‘स्त्रीवादा’चं वारं जगभरात जसजसं वाहत गेलं तसतसा स्त्रीजीवनाचा, स्त्रीच्या मनोविश्वाचा आणि तिच्या क्षमतांचा, सामर्थ्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न अनेक स्तरांवर होऊ लागला. स्त्रीमुक्ती चळवळींचे प्रकल्प असोत, समाजशास्त्रीय अभ्यास वा संशोधन असो, लिंगसमभाव प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचं दस्तावेजीकरण असो, ठिकठिकाणच्या स्त्री-अध्यासनांनी आयोजित केलेली चर्चासत्रे आणि परिसंवाद असोत, किंवा स्त्रियांच्या सामर्थ्यांला वाव
देणाऱ्या व्यक्तींची प्रामाणिक धडपड असो; या सगळ्यांतून गेल्या शंभरेक वर्षांतली स्त्रियांची वाटचाल आणि स्त्रियांचं विस्तारत गेलेलं क्षितीज आपल्यासमोर आलं आहे. पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत भारतात भौतिक-सामाजिक सुधारणांची नांदी काहीशी विलंबानंच झालेली असल्यामुळे भारतीय स्त्रीला पारंपरिक, सामाजिक तसेच कौटुंबिक र्निबध झुगारून देण्याची संधीही उशिराच मिळाली.
स्वत:चं अवकाश निर्माण करण्यासाठी भारतीय स्त्रियांना करावी लागलेली धडपड, त्यांना द्यावा लागलेला लढा हा प्रामुख्यानं पुरुषसत्ताक पद्धतीविरुद्ध आहे.. स्त्रीला गौण स्थान देणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीविरुद्ध आहे. असं असेल तर प्रत्येक स्त्रीला आपल्या आईकडून, आजीकडून, घरातल्या, नात्यातल्या ज्येष्ठ स्त्रियांकडून आधार, पाठिंबा, स्वत:चं अवकाश निर्माण करण्याची प्रेरणा खात्रीनं मिळते का? मुलगी, पत्नी, आई, सून या भूमिकांशी आणि त्यांच्या बरोबरीनं येणाऱ्या कामांच्या ओझ्याशी भारतीय स्त्री सामाजिक, पारंपरिक रूढींनी बांधली गेली आहे, की तिचा त्यात काही प्रमाणात का होईना, पण स्वेच्छापूर्वक सहभाग आहे? स्वत:चं ठळक अस्तित्व निर्माण करणाऱ्या आजच्या स्त्रियांचं अस्तित्व अर्थपूर्ण आहे का? आणि ते कोणत्या अर्थानं आहे? स्वत:चं स्वतंत्र अवकाश निर्माण करणारी स्त्री मागच्या-पुढच्या पिढय़ांशी स्वत:ला कसं जोडून घेते? आपल्या असफल विवाहाबाबत या स्त्रीच्या मनात काय भावना असते? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘अ स्पेस ऑफ हर ओन’ या पुस्तकानं केला आहे. डॉ. मीना वैशंपायन यांनी केलेला या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘‘ती’चं अवकाश’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे.
लीला गुलाटी आणि जसोधरा बागची या दोघी मूळ इंग्रजी पुस्तकाच्या संपादिका आहेत. दोघीही स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक आहेत. त्रिवेंद्रममधल्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’नं १९९८ मध्ये स्त्रीजीवनाशी संबंधित विषयांवर कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात सहभागी झालेल्या आणि स्वत:चं स्वतंत्र अवकाश निर्माण केलेल्या स्त्रियांना आपली आई आणि आजी यांच्या आयुष्याचा संदर्भ घेऊन स्वत:च्या आयुष्याचा विचार करावा आणि आपलं कथन लिहावं असं सांगितलं गेलं होतं. ‘‘ती’चं अवकाश’मधल्या बारा कथनांपैकी आठ कथनं या कार्यशाळेत लिहिली गेली आहेत. या लेखनाचा पैस अधिक विस्तारण्याच्या उद्देशानं आणखी चार कथनं पुस्तकात नंतर समाविष्ट करण्यात आली.
नवनीता देव-सेन, वीणा मुजुमदार, झरीना भट्टी, हेमा सुंदरम्, लीला गुलाटी, मैत्रेयी कृष्ण राज, प्रीती देसाई, सरोजा कामाक्षी, विजया मेहता, सुशील नरुल्ला, जसोधरा बागची, मेरी रॉय अशा बाराजणींच्या या कहाण्या आहेत. स्वत:चा शोध घेण्याची, स्वत:ला व्यक्त करण्याची, स्वत:चं स्थान निर्माण करण्याची या प्रत्येकीची अंतस्थ धारणा समान असली, तरी प्रत्येकीच्या आयुष्याची वीण अगदी वेगवेगळी आहे. आईशी-आजीशी असलेलं प्रत्येकीचं नातं निराळं आहे, यशाच्या, आनंदाच्या प्रत्येकीच्या कल्पना भिन्न आहेत. आणि स्वत:चं अवकाश निर्माण करण्यासाठीचे प्रत्येकीचे प्रेरणास्रोतही विभिन्न आहेत. कुणाला माहेरच्या नात्यांतून बळ मिळालं, तर कुणाच्या वाटचालीत या नात्यांचा नकारात्मक प्रभाव आहे. स्त्रीची परंपरागत गृहिणीची भूमिका काहींना तिच्या स्वत:च्या प्रगतीसाठी जाचक वाटते, तर काहींना ती उदात्त वाटते. काहींना आधीच्या पिढीतल्या स्त्रियांजवळची शहाणीव, संयम, सहनशक्ती महत्त्वाची वाटते, तर पुरुषी वर्चस्वाला शरण गेलेल्या स्त्रिया पुढच्या पिढीलाही स्त्रीत्वाच्या बंधनात अडकवतात, असा काहींचा अनुभव आहे.
अर्थात या सगळ्याजणींच्या कुटुंबांत आधीच्या पिढय़ांमध्ये स्वातंत्र्याचा हक्क बजावणारी कुणी ना कुणी स्त्री आहे. तिच्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रेरणा या साऱ्या स्त्रियांना मिळाली आहे. या सगळ्याजणींच्या आयुष्यातलं आणखी एक साम्य म्हणजे बहुतेकींच्या कथनांमध्ये असफल विवाहांच्या कहाण्या आढळतात. घरातून, घरातल्या स्त्रिया आणि पुरुषांकडून झालेल्या छळाचा, अवहेलनेचा, वंचनेचा अनुभवही बऱ्याचजणींनी घेतला आहे. मात्र दु:ख, वेदना, अपमान, अडथळे या सगळ्याला सामोरं जात स्वत:ची वाट घडवताना त्यांचा जो प्रतिसाद उमटला आहे तो भिन्न आहे. याचं कारण या प्रत्येकीच्या कुटुंबाची घडण वेगळी आहे, प्रत्येकीभोवतीची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे आणि प्रत्येकीचं आत्मभान उजळवणाऱ्या वाटा वेगळ्या आहेत.
स्वत:चं अवकाश निर्माण करणाऱ्या या बारा कहाण्या फक्त ‘स्त्रियांच्या आत्मकथना’च्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत. त्या स्त्रियांच्या यशोगाथाही नाहीत. स्त्रीमुक्तीचा कर्कश स्वर या लेखनात नाही. आणि पुरुषप्रधानतेविरुद्ध दंड ठोकून उभं राहिल्याचा आविर्भावही त्यात नाही. हा त्यांच्या गतकाळाचा, घराण्याचा इतिहासही नाही. पण मातुल वारशाकडे वळून बघताना त्या- त्या कुटुंबाच्या वैशिष्टय़पूर्ण चौकटीचा, त्यावेळच्या समाजव्यवस्थेचा जो पुन:प्रत्यय या सगळ्या-जणींना आला, त्याचं दर्शन या कथनांतून घडतं. आजी आणि आईशी असलेल्या नात्यांखेरीज कुटुंबातले इतरही नातेसंबंध या स्त्रियांनी उलगडून दाखवले आहेत आणि स्त्रीजीवनाच्या संदर्भात त्यांचं विश्लेषणही केलं आहे. या सगळ्याजणींच्या बाबतीत शिक्षणाचं बळ त्यांच्या अवकाशाच्या निर्मितीसाठी फार महत्त्वाचं ठरलं आहे. आणि हा वसा त्यांनी आपल्या मुलींकडे अधिक निरोगी, अधिक निर्लेप स्वरूपात सोपवला आहे.
या सगळ्या आत्मकथनांमध्ये पारदर्शकता आहे, प्रांजळता आहे आणि स्वत:च्या आयुष्याकडे, आपल्या वारशाकडे त्रयस्थपणे पाहू शकणारी भेदक नजरही आहे. मुख्य म्हणजे मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र या विद्याशाखांनी आजवर केलेल्या अभ्यासाला आणि मांडलेल्या प्रतिमानांना व्यक्तिगत अनुभवांची जोड देत आजपर्यंत वगळल्या गेलेल्या भावनिक धाग्याला या सगळ्याजणींनी वर उचलून धरलं आहे. वेगवेगळ्या प्रांतांत, वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या या बाराजणींनी भारतातल्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांचाही अप्रत्यक्षपणे वेध घेतला आहे.
या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे स्त्रीजीवनाचा एकांगी विचार यातल्या कुठल्याच कथनांनी केलेला नाही. पिढय़ान् पिढय़ांच्या जाचकतेची सवय झाल्यामुळे तिचाच पाठपुरावा करण्याची भारतीय स्त्रियांमध्ये बव्हंशी रुजलेली मानसिकताही या लेखनांतून अधोरेखित झाली आहे. कुटुंबातली नात्यांची वीण, समकालीन समाजव्यवस्था आणि स्वत:चा अंतस्थ स्वर यांची सांगड घालताना उमटणारा छाया-प्रकाशाचा खेळ या पुस्तकानं वाचकांसमोर आणला आहे. प्रत्येकीचं आयुष्य, प्रत्येकीचे अनुभव वेगळे असल्यामुळे साचेबद्धपणा न येता सगळी कथनं वाचनीय झाली आहेत. कॅरोलीन एम. इलियट आणि ऑर्ली हॉशील्ड यांनी लिहिलेल्या अनुक्रमे प्रस्तावना आणि उपसंहारामुळे स्त्री-अभ्यासाच्या दृष्टीनं या पुस्तकाचं मोल वाढलं आहे. डॉ. मीना वैशंपायन यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिकेनं या पुस्तकाचा मराठी अनुवाद करून स्त्री-प्रश्नांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे एक महत्त्वपूर्ण साधन उपलब्ध करून दिलं आहे. तसेच एकूणच मराठी वाचकांना आपल्या अवकाशाची व्याप्ती आणखीन वाढविण्यासाठी मदतीचं बोट पुढे केलं आहे.
‘‘ती’चं अवकाश’ : संपादन- लीला गुलाटी, जसोधरा बागची, अनुवाद- मीना वैशंपायन, रोहन प्रकाशन, पृष्ठे- ३०९, मूल्य- रु. २५०.