|| डॉ. कांचनगंगा गंधे

‘वृक्ष-अनुबंध’ या पुस्तकात प्रा. नीला कोर्डे यांनी एकूण अठरा वृक्षांचं माणसाशी नातं कसं अतूट आणि पूर्वापार आहे, हे संदर्भासहित दाखवून दिलं आहे. वसंत या ऋतूराजाचा सखा आम्रवृक्ष; वसंत ऋतूच्या आगमनाची द्वाही फिरवणारा अन् भगव्या फुलांच्या बहरामुळे जंगल पेटल्यासारखा दिसणारा ‘दावाग्नी’ म्हणजेच ‘पळस’; लालभडक, पेल्यासारखी फुलं आल्यानंतर स्वत:मधला मध चाखायला लहान-मोठय़ा पक्ष्यांना बोलावणारा ‘शाल्मली’ वृक्ष; वसंत ऋतूची सांगता आपल्याकडच्या सुवर्णालंकारानी (पिवळ्या फुलांचे लोंबते घोस) करणारा ‘कर्णिकार’ म्हणजेच ‘बहावा’; सुगंधी फुलांचा ‘तिलक’; आपल्या वासाने मोहून टाकणारा ‘मधूक’ (मोह); मंद सुगंधाचा, लाल-पिवळ्या फुलांचा ‘अशोक’; सोन्याची कांती असलेला सुगंधी ‘सोनचाफा’; सूर्योदयाच्या वेळेस टपाटप गळणाऱ्या फुलांचा मधुगंधी ‘बकुळ’; फुलांच्या वासाने देवांनाही मोहून टाकणारा ‘पारिजात’; ज्याचे खोड घासल्यानंतर शीतल सुगंधाने मन आणि शरीरालाही प्रसन्न करणारा, भारतीय संस्कृतीचं  चिरंतन प्रतीक असलेला ‘चंदन’ वृक्ष; भारतीय संस्कृतीत पूजनीय मानलेला वटवृक्ष; अश्वत्थ आणि औदुंबर वृक्ष; वर्षां ऋतूतल्या पहिल्या जलधारांनी फुललेला, छोटी फुलं गोलाकार पद्धतीत रचून जणू पीतवर्णीय चेंडूसारखा दिसणारा पुष्पगुच्छ, मंद सुगंधाचा कृष्णसखा ‘कदंब’; शरद ऋतूत मंद वासाच्या, नाजूक फुलांचा वर्षांव करणारा ‘शारदगंध’ अर्थात ‘सप्तपर्णी’ वृक्ष; उन्हाचे हिरवे- पिवळे तुरे मिरवणारा ‘छायामन्येस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे’ असा ‘शिरीष’ वृक्ष; निसर्गावर उत्कट प्रेम करणाऱ्या प्राचीन कवींचे आवडते, विविध रंगात फुलणारे प्रेमपुष्प म्हणजेच ‘कोरांटी’चं झुडूप.. अशा वृक्षांची उद्बोधक माहिती ‘वृक्ष-अनुबंध’ या पुस्तकात आहे.

पुस्तकाच्या लेखिका प्रा. नीला कोर्डे यांचा संस्कृत, मराठी आणि अर्धमागधी भाषेचा अभ्यास किती सखोल व विस्तृत आहे, याचा प्रत्यय प्रत्येक पानागणिक येतो. प्राचीन संस्कृत साहित्य, वेदपूर्व काल, वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, आरण्यके, मनुस्मृति, पुराण, पूर्वापार चालत आलेली व्रतवैकल्ये, वाल्मिकींचे रामायण, व्यासांचे महाभारत, भास, भवभूति, बाणभट्ट इत्यादींनी लिहिलेले साहित्य व काव्ये, संस्कृत शास्त्रीय ग्रंथ, कालिदासांनी लिहिलेली नाटकं, ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग.. अशा अनेक साहित्यांतले संदर्भ देऊन वृक्षांचे महत्त्व प्रा. कोर्डे यांनी सांगितले आहे.

एकाच वृक्षाला असलेली अनेक नावं आणि ती तशी का दिली, याचंही स्पष्टीकरण पुस्तकात असल्यामुळे त्या-त्या वृक्षाची वैशिष्टय़े मनात खोलवर रुजतात. उदाहरणार्थ, ‘रक्तपुष्पा शाल्मली’ला ‘पिच्छिला’ (पिच्छ- सावरीचा बुळबुळीत डिंक), ‘पूरणी’ (पूरण करण्यास म्हणजे भेगेत भरण्यास उपयुक्त), ‘मोचा’ (सावरीतून वाहणारा डिंक मोच), ‘स्थिरायु’ (दीर्घायु), फळातल्या मऊ, रेशमी कापसामुळे ‘इंडियन रेड सिल्क कॉटन ट्री’ अशी अनेक नावं आहेत. ऋग्वेदातल्या ऋचांमुळे शाल्मली वृक्ष इतर यज्ञीय वृक्षांप्रमाणेच महत्त्वाचा आहे हेही सांगितले आहे.

पुस्तकात समाविष्ट केलेल्या इतर वृक्षांनाही विविध नावे असल्याचे संदर्भ आहेत. याशिवाय प्रत्येक वृक्षाचा उल्लेख कोणत्या साहित्यात आला आहे, याचा कालखंडानुसार उल्लेख आहे. त्यामुळे त्या काळची वृक्षराजी कोणती व किती समृद्ध आणि विविध होती, हेही लक्षात येते. एवढेच नव्हे, तर आपल्या पूर्वसुरींनी या वृक्षांना देव-देवतांचा मान दिला. अभिजात संस्कृत साहित्यातल्या अनेक संदर्भाबरोबर वृक्षांशी नातं सांगताना अर्वाचीन मराठी साहित्याचाही मागोवा प्रा. कोर्डे यांनी ‘वृक्ष-अनुबंध’मध्ये घेतला आहे. ग. ह. पाटील यांच्या ‘पाखरांची शाळा’ या बालपणी शिकलेल्या कवितेतून पिंपळाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही :

‘पाखरांची शाळा भरे पिंपळावरती।

चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती।।’

तसेच ‘श्री गुरुचरित्रा’त येणाऱ्या अध्यायांमधून दत्तात्रेयांचं औदुंबराशी असलेलं साहचर्य, औदुंबर माहात्म्य आणि कवी सुधांशु यांनी ‘असा माझा औदुंबर’ या कवितेतून केलेले औदुंबराच्या पाना-फळांचे यथार्थ वर्णन ‘वृक्ष-अनुबंध’मध्ये वाचायला मिळते. याशिवाय ग्रंथ, चित्रपट, म्हणी, वाक् प्रचार, भावगीतं यांमध्येही ज्या वृक्षांचे उल्लेख आहेत त्यांचाही संदर्भ पुस्तकात केला आहे.

‘वृक्ष-अनुबंध’मध्ये प्रत्येक वृक्षाची महती तर सांगितली आहेच; शिवाय त्याच्याशी निगडित असलेले संस्कृत श्लोक, सर्गही सांगितले आहेत. त्याचबरोबर त्यांचा मराठी अर्थही लगेच दिला असल्यामुळे हे पुस्तक समृद्ध झाले आहे. या पुस्तकात प्रत्येक वृक्षाविषयी पानागणिक श्लोक, वृक्षाचे शास्त्रीय नाव, इतर कोणत्या वृक्षांच्या बरोबरीने त्या वृक्षाचा आलेला उल्लेख, कालानुरूप संदर्भ, साहित्यिक व शास्त्रीय दृष्टिकोन आणि बुद्धी व भावना यांच्या मिलाफामुळे ‘वृक्ष-अनुबंध’ हे पुस्तक वृक्षाच्या दाट छायेप्रमाणेच शीतल, प्रसन्न आणि परिपूर्ण वाटते.

  • ‘वृक्ष-अनुबंध’- प्रा. नीला कोर्डे,
  • मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- २४६, मूल्य- ३०० रुपये.

 

kanchan.gandhe@gmail.com