इ. स. २००० सालानंतरच्या पिढीने अनुभवलेल्या अस्थिरतेच्या भावनेवरचं सदरलेखन.. ज्यात व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, सातत्याने बदलते संगीत आणि सिनेमाचा ऊहापोह असेल. त्याचबरोबर जुन्या झालेल्या आणि कालानुरूप विनोदी, हास्यास्पद ठरलेल्या संस्था आणि परंपरांचा आढावाही! अन् नवी पुस्तके, तंत्रज्ञान, कलेच्या नव्या बाजारपेठा, बदलती भाषाशैली इत्यादीबद्दलची चर्चाही.. एकुणात, तात्पुरतेपण आणि अस्थिरतेचे वरदान लाभलेल्या  पिढीची ही डायरी असेल.

तो दिवस अतिशय क्रूर आणि थंड काळजाचा असणार.. जसे मुंबईत एकटे राहणाऱ्या अनेक लोकांचे सुरुवातीचे दिवस असतात. नव्याने राहायला आलो तरी रोजचे जगणे नीट शिजून त्याला घट्टपण आलेले नसते. माणसे या शहरात भांबावलेली असतात. सुरुवातीचे काही दिवस असे असू शकतात- जेव्हा तुमच्या आजूबाजूला बोलायला अख्खा दिवस कुणीही नसते. वेटरला खाण्याची ऑर्डर देण्यापलीकडे तुम्ही दिवसभर जिवंत माणसाशी बोलत नाही. पंधरा- सोळा वर्षांपूर्वी मी तसाच या शहरात शिजून घट्ट होण्याची धडपड करणारा मुलगा होतो. लोकलमधून उतरून प्लॅटफॉर्मवरची सिनेमाची मोठी होर्डिग्ज पाहिली की असे वाटायचे, की आपण कधी आणि कसा बनवणार आपला पहिला सिनेमा? किती लांब आहे ते जग आपल्यापासून. आपली कुणाशी ओळख नाही, आपल्याला मदत करणारे इथे कोणी नाही. चांगले अभिनेते आपल्या कथेला हो म्हणाल्याशिवाय आपल्याला कोण दारात उभे करेल? उमेदवारीच्या काळात अशा सगळ्या भावना गोळा झाल्या की भोवतीचे रिकामपण वाढत जाऊन अधिकच एकटे पडायला होते.

मी त्या काळात एका छोटय़ा प्रॉडक्शन हाऊसमध्ये डॉक्युमेंटरी बनवणारा दिग्दर्शक म्हणून काम करायचो. महिन्यातले पंधरा दिवस भारतात अनेक राज्यांमध्ये फिरून पर्यावरणविषयक फिल्म्स बनवायचो. आणि उरलेले पंधरा दिवस घरी बसून माझ्या ‘कोबाल्ट ब्लू’ या कादंबरीवर काम करायचो. अनेकदा संध्याकाळी एडिटिंग संपवून एकटा घरी येऊन मी इंटरनेटवरच्या चॅट रूमवर जाऊन अनोळखी लोकांशी तासन् तास गप्पा मारत बसायचो.

तसाच तो दिवस. मी संध्याकाळी इंटरनेटवर गेलो आणि दोन-तीन अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारणे सुरू केले. तेव्हा ती व्यक्ती मला भेटली. नवी ओळख नव्हती. गेले पाच-सहा दिवस आम्ही गप्पा मारत होतो. प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. आज आम्हाला दोघांना वेळ होता म्हणून भेटू या का, अशी चर्चा सुरू झाली. मी नुकताच दिवसभर काम करून घरी आलो असल्याने मला बाहेर पडायचे नव्हते. म्हणून मी त्या व्यक्तीला घरी यायचे आमंत्रण दिले.

दोन तासांनी ती व्यक्ती माझ्या घरात होती. आम्ही कॉफी पीत गप्पा मारत होतो. मी स्वयंपाकघरात काहीतरी आणायला उठलो तेव्हा त्या व्यक्तीने माझ्यावर मागून पहिला वार केला आणि मी भेलकांडत जमिनीवर पडलो.

पुढचा अर्धा तास ती व्यक्ती मला लाथाबुक्क्यांनी मारत होती. मी प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मी खूप शॉकमध्ये गेलो होतो. माझा एक हात लुळा पडला. डोळ्यावर बुक्की मारल्याने तो काळानिळा झाला आणि माझे डोके सोफ्यावर आपटले. माझी कपाटे आणि शेल्फ यांची उचकपाचक करून, घरातल्या अनेक वस्तू खाली फेकून त्या व्यक्तीला माझे सातशे रुपये असलेले पाकीट आणि माझा नोकियाचा नुकताच घेतलेला फोन मिळाला. तो घेऊन ती व्यक्ती घरातून पळून गेली.

साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मला शारीरिक हिंसेचा इतका मोठा अनुभव पहिल्यांदा आला होता. हिंसेबद्दल मदत मागण्याआधी मला लोक काय म्हणतील आणि मला कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील याचा विचार करत बसावे लागले. डोळ्याची सूज वाढत होती. हात दुखत होता. मला त्यावेळी पोलिसांवर विश्वास वाटला नाही. तो मार्ग जास्त भयंकर आहे हे लक्षात आले. कारण पोलीस यंत्रणेपासून बचाव करायला किंवा तिथले तंत्र सांभाळायला तुमच्यासोबत खमक्या व्यक्ती लागतात. तसे माझ्यापाशी कुणीही नव्हते. मला माझे सातशे रुपये आणि मोबाइल फोन परत नको होता. मला जोरात रडावेसे वाटत होते. कुणाच्यातरी कुशीत शिरून. पण फार भयंकर भीतीने मनाचा ताबा घेतला होता. दोन तासांनी मी कसाबसा उठलो आणि दार लावून घेतले. पाणी प्यायलो. घराची परिस्थिती पाहिली. माझ्या चुलतभावाला आणि एका मित्राला फोन केला आणि खूप रडलो. सगळेच अंतराने खूप लांबवर  होते. फोनवरच बोलावे लागणार होते.

दुसऱ्या दिवशी दुपारी मला दिल्लीला जावे लागणार होते. तिथून संध्याकाळी ट्रेनने डेहराडूनला शूटिंगसाठी पोचणे भाग होते.

मी दादर स्टेशनवर उतरताना तोंडावर आपटून पडलो अशी कथा तयार केली, कारण डोळ्याभोवती सुजून खूप काळे झाले होते. प्लॅटफॉर्मवरती माझा फोन पडून फुटला होता आणि कुणीतरी पाकीट मारून नेले होते.  डेहराडूनमध्ये पुढचे पंधरा दिवस असल्याने पुण्यात कुणाला काही कळण्याचा धोका नव्हता. मी हिंसेचा अनुभव बुजवून टाकला. कारण समाज नावाच्या अदृश्य राक्षसाच्या भीतीने मी अपराधीपण स्वत:कडे घेऊन गप्प बसून राहिलो.

पण त्या रात्री माझ्या मनावर खूप खोलवर जखम झाली; ज्यातून पुढची अनेक वर्षे काहीतरी वाहत राहिले. ती सुकायला मला फार मोठी किंमत मोजावी लागली. खूप वाट पाहावी लागली. मी मनातून अपंग होऊन राहिलो.

झालेल्या गोष्टीबद्दल काही दिवसांनी शांतपणे लिहून काढले की आपल्या अनुभवाला न्याय मिळतो यावर माझा विश्वास आहे. दुसऱ्या माणसाशी बोलण्यापेक्षा मला त्याआधी शांतपणे लिहून काढणे आवडते. गेली सोळा वर्षे मी या गोष्टीविषयी लिहायला घाबरत राहिलो. संकोच करीत राहिलो. कारण मध्यमवर्गीय वाचक आणि मध्यमवर्गीय प्रेक्षक नावाच्या जाणिवेची एक फार मोठी सत्ता असते. पोलिसांप्रमाणेच मी त्या लोकांना घाबरतो. कक्षेबाहेरचे लिहिताना शांतपणे दोनदा विचार करावा लागतो. अशा भीतीपायी मी संकोच करत गप्प बसून राहिलो. खासगीतही वहीमध्येसुद्धा त्या रात्रीविषयी काही लिहवेना. अशा वेळी आपल्याला कविता करता येत नाही या जाणिवेने फार हतबल व्हायला होते.

मी सावध झालो. त्या घरात पुढचे अनेक महिने रात्री दिवे चालू ठेवून झोपू लागलो. इंटरनेटने माझे आयुष्यात पुढे कधी काहीही वाईट केले नाही. मी अनेक अनोळखी माणस त्यामुळे जोडली. मित्र बनवले. प्रवास केले. अनोळखी माणसांना सोबत घेऊन काम केले. पण त्या रात्रीपासून माझ्या त्वचेच्या आतमध्ये एक स्वेटर आपोआप विणला गेला. त्या रात्री मी मुंबईशी दोन हात करायला सक्षम झालो. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्ट बोलायला शिकलो. नाही म्हणायचे आहे तेव्हा नाही म्हणायला शिकलो. होकारापेक्षा वेळच्या वेळी दिलेला नकार महत्त्वाचा असतो.

मला स्पर्शाबद्दल अतिशय चुकीची जाणीव त्या रात्री तयार झाली. ती दुरूस्त व्हायला किती वर्षे जावी लागली याची गणतीच नाही. एका बाजूला कुणाचाही स्पर्श नको असलेला आणि दुसऱ्या बाजूला सतत साध्या प्रेमाच्या स्पर्शासाठी भुकेला- असा दोन अर्थाचा प्राणी माझ्यातून तयार झाला. त्या प्राण्याने पुढील अनेक वर्षे लोकांना आपलेसे केले, आणि स्पर्शाच्या पांगळ्या घाबरट जाणिवेने पटकन् दूर लोटले. सतत खऱ्या प्रेमाच्या स्पर्शासाठी भुकेले ठेवले.

मी लिहायला बसलो की टाळाटाळ करायचो. याविषयी लिहिणे टाळायचो. अगदी सिनेमात कोणत्याही पात्राच्यासुद्धा आयुष्यात मी ती रात्र अजून येऊ   दिली नाही. गेली अनेक वर्षे मी अनेक गोष्टींबद्दल मोकळेपणाने आणि शांतपणे लिहीत आलो. पण ही गोष्ट लिहायला घाबरत राहिलो. मी अनेक हिंसा घडल्यावर त्याविषयी वाचले, सिनेमे पाहत आलो. शारीरिक हिंसेचा मी घेतलेला एकमेव क्रूर आणि काळा अनुभव फिका पडेल अशी दृश्ये मी सिनेमात पाहिली.

काही वेळा मला बोलता बोलता अनुरागला त्या रात्रीविषयी शांतपणे सांगावे असे वाटले. तो नक्कीच आपल्याला उलटे न भोसकता आपले म्हणणे समजून घेऊ  शकेल. पण मी आवंढा गिळून गप्प बसलो.

मराठीत अशी ठिकाणे आहेत, जिथे लिहिता आले असते. माझ्या ओळखीचे लोक आणि नातेवाईक अजिबात वाचत नाहीत अशी मासिके आहेत. त्यात लिहिणे सोपे होते. तिथे सहानुभूतीने आणि समजुतीने या अनुभवाकडे बघणारा तोच नेहमीचा ओळखीचा वाचक होता.

सगळ्यात भीती असते ती कधीही स्वत:चे घरदार न सोडणाऱ्या आणि हिंसेकडे नैतिकतेने बघणाऱ्या आणि आपल्याला जपून राहण्याचे सल्ले देणाऱ्या जन्मगावाच्या समाजाची. प्रत्येक लेखकावर जन्मगावच्या हुशार समाजाचा अप्रत्यक्ष धाक असतो. ‘इंटरनेटवर जपून वागा रे..’ असे सांगणाऱ्या ओरिजिनल बुद्धीच्या माणसांचा धाक.

पण आज जुने वर्ष सरताना मी शांतपणे बसून हे कागदावर लिहून काढले. नवीन वर्ष सुरू होताना यापेक्षा वेगळी शांतता आणि आनंद दुसरा तो काय असणार?

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com