scorecardresearch

‘एकच प्याला’ ही ट्रॅजेडी आहे काय?

‘एकच प्याला’ हे नाटक म्हणजे सुधाकरचे चित्र नसून ते गडकऱ्यांचे स्वत:चेच चरित्र होय, असे म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली.

‘एकच प्याला’ ही ट्रॅजेडी आहे काय?
  सिंधूच्या भूमिकेत बालगंधर्व

एकच प्यालानाटकाच्या आचार्य प्र. के. अत्रे यांनी केलेल्या रसग्रहणाचा संपादित अंश..

गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पुरे केले; तथापि ते नाटक ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. सदर नाटकाची बरीचशी पदे गडकऱ्यांचे ‘बंधुतुल्य’ मित्र गुर्जर यांनी लिहिली आणि त्या नाटकाची ‘प्रस्तावना लिहिण्याचे कामसुद्धा त्यांच्याकडेच आले. त्या प्रस्तावनेत ‘एकच प्याला’ची उभारणी गडकऱ्यांनी आपल्या ‘खऱ्याखुऱ्या अनुभवावर केली’ असे अतिरिक्त विधान करून गडकरी हे एक अट्टल दारूबाज होते, अशी साऱ्या महाराष्ट्रात त्यांनी त्यांची कारण नसता बदनामी केली; किंबहुना ‘एकच प्याला’ हे नाटक म्हणजे सुधाकरचे चित्र नसून ते गडकऱ्यांचे स्वत:चेच चरित्र होय, असे म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली.

गडकऱ्यांनी मद्यपाननिषेधावर नाटक लिहिण्यासाठी ‘मूकनायक’ नाटकाचा साचा घेतला, असे भा. वि. वरेरकर म्हणतात. अर्थात, गडकऱ्यांच्या आधी मद्यासंबंधाने लिहिलेल्या ‘मूकनायक’ आणि ‘विद्याहरण’ या नाटकांवरून त्याच विषयावर नवीन नाटक लिहिण्याची कल्पना गडकऱ्यांना सुचली नसेल, असे मी म्हणत नाही. परंतु ‘एकच प्याला’ हे नाव, त्यातील मुख्य तत्त्वज्ञान आणि कथानकाचा साचा यांच्या कल्पनांचा उगम दुसरीकडे आहे.

‘एकच प्याला’ हे नाटक गडकऱ्यांना शेक्सपीअरच्या ‘ऑथेल्लो’वरून सुचले, असे जर मी सांगितले, तर कोणी त्यावर विश्वास ठेवील काय? पण ती खरी गोष्ट आहे. ऑथेल्लो म्हणजे सुधाकर, डेस्डिमोना म्हणजे सिंधू, आयागो म्हणजे तळीराम आणि एमिलिया म्हणजे गीता. ही चार पात्रे डोळ्यांसमोर कल्पून आणि ‘संशया’चे रूपांतर मद्यपानात करून ‘ऑथेल्लो’ची आणि ‘एकच प्याला’ची जर तुलना केली, तर त्या दोन्ही नाटकांमधील साम्य लक्षात येईल. एवढेच नव्हे, तर ‘एकच प्याला’ हे नावदेखील गडकऱ्यांना ‘ऑथेल्लो’वरूनच सुचलेले आहे.

तुर्की आरमाराचा ऑथेल्लोने पराभव केल्यानंतर त्या विजयाच्या आनंदाने त्याच्या छावणीतले सारे सैनिक आधीच बेहोश होतात आणि मग त्या बेहोशीत मद्याची भर पडल्यानंतर त्यांनी त्या रात्री काय जल्लोष केला असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. ऑथेल्लोचा दुय्यम साहाय्यक कॅशियो म्हणून होता. त्याला दारू फार चढे म्हणून त्याने त्या रात्री फक्त ‘एकच प्याला’ (one cup only) घेतला होता. त्याला दारू पाजून बेहोश करण्याच्या उद्देशाने त्या नाटकातला खलपुरुष आयागो त्याला फक्त ‘एकच प्याला’ आणखी पिण्याचा आग्रह करतो.

सारांश माणसाची पिण्याची जी ठरावीक मर्यादा असते, तिच्यात आणखी ‘एकच प्याला’ची भर पडली, तर तो पशू होतो, ही जी शेक्सपीअरची कल्पना आहे, ती गडकऱ्यांनी सुधाकरच्या तोंडी चौथ्या अंकात वदविली आहे.

‘एकच प्याला’चा मूळ सिद्धान्त आणि पात्र-चौकट गडकऱ्यांना शेक्सपीअरच्या ‘ऑथेल्लो’वरून सुचली असली, तरी ‘एकच प्याला’चे मूळ कथानक गडकऱ्यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘अल्प चुकीचे घोर परिणाम’ या दीर्घकथेवरून घेतलेले असले पाहिजे, याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

‘एकच प्याला’ नाटकात मरणोन्मुख तळीरामला एकाच वेळी वैद्याने आणि डॉक्टराने तपासण्याची जी विनोदी घटना गडकऱ्यांनी चितारली आहे, ती त्यांनी फ्रेंच नाटककार मोलिअरच्या ‘ला मूर मेदेसिन’ (‘प्रेम हाच खरा वैद्य’) या नाटकाच्या दुसऱ्या अंकातल्या चौथ्या प्रवेशामधून घेतलेली आहे. एवढे सगळे सांगून झाले, तरी ‘एकच प्याला’ हे नाटक केवळ गडकऱ्यांच्या अलौकिक आणि देदीप्यमान प्रतिमेचा स्वतंत्र विलास आहे, यात काय शंका?

‘प्रेमसंन्यास’ आणि ‘पुण्यप्रभाव’ या दोन नाटकांपेक्षा तंत्राच्या, भाषेच्या नि परिणामकारकतेच्या दृष्टीने ‘एकच प्याला’ हे नाटक सर्वस्वी वेगळे आणि वरचढ आहे. ‘एकच प्याला’ या नुसत्या नावानेच या नाटकाची लढाई निम्मी जिंकलेली आहे. ‘इतके सूचक, प्रभावी नि सुंदर नाव कोणत्याही मराठी नाटकाला त्यापूर्वी मिळालेले नव्हते. ‘एकच प्याला’ हे नाव उच्चारताच सर्व जगाचा नाश करणारा तो दारूचा राक्षसी एकच प्याला आपल्या डोळ्यांपुढे उभा राहतो आणि नाटकाच्या स्वरूपाची प्रेक्षकांना तात्काळ कल्पना येते. ‘प्रेमसंन्यास’ नि ‘पुण्यप्रभाव’ची भाषा, काही म्हटले तरी नटवी, कृत्रिम आणि दीर्घसूत्री होती. संवाद लांबलचक आणि कंटाळवाणे होते; पण त्याचा लवलेशही ‘एकच प्याला’त कोठे आढळणार नाही. मराठी भाषेच्या अत्यंत सुबोध, सोज्वळ आणि सात्त्विक स्वरूपाचे या नाटकात सर्वत्र दर्शन होते.

दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वत:चा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी अत्यंत प्रभावी भाषेतून नि रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना विलक्षण परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. ती गोष्ट पाहात असताना प्रेक्षकांच्या काळजांना पावलोपावली पीळ पडतो आणि पाहून झाल्यानंतर त्यांचा मेंदू काही काळ तरी सुन्न होतो. प्रेक्षकांच्या भावना ठेचून आणि भरडून काढणारे एवढे प्रभावी नाटक मराठी भाषेत तर दुसरे नाहीच; पण इतर भाषांत असेल की नाही हे ठाऊक नाही. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी अत्यंत लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या नाटकात केली आहे.

अतिरेक आणि अतिशयोक्ती हा सर्वच रसांचा आधारस्तंभ आहे. त्याखेरीज परिणामकारक रसपरिपोष निर्माण होत नाही. मद्यपानाचे दुष्परिणामच जर रेखाटावयाचे असतील, तर जेवढय़ा भडकपणे आणि भीषणपणे ते रेखाटता येतील तेवढा प्रेक्षकांच्या मनावर त्याचा परिणाम खोल होणार. मग त्यासाठी वास्तवता आणि शक्याशक्यता यांचा बळी द्यावा लागला तरी चालेल. ‘एकच प्याला’त गडकऱ्यांनी तेच केले आहे. पतीचे व्यसन आणि पत्नीची निष्ठा यांच्या संघर्षांतून ‘एकच प्याला’चे शोकनाटय़ निर्माण होते. पतीची पराकाष्ठेची व्यसनासक्ती आणि पत्नीची पराकोटीची पतिभक्ती यांच्यातला हा संघर्ष आहे.

दारूचे व्यसन मनुष्याला एकदा लागले, की त्याच्यापायी त्याचा नि त्याच्या संसाराचा केवढा भयंकर विध्वंस होतो, एवढे एकच चित्र गडकऱ्यांना जास्तीत जास्त भयानक, विदारक आणि थरारकरीतीने या नाटकात चितारावयाचे होते. तेवढय़ासाठी त्यांना आवश्यक आणि पोषक असलेला जेवढा काही मालमसाला मिळवता आला- मग तो शक्य असो, अशक्य असो; संभाव्य असो, असंभाव्य असो, तो त्यांनी या नाटकामध्ये ठासून भरलेला आहे. एकदा मदिरेने सुधाकराचा कब्जा घेतल्यावर त्याची सनद रद्द होणे, कायमची रद्द होणे, त्याला नोकरी न मिळणे, अठराविशे दारिद्रय़ हात धुऊन मागे लागणे, पत्नीच्या शीलाचा संशय येणे आणि त्याच्या हातून स्वत:च्या मुलाचा खून होणे या संकटरूपी सर्व डाकिणी सुधाकरच्या मुसक्या बांधून त्याला धक्के मारीत आणि खेचीत खेचीत आत्महत्येच्या मुक्कामावर नेऊन पोहोचवितात. एवढय़ा मोठय़ा माणसाचा तो क्रूर अध:पात प्रेक्षकांना आपले श्वास अवरोधून बघावा लागतो. तोही त्यांनी एखादे वेळी बघितला असता; पण सुधाकरच्या घरादारावरून विध्वंसाचा जो भेसूर रणगाडा फिरू लागतो, त्याच्याखाली सिंधूसारख्या एका निरपराध नि देवतातुल्य साध्वीच्या शरीराचा जो नाहक चुराडा होतो, तो मात्र प्रेक्षकांना बघवत नाही. करुण रसाला त्यामुळे उधाण येते आणि सर्वत्र हुंदक्यांचा हलकल्लोळ उडतो. भीषण रसाचा नि करुण रसाचा हा जो मुख्य प्रवाह महापूर आलेल्या नदीच्या लोंढय़ाप्रमाणे नाटकामधून फुंफाटत जातो, त्याचा वेग किंवा विस्तार कमी करण्याच्या दृष्टीने गडकऱ्यांनी कोठेही या नाटकात अपप्रयत्न केलेला नाही, हेच त्याचे सर्वात मोठे यश! या नाटकाच्या यशाचे सर्वात मोठे सामथ्र्य म्हणजे सुधाकर आणि सिंधू यांच्या स्वभावाचे वैशिष्टय़पूर्ण चित्रण आणि काळजाला हात घालणारे विलक्षण प्रभावी संवाद. त्या बाबतीत आपल्या इतर नाटकांपेक्षा गडकऱ्यांनी स्वत:वरच येथे मात केलेली आहे.

‘एकच प्याला’ हे नाटक ‘ट्रॅजेडी’ आहे काय? जी पाहताना डोळ्यांत अश्रू उभे राहतात, ती ट्रॅजेडी, ही ढोबळ व्याख्या झाली. नाटक पाहताना नुसते दु:ख होते, एवढेच कारण ते नाटक ट्रॅजेडी आहे असे म्हणावयास पुरेसे पडत नाही. ‘दु:ख’ आणि ‘मरण’ म्हणजे ट्रॅजेडी, ही ट्रॅजेडीविषयीची कल्पना चुकीची आहे. मानवी जीवनाला काही हेतू असतो. तो हेतू साध्य करण्यासाठी मनुष्य जी जी साधने मिळतील, ती गोळा करून झगडत असतो; परंतु इतके झगडूनसुद्धा जेव्हा त्याचा हेतू साध्य होत नाही, तेव्हा त्याच्या आयुष्यात वैफल्य निर्माण होते. इथेच खरी ट्रॅजेडी निर्माण होते. ट्रॅजेडीचा नायक हा चांगला असावा लागतो. त्याच्याबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटावी लागते. ही कसोटी ट्रॅजेडीला लावावयास हवी. शेकडो माणसांनी प्रयत्न करूनही जो प्रश्न सुटू शकत नाही, तोच ट्रॅजेडीचा विषय होऊ शकतो. स्वत:च्या अज्ञानामुळे आणि चुकीमुळे ज्याचा शेवट होतो, तो ट्रॅजेडीचा नायकच नव्हे.

तथापि दारू हा काही ट्रॅजेडीचा विषय होऊ शकत नाही. इंग्लंडसारख्या देशात तर ‘एकच प्याला’ हे विनोदी नाटक होईल. संयमाने दारू घेणे काही वाईट नव्हे. विन्स्टन चर्चिल म्हणतो, ‘क १्रिल्ल‘ ु४३ क ंे ल्ली५ी१ १ि४ल्ल‘.’ संयमाने दारू पिणाऱ्याचा सुधाकर होणार नाही. भारतात दारूपान निषिद्ध मानले जाते; त्यामुळे या विशिष्ट समाजापुरता तो ट्रॅजेडीचा विषय होईल. सबंध जगामध्ये ट्रॅजेडी म्हणून या विषयाला स्थान नाही. मद्य, मांस आणि स्त्री यांबद्दल आकर्षण माणसाच्या उपजत प्रवृत्तीमध्येच आहे.

शिवाय एकदा एक प्याला घेतला की तो सुटत नाही, ही कल्पनाही चुकीची आहे. खुद्द गडकऱ्यांनाही हे मान्य नव्हते. ‘एकच प्याला’ या नाटकात त्यांनी दारूच्या संदर्भातच निरनिराळी पात्रे रंगविली आहेत. रामलाल हा इंग्लंडला गेला होता; पण त्याने दारूला स्पर्श केला नव्हता. भगीरथाला दारूची चटक लागली होती, परंतु त्याने दारू सोडली. सुधाकरने एका विशिष्ट परिस्थितीत मद्यपानाला सुरुवात केली आणि त्या व्यसनातून त्याला आपली सुटका करून घेता आली नाही. तर तळीराम हा अट्टल दारूबाज होता. तळीराम हे नाव गडकऱ्यांनी त्यासाठीच ठेवले. जो बाटली हातात घेतली की तळापर्यंत जात असे, तो तळीराम! या चार पात्रांत रामलाल हे गडकऱ्यांच्या दृष्टीने आदर्श पात्र होते. खुद्द गडकरी म्हणजेच रामलाल. त्यांचे नाव राम होते आणि घरात त्यांना लालजी म्हणत असत.

अपमानाचे दु:ख विसरण्यासाठी सुधाकर दारू प्यायला लागला. शरीर जिवंत ठेवून मनाचे दु:ख विसरावयास लावील, असा हा एकच उपाय त्याला सापडला. या व्यसनामधून सिंधूला त्याला वाचविता आले नाही. सिंधू ही इतकी चांगली असूनही त्याला वाचवू शकली नाही. पुष्कळ लोक म्हणतात की, सिंधू फार नेभळट होती. तिने थोडे कडक वागावयास हवे होते; पण सिंधू कडक वागली असती तरी त्याला अध:पातापासून वाचवू शकली नसती, हे गीता तळीरामाला वाचवू शकली नाही, यावरून सिद्ध होते. सिंधू ही गीता झाली असती तरी सुधाकरचा शेवट असाच झाला असता. स्वाभिमानी मनुष्य अपमान विसरण्यासाठी मद्यपान करतो, हे चूक नाही; पण त्याला तोल सावरता आला नाही; इथे ट्रॅजेडीची बीजे आहेत. सिंधूपाशी बाळाच्या गळ्याची शपथ घेऊनही सुधाकराचे व्यसन सुटू शकत नाही, कारण त्याचा अतिरेकी स्वभाव! ‘एकच प्याला’तील ट्रॅजेडीचा उगम सुधाकरच्या अतिरेकी स्वभावामध्ये आहे. ज्याप्रमाणे सुधाकर त्याप्रमाणे सिंधूही अतिरेकी आहे. तिचे पातिव्रत्य पराकोटीला पोहोचलेले आहे. ‘असे पति देवचि ललनांना’ असे ती म्हणते. सिंधूची ट्रॅजेडी म्हणजे हिंदू स्त्रीचीच ट्रॅजेडी आहे. आपल्या गुणांच्या जोरावरही हिंदू स्त्री पुरुषाला सुधारू शकत नाही आणि तिचा विवाह ही तिची उत्तरक्रिया ठरते. अशा रीतीने दोघांच्याही अतिरेकी स्वभावातून येथे ट्रॅजेडी निर्माण होते.

सुधाकर-सिंधू ही जोडी मराठी साहित्यात राम-सीता किंवा हरिश्चंद्र-तारामती या अर्थपूर्ण जोडय़ांप्रमाणे अमर होऊन बसली आहे; तथापि या नाटकातून एकच निष्कर्ष काढता येणार नाही. या दृष्टीने विचार केल्यास हे एक दु:खपर्यवसायी नाटक आहे, असे म्हणता येईल. परंतु व्यापक दृष्टिकोणातून विचार करता त्याला ट्रॅजेडी म्हणता येणार नाही.

(प्र. के. अत्रे लिखित रा. ग. गडकरींच्या साहित्यावरील लेखांच्या स. गं. मालशे यांनी संपादित केलेल्या गडकरी सर्वस्वया संग्रहातून साभार प्रकाशक : परचुरे प्रकाशन मंदिर)

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या