्या काळात मोठय़ा बिदाग्या मिळत होत्या. त्यांच्या कलेचे कौतुक केले जात होते. स्त्रीपात्र करणाऱ्या नाच्या पोऱ्याला कलावंत म्हणून मान्यता दिली जात होती. त्यानंतरच्या काळात मात्र राजाश्रयाखाली असणारा तमाशा लोकाश्रयाखाली विस्तारत जाऊ लागला तसे तमाशा कलेत अनेक बदल होत गेले. नाच्या पोऱ्याची जागा स्त्री कलावंताने घेतली. मागास जातीसह, डोंबारी, कोल्हाटी, गोंधळी या भटक्या जमातीतील स्त्रिया नाचणारीण- कलावंतीण म्हणून तमाशा फडात आल्या तेव्हा तमाशाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलली. स्त्री कलावंतामुळे तमाशा शृंगारिक झाला आणि स्त्रिया हे फडातील आकर्षण ठरले. त्याच काळात चित्रपटाच्या प्रभावामुळे तमाशाचा मूळ बाज हरवतो की काय असे चित्र निर्माण झाले. परिणामी तमाशा चित्रपटात गेला आणि अस्सल मराठमोळय़ा तमाशाचा बाज हरवला. गण, गौळण, बतावणी, फार्स आणि वग हे तमाशातील प्रमुख घटक काहीसे दुर्लक्षित होऊन, तमाशातील अस्सल लावण्या, छक्कड, गण, गौळण यांची जागा सिनेमातील गाण्यांनी घेतली. त्यातून बैठकीच्या लावण्यांचे कार्यक्रम सुरू झाले. दौलतजादा मिळू लागली. परिणामी गावोगावच्या जत्रेशिवाय तमाशा उभा राहू शकला नाही. तो मूळच्या स्वरूपात उभा न राहता सिनेतमाशा अशा स्वरूपात सादर होऊ लागला. एकेकाळी ग्रामीण भागातील मनोरंजनाचा हुकमी एक्का असलेला तमाशा व त्यातील गण, गौळण, बतावणी आणि फार्स काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी त्यांचे दस्ताऐवजीकरण करण्याचे मोलाचे काम सोपान खुडे यांनी ‘तमाशातील फार्सा’ हे पुस्तक लिहून केले आहे. ते ऐतिहासिक असेच आहे.
महाराष्ट्रात तमाशावर प्रेम करणारे अनेक आहेत. मात्र तमाशाचा अभ्यास व संशोधन करणारे फारसे आढळत नाहीत. प्रत्यक्ष तमाशाचा अनुभव घेऊन तमाशाच्या फडामध्ये सामील होऊन त्याविषयी लिहिणारे दुर्मिळ आहेत. सोपान खुडे हे त्यापैकी एक आहेत. ‘तमाशातील फार्सा’ हे पुस्तक त्यांनी खूप मोठय़ा कष्टातून लिहिले आहे हे पुस्तक वाचताना जाणवते. खुडे हे जुन्या नामांकीत तमाशा फडाबरोबर फिरले आहेत, वेळप्रसंगी तमाशा कलावंत म्हणूनही ते फडात उभे राहिले आहेत. तमाशाच्या सर्वागाची माहिती मिळविण्यासाठी ऐन उमेदीचा काळ त्यांनी घालवला आहे. ‘तमाशातील फार्सा’विषयीची त्यांनी दुर्मिळ अशी माहिती जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेऊन मिळवली आहे. या पुस्तकामध्ये ‘फार्सा’बरोबरच लेखकाने गण, गौळण, रंगबाजी, मुजरा, बतावणी आणि वगाविषयी माहिती देऊन, शाहीर पठ्ठे बापूराव, रामा-नामा लबळेकर, सखाराम कोऱ्हाळकर, दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, जगताप पाटील-पिंपळेकर, काळू-बाळू कोल्हापूरकर, दादू इंदुरीकर, किसन कुसगावकर, दगडोबा कोऱ्हाळकर आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या अल्प परिचयाबरोबरच त्यांनी त्यांच्या तमाशात सादर केलेल्या बतावणी फार्साचे काही नमुनेही सदर पुस्तकात दिलेले आहेत. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.
अलीकडच्या काळात पूर्वीइतके तमाशाचे महत्त्व किंवा आकर्षण राहिलेले नाही. ग्रामीण भागात मनोरंजनाची अनेक आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने मराठमोळय़ा, रांगडय़ा तमाशा कलाप्रकाराकडे आकर्षित होणारा प्रेक्षकवर्ग आता बैठकीच्या लावण्यांकडे वळलेला दिसतो. त्यामुळे गण गौळणीसह, रंगबाजी, बतावणी, फार्सा आणि वग सादर करणारे तमाशा फड तसे दुर्मिळ झालेले आहेत. अशा परिस्थितीत तमाशा या लोककलेचा अस्सल बाज जतन करण्याचे अत्यंत मोलाचे काम सोपान खुडे यांनी हे पुस्तक लिहून केले आहे.
आधुनिक काळात तमाशा या लोककलेला लागलेली घरघर, तमाशातून हद्दपार झालेले फार्स, बतावणी, रंगबाजी, वग, अस्सल गवळणी, छक्कड, भेदिक लावण्या, शिलकार आणि टाकणीची लावणी याविषयी लेखकाने नेमकेपणाने नोंदवलेले निरीक्षण किती अचूक आहे हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते. सोपान खुडे म्हणतात, ‘आजच्या तमाशात आधुनिक वाद्यं आहेत, नेत्रदीपक प्रकाशयोजना आहे. कनात तंबू, बांबू, लाकडी रंगमंच सर्व काही आहे, पण तमाशात तमाशा नाही.’ लेखकाने तमाशाविषयी नोंदविलेले निरीक्षण किती वास्तव आहे हे आजचा तमाशा पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकते. तमाशा या कलेविषयी लेखकाची तळमळ ही त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे जाणवते.
ज्या निरक्षर-अडाणी तमाशा कलावंताने केवळ आपल्या उपजत प्रतिभेच्या जोरावर विविध प्रकारच्या लावण्या रचल्या आणि स्वतंत्र चाली लावून गायल्या, त्या असंख्य रचना आज अस्तित्वात नाहीत. परंतु जे आहे ते तरी शब्दसाहित्य रूपाने जतन व्हावे ही लेखकाची इच्छा आणि त्यातूनच ‘तमाशातील फार्सा’ या पुस्तकाची झालेली निर्मिती म्हणूनच महत्त्वाची आहे. लेखकाने ‘फड आठवणीचा’ या त्यांच्या मनोगतात म्हटले आहे- ‘तमाशाच्या बोर्डावरून अस्तंगत झालेला फार्स काळाच्या उदरात कायमचाच गडप होऊ नये. किमान तो लेखन स्वरूपात तरी अस्तित्वात राहावा या एकाच इच्छेपोटी मी प्रयत्न करीत होतो.’ लेखकाचा हा प्रयत्न किती मोलाचा आहे हे भविष्यात लोककलेचा समग्र इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्याचे महत्त्व निश्चितच जाणवेल. तमाशाचा अभ्यास व संशोधन करणाऱ्यांना सोपान खुडे यांनी लिहिलेले ‘तमाशातील फार्सा’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. त्यांचे हे पुस्तक दुर्लक्षित करून किंवा ओलांडून लोककलेच्या अभ्यासकांना जाता येणार नाही. इतके हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
‘तमाशातील फार्सा’- सोपान खुडे,
देशमुख अ‍ॅण्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.,
पृष्ठे- २४०, मूल्य-३०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामनाथ चव्हाण 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book by supan khude
First published on: 05-06-2016 at 02:23 IST