‘नो इझम्’  काळाचे रहिवासी!

तंत्रज्ञानातील सततच्या बदलांमुळे आतापर्यंतच्या सर्व विचारसरण्या आज कुचकामी ठरल्या आहेत.

Noism Era
आज आपण सगळे ‘नो इझम्’च्या काळाचे रहिवासी आहोत!

तंत्रज्ञानातील सततच्या बदलांमुळे आतापर्यंतच्या सर्व विचारसरण्या आज कुचकामी ठरल्या आहेत. नव्या काळासाठी नव्या इझम्ची गरज आहे. परंतु आजच्या काळाचा वेग प्रचंड आहे. आणि जोवर गोष्टी प्रचंड वेगाने बदलत असतात तोवर कुठलंही स्थिर तत्त्वज्ञान जन्मणं अवघड असतं. त्यामुळे आज आपण  सगळे ‘नो इझम्’च्या काळाचे  रहिवासी आहोत!

राजकीय-सामाजिक भूमिका असणं हे कोणत्याही माणसासाठी गरजेचं असतंच. मग ती विचारसरणी कोणतीही असो. ही भूमिका, विचारसरणी येते कोठून? ती तुमच्या जगण्याविषयीच्या व्याख्येतून येते. तुमच्या आजूबाजूला कुठले लोक आहेत, त्यांचे कोणते विचार तुमच्यावर प्रभाव पाडतात, तुम्ही काय वाचता, जगण्याची कोणती पद्धत तुम्हाला जास्त आकृष्ट करते, तुमची वाढ कोणत्या वातावरणात झाली आहे, आजूबाजूची माणसे कशी बदलली, पुस्तके कशी बदलली.. या सर्वातून ती व्याख्या ठरत जाते. तुम्ही कुठल्या ‘इझम’च्या जवळचे आहात हे त्यावरून ठरतं. विचारसरणीने तुमच्या जीवनाची पकड घेण्यामागे ही प्रक्रिया घडत असते.

सामान्यत: सगळे इझम्स हे पाश्चिमात्त्य देशांत निर्माण झाले आहेत. या इझम्सना भारताच्या परिप्रेक्ष्यात खूप वेगळ्या पद्धतीने पाहावं लागेल. कारण भारतातील सामाजिक-राजकीय परिस्थिती ही पूर्णत: भिन्न आहे. भारतीय परिस्थितीत जातव्यवस्था हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथली सामाजिक संरचना घट्टपणे जातीच्या भोवती विणलेली आहे. तुम्ही काय काम करता, तेवढंच नाही तर जे काम करता ते इतरांपेक्षा कनिष्ठ की श्रेष्ठ, हे या जातीच्या मुळाशी आहे. ती कर्मावर अवलंबून असली तरी तिचे वहन मात्र जन्माने होते. त्यामुळे जातव्यवस्थेच्या अनुषंगाने या इझम्सकडे पाहावं लागेल. त्याचप्रमाणे इतरही भारतीय राजकीय-आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन या इझम्सचा विचार करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यानंतरचा भारतीय समाज एका रोमँटिसिझमने भारलेला होता.. जसा तो कुठल्याही नवीन जन्मलेल्या देशामध्ये असतोच. त्यादरम्यानचे राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद यासारख्यांचे चित्रपट पाहिले तर ही बाब सहज लक्षात येईल. त्यानंतर दोनेक दशकांनी मात्र विविध कारणांनी हा रोमँटिसिझम तुटण्याचा काळ सुरू झाला. तो तुटल्यानंतर काहीतरी नवं शोधणं गरजेचं होतं. आता पुढे काय, असा प्रश्न पडलेला हा काळ. त्यावेळी इथल्या सांस्कृतिक विश्वाला डाव्या विचारात त्याचं उत्तर सापडलं. परंतु यामध्ये कडवं डावेपण ते किंचितसाच डावीकडे झुकलेला उदारमतवादी दृष्टिकोन असे विविध स्तर होते. आणि अर्थातच याला भारतीय परिप्रेक्ष्य होता. आणि हे स्तर केवळ कलाकारांमध्येच नाही, तर सामान्य लोकांमध्येही होते. या स्तरांची सांस्कृतिक विश्वामधली उदाहरणं पाहिली तर एका बाजूला इप्टाची चळवळ, तर दुसऱ्या बाजूला सलीम-जावेद यांचे चित्रपट अशी विविध होती. अमिताभ बच्चन यांनी रंगविलेल्या ‘अँग्री यंग मॅन’ला प्रचंड व्यावसायिक यश मिळण्यामागचं कारणही हेच होतं. आपल्यापेक्षा आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा वरच्या स्तरावर असणाऱ्यांविरुद्ध बंड करणं शक्य आहे; त्यांच्याविरुद्ध लढून मी माझं स्वातंत्र्य मिळवू शकतो, असा विश्वास त्यातून मिळत होता. कलाकृती सामाजिक क्रांती घडवत नाही, पण समाजात असलेल्या खळबळीला चालना देण्याचं काम करू शकते. किंबहुना, समाजात असलेल्या अस्वस्थतेचं दृश्यरूप कलाकृती दाखवत असते. तेच या काळातही झालं.

या डाव्या विचारांचं अधिष्ठान समतेचं व व्यक्तिस्वातंत्र्याचं होतं. हा काळही समूहापेक्षा व्यक्ती महत्त्वाची ठरू लागण्याचा होता. व्यक्तीचे प्रश्न, तिचे स्वातंत्र्य यांची दखल घेण्याचा होता. त्यामुळे व्यक्ती व तिला नियंत्रित करणारी व्यवस्था यांच्यातील संघर्षांचे परिमाणही या साऱ्याला जोडलं गेलं. शिवाय तो काळ आजच्याइतका जलद नव्हता. जगण्याचा, अस्तित्वाचा ताण तेव्हा नक्कीच होता; पण तो ‘इतरांच्या तुलनेत माझ्या अस्तित्वाचा ताण’ असा नव्हता. तसेच माहितीच्या स्रोतांचा वेगही आजच्याइतका नव्हता. त्यामुळे भूमिका घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल होती. त्यासाठी अवसरही मिळत होता.

याचबरोबर आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधणं भाग आहे. गांधी-नेहरू-आंबेडकरांनी माणसामाणसांमधला भेदाभेद नाकारण्याला एक नैतिक अधिष्ठान दिलं. भेदाभेद करणं योग्य नाही, हे त्यांनी सांगितलं. एक प्रकारे समाजवादी मूल्ये रुजवण्याचाच हा प्रयत्न होता. स्वातंत्र्यानंतर त्याविषयीचे कायदेही करण्यात आले. या महापुरुषांचा किंवा त्या काळाचा महिमा असा होता, की वरवर पाहता हे सारं मान्य झालं. म्हणजे जाहीरपणे भेदाभेद करण्याकडे लोक धजताना दिसत नव्हते. पण खासगी आयुष्यात मात्र आपण हा भेदाभेद जपून ठेवला होता. जातीय भेदाभेद कमी करण्याचा एक उपाय पैसा हा आहे असं कालांतरानं लोकांच्या लक्षात आलं.

नव्वदच्या दशकात पैसा मिळवण्याच्या संधी (पूर्वीच्या तुलनेत) सर्वाना उपलब्ध झाल्या. त्यामुळे आपणही इतरांच्या खांद्याला खांदा लावून जगू शकतो याचं भान आलं. समाजातील खालच्या स्तराने पैशाचा उपयोग तुल्यकारक म्हणून, तर सामाजिकदृष्टय़ा वरच्या स्तराने मी इतरांपेक्षा किती जास्त मोठा आहे, हे दाखवण्यासाठी करण्यास सुरुवात केली. या साऱ्यामुळे भूमिका, आयुष्य जगण्याविषयीची व्याख्या हे सारं ऐहिकतेभोवती केंद्रित झालं. त्यामागे कोणतीही विचारसरणी नव्हती. कोणताही इझम नव्हता. याला भांडवलवाद म्हणावा की नाही याविषयीही शंका आहे. याचं कारण भारतातल्या सामाजिक गुंतागुंतीमुळे इथला भांडवलवाद हा जागतिक अर्थाने घेतला जातो तसा नाही. त्याचं स्वरूप वेगळं आहे. खरं तर जागतिक स्तरावरच्या सगळ्याच संकल्पना भारतीय संदर्भात बदलून वापरायला हव्यात.

गेल्या दोनेक दशकांमध्ये अशी परिस्थिती झाली आहे की केवळ पैसा असून भागत नाही, तर प्रदर्शनीय संपत्ती, इतरांना दिसू शकेल अशी सुबत्ता असणं गरजेचं झालं आहे. माझ्या वडिलांना किंवा आजोबांना बँकेत एफडी असणं पुरेसं होतं, ती इतरांना सांगायची आवश्यकता नव्हती. पण आता तसं नाही. आता तुमच्या संपत्तीचे प्रदर्शन करणं गरजेचं झालं आहे. या प्रदर्शनासाठी मग प्रतीकांची गरज जाणवू लागली आहे. त्यातून ब्रॅण्ड्स तयार झाले आहेत.

नव्वदच्या आधीच्या दशकांत ज्याच्याकडे पैसा आहे, त्याने तो चुकीच्या मार्गानेच मिळवलेला आहे, किंवा पैसा असणारा माणूस सर्व दोषांनी युक्तच असतो अशी समजूत होती. मात्र, मागील दोन दशकांत हे सगळं बदललं. पैसा हे एकमेव परिमाण झालं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला यशस्वी म्हटलं जाऊ लागलं आहे. सिनेमा क्षेत्राचा विचार करता शाहरूख खान हा या साऱ्या प्रक्रियेचं प्रतीक ठरतो. त्याने बंडखोरी करत पहिल्यांदा आपल्या संपत्तीविषयी बोलण्यास सुरुवात केली. आपल्याकडे किती बीएमडब्ल्यू आहेत, आपण कुठे राहतो, हे तो सांगू लागला. याचंच प्रतिबिंब त्याच्या सिनेमातही दिसतं.

या साऱ्या पाश्र्वभूमीवर असं म्हणता येईल, की समाजाच्या पायथ्याशी अभ्यासातून, अनुभवातून आलेलं तत्त्वज्ञान नसेल, जीवनाच्या ठोस व्याख्या नसतील, तर तो समाज एका कर्कश्शपणाच्या अवस्थेत जातो. तशाच काहीशा अवस्थेत आज आपण आहोत. तात्त्विक-वैचारिक खोली नसलेल्या या अवस्थेत उथळपणा येणं आणि त्याचा खळखळाट होणं हे स्वाभाविकच आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक राजकारण, तसेच विविध कारणांमुळे धर्म या संकल्पनेचं महत्त्व पुन्हा वाढलं आहे. धर्म जेव्हा जास्त महत्त्वाचा होतो, तेव्हा तो नेहमीच व्यक्तिवादाला विरोध करतो. त्यामुळे एकीकडे व्यक्तिवादाचे फायदे, तर दुसरीकडे धर्माला दिलेले महत्त्व असा हा काळ आपण अनुभवतो आहोत. आताचा दिसत असलेला ‘केऑस’ हा त्यामुळेही आहे.

हे सारं पाहता एक कुठलातरी नवीन इझम् विचारांती तयार होण्याची, (उदा. मार्क्‍सवाद जसा तयार झाला.) एक तत्त्वज्ञान तयार होण्याची, त्यातून एक चळवळ उभारण्याची आज गरज जाणवते आहे. त्याचं कारण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मार्क्‍सवाद किंवा याआधी अस्तित्वात असलेला कोणताही इझम् हे आजच्या परिस्थितीवरचं उत्तर नाही असं मला वाटतं. आज तीव्र गरज आहे ती नवीन इझम् तयार होण्याची; जो मार्क्‍सवाद किंवा भांडवलशाही यांच्याही पलीकडे जाणारा असेल. तंत्रज्ञानातील सततच्या बदलांमुळे आतापर्यंतच्या सर्व विचारसरण्या यापुढच्या जगात कुचकामी ठरणार आहेत. त्यामुळे वेगळं काहीतरी शोधून काढावं लागेल. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मार्क्‍सवाद जन्मला. सध्याचा काळ हा संगणक क्रांतीचा आहे. या नव्या काळासाठी नव्या इझम्ची आवश्यकता आहे. परंतु आजच्या काळाचा वेग प्रचंड आहे. आणि जोवर गोष्टी प्रचंड वेगाने बदलत असतात तोवर कुठलंही स्थिर तत्त्वज्ञान जन्मणं अवघड असतं. त्यामुळे नवीन कुठलंही तत्त्वज्ञान जन्मण्यासाठी आजचा आर्थिक-सामाजिक-राजकीय-तांत्रिक बदलांचा वेग थोडासा आटोक्यात येण्याची वाट आपल्याला पाहावी लागेल असं मला वाटतं. तोपर्यंत आपण सगळे ‘नो इझम्’च्या काळाचे रहिवासी आहोत!

अतुल कुलकर्णी -atul@atulkulkarni.com

शब्दांकन : प्रसाद हावळे 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Residents of noism era marathi article

Next Story
मराठवाडी लेणे
ताज्या बातम्या