पाश्चात्त्य संगीतसंज्ञांचा मूलभूत कोश

या प्रश्नाचं उत्तर मला हळूहळू त्यांच्या भेटींतून, अनेक भाषणांतून, लिखाणातून मिळू लागलं.

‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’

प्रा. रमा चोभे

दिवंगत डॉ. अशोक दा. रानडे हे हिंदुस्थानी संगीतजगतातील गाढे अभ्यासक, विचारवंत. त्यांनी अत्यंत निष्ठेने आयुष्यभर संगीतकला जोपासली व भरभरून विद्यार्थ्यांनाही दिली. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास या ‘संगीत परंपरेतील दुवा’ होण्याचे कार्य त्यांनी अखेपर्यंत केले. असे असताना आमच्या सुरुवातीच्या भेटीतच त्यांनी मला ‘‘स्टाफ नोटेशन पद्धती शिकण्यास सुरुवात कर,’’ असा सल्ला दिला होता. तेव्हा मला काहीच उलगडा झाला नाही. यानंतरही पुढे पाच-सहा वर्षांनी, ‘लहान मुलांना व्हॉयोलिन शिकवायचं आहे,’ असं मी सांगितल्यावर ‘‘सुझुकी पद्धतीचा अभ्यास कर,’’ असा सल्ला त्यांनी दिला. आपली भारतीय परंपरा इतकी प्राचीन, समृद्ध असताना त्यांना मला असं सांगावंसं का वाटलं असावं?

या प्रश्नाचं उत्तर मला हळूहळू त्यांच्या भेटींतून, अनेक भाषणांतून, लिखाणातून मिळू लागलं. ते नेहमी सांगत, ‘‘आपली परंपरा सोडायची नाही, पण आंधळेपणाने ती स्वीकारायची नाही. त्याचं शास्त्र तपासायचं, इतर परंपरांशी त्याची तुलना करायची. दुसरी परंपरा, संस्कृती अभ्यासायला लागल्यावर आपल्याकडे असलेल्या चांगल्या आणि वाईटही गोष्टींची जाणीव होते, सुधारणेस वाव राहतो व नवीन निर्मिती होऊ  शकते.’’

त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे (आताचा संगीत विभाग) प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर जगभरातील संगीत विद्यापीठांतून त्यांचे अभ्यासक्रम मागवून त्यांचा अभ्यास केला होता. त्यानुरूप भारतीय संगीताच्या विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार जगाबरोबर राहण्यासाठी काय शिकणे गरजेचे आहे, हे जाणून त्यांनी नवीन अभ्यासक्रम बनवला. त्या काळात मुंबईसारख्या ठिकाणी पाश्चात्त्य संगीताचा- ‘जॅझ’चा विशेषकरून चित्रपट संगीतावर चांगलाच प्रभाव दिसत होता. तेव्हा ‘हार्मनी’, ‘मेलडी’ यांसारखे शब्द मुळातून संकल्पना न समजून घेता सैलपणे वापरणे योग्य नाही, संकल्पना पटल्यावर आपण त्यावर बोलू शकतो, त्यातील काही भाग स्वीकारू शकतो व आपल्या संगीताशी त्याला जोडू शकतो, याची जाणीव झाल्याने त्यांनी पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास सुरू केला. त्यातूनच सर्व संकल्पना मूलभूत पातळीवरून समजून घेण्यासाठी ‘कोशा’ची गरज आहे असे त्यांना वाटले.

संगीताचं मूलद्रव्य ‘ध्वनी’ आहे. त्या ध्वनीच्या काय काय शक्यता आहेत, इतर संस्कृतींनी ध्वनीकडे कसे पाहिले आहे, त्याचा वापर कसा केला आहे, हे समजणे गरजेचे आहे. थोडक्यात, एक अभ्यासक म्हणून एका विचारसरणीला चिकटून न राहता बदलांना सन्मुख असणे, बदल होणे अपरिहार्य आहे हे मानणे, हे डॉ. रानडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते. ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ हे याच विचारधारेने सुमारे चार दशके त्यांनी केलेल्या अभ्यासाचे फलित आहे.

हा कोश लिहिताना त्यांनी ग्रीक, लॅटिन, इंग्रजी, इटालियन, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्कॉटिश, डॅनिश अशा दहा भाषांतील संज्ञांचा परामर्श घेतला आहे. समांतर अर्थाच्या मराठी संज्ञाही तयार केल्या आहेत. उदा. ‘Unison – स्वराष्टक भाव’, ‘Counter point – संहती गुंफण’, ‘Relative pitch – सापेक्ष तारता’! इतक्या भाषांतील संज्ञांविषयीच्या माहितीत स्वाभाविकपणे संगीताबरोबरच तिथल्या समाज व संस्कृतीचेही संदर्भ कोशात आले आहेत.

कोशात सुरुवातीला पाश्चात्त्य संगीताचा थोडक्यात इतिहास (ख्रिस्तपूर्व काळापासून आधुनिक कालखंडापर्यंत) नमूद केला आहे. त्यात ‘बॅरोक’, ‘क्लासिकल’, ‘रोमँटिक’ आणि २० व्या शतकापासून पुढचा ‘आधुनिक’ कालखंड अशा यातील ठळक टप्प्यांविषयी माहिती दिली आहे. त्या- त्या कालखंडातील महत्त्वाचे रचनाकार आणि त्यानुसार संगीत-घाटामध्ये होत गेलेले बदल यांची चर्चा केली आहे. विस्तारक्रिया, स्वरलेखन पद्धती व तिचा विकास, धर्मसंगीत, सिंफनी, सोनाटा ते जॅझपर्यंत अनेक संगीत आविष्कारांविषयी तपशीलवार नोंदी दिल्या आहेत.

‘साथसंगत’ (accompaniment) या विषयावर डॉ. रानडे यांनी लिहिलेली नोंद आवर्जून वाचण्यासारखी आहे. प्राचीन ग्रीक लिखाण ते पौर्वात्य देशांतदेखील धर्मसंगीत व नृत्यसंगीतात, सादरीकरणांमध्ये साथसंगतीची कल्पना कशी बदलत गेली याची वर्णनात्मक टीप त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ‘ऑपेरा’विषयी १४ पृष्ठांमध्ये अतिशय सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. ती प्रयोगकलेच्या सर्व शाखांच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी आहे. ‘संगीतात बसवलेले नाटक’ हा ऑपेराचा मुख्य अर्थ असला तरी ‘संगीत व नाटय़ यांच्या शक्तींचे संतुलन करणे’ हेच ऑपेराचे मुख्य वैशिष्टय़ राहिले आहे. ऑपेराचा विकासक्रम, अनेक रचनाकारांचे योगदान, त्यांचे विचार व वैशिष्टय़े यांची माहिती सविस्तर आली आहे. तसेच ‘नृत्यनाटय़’ व ‘संगीतिका’ यांतील साम्य-भेदही त्यांनी स्पष्ट केला आहे. ‘आवाज’ व ‘आवाज-जोपासना शास्त्र’ यांविषयीही तपशीलवार माहिती दिली आहे.

पाश्चात्त्य संगीतजगतात वापरली जाणारी वाद्ये, त्यांची उत्पत्ती, कारागिरी, त्यांच्या उत्क्रांती वा विकासाचे टप्पे, वाद्यवर्ग, वाद्यवृंदातील त्या वाद्याचे स्थान यांविषयीचे सविस्तर वर्णन कोशात आहे. विशेषत: व्हायोलीन व त्या वाद्यकुलातील वाद्ये, त्यांचे सार्वजनिक संगीतातील स्थान, कारागिरांची कु टुंबे व त्यांची वैशिष्टय़े, त्या वाद्यांच्या सांगीतिक शक्यता यांविषयीची नोंद आवर्जून वाचावी अशी आहे. अनेक प्रकारच्या वाद्यांबद्दल लिहिताना त्या- त्या वाद्यांची छायाचित्रेही परिशिष्टात दिसतात. स्वरालेख, लयचिन्हे, स्वरचिन्हे यांचे तक्ते व आकृत्याही कोशात आहेत.

याबरोबरच अनेक संगीत-घाट (फॉम्र्स), नृत्याविष्कारातील अनेक प्रचलित प्रकार, त्यासाठी वापरली जाणारी वाद्ये, संगीतप्रकार, लयछंद यांविषयीही सविस्तर लिहिले आहे. मिन्युएट, गॅवॉट, बूरे, कु राँत तसेच कंट्री डान्स यांसारख्या लोकनृत्यप्रकारांच्या नोंदी उत्सुकता चाळवतात. उदा. गॅवॉट ही फ्रान्समधील नृत्यशैली. हे नृत्य समलयीचे असते आणि लयखंडाच्या तिसऱ्या मात्रेवर नवीन ओळ सुरू होते.. अशा पद्धतीची माहिती अभ्यासकांना अत्यंत उपयोगी आहे.

काळाच्या ओघात पाश्चात्त्य संगीतातील काही संकल्पनाही बदलत गेल्या आहेत. परंतु डॉ. रानडे यांनी संदर्भासाठी अद्ययावत संदर्भग्रंथांचा वापर केल्याने कोशातील माहिती कालबा वाटत नाही. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत या कोशाचे काम पूर्ण होऊ  शकले नाही. हे अपुरे काम डॉ. चैतन्य कुं टे यांनी तितक्याच जबाबदारीने पूर्ण केले आहे.

आजच्या संगीताच्या अभ्यासकांमध्ये पाश्चात्त्य संगीतसंस्कृतीचे आकर्षण झपाटय़ाने वाढत आहे. सादरीकरणामध्ये ‘फ्यूजन’ (संगमी संगीत) करू पाहणाऱ्या कलाकारांचे प्रमाण वाढते आहे. त्या सर्वासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि एकंदरीत संगीत व्यवहाराकडे आस्थेने पाहणाऱ्या रसिकांसाठीदेखील हा संगीतकोश अत्यंत उपयुक्त आहे. भारतासारख्या देशात इतक्या साऱ्या भाषा बोलल्या जात असताना सर्वप्रथम मराठी भाषेत असा ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ लिहिला जावा, ही मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे!

‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’

– अशोक दा. रानडे / चैतन्य कुंटे,

पॉप्युलर प्रकाशन,

पृष्ठे-७६८, मूल्य- १५०० रुपये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi book paschatya sangeet sandhya kosh