राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या ‘चित्रभास्कर’ या सिनेसंगीतावरील पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात होत आहे..

भास्कर चंदावरकर यांच्यासारख्या प्रगाढ माणसाचं- कलाकाराचं सिनेसंगीतावरचं संपादित लेखन सामावून घेतलेल्या ‘चित्रभास्कर’ या ग्रंथाकडे साधी नजर टाकली तरी दिपून जायला होतं. पण त्याचवेळी जाणवतं, की हे शब्द वाचकाला परकं मानणारे नाहीत. त्यात अभिजातता असली तरी शिष्टपणा नाही. चिंतन आहे, पण गप्पाही आहेत. इतिहास आहेच सिनेसंगीताचा; पण कालनिरपेक्ष असं भावसत्यही आहे त्यात. आणि मुख्य म्हणजे त्या शब्दांमध्ये आहे तो कमालीचा निरलसपणा, आत्मीयता, प्रेम! प्रेम.. माणसांवरचं, गायकांवरचं, वादकांवरचं आणि वाचकांवरचंही.

vidya balan express adda
Video: विद्या बालन व प्रतीक गांधी यांची ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निमित्तानं खास मुलाखत, पाहा LIVE
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

दुर्गा भागवतांची शब्दकळा जशी एकाच वेळी अ‍ॅकॅडेमिक आणि ललित असते, तशी शब्दकळा भास्कर चंदावरकरांनी त्यांच्या या संगीत निरुपणात उतरवली आहे. नव्हे, उतरली आहे ती! हे वाक्य बघा : ‘सिनेमातली पात्रं आता सायकलवर असताना, घोडेस्वारी करताना, बैलगाडी हाकताना गाणी म्हणू लागली होती. या सर्व गोष्टी म्हणजे गाण्याची गती, वेग वाढल्याच्या खुणा आहेत.’ गुलाम हैदर यांच्या रूपाने पंजाबी लोकगीतांचा सिनेसंगीतात प्रवेश झाला, त्या अनुषंगाने हे वाक्य येतं. ते सहज आहे. अवघड संज्ञा त्यात नाहीत. पण म्हणून ते महत्त्वाचं नाही, असं नाही. खरं तर ते वाक्य नसून विधान आहे! नेमक्या कुठल्या काळात सिनेसंगीत गतिमान झालं हे तिथे अचूकपणे अधोरेखित केलं आहे. त्यासाठी दांडगा व्यासंग लागतो लेखकाकडे. चंदावरकर हे किती प्रज्ञावान संगीतकार होते हे सांगायला नकोच. पण सगळ्या संगीतकारांना संगीतावर भाषेकरवी अभिव्यक्त होता येत नाही. संगीत समीक्षकही प्रत्यही चाचपडत राहू शकतात. कारण मुळात ‘संगीताची शब्दांत समीक्षा’ यातच अंतर्विरोध आहे. शब्दांची समीक्षा शब्दांनी होते. सुरांची समीक्षा सुरांनी व्हायला हवी! पण प्रत्येक वेळी ते शक्य नसतं. आणि माध्यमांतरात अर्थऱ्हास होऊ शकतो. चंदावरकरांचा हा ग्रंथ वाचताना जाणवतं, की असं मुळीच होऊ न देता उलट तिथे अर्थवृद्धी साधली आहे. मूकपट संगीत, सिनेगीतांचा जन्म, विकास, मुंबईतलं खास बॉलीवूड संगीत, सिनेगीतांमधलं वाद्यसंगीत, जुन्या काळातले संगीत संयोजक, साठीचं संगीत सुवर्णयुग, सिनेगीतांचे शब्द अशा अनेक पदरांना नुसता स्पर्श करत नव्हे, तर आरपार बघत चंदावरकर एक भव्य पट आपल्यासमोर मांडतात. त्यांची सजग निरीक्षणं कधी विनोदी तऱ्हेनंही समोर येतात. पूर्वी मूकपटांना ‘लाइव्ह संगीत’ थिएटरमध्ये असे. लेखक लिहितात- ‘हाणामारीच्या प्रसंगावेळी वादक ‘मारो’, ‘चूप साले’, ‘खामोश’ अशा आरोळ्या हॉर्मोनियम टिपेला वाजवताना मागे म्हणत.’ हे वाचून ते चित्रच येतं समोर आणि हसूही येतं गालातल्या गालात! पुढे पटकन् वाक्य ठोस विधान व स्वतंत्र विचार घेऊन येतं- ‘हे वादक केवळ संगीत दिग्दर्शक होते असं नव्हे, तर संवादलेखक आणि उसना आवाज देणारेही होते. सिनेउद्योगाचे ते पहिले धावते समालोचक होते.’ आणि मग ते जुनं चित्र नुसतं सजीव होत नाही, तर त्या जुन्या चित्राचं ऐतिहासिक नेमकेपणही कळतं.

संगीताकडे सामाजिक अंगाने बघायला अनेकदा विसरलं जातं. पण चंदावरकर १९६० च्या दशकामधलं गाण्यांचं वैशिष्टय़ सांगताना मुळात त्या दशकात केनेडी, पॅरिस विद्यार्थी आंदोलन, बीटल्स असं तरुण चैतन्य खेळतं होतं आणि त्याचा प्रभाव आपल्या सिनेसंगीतावर पडला, हेही विशद करतात. अगदी असांकेतिक निरीक्षणंही कधी कधी ते पृष्ठभागी न घाबरता आणतात. सिनेसंगीतामधलं शास्त्रीय बाजाचं संगीत हे खरोखर कितपत शास्त्रीय आहे, असा त्यांना प्रश्न पडतो. ‘तानसेन’ चित्रपटातली खुर्शीद यांनी गायलेली गाणी लोकगीतसदृश होती, असं निरीक्षणही ओघानं येतं. आज जो उठतो तो गाण्याच्या ‘साऊंड’वर बोलतो. त्या तऱ्हेचा वैचारिक अभ्यास पूर्वी खूप जणांनी केलेला नाहीए. पण लेखकाचं ‘फिल्मी नाद’ हे अभ्यासाचं ठिकाण आहे. ते लिहितात, ‘एखाद्या गाण्याचं मधलं संगीत ऐका. तुम्हाला हे गाणं ५० च्या दशकातलं आहे की ७० च्या दशकातलं आहे, हे ओळखता येतं.’ आज संगीत संयोजकांना पुरेसा मान आहे. किंबहुना त्यांची दादागिरीही चालते. पण पूर्वी गोव्याहून मुंबईत डेरेदाखल होणाऱ्या गुणी, मेहनती संयोजकांची बूज राखली गेलेली नाही, हे चंदावरकर मांडतात. ‘अख्खी कारकीर्द विशाल संगीतकाराच्या छायेखाली घालवणं हेच संयोजकांच्या नशिबी असे,’ असं लिहिताना लेखकाची न्यायबुद्धी आणि ऋजुता याचाही प्रत्यय येतो वाचकाला!

चंदावरकर यांच्यासारख्या शास्त्रीय संगीतात वाढलेल्या अभ्यासकाने सहसा ‘प्रो-अभिजात’ अशी मांडणी केली असती. पण चंदावरकर हे मुळात अभिजात संगीत परंपरेच्या पुष्कळच पुढचं-मागचं संगीत कोळून प्यालेले होते. त्यामुळे या लेखनात कुठे अट्टहास जाणवत नाही. जाणवते ती समजूत. पण ती बुजरी नाही. म्हणूनच मग ‘राग हे ४००० वर्षांच्या जुन्या भारतीय संगीत परंपरेचं देण आहेत आणि तितकंच सिनेसंगीतसुद्धा!’ असं मूलगामी विधान या लेखनात ठामपणे येतं. किंवा ‘हिंदी गीतांचा शब्दसमुच्चय २५ पानांच्या शब्दकोशात मावेल एवढाच असेल,’ असं नेमकं, टोकेरी निरीक्षणही न चाचपडता येतं.

अरुण खोपकर यांनी या लेखांना सूत्रबद्ध तऱ्हेने वाचकांसमोर आणलं आहे. त्यांची दीर्घ प्रस्तावना ही स्वतंत्रपणे समीक्षा करावी इतकी खोल व सजीव आहे. विकास गायतोंडे यांनी दिलेलं ‘ग्रंथरूप’ही प्रभावी आहे. आतली छायाचित्रं, पुस्तकाचा फाँट, मांडणी ही अभिजात वळणाची आहे. मुखपृष्ठ मात्र काहीसं निराश करतं. ते अभिजात वळणाचं, सौम्य रंगछटांच्या खेळाचं, ‘साऊंड वेव्ह’चा आकार सामावणारं आहे. पण आत असलेला जो चंदावरकरांचा संवादी उत्सव आहे, त्याच्याशी ते मेळ राखणारं नाही!

खोपकरांनी प्रस्तावनेत चंदावरकरांच्या प्रेरणांवर लिहिलं आहे. (हेही वेगळं आहे रूढ प्रस्तावनेपेक्षा.) त्यात त्यांनी म्हटलंय, ‘कुतूहलाइतकीच चंदावरकरांच्या आयुष्यातली दुसरी महत्त्वाची प्रेरणा म्हणजे प्रेम. त्यांच्यात प्रेम करण्याची प्रचंड क्षमता होती.’ सगळे लेख वाचून मी फिरून या वाक्याशी येतो आहे, ‘वा!’ म्हणतो आहे आणि मग मला जाणवतं आहे, की नुसतं प्रेम करण्याची नव्हे, योग्य तिथे आणि योग्य तेव्हा सुरांवर, माणसांवर प्रेम करण्याचा विवेक असणार या प्रतिभावान कलाकाराकडे. नुसत्या अभ्यासाचं लेखन कोरडं होतं एकेकदा. नुसत्या प्रेमाचं लेखन ठिसूळ होऊ शकतं आणि हरवतं काळाच्या ओघात. ‘चित्रभास्कर’ या ग्रंथाचं वैशिष्टय़ हे आहे, की त्यात प्रेम आणि प्रज्ञा हातात हात घालून सवंगडय़ांसारखे येतात आणि मग जाणवतं, की असं साध्य करायला लेखकाकडे संयम, विवेक आणि त्यापलीकडची अनुकंपाही लागते. चंदावरकरांकडे हे सारंच असणार. संगीतापलीकडे या ग्रंथातून शिकण्यासारखी ही एक जाणती गोष्टही आहेच!

‘चित्रभास्कर’- भास्कर चंदावरकर,

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- २८८, मूल्य- ४५० रुपये.

ashudentist@gmail.com