scorecardresearch

पत्रमत्रीची कथा

विशेष म्हणजे दोघांच्या घरातल्या लोकांना या मत्रीची माहिती असूनही त्यांनी कुणीच त्याला आक्षेप घेतला नाही.

एखाद्या कारणासाठी कुणी कुणाला पत्र लिहिणे हे आज जवळजवळ  इतिहासजमा झाले आहे. पत्र लिहायला वेळ नाही आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मेल,व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर सारख्या गोष्टी हाताशी असल्यावर कागदावर कोण कशाला काही लिहिल? या सगळ्या गोष्टी वापरायला अवघड वाटणारे आपल्या आई-वडिलांच्या पिढीतले लोकही पत्रापेक्षा फोनवरून चटकन संपर्क साधणे पसंत करतात, यातच सगळे काही आले. अर्थात पत्रव्यवहाराची वेगळी अशी मजा आहेच. आणि फोनवर बोलता येत नाहीत, सोशल मीडियावर पाठवणे कोरडे वाटते असे काही बोलायचे तर प्रत्यक्ष भेटीच्या खालोखालचा पर्याय अजूनही पत्र पाठवणे हाच आहे; तशी ती प्रत्यक्षात पाठवली जातात का हा मुद्दा वेगळा. तरीही अगदी आजची महाविद्यालयीन पिढी सोडली तर आपण बहुतेकांनी कधी ना कधी , कुणा ना कुणाला तरी, कुठल्यातरी निमित्ताने पत्र लिहिलेले असतेच. पत्रातून जवळची व्यक्ती जितकी कळते तितकी ती कधीकधी प्रत्यक्ष भेटीतूनही कळत नाही. कारण पत्रे ही जास्त खरीखुरी असतात.

..अशाच मित्राला पाठवलेल्या पत्रातून व्यक्त झालेल्या एका अगदी तरुण मुलीच्या पत्रांचा संग्रह ‘शकुनपत्रे’ या नावाने संस्कृती प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. दिगम्बर जोशी उर्फ दिगेश या तरुणाला शकुंतला (शकुन) उपासनी या पत्रमत्रिणिने पाठवलेली ही पत्रे आहेत. प्रा. विश्वास वसेकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. ही पत्रे ऑगस्ट १९४६ ते जून १९५० या काळातली आहेत. हे दोघेही कुमार साहित्य मंडळ या संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी. या कारणामुळे त्यांची ओळख झाली. मात्र दोघे सुरुवातीला पुण्यात असूनही त्यांची भेट झालेली नव्हती. त्यांनंतर शकुन ही काही कारणाने कल्याणला गेली आणि मग त्यांचा पत्रव्यवहार सुरु झाला.

हा काळ पत्रमत्रीच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता असा उल्लेख प्रस्तावनेत आहे. एकमेकांना न भेटलेल्या व्यक्तींतही पत्रमत्री होत असे. आजही सोशल मीडियावर आपले असे अनेक मित्र असतात, जे कधी भेटलेले नसतात ना भेटायची शक्यता असते. पत्रमत्री ही देखील याच्याच जवळपास जाणारी. असे अनेक पत्रमित्र – मत्रिणी एका व्यक्तीला असायचे. या दोघांनाही असे इतर मित्र-मत्रिणी होतेच. मग दिगेश आणि शकुन यांच्या मत्रीत विशेष काय? तर ती तरुण-तरुणीतली मत्री होती. ७०-७५ वर्षांपूर्वी अशी मत्री असणे हे अप्रूपच होते. विशेष म्हणजे दोघांच्या घरातल्या लोकांना या मत्रीची माहिती असूनही त्यांनी कुणीच त्याला आक्षेप घेतला नाही. उलट शकुनच्या कुटुंबीयांनी तिला प्रोत्साहनच दिले असा उल्लेख आढळतो. दिगेश आणि शकुन यांनीही आपल्यात भावा – बहिणीचे नाते असल्याचा उल्लेख वारंवार केला आहे. या मानलेल्या नात्यामुळेही गोष्टी काहीशा सोप्या झाल्या असाव्यात.

हे दोघेही त्या काळच्या मॅट्रिकचा अभ्यास करणारे. म्हणजेच विशीच्या आसपासचे असावेत. दोघांचेही आवडते लेखक वि. स. खांडेकर. दोघेही अति संवेदनशील स्वभावाचे. आणि लगेच मानसिक त्रास करून घेणारे. त्यामुळे काहीसा नकारात्मक सूर पुस्तकभर उमटत राहतो.  या पुस्तकात केवळ शकुनने लिहिलेली पत्रे आहेत. दिगेश जोशी यांनी आपल्या सगळ्याच पत्रमित्रांची पत्रे जपून ठेवल्याने ती उपलब्ध झाली आहेत. मात्र काही वर्षांपूर्वीच शकुनचा मृत्यू झाला असल्याने तिला दिगेशनी पाठवलेली पत्रे उपलब्ध झालेली नाहीत. त्यांनी लिहिलेली, पण न पाठवलेली २-३ पत्रे मात्र समाविष्ट केली आहेत. त्यामुळे शकुनचे व्यक्तिचित्र जसे थोडेफार सुस्पष्ट होते तसे दिगेशचे होत नाही. शकुन जे लिहिते त्यावरून त्याच्याबद्दलचा अंदाज येतो तेवढाच. या एकतर्फी पत्रांमुळे अनेक उल्लेखांचे संदर्भ लागत नाहीत. पात्रांची भाषा पुस्तकी आहे. ‘अभ्यासाचा पिंजरा’ यासारख्या उपमा आहेत, ज्या वाचणे आज सवयीचे राहिलेले नाही. सुरुवातीची पत्रे मॅट्रिकच्या परीक्षेची भीती, शाळेतल्या किरकोळ घटना, इतर मित्र-मत्रिणींवर टिप्पणी यापलीकडे जात नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेचा, गांधीहत्येचा उल्लेख आहे इतकेच. अर्थात, किशोरवयातील पत्रात यापेक्षा अधिक काय असणार? पण त्यामुळेच वाचक त्यात गुंतून राहत नाही.

नंतरच्या टप्प्यातील पत्रांत मात्र डांगेंचा प्रभाव दिसतो. समाजवादी विचारसरणीकडे असलेला शकुनचा कल दिसतो. ठरवून केलेले लग्न म्हणजे अंधारातली उडी याची जाणीव झालेली शकुन अस्वस्थ झालेली आहे. या काळातील तिची पत्रे अधिक भावपूर्ण आणि मनातील सारे काही सांगणारी आहेत. मानलेले भावा-बहिणीचे नाते कशाला, आपण मित्र आहोत हे मान्य करायला हवे असे त्या काळात प्रागतिक असलेले विचारही ती मांडते. मात्र याला दिगेशचा प्रतिसाद फारसा नसावा, कारण तिने दाखवला तसा आणि तितका विश्वास आपण तिच्यावर दाखवला नाही अशी कबुली त्यांनी पुस्तकाच्या शेवटी असलेल्या चिंतनात दिली आहे.. इतक्या जुळणाऱ्या विचारांची दुसरी मुलगी मिळणे अवघड हे लक्षात आल्यावरही आणि शकुनच्या भावाकडून लग्नाचा प्रस्ताव येऊनही प्रेमाच्या विचारांवर मात करणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटलेले आहे.

दोन सामान्य किशोरवयीन मुला-मुलीची ही मत्री त्यांच्या काळात क्रांतिकारकच म्हणायला हवी. मात्र या मत्रीची एकच बाजू आपल्याला दिसते. त्यामुळे त्याची वैशिष्टय़पूर्णता मर्यादित राहिली आहे, हे नमूद करायलाच हवे.

शकुनपत्रे’- संपादन विश्वास वसेकर,

संस्कृती प्रकाशन,

पृष्ठे – २३१, मूल्य – २२० रुपये

सीमा भानू

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shakuna patre book review

ताज्या बातम्या