|| डॉ. स्वाती कर्वे
विनोदी साहित्याच्या विभागात काही मोजक्या लेखिकांची नावे घेतली जातात. त्यामध्ये मंगला गोडबोले यांचे नाव आवर्जून घेतले जाते. प्रत्यक्षात मंगला गोडबोले यांनी विनोदी लेखनाच्या बरोबरीने कथा, ललितगद्य, बालसाहित्य, कादंबरी, एकांकिका, माहितीपर आदी विविध प्रकारचे लेखन सातत्याने केले आहे. त्यांच्या एकूण लेखनात कथालेखन महत्त्वाचे आहे. १९८० ते २०१६ या काळात त्यांचे १७ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. अजूनही त्यांचा हात लिहिता आहे. या दीर्घ काळातील मंगला गोडबोले यांच्या कथालेखनाची वैशिष्टय़े, वेगळेपण व एकूणच कथालेखनाचा पट प्रातिनिधिक स्वरूपात वाचकांसमोर ठेवणारा ‘कथायात्रा’ हा डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी संपादित केलेला कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १७ कथासंग्रहांतून केवळ १५ कथांची निवड करण्याची अवघड कामगिरी डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी उत्तम पार पाडली आहे.
‘कथायात्रा’ या संग्रहातील सर्वच कथा वाचनीय, वेगवेगळ्या जीवनानुभवांची अभिव्यक्ती करणाऱ्या आणि जाताजाता जीवनाचे मर्म सहजतेने अधोरेखित करणाऱ्या आहेत. लेखिकेचे व्यापक अवलोकन क्षेत्र, चिंतनाची, अनुभवाचा अन्वय लावण्याची, सूक्ष्मतेने व्यक्तिमनाचा वेध घेण्याची क्षमता वैविध्यपूर्ण जीवनानुभवांतूनच प्रामुख्याने व्यक्त होते. आजी आजारी असताना प्रथमच ऋतुप्राप्ती होणाऱ्या शाळकरी मुलीच्या भावविश्वापासून (‘पार्टी नंबर वन’) चर्चा, सेमिनार, परिसंवादातून विद्वत्तेपेक्षा आपला थाटमाट, भारी साडय़ा, आपल्या ‘लूक’ने श्रोत्यांना भारावून टाकणाऱ्या आजच्या पिढीतील तथाकथित विदुषीपर्यंत (‘गिरकी’) आणि कष्टकरी यशोदेच्या (‘न्याय’) व्यथेपासून अमेरिकेत प्रसारमाध्यमांत यशस्वीपणे काम करणाऱ्या प्रफुल्लाचे जीवन (‘बातमी’) किंवा कोणत्याच बाबतीत गांभीर्य न वाटणाऱ्या आजच्या पिढीतील तरुण मुलींच्या (‘बिग डील’) मानसिकतेपर्यंत जीवनाचा व्यापक पट या संग्रहातील सर्व कथांतून व्यक्त होतो. प्रत्येक अनुभवाला सूक्ष्मतेने जाणून घेत तितक्याच सहजतेने व्यक्त करण्याचे लेखिकेचे कौशल्य, कथालेखनावरची पकडही स्पष्टपणे जाणवते.
संग्रहातील पहिलीच कथा- ‘जीव’ वाचकांना अंतर्मुख करते. सुधीरला टूरवर असताना सकाळीच त्याचे गुरू प्रा. भाऊराव गेल्याची बातमी समजते. फोनवर बोलताना पत्नी नलू रडत असते. सुधीर टूर रद्द करून गुरूंच्या अंत्यदर्शनाला जातो. तेथे गेल्यावर त्याला जाणवते, की काही तासांतच जमलेल्या लोकांनी भाऊरावांना भूतकाळात जमा केले आहे. तसाच त्यांचा उल्लेख होत आहे. सुधीरला ते आवडत नाही. तो नाराज होतो. तो घरी पोचतो तर पत्नीची प्रसूती होऊन मुलगी झालेली असते. बायको खूश असते. तिच्या बोलण्यात फक्त मुलीचाच विषय असतो. सर्व जण बर्फीची मागणी करीत असतात. ‘जाणारा जीव’ आणि ‘येणारा जीव’ यांच्याविषयीच्या जाणिवेतील अंतर सुधीरला समजते. जाणाऱ्या जीवापेक्षा येणाऱ्या जीवाचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याचे त्याच्या लक्षात येते. त्यामुळे या कथेची प्रारंभीची जागा अर्थपूर्ण वाटते.
संग्रहातील अन्य कथा ‘स्त्रीकेंद्री’ आहेत. विविध वयोगटांतील, विविध सामाजिक स्तरांवरील स्त्रियांच्या अनुभवांना लेखिकेने अभिव्यक्त केले आहे. कथेच्या लहानशा झरोक्यातून स्त्रीच्या अस्तित्वाच्या अनेक पैलूंना प्रकाशित केले आहे. वृद्धापकाळातील एकाकीपणावर मात करण्याचा तोकडा प्रयत्न (‘वाळू’, ‘बोट’); कष्टकरी स्त्रीची काही सुखाचे क्षण मिळविण्याची धडपड (‘चांदण्या रात्रीतलं स्वप्न’); आजोबांना कोड असल्याने नातीचे लग्न जमत नसते. हा कमीपणा आजोबांना येऊ नये म्हणून नातीचे प्रयत्न (‘डाग’); आजच्या मुलींची स्त्रीविषयीच्या रूढ संकेतांना ओलांडून जाणारी मानसिकता (‘बिग डील’) अशा स्त्री-जीवनाच्या अनेक बाजू लेखिकेने साकार केल्या आहेत.
‘संदर्भ’, ‘बातमी’, ‘न्याय’ या कथा स्त्रीच्या अस्तित्वाला नवऱ्याच्या अस्तित्वाचा संदर्भ नेहमीच कसा असतो, तिच्या सुख-दु:खाची वा अस्तित्वाची स्वतंत्र जाणीव कोणालाही महत्त्वाची वाटत नाही, या जाणिवेच्या अनेक छटा व्यक्त करणाऱ्या आहेत. ‘न्याय’ कथेत सतत मारहाण करणाऱ्या नवऱ्याविरुद्ध यशोदा तक्रार नोंदवते. अतिशय गरीब असणारे तिचे वडील मुलीचा विचार न करता १०० रुपये जामीन भरून जावयाला सोडवात, तेव्हा यशोदेला आपली धडपड निष्फळ वाटते. ‘बातमी’ कथेत प्रफुल्लाच्या नवऱ्याचे निधन होते. त्याने तिचे आई, बाबा, भाऊ अस्वस्थ होतात. काही महिन्यांनी प्रफुल्ला भारतात येते आणि एकटय़ाने जीवन जगणे अवघड वाटल्याने आपण एरीकबरोबर दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगते. तिचा हा निर्णय कोणालाच आवडत नाही. एरीकविषयी साधी चौकशीही कुणी करीत नाही. तेव्हा प्रफुल्लाच्या मनात येते, ‘बाईच्या दु:खाला जी ‘न्यूज व्हॅल्यू’ आहे ती तिच्या सुखाच्या शोधाला नाही.’ ‘संदर्भ’ या कथेतील मैथिली पती वीरेनच्या मृत्यूनंतर त्याने स्थापन केलेली अकादमी पुढे चालविण्याचे ठरवते. पूर्वीप्रमाणे मित्र-मैत्रिणींमध्ये पार्टी, पिकनिकला जायचे ठरवते. परंतु वीरेन आता नाही, त्यामुळे मैथिली येणार नाही असे गृहीत धरून तिला परस्पर वगळले जाते. तिचा विश्वासू सहकारी परस नोकरी सोडण्याचे ठरवतो. स्त्री कोणत्याही सामाजिक स्तरावर जीवन जगणारी असो किंवा स्त्रीच्या जीवनाचे भौतिक संदर्भ वेगळे असले तरी प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वाची स्थिती-गती सारखीच असते, हे वास्तव या कथा दाखवतात.
‘समीकरण’, ‘पर्याय’ या कथा पती-पत्नी नात्याची अनाकलनीयताच व्यक्त करतात. कर्तृत्ववान, स्वत:चा लौकिक उभा करणारी स्त्री आधी कुणाची तरी पत्नी असते, नवरा बायकोचा सतत पाणउतारा करणार आणि बायको ते सहन करणार हे चित्र ‘समीकरण’ या कथेत आहे. तर ‘पर्याय’मध्ये गोकर्ण आजारी पत्नीची दिवसरात्र सेवा करीत असतो. ‘पत्नी असणे’ त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. तिच्या निधनानंतर जगण्याचा कोणताच पर्याय गोकर्णला मानवत नाही. पती-पत्नी नात्याची अनोखी वीणच ही कथा व्यक्त करते.
या संग्रहातील कथा काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या आहेत. या काळात जीवनाचे स्वरूप, नातेसंबंधांचे संकेत आणि श्रेयस-प्रेयसाच्या संकल्पना बदलून गेल्या. या बदलाचे भान ‘बोट’, ‘गिरकी’, ‘रस्ता’, ‘बिग डील’ या कथा देतात. काळाबरोबर बदलणारी जीवनमूल्ये या कथा व्यक्त करतात. ‘बच्चा’, ‘पार्टी नंबर वन’, ‘चांदण्या रात्रीतलं स्वप्न’, ‘बोट’ या कथा चाकोरीबाहेरील अनुभवचित्रण करतात.
डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी संपादन नेटकेपणे केले आहे. मंगला गोडबोले यांच्या समग्र साहित्याच्या सूचीची, त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांच्या सूचीची जोड संग्रहाला आहे. ‘सर्वसामान्यांच्या सामान्य जगण्याची आस्थेने घेतलेली नोंद’ ही संपादकीय प्रस्तावना संग्रहात निवडलेल्या कथांपुरती मर्यादित नसून मंगला गोडबोले यांच्या सर्वच कथालेखनाची व्याप्ती, वैशिष्टय़े, अंतरंगाचे विश्लेषण करणारी आहे. एक बाब नोंदवणे आवश्यक वाटते, ती म्हणजे या संग्रहातील कथा या १९८० ते २०१७ अशा दीर्घ कालावधीत प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कथेच्या प्रथम प्रसिद्धीची (नियतकालीक, वर्ष, महिन्यासह) संदर्भ नोंद देणे आवश्यक होते. तसेच कथांची प्रसिद्धीच्या कालानुक्रमे मांडणी आवश्यक होती. त्यातून काळाबरोबर बदलणारे जगण्याचे संदर्भ, संकेत, स्त्रीजीवन आणि त्याला समांतरपणे संवादी स्वरूपात लेखिकेचा विकसित होणारा दृष्टिकोन यांचा सलग पट साकार झाला असता. तरीही ‘कथायात्रा’ हा संग्रह मंगला गोडबोले यांच्या कथालेखनाचा परिचय करून देणारा आहे.
- ‘कथायात्रा: मंगला गोडबोले यांच्या निवडक कथा’, संपादन- डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी,
- नवचैतन्य प्रकाशन, मुंबई,
- पृष्ठे- २९६, मूल्य- ३५० रुपये.