हृदयाला भिडणारं गाणं..

किशोरीताईंच्या गाण्यात जयपूर घराण्याची सारी वैशिष्टय़ं होती.

किशोरीताईं

किशोरीताईंची तान अप्रतिम होती. त्यांच्या गाण्यात लयीशी झटापट नसते, तर लयीला सूक्ष्मपणे उचलून धरलेलं असतं. त्यामुळेच त्यांचं गाणं थेट हृदयाला भिडतं.

किशोरीताईंचं गाणं मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. ज्या मोठय़ा गायकांचं गाणं मी सुरुवातीच्या काळात ऐकलं, त्यात किशोरीताई या पहिल्या होत्या. मला आजही आठवते ती यवतमाळमधल्या एका गावात झालेली त्यांची मैफील. तेव्हा मी लहान होतो. गाण्यातलं फार काही मला कळत होतं असं नाही, पण त्यावेळी किशोरीताईंनी गायलेला तिलककामोद अजूनही आठवतो. त्याचा तेव्हा माझ्यावर फार प्रभाव पडला होता. त्या लहान वयात किशोरीताईंच्या गाण्याशी ही अशी ओळख झालेली. नंतरच्या काळात तर त्यांच्या बऱ्याच रेकॉर्डिग ऐकल्या. प्रत्यक्ष मैफिलींच्या कार्यक्रमांतूनही त्यांचं गाणं अनेकदा ऐकलं. त्या काळात जयपूर घराण्याचं मला आकर्षण होतंच, पण किशोरीताईंच्या गाण्याने माझं मन त्याकडे पुढेही आकर्षित होत राहिलं. जयपूर घराण्याचं गाणं हे बौद्धिक गाणं आहे. अनवट राग, समेला येण्याची त्यांची अनोखी पद्धत, आकाराने सुरुवात करणे ही त्याची काही वैशिष्टय़ं. त्यामुळे पुढे मी माझे गुरू गजाननबुवा जोशी यांच्याकडून जयपूर गायकीही शिकलो.

किशोरीताईंच्या गाण्यात जयपूर घराण्याची सारी वैशिष्टय़ं होती. तरीही अनेकजण असं म्हणतात की, त्यांनी जयपूर घराण्याची चौकट मोडून आपली गायकी तयार केली. परंतु मला हे म्हणणं तितकंसं बरोबर वाटत नाही. किशोरीताईंनी स्वत:च अनेक वेळा हे सांगितलं आहे, की माझ्या रक्तातच जयपूर घराणं आहे. त्यांचं गाणं ऐकताना आपल्याला जयपूर घराणं सारखं जाणवत राहतं. त्यामुळे चौकट मोडली म्हणण्यापेक्षा त्यांनी चौकट कायम ठेवून त्यात नवीन गोष्टींची भर घातली, हे म्हणणं अधिक सयुक्तिक होईल. स्वराचा भाव, रागाचा भाव गाण्यात आणण्यासाठी त्यांची धडपड होती. रागाचा भाव काय आहे, हेच त्या त्यांच्या गाण्यातून सांगत असत. आणि हे त्यांचं मोठं योगदान आहे. हे पहिल्यांदाच होत होतं, असंही मी म्हणणार नाही. आपल्या मूळ घराणा गायकीत नवीन  गोष्टींची भर घालणं हे आधीही अनेकांनी केलं आहे. त्यामुळे त्या त्या काळात असे प्रयोग करणाऱ्यांची गायकी मूळ गायकीपेक्षा वेगळी वाटे. उदाहरणार्थ, किराणा घराण्यातील अमीर खाँसाहेबांच्या गाण्याचं वेगळेपण जाणवत असे. अशी आणखीही उदाहरणं आहेत.  असं असलं तरी किशोरीबाईंनी जयपूर घराणा गायकीत केलेली नवीन गोष्टींची ‘अ‍ॅडिशन’ ही इतरांपेक्षा निराळी ठरते. त्यांचं गाणं चौकट कायम ठेवूनही वेगळं वाटतं. याचं कारण, हे करण्यासाठी किशोरीताईंनी जी पद्धत वापरली, त्यात आहे. ते करताना त्यांनी रागप्रस्तुतीकरणात जो रुक्षपणा होता, तो कमी केला. रागप्रस्तुतीकरणाला त्यांनी भावपूर्ण गाण्याची जोड दिली. स्वराबरोबरच त्यात भावालाही त्यांनी महत्त्व दिलं. मीरेची भजनं, उर्दू गझल असं खूप निरनिराळ्या प्रकारचं त्यांनी गायलं आहे. त्या इतक्या उच्चपदाला पोहोचल्या होत्या, की संगीतातील सर्व प्रकार त्यांनी हाताळले.

मोगुबाई कुर्डीकर या त्यांच्या आई व गुरूही. मोगुबाईंचं गाणं कर्मठ होतं. विशिष्ट मात्रेवर विशिष्ट अक्षर, आवर्तन भरण्याचा ठरलेला मार्ग, यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांचा अभ्यास प्रचंड होता. त्यांची एक मैफील मी प्रत्यक्ष ऐकली आहे. नंतरच्या काळातही त्यांच्या रेकॉर्डिग्ज ऐकल्या. समेला येण्याची, आवर्तन भरण्याची पद्धत, रागाची शुद्धता, त्याची मांडणी या गोष्टींना मोगुबाईंनी फार महत्त्व दिलं. त्या साऱ्या बाबी किशोरीताईंच्याही गाण्यात आल्या आहेतच, पण त्यात आणखी काही नवीन गोष्टींची भर त्यांनी घातली.

जयपूर घराण्यात जे राग सहसा गायले जात नसत, ते रागही किशोरीताईंनी गायले. उदाहरणार्थ, हंसध्वनी, रागेश्री हे जयपूर घराण्यात गायले न जाणारे राग त्यांनी गायले आहेत. त्यांचं आणखी एक वैशिष्टय़ सांगायचं म्हणजे, त्यांची तान अप्रतिम होती. त्यांच्या गाण्यात लयीशी झटापट नसते, तर लयीला सूक्ष्मपणे उचलून धरलेलं असतं. त्यामुळेच त्यांचं गाणं थेट हृदयाला भिडतं. बुद्धीला ते आवाहन करतंच, पण मनाच्या आतपर्यंत ते शिरतं. त्यांनी गायलेले बसंत केदार, नटबिलावल, खेमकल्याण नेहमीच आठवतात. राग ही संकल्पना किती मोठी आहे, हे त्यांचं गाणं ऐकलं की कळतं.

हिंदुस्थानी संगीतामध्ये गाणं संपल्यानंतर एक प्रकारची मन:शांती, समाधान अपेक्षित असतं. आपल्या संगीताचा हेतू हा श्रोत्यांना उत्तेजीत करण्याऐवजी शांतीची अनुभूती देण्याचा आहे. त्यामुळे तुमचं गाणं सुरू असताना एखाद्या जागेला प्रचंड टाळ्या मिळवणं हे अपेक्षितच नाहीये, असे त्यांचं मत होतं. त्यांचा हा विचार खरंच आचरणात आणायला हवा. त्यांनी स्वत: गाणं गायल्यानंतर लोकांना जो आनंद मिळायचा तो वर्णनातीत आहे.

गेली २५ र्वष मी कोलकात्याला आहे. तिथेही त्या काही वेळेस आल्या होत्या. तेव्हाही त्यांना ऐकलं होतं. एकदा असंच त्यांच्याशी बोलताना त्यांनी सध्याच्या संगीत शिक्षणाबद्दल खंत बोलून दाखविली होती. त्याविषयी त्या उद्वेगाने म्हणाल्या होत्या की, ‘हे काय चाललंय?’ गुरुपरंपरेत शिकण्याला त्यांच्या दृष्टीने महत्त्व होतं. संगीत महाविद्यालयांतील संगीत शिक्षणाविषयी त्यांचं मत प्रतिकूल होतं. ते त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलं होतं. गुरुकुल पद्धत संगीत शिक्षणासाठी आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या या मताचा विचार करणं, व तसे बदल करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.

उल्हास कशाळकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kishori amonkar songs kishori amonkar classical singer

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या