जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर याच्या ४०० व्या पुण्यतिथीनिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचा शेक्सपिअरच्या विविधांगी नाटकांच्या, त्यातील कलावंतांच्या, त्याच्या नाटकांवरील समीक्षात्मक तसेच आठवणीपर पुस्तकांच्या, त्याचबरोबर शेक्सपिअरशी संबंधित व्यक्तिगत आठवणींचा धांडोळा घेणारा लेख..
गेल्या आठवडय़ातील त्यांच्या लेखाचा हा उत्तरार्ध..
लिअर आपल्या गोनेरिल, रेगन आणि कॉर्डेलिया या तीन मुलींना एकत्र भेटून आपला राजसंन्यासाचा बेत सांगतो. पण त्याची एक अट होती. ती म्हणजे- या मुलींनी आपले लिअरवर किती प्रेम आहे; त्यासाठी आपण काय करू, हे स्पष्ट करण्याची.
गोनेरिल, रेगन या दोघी सर्वस्वाचा त्याग करण्याची भाषा करतात. म्हणून त्यांना तो मोठमोठे प्रदेश, संपत्ती आणि घोडदळ इत्यादी देतो. तिसरी कॉर्डेलिया ही लिअरची सर्वात लाडकी. पण ती दांभिक नसल्यामुळे सांगते की, विवाहबद्ध मुलीच्या माता-पित्यासंबंधीच्या प्रेमाला काही मर्यादा पडणे स्वाभाविक आहे. त्या मर्यादेत आपण प्रेम करू. पण लिअरला हे न मानवल्यामुळे तिला काहीही न देता तो देशाबाहेर घालवतो. पुढे पहिल्या दोन्ही मुली त्याची सर्व स्वप्ने धुळीला मिळवतात आणि लिअर कफल्लक आणि वेडापिसा होतो.
आधार म्हणून एक मुलगा त्याच्याबरोबर असतो व त्याला लिअर ‘वेडा’, ‘फूल’ म्हणून हाक मारतो. हा वेडा अनेकदा अनाकलनीय बोलत असला तरी तोच सत्य बोलणारा आहे. निराधार बनलेला लिअर वनवासी जीवनाने हैराण झालेला असताना त्याला कॉर्डेलिया भेटते. ‘तूच खरे बोललीस..’ असे सांगून तो तिची माफी मागतो. बाप आपल्या अपत्यापुढे लीन होऊन माफी मागतो, ही कल्पना आणि ते दृश्य अलौकिक होते व आहे.
‘लिअर’ या नाटकासंबंधी माझा अनुभव सांगावासा वाटतो. बी. ए. ला असताना हे नाटक मला अभ्यासाला होते. मी रुईया महाविद्यालयात होतो. आम्हाला ‘लिअर’ नाटक शिकवणारे प्राध्यापक होते- फर्नाडिस. ते कवीवृत्तीचे. मनापासून शिकवत असल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय होते. ‘लिअर’चा विषय त्यांना हळवा करणारा असल्यामुळे वाढत जाणाऱ्या त्या शोकांतिकेमुळे ते भारावून गेले होते.
अखेरचा प्रवेश सुरू होताच लिअर येतो तो कॉर्डेलियाचे शव हातावर घेऊन. बेभान झालेला लिअर म्हणतो, ‘उंदरा-मांजरांना जीव आहे, पण तुला नाही.’ सर्व जगाचाच नायनाट व्हावा म्हणून लिअर जगाच्या अतीत असलेल्या शक्तीला सांगतो की, असा जबरदस्त दणका दे आणि ही पृथ्वीच पुरती भुईसपाट करून टाक.
लिअरचे हे संभाषण फर्नाडिस बोलून दाखवीत असताना त्यांना अश्रू आवरत नव्हते. हे पाहत व ऐकत असता माझे डोळे पाण्याने भरून गेले. हे माझ्या मनातून कधी गेले नाही. नंतर काही वर्षांनी फर्नाडिस झेविअर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले.
शेक्सपिअरने इंग्रजी वाङ्मय समृद्ध केलेच; पण नंतर त्यासंबंधी लिहिणाऱ्या क्विलरकुच, ब्रॅडली, ए. एल. राऊस, हॅजलिट इत्यादी अनेकांनी त्यात मोलाची भर टाकली. ग्रॅनव्हिल बार्कर हा प्रथम शेक्सपिअरच्या नाटकात काम करणारा नट. पुढे तो दिग्दर्शक झाला आणि त्याने लिहिलेले पुस्तक चांगलेच गाजले.
ब्रॅन्डिस हे डेनिश. त्यांनी त्यांच्या भाषेत शेक्सपिअरसंबंधी अत्यंत अभ्यासपूर्णरीत्या लिहिलेल्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतरित रूप तीन खंडांत आहे. त्या अभ्यासाला लेखकाच्या रसिकतेची आणि विद्वत्तेची जोड आहे. शेक्सपिअरचा काळ तसेच नाटकाच्या संहितेचा काळ लक्षात घेऊन त्यावेळच्या वातावरणाचे भान वाचकांना असावे, यावर त्यांनी भर दिलेला दिसेल. पुढे त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.
शेक्सपिअरच्या नाटकांच्या विषयांना देशकालाच्या मर्यादा नव्हत्या. त्यामुळे असे म्हणण्याचा प्रघात पडला की, ‘सर्व जग ही त्याची रंगभूमी होती आणि रंगभूमी हे त्याचे जग होते.’ लंडनमध्ये ग्लोब नाटय़गृहाचा तो एक मालक होता. त्या नाटय़गृहात लॅटिन भाषेत कोरलेले वाक्य अर्थपूर्ण आहे. त्याचा अर्थ असा की, ‘सर्व जग हे रंगभूमी आहे.’
शेक्सपिअरच्या जगभर पसरलेल्या रसिकांत नेल्सन मंडेला हे एक होते. रॉबिन या बेटावरील २७ वर्षांच्या कारावासात मंडेला आपल्या निजण्याच्या जागी शेक्सपिअरच्या समग्र साहित्याचा खंड बाळगत असत. ते त्याला रॉबिन बेटाचे बायबल म्हणत. त्याचे वाचन ते सतत करत आणि अनेक वेळा आपल्या सहकारी बंदिवानांना ते शेक्सपिअरच्या नाटकांतील भाग वाचून दाखवत. दरवेळी शेक्सपिअर आपल्याला काही नवेच सांगतो, असे ते म्हणत. मंडेलांकडील तो खंड लंडनच्या ब्रिटिश ग्रंथालयाने २०१२ साली वाचकांना पाहण्यासाठी ठेवला होता.
तथापि शेक्सपिअरच्या केवळ नाटकांचा विचार करून त्याच्या जीवनाची व साहित्याची पूर्ण कल्पना येत नाही असे ब्रॅन्डिस व अनेक समीक्षकांना वाटत होते. त्यामुळे ब्रॅन्डिस यांनी त्यांच्या पुस्तकातील दोन प्रकरणे त्याच्या सुनितांना दिली आहेत. ‘सॉनेट’चे मराठी ‘सुनित’ असे रूपांतर झाले. ‘सुनित’ हे साधारणत: एखाद्या व्यक्तीला उद्देशून लिहिले जाते. शेक्सपिअरने अनेक सुनिते लिहिली. त्यातील बरीच एका कृष्णवर्णीय स्त्रीला उद्देशून आहेत. ही स्त्री कोण, याबद्दल अनेकांनी बरेच लिहून ठेवले आहे. राऊस यांनी यासाठी अनेक वष्रे घालवली व शेवटी आपल्यालाच त्याचा शोध लागला असा त्यांचा दावा होता. पण नंतर स्टॅन्ली वेल्स या अभ्यासकाचा व राऊस यांचा बी बी. सी.वर वाद झाला. त्यात राऊस यांना माघार घ्यावी लागली व चूक कबूल करणे भाग पडले.
ब्रॅन्डिस यांच्या मते, लंडनमध्ये शेक्सपिअर राहत होता त्याच्या आसपास राहणारी मेरी फिटन या नावाची तरुण महिला ही शेक्सपिअरशी संबंधित होती व तीच ती कृष्णवर्णीय स्त्री (डार्क लेडी), असे त्यांनी म्हटले आहे. तिला कृष्णवर्णीय म्हटले असले तरी ती काळी नव्हती. इंग्रज स्त्री पुरुषांपेक्षा कमी गौर. काहीजणांनी म्हटले आहे की, ती धनिक होती. त्याचबरोबर गायन-वादनात पारंगत होती. ब्रॅन्डिस यांनी तिचे अनेक गुण वर्णन केले आहेत. ती व शेक्सपिअर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल त्यांना कसलाही संशय नाही.
पण त्या कृष्णवर्णीय स्त्रीचे गूढ अद्यापिही सुटलेले नाही. नाटककार बर्नार्ड शॉ याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण दिले. त्याने १९१० मध्ये ‘दि डार्क लेडी ऑफ दि सॉनेट’ हे छोटे नाटकच रंगभूमीवर आणले. शेक्सपिअरच्या विविध नाटकांतील वेधक वाक्यांचा शॉने या नाटकात सढळपणे वापर केला आहे. १९१६ साली शेक्सपियरच्या तीनशेव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शेक्सपिअरचे नाव देऊन राष्ट्रीय रंगमंच उभा करण्याची अनेकांची सूचना होती, आणि शॉ त्यातला एक होता. यासाठी त्याने नाटक लिहिले. तथापि चौदा साली पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे हा रंगमंच उभा राहिला नाही.
नाटकात असे दाखवले होते की, शेक्सपिअर कृष्णवर्णीय स्त्रीला भेटण्यासाठी अवतरतो आणि त्याची पहिल्या एलिझाबेथशी अचानक गाठ पडते आणि राष्ट्रीय रंगमंच उभारण्यासाठी तो राणीचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो.
या नाटकाची शैली शॉच्या खास वळणाची आहे. कृष्णवर्णीय स्त्री नक्की कोण होती हे आपल्याला पूर्ण माहिती असल्याचा दावा करणारा थॉमस टायलर तेव्हा शॉला दर दिवशी ब्रिटिश ग्रंथालयात भेटत असे. त्या अत्यंत कुरूप गृहस्थाचे शॉने वर्णन केले आहे. तो सांगत असे की, मेरी फिटन नावाची तरुणी कोण, याचा त्याने शोध घेतला व त्यावर पुस्तक लिहिले. ते पुस्तक त्याने शॉला वाचायला दिले. यातूनच कृष्णवर्णीय स्त्रीचे नाव पसरत गेले असेल. शॉला तो माणूस भेटत होता एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात. शेक्सपिअरचे निधन होऊन दोन शतके उलटली होती.
म्हणजे कृष्णवर्णीय स्त्रीचे गूढ किती जुने आहे, ते यावरून समजते.
कदाचित एखाद्या काल्पनिक स्त्रीचे प्रेमजीवन शेक्सपिअरने काव्यात रंगवले असावे. पण इतकी वष्रे ते गूढ टिकून आहे. या श्यामलेचा प्रवेश मराठी वाङ्मयातही झाला होता हे नमूद करणे आवश्यक वाटते. माधव ज्युलियन यांच्या दोन कविता आहेत.
‘श्यामाच म्हणू तुला का
श्यामल पोरी
रंभा परि रंभांत कशाला
हिमगौरी?’
दुसरी :
‘मी श्यामले बंदी तुझा
वंदी तुला अभ्यंतरी
तू दक्षिणा दे वा न दे
नि:शब्द मी सेवा करी’
विसाव्या शतकात शेक्सपिअरच्या नाटकांत काम करून ज्यांनी नाव कमावले आणि आपल्या अभिनयाने त्या नाटकांचे अंतरंग प्रेक्षकांना उकलून दाखवले असे काही नट व नटय़ा होऊन गेल्या. एलेन टेरी ही एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील सर्वागसुंदर आणि अत्यंत गुणी नटी होती. ती आणि अìवग या दोघांनी संयुक्तपणे अमेरिकेत शेक्सपिअरची नाटके करून उदंड लौकिक मिळवला.
एलेन टेरीचे शेक्सपिअरच्या नाटकांसंबंधी भाषणांचे सुंदर पुस्तक आहे. एक भाषण नाटकातील काही मुलांबद्दल असून ते चटका लावते. दुसरे आहे ज्युलियट आणि तिची दाई यांच्यातील संभाषणाचे. ज्युलियट रोमिओच्या पत्राची प्रतीक्षा करत असताना तिची लहानपणापासूनची आवडती दाई येते. ती दाई खेळकरपणाने ज्युलियटशी पत्राचा विषय काढण्यास विलंब लावत बसते. यात दोघींचे जे संवाद झाले आणि दोघी ज्या रीतीने वागत होत्या, ते सर्व एलेन टेरी अभिनयाद्वारे भाषणात दाखवत असे. आपण हे वाचत असताना रंगून जातो, तर ज्यांना तो अभिनय पाहता आला ते किती धन्य झाले असतील याची कल्पना केलेली बरी.
एलेन आणि बर्नार्ड शॉ यांच्यात शेक्सपिअर आणि एकंदर नाटके यासंबंधी बराच पत्रव्यवहार झाला. तो पुढे पुस्तकरूपाने उपलब्ध झाला होता. शॉने नंतर आपल्या एका नाटकात अभिनय करण्याचा आणि आपल्याशी विवाह करण्याचा बराच आग्रह तिला केला. पण एलेनने दोन्हीस दिलेला नकार कधी बदलला नाही.
गॅरिक हा नट शेक्सपिअरच्या नाटकांतील भूमिका करणाऱ्या बहुतेकांना मागे टाकत असल्याची तेव्हाच्या प्रेक्षकांची भावना होती. त्याचे पुस्तक नावाजले गेले तर नवल नाही.
रिचर्ड बर्टन, लॉरेन्स ऑलिव्हिए, जॉन गिलगुड या तिघांनी स्वतंत्रपणे व काही वेळा एकत्र एकाच नाटकात काम केले होते. रंगभूमीप्रमाणेच चित्रपट या प्रभावी साधनाचा त्यांनी कौशल्याने उपयोग केला. या त्यांच्या भूमिकांसंबंधी त्यांनी व समीक्षकांनी भरपूर लिहून वाङ्मयात मोलाची भर टाकली.
‘अॅिक्टग शेक्सपिअर’ हे गिलगुड यांचे पुस्तक उल्लेखनीय आहे. यात केवळ स्वत:बद्दल व तेही प्रशंसापूर्वक लिखाण नाही. आपली कोणती भूमिका उत्कृष्ट झाली आणि कोणती कमी दर्जाची, हे गिलगुड यांनी लिहिले आणि याचे कारण काय, याचीही चर्चा केली आहे. बर्टन, ऑलिव्हिए इत्यादींबरोबरच्या भूमिकांसंबंधी त्यांची हीच दृष्टी असल्यामुळे या लिखाणातील वैशिष्टय़ उठून दिसते. जॉन मिलर हे गिलगुड यांचे मित्र व नाटय़समीक्षक. त्यांनी गिलगुड यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेऊन ‘अॅन अॅक्टर अॅण्ड हिज टाइम’ या संग्रहात त्या समाविष्ट केल्या आहेत. शेक्सपिअरसंबंधीच्या वाङ्मयात हीसुद्धा महत्त्वाची भर आहे.
शेक्सपिअरच्या काळात आयुर्मान कमी होते. पन्नास वा पंचेचाळीस म्हणजे म्हातारपण होते. शेक्सपिअरचा शेवटचा काळ जवळ येऊ लागला होता. ब्रॅन्डिस सांगतात की, त्याआधीच शेक्सपिअरचे मन वैयक्तिक दु:खांनी खचले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘हॅम्लेट’ या शोकान्त नाटकाला शेक्सपिअरच्या मानसिकतेची जोड मिळाली होती. ‘हॅम्नेट’ या नावाच्या त्याच्या एकुलत्या एक मुलाचे थोडय़ाशा आजारात निधन झाले. मुलगा आणि शिवाय होणारा वारस गेला, हा दुहेरी धक्का होता. शेक्सपिअर हा अलौकिक कलावंत खरा; पण मालमत्ता, आíथक सुबत्ता याबद्दल तो कधीही उदासीन नव्हता. मृत्युपत्र करताना त्याने एका ठिकाणी ‘हॅम्नेट’ऐवजी ‘हॅम्लेट’ असे लिहिले होते.
त्याच्या डोक्यात तेव्हा मृत्यूचे विचार चालत आणि मॉन्टेन याचे पुस्तक त्याच्या टेबलावर दिसत असे. मृत्यू हे काय प्रकरण आहे? मृत्यू म्हणजे आपल्या जीवनाचा वाढवलेला पुढचा भाग आहे, की पूर्णत: नवे जीवन सुरू होणार आहे, की सगळ्यालाच पूर्णविराम? हे सॉक्रेटिसचे विचार होते. ‘टु बी ऑर नॉट टु बी’ या तोड नसलेल्या स्वगतातून शेक्सपिअरच्या तेव्हाच्या मानसिकतेची कल्पना ब्रॅन्डिस यांना येते. त्या स्वगताला सॉक्रेटिसच्या वचनाचा आधार आहे.
अशा या शेक्सपिअरवरील प्रेमाने मानसिकदृष्टय़ा बांधलेले जगभरचे असंख्य लोक त्याच्या नाटकांत गुंतून राहतात. दर २३ एप्रिलला त्याच्या आठवणी निघतात व जागृत होतात. अनेकजण स्ट्रॅटफर्डला जातात.
आंतरिक नाते जुळण्यासंबंधीची माझी एक आठवण सांगून संपवतो. पन्नासच्या दशकात किंवा साठच्या प्रारंभी असेल, मला रीगलच्या बाजूला जायचे होते. तेव्हा बोरीबंदरजवळची बस पकडून जाण्याचे ठरवून मी बससाठी उभा राहिलो. तेव्हा रांगा मोडून घुसण्याचा प्रघात नव्हता व तशी गरजही नव्हती. बस आली. लगेच मिळालेल्या जागेवर मी बसलो. प्रवासी येत होते. दोघा-तिघांना जागा न मिळाल्यामुळे उभे राहावे लागले.
माझ्या पुढच्या रांगेच्या बाकाला धरून एक गृहस्थ उभे राहिलेले बघितले. पाहतो तर ते फर्नाडिस प्राध्यापक. मी लगेच उठलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘सर, तुम्ही इथे माझ्या जागेवर बसा.’’ त्यांचा चेहरा फुलला. मी त्यांना सांगितले की, मी रुईया कॉलेजमध्ये बी. ए.ला तुमचा विद्यार्थी होतो. मग मी त्यांना ते ‘लिअर’ शिकवत असताना कॉर्डेलियाच्या मृत्यूच्या प्रवेशाची आठवण दिली आणि म्हणालो, ‘‘सर, ती आठवण मी कधी विसरलो नाही.’’ अगोदरच चटकन् सद्गदित होणारे प्रा. फर्नाडिस माझे बोलणे ऐकल्यावर चांगलेच सद्गदित झाले. माझी उतरण्याची वेळ आली. निरोप देताना ते म्हणाले की, ‘‘तू ज्या रीतीने वागलास आणि जुनी आठवण जागी केलीस, ते सर्व मीही कधी विसरणार नाही.’’
शेक्सपिअरमुळे जमलेले असे ते आंतरिक नाते.
गोविंद तळवलकर govindtalwalkar@hotmail.com