‘कादंबरी’ हा शब्द भारतीय परंपरेतील असला तरी वाङ्मयप्रकार म्हणून तो पाश्चात्त्य साहित्याच्या संरचनेतून तयार झालेला आधुनिक लेखनप्रकार आहे. हा वाङ्मयप्रकार समग्र मानवी जीवनाला कवेत घेणारा आहे. यामुळेच मराठवाडय़ातील समग्र ग्रामजीवन समजून घेण्यासाठी प्रदीप पाटील यांची ‘गावकळा’ ही कादंबरी लक्ष वेधून घेते.  ‘संदर्भ शोधताना’ (कवितासंग्रह) व ‘होरपळ’ (कथासंग्रह) यांसारख्या कलाकृतींनंतर प्रदीप पाटील यांची ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठवाडय़ामधील नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली तालुक्यात हज्जापूर नावाचे खेडे आहे. तेथील गंगाराम बाबा शिळेकर हा सरपंच ‘जोपर्यंत आपला गाव हागणदारीमुक्त होत नाही तोपर्यंत पायात वहाणा व अंगभर कपडे घालणार नाही,’ अशी प्रतिज्ञा करतो. ही बातमी लेखकास अस्वस्थ करून सोडते. आणि त्यातूनच ही कादंबरी जन्मास येते.

कादंबरीची सुरुवात सखाबापू या गावातील नवोदित सरपंचाने माजी सरपंच दाजिबा पाटील यांचे आशीर्वाद घेऊन गाव हागणदारीमुक्त करण्याच्या संकल्पापासून होते. तसे पाहता हा दाजिबा पाटील सखाबापूचा राजकारणातील विरोधक. त्यांच्या मुलास पराभूत करूनच सखाबापू गावचा सरपंच झालेला. परंतु राजकारणातील विरोधासाठी विरोध ही वाईट परंपरा छेदून चांगल्या कामासाठी मदत करणारा दाजिबा पाटील आहे. त्यांच्या आशीर्वादरूपी सहकार्यातून सखाबापू प्रथम ग्रामसभा भरवतो. पण या सभेला चांगला प्रतिसाद मिळत नाही. ग्रामस्वच्छतेची कल्पना सरपंच सखाबापू व ग्रामसेवक डुकरे यांनी मांडूनही गावातील काही लोक या प्रकल्पास विरोध दर्शवतात. सखाबापू अगदी कळवळून गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगतो. पण प्रत्येक गावात असे काही लोक चांगल्या कामात आडकाठी घालणारे असतातच. या ठिकाणीही राघोबा मास्तर, अप्पा गुरव, अण्णाजी खंडू, इंदर बनसोडे व सुजित कांबळे या उपक्रमाची खिल्ली उडवत असतात. पण त्यांच्या विरोधाची तमा न बाळगता सखाबापू दुसऱ्या दिवशी चार तरुण पोरांना घेऊन प्रथम गावात फेरफटका मारतो. त्याच्या असे नजरेस येते, की संपूर्ण गावच अस्वच्छ असून गावकऱ्यांना ही अस्वच्छता सवयीची झाली आहे. तरीही जिद्द न सोडता सखाबापू सगळ्यांना विनवणी करून स्वच्छतेची महती पटवून देत असे. लोक ‘हो.. हो’ म्हणायचे, पण सखाबापूची पाठ फिरली की दुर्लक्ष करायचे असा प्रकार सुरू होता.

सखाबापूने सखोल विचारांती ग्रामस्वच्छतेसाठी मनातल्या मनात काही नियोजन तयार केले. प्रथम गावकऱ्यांना आपल्या घरासमोरील रस्ते झाडण्यासाठी सांगूनही कोणीच पुढे येत नव्हते, म्हणून मग आपणच हातात झाडू घेऊन गावातील प्रत्येक रस्ते दररोज झाडण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांना काही चांगली तरुण मंडळी मदत करीत होती. यामुळे सखाबापूच्या नियोजनातील पहिला टप्पा जवळपास यशस्वी झाला. दुसरा टप्पा म्हणजे घरासमोर जमा झालेला कचरा, शेणाचा ढिगारा गावाशेजारी हलविण्याचा. त्यासाठी त्याने गावात प्रतिष्ठित असलेल्या दाजिबा पाटील व त्यांच्या बंधूंना ही कल्पना सांगितली. हेतू असा, की गावातील मोठा माणूस हे काम हाती घेईल तर बाकीचे लोक आपोआपच ते करतील. सखाबापूचा मान ठेवत या दोन बंधूंनी आपल्या घराजवळील कचऱ्याचा ढीग काढून गावाशेजारील आपल्या शेतालगत गावठाण म्हणून पडीक असलेल्या जमिनीवर नेऊन टाकला. तरीही ग्रामस्थांना फितवून व महसूल प्रशासनास निनावी पत्र लिहून सखाबापूच्या कार्यास राघोबा मास्तर विरोध करतच असतो. याही टप्प्यात यशस्वी झाल्याने सखाबापू स्वच्छता मोहिमेचा तिसरा टप्पा हाती घेतो. तो म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरासमोर स्वच्छतागृह बांधणे. लोकांना परंपरेने बाहेर शौचकर्मास जाण्याची सवय होती. तेव्हा घराजवळ वा स्वयंपाकघराशेजारी स्वच्छतागृह बांधणे त्यांना विचित्र वाटत होते. वेगवेगळी कारणे सांगून लोक टाळत होते. शेवटी सखाबापूने आपली एक एकर जमीन गहाण ठेवून गोरगरीबांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी लागणारी साधनसामुग्री मोफत वाटण्याचा उपक्रम हाती घेतला. पण या योजनेचा गरीब माणसे फायदा न घेता गावातील बऱ्यापकी श्रीमंत असलेली माणसेच वेगवेगळी कारणे सांगून ते सामान घेऊन जाऊ लागली. या महत्त्वपूर्ण योजनेनंतर सांडपाण्याचा वापर घराशेजारी भाजीपाला, झाडे लावण्यासाठी कसा करावा, हे सखाबापू लोकांना पटवून देऊ लागला. या सगळ्या बदललेल्या परिस्थितीने गाव सुंदर दिसू लागले. वर्तमानपत्रांतून त्याबद्दलची बातमी झळकू लागली. शासनाची समिती येऊन या गोष्टीची पाहणी करून गेली. अनेक अडीअडचणींना तोंड देत शेवटी सखाबापूला निर्मल ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते घेण्यासाठी दिल्लीला बोलावणे आले. पुरस्काराच्या एक दिवस आधी पुरस्कारप्राप्त गावाची अंतिम पाहणी म्हणून सॅटेलाइटद्वारे गावाची तपासणी केली जात होती. सखाबापूचे गाव जेव्हा समितीकडून पाहिले जात होते तेव्हा गावातील काही माणसे हातात लोटा (तांब्या) घेऊन शौचासाठी बाहेर जात असल्याचे दिसून आले. ते पाहून समितीने त्यांचा पुरस्कार रद्द केला. एवढे कष्ट व अथक प्रयत्नांनंतरही अपयश आल्याने सखाबापू मोकळ्या हातांनी गावी परत आला.

सखाबापूला अतिशय वाईट वाटले. काही दिवस तो घराबाहेरही पडला नाही. गावकऱ्यांनाही आपल्या गावाचा झालेला हा अपमान जिव्हारी लागला. गावातील दाजिबा पाटील व अन्य काही प्रतिष्ठितांनी सखाबापूला पुन्हा बळ देऊन उभे केले. त्याने गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा लढाईस सुरुवात केली. यावेळी मात्र त्याला यश प्राप्त झाले व त्याच्या गावास पुरस्कार प्राप्त झाला. येथे ही कादंबरी संपते.

‘गावकळा’ या कादंबरीत मुख्य नायक सखाबापूच आहे, पण त्याला मदत करणारी चांगली माणसे म्हणून दाजिबा पाटील, धनगराचा गोपू, रघू जमादार, दगडू कोळी, सोनबा खरात, सायबू जगताप, बालू, वसंता आदी पात्रे कादंबरीत येतात. गावातील खलनायकाच्या भूमिकेत राघोबा मास्तर आहे. ही सगळी पात्रे जिवंतपणे उभी करण्यात लेखकास कमालीचे यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या गुणदोषांसह ही पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

‘गावकळा’ कादंबरीचे वेगळेपण म्हणजे त्यातील भाषाशैली. काही अपवाद वगळता मराठवाडय़ातील बोलीभाषेचा मोठय़ा प्रमाणात वापर मराठी साहित्यात झालेला दिसत नाही. पण ‘गावकळा’ कादंबरीत आलेले शब्द, म्हणी, शिव्या, वाक्प्रचार, बोलीतील आघात, लय, वाक्यरचना मराठवाडी बोलीभाषेला न्याय देणारी ठरली आहे. उदा. येयनावणी, केधोळ, वंगळढय़ाण, तरास, कुंकड गेल्यास हिकडऽ, चितर, इरोध, च्छा, न्हयाळत, हिंगबापूऽ, गरामसभा, गडय़ा, इंजनेर, उकंडा, लईबी असे असंख्य शब्द पानोपानी आढळतात. पात्रांमधील संवादही कथानकाला गती देतात.

‘गावकळा’ कादंबरीच्या भरपूर जमेच्या बाजू असूनही काही त्रुटीसुद्धा जाणवतात. उदा. ही कादंबरी निर्मल ग्रामस्वच्छतेची कहाणी वाटते. यासोबतच लेखकाने सीमा परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडींचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला असता तर कादंबरीचा अवकाश अधिक वाढला असता. काही काही प्रसंग जाहिरातीसारखे दिसतात. उदा. शौचालय बांधले नाही म्हणून घटस्फोट होणे, सखाबापूवर आरोप करण्यासाठी रंगवलेला प्रसंग, कादंबरीचा चित्रपटासारखा गोड शेवट, तीन वर्षांचे कथानक घडताना गावातील उत्सवांना दिलेली बगल, ओवीगीते, इ. प्रसंगांकडे लेखकाने केलेले दुर्लक्ष सहज नजरेत येते. अर्थात या काही फार मोठय़ा प्रमाणातील मर्यादा नाहीत, पण ते मांडणे लेखकाला सहज शक्य होते. मराठवाडय़ातच नाही, तर महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण भागात विकासाची विधायक कामे करताना विघातक प्रसंग कसे उभे राहतात याचे ज्वलंत व वास्तव चित्रण म्हणजे ‘गावकळा’ ही कादंबरी होय.

‘गावकळा’- प्रदीप धोंडिबा पाटील,

राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- २४८, मूल्य- २६० रुपये.