भारताला दर्यावर्दी असण्याची अभिमानास्पद परंपरा आहे. याच परंपरेशी २१ व्या शतकात नाते सांगते ते भारतीय नौदल. गेल्या दशकभरापासून भारतीय नौदलाचा जगभरात बोलबाला आहे. सध्या आपले नौदल हे संख्याबळाच्या बाबतीत जगातील पाचवे सामथ्र्यशाली नौदल आणि कौशल्याच्या बाबतीत बोलायचे तर त्याचा समावेश पहिल्या तीन नौदलांमध्ये होतो. महासागरांमध्ये केलेल्या प्रत्यक्ष कारवायांमध्ये भारतीय नौदल अमेरिकन नौदलाच्याही तसूभर पुढेच आहे. सागरी चाच्यांवर वचक ठेवणारे नौदल अशी त्याची जागतिक प्रतिमा आहे. हीच प्रतिमा उंचावणारा आणि महासमन्वयापासून ते इतर कौशल्यांचे सामथ्र्य प्रकट करणारा आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाचा सोहळा विशाखापट्टणम येथे ४ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. त्याविषयी..

मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील प्राचीन गुहाचित्रांचा शोध लावणारे प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. हरिभाऊ वाकणकर लंडनच्या म्युझियममध्ये ठेवलेली राजा भोजच्या दरबारातील सरस्वतीची शिल्पकृती तब्बल तीन तास निरखत होते. तेथील सुरक्षा रक्षकाने ही बाब म्युझियमच्या संचालकांच्या लक्षात आणून दिली. त्याने हरिभाऊंना गाठले आणि चौकशी केली. शिल्पकृती निरखणारी व्यक्ती हरिभाऊ वाकणकर आहेत, हे कळल्यानंतर त्याने आदराने त्यांना एका विशेष खोलीत नेले व सांगितले की, ‘‘आजवर भारताला भेट दिलेल्या अनेकांच्या दैनंदिनी या कपाटात आहेत. या खोलीत केवळ तज्ज्ञांनाच प्रवेश आहे, तुम्ही तज्ज्ञ आहात. हवी ती दैनंदिनी पाहू शकता, वाचू शकता. फक्त बाहेर नेण्यास मनाई आहे.’’ त्यातील वास्को द गामाची दैनंदिनी त्यांनी वाचायला घेतली आणि त्यांनाही धक्का बसला.. सोन्याचा धूर येणाऱ्या भारताच्या शोधात का निघावेसे वाटले इथपासून इतर अनेक नोंदी त्यात होत्या. त्यासाठी केलेली तयारी आणि प्रत्यक्ष प्रयाण.. आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून थोडे दूर आल्यावर एक भले मोठे प्रचंड आकाराचे जहाज पाहून तो अचंबित झाला. त्या जहाजावर नोकराला धाडले. नोकराने परतल्यावर जे सांगितले त्याने हरखून जाऊन अंगावर गाऊन चढवत, तोही त्या जहाजावर गेला. एक ढेरपोटय़ा व्यापारी जहाजाचा मालक होता. भारत शोधायला निघालोय, असे त्याला सांगितल्यावर तो गडगडाटी हसला, अशी नोंद वास्को द गामाने केली आहे. पुढे त्याने लिहिले आहे, व्यापारी म्हणाला, ‘‘अरे, तू काय भारत शोधणार? आमच्या अनेक पिढय़ा मसाल्याच्या पदार्थाच्या विक्रीसाठी भारतातून इथे येतात. दोन दिवसांत माल संपतो व आम्ही परत जातो. दोन दिवस थांब, आमच्या मागोमाग ये.’’ त्यानंतर दोन दिवसांत गामा त्याच्यासोबत बाजारपेठेत फिरला व त्याच्या मागोमाग भारतात आला, त्याची सविस्तर नोंद या दैनंदिनीत आहे. यात त्या व्यापाऱ्याच्या व्यापारी कौशल्याविषयीही गामाने लिहून ठेवले आहे.. आपण मात्र भारताचा शोध कुणी लावला, याची गाळलेली जागा भरताना शाळेत वास्को द गामा अशी नोंद करून गुण मिळवतो!
lr06
इथे मुद्दा भारताचा शोध कुणी लावला याचा नाही, तर भारतीय मंडळी ही प्राचीन काळापासूनच दर्यावर्दी होती, याचा आहे. भारत हा त्या वेळेस जगातील सर्वात समृद्ध देश होता. हडप्पा आणि मोहेंजोदारो या सापडलेल्या भारतीय प्राचीन शहरांचेही जगभरातील तत्कालीन प्राचीन शहरांशी व्यापारी संबंध होते, हे बॅबिलोनिया- मेसोपोटामिया येथे सापडलेल्या हडप्पन मृत्तिकांवरून पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. या तिन्हींचा समावेश जगातील तत्कालीन समृद्ध संस्कृतींमध्ये होत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, समृद्धीचा अन्योन्य संबंध हा दर्यावर्दी आणि व्यापाराशी आहे आणि भारताला दर्यावर्दी असण्याची अभिमानास्पद परंपराही आहे.
याच परंपरेशी २१ व्या शतकात नाते सांगते ते भारतीय नौदल. गेल्या दशकभरापासून भारतीय नौदलाचा जगभरात बोलबाला आहे. सध्या आपले नौदल हे संख्याबळाच्या बाबतीत जगातील पाचवे सामथ्र्यशाली नौदल आणि कौशल्याच्या बाबतीत बोलायचे तर त्याचा समावेश पहिल्या तीन नौदलांमध्ये होतो. येणाऱ्या १०-१५ वर्षांत भारत महासत्ता होणार, अशी चर्चा भारतात व बाहेरही सुरू आहे. महासत्ता होण्याचे पहिले दोन निकष हे आर्थिक आणि महासागरावरील जागतिक सत्ता असे आहेत. याही दृष्टीने भारतीय नौदल महत्त्वाचे ठरते. यापूर्वीच भारताचा समावेश ब्लू वॉटर नेव्हीमध्ये झाला आहे. ब्लू वॉटर नेवी याचा अर्थच असा की, कोणत्या क्षणी आढावा घेतला की, तुमच्या युद्धनौका जगभरात सर्वत्र अशा पद्धतीने विखुरलेल्या असतात की अवघ्या काही तासांत कोणत्याही जागतिक कारवाईत सहभागी होऊ शकतात. नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा एकाच ठिकाणी थांबलेल्या नसतात, त्यामुळे अशा प्रकारे त्यांची रचना करणे हे सामरिकदृष्टय़ा अवघड असते. महासागरांमध्ये केलेल्या प्रत्यक्ष कारवायांमध्ये भारतीय नौदल अमेरिकन नौदलाच्याही तसूभर पुढेच आहे. सागरी चाच्यांवर वचक ठेवणारे नौदल, अशी त्यांची जागतिक प्रतिमा आहे. हीच प्रतिमा उंचावणारा आणि महासमन्वयापासून ते इतर कौशल्यांचे सामथ्र्य प्रकट करणारा आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाचा सोहळा आता भारतात होऊ घातला आहे.
राष्ट्रपती हे देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असतात. या नात्यानेच त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असताना साधारणपणे चौथ्या वर्षांच्या अखेरीस किंवा पाचव्या वर्षी भारतीय नौदलातर्फे त्यांच्या सन्मानार्थ नौदल ताफा संचलनाचे आयोजन केले जाते. भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे मुख्यालय व तळ विशाखापट्टणम येथे, तर पश्चिम विभागाचे मुख्यालय व तळ मुंबई येथे आहे. या दोहोंपैकी एका ठिकाणी भर समुद्रामध्ये (मुंबईत अरबी समुद्रात, तर विशाखापट्टणमला बंगालच्या उपसागरात) या नौदल ताफा संचलनाचे आयोजन करण्यात येते. भारतीय नौदल ताफ्यातील जवळपास सर्व प्रकारच्या वर्गातील प्रत्येकी चार युद्धनौका तसेच पाणबुडय़ा व टँकरनौका, त्याचप्रमाणे अलीकडेच नौदलात दाखल झालेल्या अतिवेगवान गस्तीनौका यात सहभागी होतात. यापैकी एकाला युद्धनौकेला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा मान दिला जातो. त्या युद्धनौकेवरून राष्ट्रपती ताफा संचलनाचे निरीक्षण करतात. सर्व युद्धनौका व पाणबुडय़ा खोलवर समुद्रामध्ये चार- पाच रांगांमध्ये ओळीने उभ्या असतात. दोन रांगांच्या मधून राष्ट्रपतींची युद्धनौका जाऊ शकेल, एवढे सुरक्षित अंतर दोन रांगांमध्ये राखण्यात येते. राष्ट्रपतींची नौका प्रत्येक युद्धनौका आणि पाणबुडीवरील नौसैनिक व अधिकाऱ्यांची मानवंदना स्वीकारत पुढे जाते. राष्ट्रपतींची नौका समोर येताच डोक्यावरील नौदलाची टोपी समोर धरून राष्ट्रपतींना अभिवादन केले जाते. तर युद्धनौकेचे नेतृत्व करणारा कॅप्टन कडक सॅल्यूट करत त्यांना अभिवादन करतो. रांग संपली की, राष्ट्रपतींची नौका वळून दुसऱ्या रांगेतील युद्धनौकांकडून मानवंदना स्वीकारत पुढे सरकते. हा सोहळा सुमारे तीन तास सुरू असतो. संचलनाच्या अखेरीस राष्ट्रपती नौदलातील नौसैनिक व अधिकाऱ्यांना उद्देशून भाषण करतात. भाषण संपल्यानंतर राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरने युद्धनौकेवरून उड्डाण केले की सोहळा संपतो.
lr07
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनही अशाच प्रकारे होते. फरक इतकाच की, त्यात केवळ भारतीय नव्हे तर जगभरातील अनेक नौदलांच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा सहभागी होतात. अशा प्रकारचे भारताने आयोजित केलेले आपले पहिले आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन २००१ साली मुंबईनजीक अरबी समुद्रामध्ये पार पडले. आता बरोबर १५ वर्षांनंतर भारतीय नौदलातर्फे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाचे (आयएफआर) आयोजन विशाखापट्टणम येथे ४ ते ८ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. तब्बल ५० देशांच्या नौदलांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. शिवाय आणखी काही देशांच्या नौदलांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे १३० युद्धनौका त्यांवर असलेल्या सुमारे २५ हजार नौसैनिक व अधिकाऱ्यांसह सहभागी होतील, असे चित्र आहे. सर्वच देशांचे नौदल अधिकारी व नौसैनिक या प्रसंगी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मानवंदना देतील.
आयएफआरचे आयोजन करण्याची संधी हा कोणत्याही देश, राज्य आणि शहरासाठी सन्मानाचा भाग असतो. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारही या आयोजनासाठी कंबर कसून कामाला लागले आहे. स्थानिक नागरिक हे आयएफआरचे यजमान असल्याची जाणीव राज्य शासनाने करून दिली आहे. आणि सहभागी देशांच्या नौदलांच्या पदपथ संचलनासाठी विशाखापट्टणम सज्ज झाले आहे.
lr08
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच जगभरातील ५० नौदलांच्या युद्धनौकांचे आगमन होण्यास सुरुवात होईल. या सर्वाना बंदरात जागा देणे केवळ अशक्यच असल्याने त्यांना किनाऱ्यापासून आतमध्ये खोलवर समुद्रात उभे राहावे लागेल. अशा सुमारे सव्वाशे ते दीडशे युद्धनौकांच्या उभे राहण्याची सोय समुद्रात करणे आणि त्यावरील नौसैनिक व अधिकाऱ्यांची समुद्रातून किनाऱ्यावर ये-जा करण्याची सोय करणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे. केवळ एवढेच नव्हे, तर त्या सर्वाचे आगत्यही करावे लागेल. त्यांच्या जेवणाची सोय थेट करावी लागली नाही तरी ते आपले पाहुणे असल्याने त्यांच्या दाण्यापाण्याची सोय निश्चितच करावी लागणार. त्यांचा हा दौरा संस्मरणीय ठरेल, असे आयोजन करणे हे नौदलाचे कौशल्य असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या बंदरात आयता नांगर टाकण्याची संधी मिळणे ही इतर नौदलांसाठी गुप्तवार्ता मिळविण्यासाठीची संधी असली तरी आपल्या सुरक्षा यंत्रणेचा मात्र त्यात कस लागणार आहे. म्हणजे एकाच वेळेस त्यांना पाहुणे म्हणून संधी देताना त्यांना आपल्या गुप्तगोष्टी इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून हाती लागणार नाहीत याची खातरजमा करावी लागेल आणि त्याच वेळेस त्यांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी लागेल. आयसिससारख्या संघटना तर अशा आयोजनांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोणतीही आगळीक होऊन देशाचे नाव कलंकित होणार नाही, यासाठी सर्व गुप्तचर यंत्रणा गेले सहा महिन्यांहून अधिक काळ डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून आहेत. आयएफआरचे आयोजन हा देशाच्या शिरपेचातील तुरा ठरणार असला तरी ते प्रत्यक्षात घडून येण्यासाठी गेले अनेक महिने अनेक यंत्रणांचा महासमन्वय सुरू आहे. प्रत्यक्ष जमिनीवर म्हणजे विशाखापट्टणम शहरात आणि समुद्रामध्ये असा एकाच वेळेस दोन ठिकाणी हा महासमन्वय साधावा लागणार आहे.
भारतीय नौदलाची सज्जता स्पष्ट करून देशवासीयांमध्ये एक आश्वस्तता निर्माण करणे, आयएफआरसारखे महासमन्वयाचे मोठे कार्य करण्याची क्षमता भारत राखतो हे जगाला दाखवून देणे, त्याच वेळेस दहशतवादी हल्ल्याची शक्यता असतानाही सुरक्षा व्यवस्था एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हाताळण्याची असलेली क्षमता; आणि हे सारे करतानाच आपल्या नौदल सामर्थ्यांचे प्रदर्शन हे सारे हेतू या आयएफआरमागे आहे. पराकोटीची शिस्त असल्याशिवाय एवढे मोठे आयोजन शक्यच नसते.
आयएफआर ही इतर ५० निमंत्रित देशांच्या नौदलांसाठीही मोठी अनोखी संधी असणार आहे. यानिमित्ताने आपली व्यावसायिक कौशल्य इतर नौदलांना कवायती- सरावादरम्यान दाखविता येतात, शिवाय दोन देशांच्या नौदलांमध्ये समन्वय साधण्याचे कौशल्यही इथेच शिकता येते. सध्या सागरी चाच्यांच्या हल्ल्याची भीती सर्वानाच आहे, अशा वेळेस अनेक नौदलांना समन्वय साधून काम करावे लागते, त्याची रचना व आखणी करण्यासाठी आयएफआर ही मोठी संधी असते.
lr09
आयएफआरच्या निमित्ताने संरक्षणविषयक मेक इन इंडिया प्रदर्शनाचे आयोजनही विशाखापट्टण येथे करण्यात आले आहे. स्वयंपूर्ण बनावटीच्या संरक्षणविषयक बाबी प्रदर्शनाचे आकर्षण असतील. यात भारतीय तरुणाईची ताकद पाहायला मिळेल.
आयएफआरवर अब्जावधींचा खर्च करून भारताला काय मिळणार किंवा भारत काय साधणार? या प्रश्नाचे उत्तरच भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. भारताच्या एका बाजूला अरबी समुद्र, दुसरीकडे बंगालचा उपसागर, तर तिसरीकडे हिंदी महासागर आहे. जगाचा ८५ टक्के व्यापार यातील अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातून होतो. त्यामुळे इथे आपले वर्चस्व असणे खूप महत्त्वाचे आहे. शिवाय गेल्या १० वर्षांत चीनने म्यानमारशी करार करून बंगालच्या उपसागरात त्यांचे अस्तित्व वाढवले आहे. हिंदी महासागरातील त्यांच्या कारवायाही वाढविल्या आहेत. अशा वेळेस आपल्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. आयएफआर हे आदरातिथ्याचे निमित्त असले तरी ते साधून आपण एकाच वेळेस अनेक प्रकारच्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करणार आहोत. जगभरातील ५० हून अधिक नौदलांनी भारताच्या आयएफआरमध्ये सहभागी होणे हा हितशत्रूंना दिलेला इशारा असतो. कारण निमंत्रण देणारा किती शक्तिशाली आहे, यावर ते निमंत्रण स्वीकारायचे की नाही, हे निमंत्रित ठरवत असतो. त्यातील त्यांचा सहभाग कसा असणार हेही यजमानांच्या सामर्थ्यांवर ठरत असते. मैत्री हा सौहार्दाचा भाग असला तरी त्यातील अंतर्गत धागे किंवा वीण यामध्ये सामथ्र्य महत्त्वाचे असते. आपण उगाचच कुणाशीही मैत्री करायला जात नाही. मैत्रीही सामथ्र्यशाली मित्राशी असावी, असेच कुणालाही वाटते. ‘महासागरातून एकात्मता’ असे बोधवाक्य असलेल्या या आयएफआरच्या आयोजनामागची नेमकी हीच (मूक) भूमिका आहे. यातून आपण महासागरावरचा वचक आणि जागतिक मैत्री दोन्ही एकाच वेळेस साधणार आहोत!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com

Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
one dead in Accident on JNPT Palaspe National Highway
जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
Sealed by an international organization on the name Chandrayaan 3 landing site Shiva Shakti
‘शिवशक्ती’ नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिक्कामोर्तब