scorecardresearch

अज्ञानाची धिंड ‘ढांग टीक, टाक टीक..’

हळूहळू ‘टांग टिक’चा नाद शिवार भारत एका शेतावर. तिथं जणू एखाद्या उत्सवाचं वातावरण आणि प्रसन्नता.

अज्ञानाची धिंड ‘ढांग टीक, टाक टीक..’

स्थळ : पठाण मांडवा, ता. अंबाजोगाई

वेळ : सकाळ

शिवार गर्दीनं फुललेलं. गर्दी नटलेली. उत्साहाची सर्वत्र सजावट. ‘आले, आले’चा हाकारा. पाठोपाठ सुवासिनी अन् कार्यकर्त्यांत लगबग. लहानग्यांच्या कुतूहलानं भरलेल्या नजरा रोखलेल्या. मी नमस्कार करीत उतरलो. हलगीचा नाद सुरू झाला. ‘ढांग टिक, टांग टिक, टाक टिक..’!  शंकर पाटलांची ‘धिंड’ आठवली. मनात म्हटलं, ‘गडय़ा, पाण्याच्या या प्रश्नाबद्दलचं तुझं अज्ञान, तुझ्या आजोळबद्दलचं तुझं अज्ञान, भवतालाबद्दलचं अज्ञान या सगळ्याचीच धिंड काढतायत की काय?’ हसू आलं. निघालीच धिंड. अज्ञानाशी रोज नव्यानं ओळख करून घ्यावीच की. तरंच पुढे सरकता येईल. मी सुवासिनींपुढे मान वाकवली. त्यांनी भरवलेल्या साखरेनं चित्तवृत्ती फुलवणारा गोड मुखरस तयार केला. जरा सरावत मी चालू लागलो माझ्या धिंडीत. आनंदानं. घराघरांतून गावच्या अरुंद गल्ल्या जिवंत करीत माणसं येतायत मागोमाग.

हळूहळू ‘टांग टिक’चा नाद शिवार भारत एका शेतावर. तिथं जणू एखाद्या उत्सवाचं वातावरण आणि प्रसन्नता. पक्षांचा किलबिलाट अन् वाऱ्याची सुखद झुळूक. ‘देऊळ चित्रपटातील कलाकार अभिनेते..’ वगैरे उद्घोषणा. सकाळची शाळा भरल्यागत मुलं रांगेनं बसलेली. बाकी गावकरी स्त्री-पुरुष, आबालवृद्ध सगळे आतुरतेनं वाट पाहत मातीत सप्पय बसलेले. ‘‘हे प्रसाददादा,’’ इरफान सुती झब्बा अन् पांढरा पायजमा घातलेल्या एका शिडशिडीत सुहास्यवदन माणसाशी मला भिडवीत म्हणाला, ‘‘ज्ञानप्रबोधिनीतर्फे प्रसाददादांची मोठी मदत आहे.

गावाला, तालुक्याला- म्हणजे सगळ्याच मराठवाडय़ातल्या तालुक्यांना.’’ प्रसाददादांनी हसत हातात हात घेतला. ‘‘नमस्कार, मी प्रसाद चिक्षे.’’ ज्ञानप्रबोधिनी म्हणताच माझे कान टवकारले. हो, अहो आमची शाळेतली खुन्नस! का तर, आमच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेला घुमट आहे म्हणून त्यांनीही त्यांच्या नव्या इमारतीला घुमट बांधले आणि तेही आमच्याहून उंच. म्हणजे त्यांचीच शाळा दिसावी! हा आम्हा पोरांचा ग्रह. काळ आपल्या अज्ञानावर हसायला शिकवतो हेच खरं.

प्रसाददादा शांत स्थानापन्न! कार्यक्रमाला सुरुवात झाली. समोरची रांगेतली पोरं बघून मला वाटलं, ही लेकरं का बसवलीत उगाच? एवढय़ात निवेदकानं सांगितलं की, ‘‘रुकैया शेख या सामाजिक शास्त्राच्या पदवीधर मुलीनं तिच्या मित्राच्या साथीनं विद्यार्थ्यांचं एक मूकनाटय़ बसवलंय, त्याचा प्रयोग आता सादर होईल..’’ मला धस्स झालं. म्हटलं आता अवघड आहे. ‘अभिजन’ म्हणून माझी अभिरुची वगैरे एव्हाना तयार झाली होतीच की हो पुण्यात राहून. मग?

तर बरं का, नाटक सुरू झालं. अगदी साधीच गोष्ट होती. गावामध्ये भरपूर पाणी असल्यानं बेदरकारपणे त्याचा वापर होत असतो. आपापसातील भांडणातून अपव्यय पराकोटी गाठतो अन् हातपंप कोरडा होतो. साधे, छोटे छोटे प्रवेश. पाण्याची हेळसांड दाखवणारे. पाणी भरायला आलेल्या बायका एक घागर विसळायला दोन घागरी पाणी सांडवतात, तर शेतकरी जनावराला बादलीभर पाणी पाजून हौदभर पाणी त्याला धुवायला सांडवतो. गावातला नवतरुण चार-चार वेळा त्याची फटफटी धूतो. असे विनोदाची पखरण असलेले प्रसंग. लहानग्यांच्या निव्र्याजतेनं नटलेले. मग दोन इटुकल्या प्रवेशतात अन् हातपंप झालेल्या लहानग्याच्या हातास झटू लागतात. तो हात काही केल्या खाली येत नाही. त्या विनंती करतात, रागावतात, चिडून त्या आडव्या हाताला लटकतातसुद्धा. पण छे! हातपंप निर्विकार. आडवा हात काही केल्या खाली येईना. असं कशानं झालं? जो तो एकमेकाला बोल लावू लागतो. शेवटी गाव एकत्र येऊन फटफटीवाल्याला धू धू धुतं. बिचारा रडू लागतो. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहून चटकन् एकजण ओंजळ धरून म्हणतो, ‘‘(मुद्रेनं) आरं लका पाणी आलं!’’ हातपंप या सगळ्याचा मूक साक्षीदार. खरं सांगतो, ‘प्रॉपर्टी’चा, एका निर्जीव वस्तूचा इतका समर्पक अभिनय मी आजवर पाहिला नव्हता. हातपंप झालेल्या पोरानं धमाल आणली. रुकैया अन् तिच्या मित्रांचं कौतुक केलं. हातपंपाला जाऊन मिठी मारली. गोड हसला मग तो. मी भाषणातून पोरांसाठी एका निबंध स्पर्धेची घोषणा केली. म्हटलं हे जे तुम्ही अनुभवताय ते तुमच्या भाषेत लिहा. ‘माझं श्रमदान’ हा विषय. मग श्रमदान झालं. एव्हाना शासकीय अधिकारीगण आला होता. त्यांना हात जोडून गावाला मदत करण्याची विनंती करून पुढे निघालो. ‘मानवलोक’ हे नाव अनेकदा ऐकलेलं. पण ते नेमकं काय आहे, हे जाणून घेण्याची कधी उत्सुकता दाखवली नव्हती. अनिकेतदादा लोहिया भेटले. माझ्या बालपणापासून जनांच्या मुखी रुळलेलं ‘मानवलोक’ म्हणजे लोहिया कुटुंबानं पिढीजात अंगीकारलेल्या समाजव्रताचं साधन. वेगवेगळ्या समस्यांशी गुपचूप भिडणारी ही संस्था माझ्या आजोळी आहे. वा! ‘ज्ञानप्रबोधिनी’, ‘मानवलोक’.. सगळेच जमलेत की ‘पाणी फाऊंडेशन’सह हा दुष्काळ हटवायला!

पुढे धावणाऱ्या गाडीवर माझंच चित्र पाहून चमकलो. ‘तूफान आलंया’ या आमच्या कार्यक्रमाचं पोस्टर होतं ते. मी आणि प्रतीक्षा लोणकर ‘मराठवाडा वीर’ म्हणून झळकत होतो त्यावर. ‘ही आणिक कशाला धिंड?’ असं मी पाहतोच आहे तोवर संतोष म्हणाला, ‘‘लई लक्ष वेधून घेतंय. हिरोहिरोनीचे फोटो पाहायला तरी गर्दी केली मानसांनी की सांगता येतंय. आन तुमी ते फोटो, सेल्फी काढू द्या लोकांना दादा. चर्चा होतीये तेवढीच.’’

‘‘संतोष शिनगारे!’’ इरफाननं माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचून ओळख करून दिली. तोंडाचा दांडपट्टा फिरवताना चेहऱ्यावरचं स्मित अन् आवाजाची पट्टी हलू न देणारा संतोष एका लयीत बोलतो. समाजशास्त्राचा पदवीधर असलेला संतोष इरफानसह ‘पाणी फाऊंडेशन’चा विभागीय समन्वयक म्हणून काम पहातो.

‘‘तुमी हाये न आता? जरा फिरुत गावोगाव. मागच्या खेपेला (पहिल्या वर्षी) आपन तिसरं बक्षीस आनलं व्हतं. आता तूमी फिरलात तर पयलं आनूत. जायभायवाडी, पळसखेडा, वाठवडा सगळी नंबरात येनारी गावंयत. आज आता धा गावं करूत.’’ मला धडकी भरली; म्हटलं, ‘आपलं काही खरं नाही!’ ‘‘मी जीवन! अन्नांनी पाटवलेला मानूस’’ – ‘वळू’तलं मी लिहिलेलं पात्रंच तर होतं हे. पुढाऱ्यालाही कामाला लावणारं. मला आवडलाच गडी. म्हटलं, ‘निघालीच आहे तर पाक सगळ्या कोपऱ्यास्नी फिरवून आनूत आता ही धिंड!’

गाडय़ा शेपवाडीत घुसल्या. पहिल्या वर्षीच्या स्पर्धेत गावानं बक्षीस मिळवलं होतं. विरोधही भरपूर झाला होता. पण गावातल्या पोरांनी, सरपंचांनी नेटानं काम मार्गी लावलं होतं. ‘ढांग-टिक टाक-टिक’ करीत गावातून शिवारात. कुंकवानं एव्हाना मळवट भरला गेला होता. उन्हानं एक तार स्वर धरला होता. गावात श्रमदान करताना धपापून मी वर पाहिलं. संतोष खटय़ाळपणे पाहत होता माझी त्रेधा. पटकन पुढे होत धपाधपा घाव घालत त्यानं मला पाटय़ा भरून दिल्या. वाटलं, ‘किती अवघड आहे हे काम? आपलं काय जातंय सांगायला? आपण जरा जपूनच बोललं पाहिजे गावकऱ्यांशी.’ एक आजोबा सतत ‘माझी विहीर बघा’ म्हणून मागे लागले होते. अखेर मला हाताला धरून घेऊन गेलेच. म्हणाले, ‘‘मागच्या वर्षी पोरांला ईरोद केला. हीर पाडायला घेतली हुती. साठ-सत्तर फूट जाऊनपन काय उपेग झाला न्हाई. पन यंदा या पोरांच्या कामामुळं हीर भरलीय. आवो शेततळं करायला घ्येतलं तर धा फुटावरंच पानी लागलं. तवा माजे डोळे उगाडले. आता या वर्षीच्या कामामदी श्रमदानाच्या कामाला माजी आर्दा एकर जागा  दिलीय पोरांला. जाऊंद्या म्हनलं गेली तर.’’ नागनाथ शेप अण्णा त्यांचं नाव. शहरालगत असल्यानं प्लॉट विक्री जोरात. अशा काळात स्वत:ची अर्धा एकर जमीन गावाला पाण्याच्या कामाकरिता देणारा हा आजोबा. डोळ्यांत पाणी आणून स्वत:च्या अज्ञानाची कबुली देत होता. मिळालेल्या ज्ञानाची किंमत चुकती करत होता.

गावात खाल्लेल्या औक्षणाच्या साखरेचा गोडवा मनात पाझरवत मी चढा घाटरस्ता न्याहाळत असता ‘येल्डा’ आलं. उंचवटय़ावरचं ऊसतोडणी मजुरांचं गाव. पाण्याअभावी फक्त खरीपाची शेती. रबीचा हंगामच नाही म्हणून मग ऊसतोडणीला जायचं असा परिपाठ. देवळात सभा झाली. मी हेऽऽऽ चेतवलं. नागनाथ आण्णांचीच गोष्टं सांगितली. ताज्या शिकवणीतून मिळालेल्या ज्ञानाची ताजी गोष्टं.

‘‘पंचेचाळीस दिवसांत माणशी सहा घन मीटर काम करायचं असा नियम आहे. गावच्या एकूण क्षेत्रानुसार मशीनच्या कामाचा आकार ठरतो. शोष खड्डे, वृक्ष लागवड ही कामंही लोकसंख्येच्या प्रमाणात. तीस टक्के श्रमदान पूर्ण केलं की मशीन मिळतं इखर कडून. २५० तास. मोफत! इंधन खर्चासाठी मात्र गावकऱ्यांनी लोकवाटा जमा करायचा. लोकसहभागाशिवाय इथं काहीही होणार नाही.’’- गाडीत इरफानी शिकवणी सुरूच होती.

एका गुरुवारच्या शूटिंगला शांतीलाल मुथा आले होते. इतकं नेमकं आणि परिणामकारक बोलले की, आम्ही उत्स्फूर्त टाळ्या वाजविल्या. आजवर लातूरमधल्या किल्लारीपासून जम्मू-काश्मीपर्यंत हर संकटसमयी इखर धावून गेली आहे. ‘‘आमीर, सत्यजित इतकं चांगलं काम करताहेत तर आपण त्यांना मदत केली पाहिजे, या भावनेतून मी या कामाशी जोडला गेलो. मी त्यांचं मागच्या वर्षीचं काम पाहिलं. हे खरं काम आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सगळ्यात मोठा लढा आहे. दुष्काळ हटवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे फक्त पाण्याचं नाही तर माणूस उभा करण्याचं काम आहे, मग मी मागे का राहू? या वर्षी इखर स्पर्धेतल्या प्रत्येक गावाला मशीन देईल.’’ शांतीभाऊंना ऐकणं हा एक निराळाच अनुभव आहे.

‘‘त्ये डोंगरावर आडव्या रेषा कायेत?’’ गुलफाम- माझा चालक सहकारी विचारत होता. ‘‘ते बरं का दादा, गावकऱ्यांनी खोदलेल्या सीसीटय़ाएत. (CCT : Continuous Contour Trenches) हा डोंगर त्यांच्या हद्दीत येत नाही तरी ‘येनाऱ्या पावन्याला बरं दिसावं’ म्हनून खोदल्यात त्यांनी हितं.’’

एकंदरीत डोंगराची उंची न रुंदी पाहून त्या उतारावर असं नक्षीदार काम करण्याची कल्पनाच मला दमवणारी वाटली. ‘हे माणसांनी केलंय ?’ डोळ्यांवर विश्वास बसू नये असं दृश्यं हो!

आणि पाहुणा सोडा, साधी एष्टी येत नाही. टेलीफोनची रेंजही फाटय़ावरूनच पसार झालेली. बरं गावसुद्धा बारा महिने वस्तीला नाही. सहा महिने मंडळी ऊसतोडणीला जाणार. ऐकूनच जायचं भय वाटावं असं ‘जायभायवाडी’! उस्मानाबाद जिल्ह्यतल्या धारूर तालुक्यातलं डोंगराच्या कुशीत लपलेलं छोटंसं गाव.

डॉक्टर सुंदर जायभाय हे बहुदा एकमेव उच्चशिक्षित. बीडला असलेलं आपलं इस्पितळ दोन महिने बंद ठेवून गाव पाणीदार करण्याचा विडा उचलून गावात ठाण मांडून बसलेले. गावची लोकसंख्या २५० च्या घरात, त्यामुळे श्रमदानाचं लक्ष्य आवाक्यातलं. मशिनचं काम मात्र डोंगराएवढंच अवघड. पाच मशीन येऊन धाप टाकत परत फिरल्या. अशात प्रसाददादा गावात आले. त्यांनी, ‘‘मशीन हटलं म्हणून आपण हटायचं नाही. आपण मशीनचं काम हातानी करू’’ असं आवाहन केलं अन् पेटलेच गडी. एकानं तर विक्रमच केला. ४५ दिवसांसाठी एका माणसाला सहा घनमीटर श्रमदानाचं लक्ष्य आहे. रामकिशन जायभाय नावाच्या बहाद्दरानं चार तासांत खणून काढलं ते. त्याचा सत्कार करताना मी म्हटलं, ‘‘तुम्ही खरे बाहुबली.’’ प्रसादादानंही शाबासकी दिली. त्यानं सुखावली माणसं. मटण भाकरीचं जेवण होतं गावाला. सगळे एकत्र जेवायला बसले. प्रसाददादा सोडून. मी म्हटलं, ‘‘दादा चला की..’’ तर म्हटले, ‘‘काम चालू असलेल्या गावांमध्ये पाणी आल्याखेरीज तिथं जेवायचं नाही असा माझ्यापुरता निश्चय केलाय. एकदा का पाणी आलं, की मात्र हक्कानं आवडीचं रांधून खायला घालायला लावणार आहे सगळ्यांना.’’ आवंढा आला. ‘‘मटण तिखटंय हो’’ म्हणत मी नाकासरशी डोळेही पुसून घेतले.

‘‘गावोगावी आव्हानं निराळी आहेत, पण त्यांना भिडणारी आमच्या धर्मराजसारखी माणसंही आहेत. त्यानं अहो कमाल केली. बैलांची झुंज लागली. जवळच श्रमकरी काम करीत होते. त्यांना धोका नको म्हणून ह्यनं झुंज सोडवली, पण एक बैल ह्य़ाच्या मागेच लागला.’’ प्रसाददादा सांगत होते. मला ‘वळू’च्या चित्रिकरणादरम्यानचा प्रसंग आठवला. एरवी शांत असलेला आमचा राजा ‘गाव मागे लागण्याच्या’ शॉटच्या वेळी बिथरला अन् एकदम कॅमेऱ्याच्या दिशेनं चाल करून आला. सुधीर पलसाने नावाच्या आमच्या धीरोदात्त कॅमेरामनने शांत सामोरं जात निभावून नेलं म्हणून वाचलो.

‘‘मग? पुढे?’’ मी विचारलं.

‘‘त्या बैलाला चुकवताना धर्मराज खड्डय़ात पडला. डोक्याला जबर मार लागला. सुंदररावांनी त्वरित उपचार केले आणि सक्तीची विश्रांती सांगितली. झाल्या प्रसंगानं हबकून म्हणा, गावाचा उत्साह कमी झाला. या गडय़ाला काही ते सहन होईना. बायकोला म्हणाला, ‘मला तिथं घेऊन चल.’ श्रमदानाच्या जागेवर जाऊन बसून काम करू लागला. हे पाहून लोक पिसाटून कामाला लागले.’’ दादाच्या चेहऱ्यावर कौतुक ओसंडून वाहत होतं. स्वरात अभिमान होता. भल्या पहाटे घरून निघून फत्तरातून पाणी काढायची ऊर्जा माणसांना देत उपाशीतापाशी वणवण करणारा हा मेणाहून मऊ  माणूस! मी पाहत राहिलो.

कोण आहेत ही माणसं? कुठल्या शाळेत शिकलीत? यांना अहंकार का नाहीत? येते कुठून ही करुणा? सत्यजित, अविनाश पोळ, धर्मराज, सुंदरराव, नागनाथ शेप आण्णा, संतोष, इरफान, आमीर खान, प्रसाद चिक्षे, शांतीभाऊ .. सगळी खुळीच म्हणायची की काय?

प्रश्नांनी ताल धरला.. ढांग टिक, टाक टिक, टाक टिक, टाक टिक.. अज्ञानाची धिंड निघत होती!

– गिरीश कुलकर्णी

girishkulkarni1@gmail.com

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या