साहित्य संमेलनांतून कोटय़वधी रुपयांची पुस्तकविक्री होत असल्याची चटकदार बातमी माध्यमांतून अलीकडच्या काळात प्रसिद्ध होताना दिसते. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे, याचा ऊहापोह करणारा लेख..

डोंबिवली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. संमेलन नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी गाजत असते. त्यात आणखी गेली काही वर्षे एका बातमीची भर पडली आहे. ती म्हणजे- संमेलनांतून होणारी कोटय़वधी रुपयांची पुस्तकविक्री! त्यात तथ्य किती, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

संमेलन ज्या नगरात होत असते तिथे त्याबद्दल फार अप्रूप आणि कमालीची उत्सुकता  असते. एक तर ते त्या नगरात खूप वर्षांनी किंवा पहिल्यांदाच होत असते. त्यासाठी होत असलेला कोटी कोटींचे आकडे गाठणारा प्रचंड खर्च, भव्य, दिमाखदार मंडप, उपस्थित वलयांकित व्यक्ती, राजकारणी अशा अनेक साहित्यबा कारणांनी ते अधिक गाजते. प्रसार माध्यमांच्या दृष्टीने या सगळ्याला बातमीमूल्य असते. आणि ते स्वाभाविकच आहे.

मग बघता बघता तो एक मोठा ‘इव्हेन्ट’ होऊन जातो. साहजिकच नगरातील आबालवृद्धांसह सर्वाच्याच मनात साहित्य संमेलन म्हणजे काय असते ते बघितले पाहिजे अशा प्रकारचे कुतूहल निर्माण होते. या उत्सुकतेमुळे संमेलन परिसराला एखाद्या जत्रेचे स्वरूप येते. त्या अर्थाने ‘वाचक’ वा ‘साहित्यरसिक’ नसलेले अनेक लोक, अगदी हवशेगवशेसुद्धा तेथे दाखल होतात. संमेलनास बाहेरगावाहून आवर्जून आलेले साहित्यप्रेमी तसेच स्थानिक वाचक, रसिक अशा मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या गर्दीच्या तुलनेने मोजक्याच मंडळींना सभामंडपात होणाऱ्या चर्चासत्रांतून रस असतो. बाकी सर्वाची पावले ग्रंथप्रदर्शनाकडे वळतात. त्यांना सभामंडपात चालू असलेल्या भाषणांत वा चर्चासत्रांत काहीही रस नसतो. लोक सहकुटुंब सहलीला जातात तसे फेरफटका मारायला संमेलनस्थळी येतात. आयोजकांनाही आपल्या गावाची सांस्कृतिक ओळख करून देण्याची हौस असतेच. मग त्याचेही एखादे प्रदर्शन, शिल्पे, रांगोळ्या त्या परिसरात मांडलेल्या असतात.

आता आपण ग्रंथप्रदर्शनाचे स्वरूप पाहू. प्रदर्शनात दोन-अडीचशे गाळे असतात. अर्थात सगळेच गाळे काही पुस्तकांचे नसतात. काही स्वयंसेवी संस्था निधीउभारणी किंवा आपल्या कार्याची ओळख करून देण्यासाठी गाळे घेतात. त्याशिवाय सीडीज्, दैनिके, नियतकालिके यांचेही गाळे त्यात असतात. आयोजकांचे कडक र्निबध नसतील तर खाद्यपदार्थ, बचतगट, त्यांच्या विविध वस्तू आदींचेही गाळे यातच असतात. तशात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झालेली आहे ती आध्यात्मिक गुरूंच्या साहित्यविक्रीची. यात त्यांच्या प्रचाराची आणि आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाची पुस्तके असतात. पण ‘साहित्य’ वा ‘वाचनसंस्कृती’ या अर्थाने त्याची मोजदाद करावी का, हा प्रश्न आहे. त्यात आता नव्या डिजिटल युगाचे अपत्य.. ई-बुक! त्याचीही चाहूल मराठी प्रकाशकांना लागलेली आहेच. ही ई-बुक्सही नक्कीच अवतरणार आता. पण त्यांची तिथे लगेच विक्री होईल असे नाही. प्रत्यक्ष पुस्तकविक्री न करता आपल्या वेबसाइटची, प्रकाशन संस्थेची प्रतिमा वाचकांच्या मनावर ठसवणारे असे आणखी काही ‘प्रायोगिक’ गाळे लक्षात घेता निव्वळ पुस्तकविक्रीचे गाळे हे एकूण गाळ्यांच्या ६० ते ६५ टक्के इतकेच असतात असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे.

प्रदर्शन खूप मोठे असते आणि प्रत्येक रसिकाला प्रत्येक विक्रेत्याकडे जाता येतेच असे नाही. ते शक्यही नाही. प्रवेशद्वारालगतचे पन्नास-साठ गाळे, तसेच नामवंत पुस्तकविक्रेते आणि वाचक ज्यांना शोधत फिरतात अशा मोजक्या प्रकाशकांची विक्री चांगलीच होते. यापैकी एखाद्याच्या विक्रीचा आकडा विचारून त्याची खातरजमा न करता त्याला दोनशेने गुणून तीन कोटींच्या विक्रीच्या बातमीचे उड्डाण माध्यमातून होते. अशा प्रकाशकाचे सात-आठ गाळे असतात हेसुद्धा गुणाकार करताना लक्षात घेतले जात नाही. पण वस्तुस्थिती तशी नाही. तीन कोटी हा आकडा अतिरंजित असला तरी ग्रंथविक्री चांगली होते, हे खरेच आहे.

आता कोणत्या पुस्तकांना किती प्रतिसाद असतो, ते पाहू. सध्या ‘स्वयंमदत’ स्वरूपाच्या पुस्तकांची चांगली विक्री होत आहे. पाककृती, ज्योतिष, धार्मिक, आरोग्य या विषयांची पुस्तके चांगली खपतात. आत्मचरित्रे, चरित्रे, पौराणिक, ऐतिहासिक कादंबऱ्या ही मराठी वाचकांची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, अशी हमखास खपणारी पुस्तके प्रकाशकाला आर्थिक स्थैर्य देतात. त्यामुळेच पूर्णपणे नव्या अशा एखाद्या ललित लेखकाची कादंबरी वा कथासंग्रह काढण्याचे धैर्य प्रकाशक दाखवू शकतो. पण वाचनसंस्कृतीचा विचार करत असताना निव्वळ ललित स्वरूपाची कादंबरी, कथा, कविता असलेली पुस्तके किती खपतात याची एक स्वतंत्र पाहणी या व्यवसायातील सर्वानी मिळून करण्याची आता गरज आहे. संमेलनात अशा ललित पुस्तकांना प्रतिसाद जरा अधिक मिळतो, इतकेच! जगभरची विविध विषयांची अनुवादित पुस्तके मराठीत जोमाने येत आहेत. वाचकांचे जगाबद्दलचे कुतूहल वाढल्यामुळे याही पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळतो. समीक्षा, वैचारिक, सामाजिक अशा काही गंभीर विषयांवरची पुस्तकविक्री ही मात्र जरा गंभीरच बाब आहे.

आता या सगळ्यासाठी प्रकाशक आणि विक्रेते घेत असलेले कष्ट आणि आर्थिक तोशीस पाहू. आपले दैनंदिन कामकाज आठवडाभर बंद ठेवणे, मोठय़ा प्रमाणात पुस्तकांची ने-आण करणे, वाहतूक खर्च आणि माणसांचा प्रवास व निवासखर्च करणे, जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी सवलत देणे, चोरी, पुस्तके गहाळ होणे, धूळ बसून खराब होणे अशी गळती होतेच. हा सगळा खर्च आणि खटाटोप बघता संमेलनातील पुस्तक- विक्रीतून खूप नफा होतो, ही निव्वळ धूळफेक आहे. त्यात कुठे एका टोकाला आपली जागा आली (संमेलनात सोडत पद्धतीने जागावाटप होते.) तर नुकसान होण्याचा संभवच अधिक. पण आशा सुटत नाही आणि देव भेटत नाही, तशातली गत. मग प्रश्न उरतो तो- इतक्या मोठय़ा संख्येने प्रकाशक यात सहभागी का होतात? तेही पाहू.

मराठीत प्रकाशकांची संख्या खूपच जास्त आणि विक्रेत्यांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. इतर उत्पादनांबाबत हे प्रमाण नेमके उलटे असते, हे प्रकाशकांचा विषय निघाला की नाके मुरडताना कोणी लक्षात घेत नाही. विक्रेत्याकडे प्रकाशकाची सर्व पुस्तके कधीच उपलब्ध नसतात. ते शक्यही नाही. त्यामुळे आपण प्रसिद्ध केलेली सर्व पुस्तके वाचकांसमोर प्रदर्शित करण्याची ही एक संधी असते. माध्यमात गाजणारी, जाहिराती आणि सवलत योजना सुरू असलेली आणि सातत्याने विकली जाणारीच पुस्तके विक्रेते ठेवू शकतात. एरव्ही वाचकांच्या दृष्टीस न पडणारी, पण खपाची शक्यता असणारी पुस्तके आणि वाचक यांची गाठभेट अशा संमेलनांसारख्या ठिकाणीच होते. चोखंदळ वाचक, त्या- त्या विषयाचे जाणकार, संग्राहक अशी पुस्तके शोधत येतात आणि अशा काही अनवट पुस्तकांची विक्री संमेलनात होते, ही जमेची बाजू. शिवाय अशा प्रदर्शनात होणारी विक्री ही ‘रोख’ असते. एरव्ही हा व्यवसाय उधारीचा असल्यामुळे प्रकाशक बहुतेक ‘कॅशलेस’च असतात!!! त्याशिवाय वाचकांशी, लेखकांशी संवाद याच ठिकाणी  होतो. आपल्या पुस्तकांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद प्रत्यक्ष बघून प्रकाशक सुखावून गेला तर नवल नाही. त्यातूनच काही नवे संकल्प आकाराला येऊ  शकतात. आर्थिक फायदा नाही झाला, वा कमी झाला तरी एव्हढय़ा मोठय़ा संख्येने वाचकांना सामोरे जाऊन, ही आपली ‘बाजारपेठ’ पाहून प्रकाशकाची उमेद टिकून राहते.

पण माध्यमात गाजते ती कोटीच्या कोटी पुस्तकविक्रीची चटकदार बातमी!!! अंगावर आणि पुस्तकांवर धूळ घेऊन बहुतेक प्रकाशक घरी परततात तेव्हा त्यांचे आप्त त्यांच्याकडे लक्ष्मीदर्शन झाल्यासारखे बघतात आणि प्रकाशकाचा अमेरिकेहून परतलेला ‘देवदत्त’ होतो.

डोंबिवलीत काय होते ते आता पाहूच!!!

विकास परांजपे vikas@jyotsnaprakashan.com